स्त्रीदास्य : काल आणि आज – छाया बेले
भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध असा वारसा म्हणजेच, न्याय, समता व शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावं, आणि ते हजारो वर्षे टिकून राहाव ही अतिशय खेदाची बाब आहे.
शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे
भेदावर, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणं हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात म्हणावी लागेल. आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे. असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती अशी त्यावेळी मान्यता होती. त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते. स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला *गणिका* असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण आपल्या जमिनीचे आपल्या कुलात समान वाटप करणारी गणराणी. *आम्रपाली* सुद्धा अशीच एक गणराणी होती.
ती समानतेच्या लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचा निमंत्रण न स्वीकारता आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारून तिच्या घरी जेवण घेतलं.
स्त्रीही पूजनीय होती त्या काळात जन्माला येणारी मुले ही आईच्या नावाने ओळखली जात होती. त्या मुलावर आईचा अधिकार होता.कुंतीची मुले ही कौंत्येय किंवा कुंतीपुत्र या नावाने ओळखले जातात हे एक मातृसंस्कृतीचे ठळक उदाहरण होय.
कुटुंब प्रमुख महिला असायची त्यावेळी माणसामाणसात कुठलाही भेद नव्हता.
स्त्री ही जन्मदात्री, निर्माती आहे म्हणून आदरणीय होती. व सगळी सूत्रे सगळे अधिकार तिच्याकडे होते.
या काळातील स्त्रीचं वर्णन करताना
*’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध”*
या ग्रंथात *डॉ. यशवंत मनोहर* पुढीलप्रमाणे वर्णन करतात–
” इ. स. पूर्व तीन हजार वर्षापर्यंत एकूण जगाच्या पाठीवरील स्त्री मुक्त होती.
ती पाखरासारखे स्वच्छंदी होती. तिच्या पंखात स्वप्ने होती आणि स्वप्न पुढे मोकळे, असीम आकाश होते. दास्याच्या कोणत्याही बेड्या तिच्या पायात पडल्या नव्हत्या. तिला कोंड्यासाठी सोन्याचे पिंजरे निर्माण करायचे कोणाला सुचले नव्हते. तिचे मन वाऱ्यासारखे सर्व संचारी होते. तिची नजर निर्भय होती. ती स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशित ग्रहासारखी होती. तिच्या बोलण्यातून अत्तदिपत्वाचा गौरव चहूदिशांनी उधळला जात असे.
स्त्री ही स्वातंत्र्याची प्रतिमा शोभत होती. तिच्या शक्तीच्या बुलंद आविष्कारातून यावेळी तिचे दळदार माणूसपण बिनधास्त फुलत होते. त्या संपूर्ण माणूसपणाच्या सूर्य पौर्णिमेचा हा झगमगता कालखंड होता.
तिचा दरारा असा होता कि वाघ-सिंहानाही तिच्या शक्तीतुफानाचे कापरे भरले. तिचा आवाज एखाद्या अजिंक्य पराक्रमा सारखा जंगलातल्या काळोखात घुमत राही. आणि वातावरणात थरार भरून जाई.
संकटे तिच्यापुढे माना खाली टाकत. आणि दिशा नम्रपणे तिला सामोरे येत. शौर्याची गाणी गात तिच्या भरोशावर फुलांचे फुले निश्चिंत होते. त्यावेळी ती जीवनाची आधीनायिका होती. सूर्य तिच्या स्वातंत्र्याची द्वाही फिरवत उगवत असे. त्यावेळी तिचे स्त्रीत्व असे मुक्तायन झाले होते. तिचे पंख या वेळी कोणी कापले नव्हते. आणि तिच्या उड्डाणाची वाट पाहणाऱ्या आकाशाची कोणी अपहरण केले नव्हते. यावेळी सहासे फुलवीत चाललेला प्रवास होती. आणि या प्रवासाच्या वाटेवर कोणीही अवरोध निर्माण केले नव्हते. या वेळी ती सुंदर निसर्ग सुद्धा होती. आणि प्रकृती तिच्यातून कविता होऊन बोलत होती. ती स्वातंत्र्याचे स्वयंसिद्ध संविधान होती. ती निर्णयस्वातंत्र्याचा यावेळी पूर्ण उपभोग घेत होती. आपल्या पसंतीचे जगणे ती जन्माला घालत होती. मन मारण्याची तिला गरज नव्हती. ती स्वतःच या वेळी स्वातंत्र्याचा राग झाली होती. यावेळी पूर्णता स्वयंशासित माणूस होती.
शेतीचा शोध, कुटुंब आणि विवाह या गोष्टीने तिचे अत्तदिपत्व नष्ट केले .”
अतिशय समर्पक असं वर्णन यशवंत मनोहरांनी केले आहे.
पुढे नांगराचा शोध लागला आणि पुरुषाचं शेतीवर वर्चस्व प्रस्थापित झालं. त्याचबरोबर मूल जन्माला येण्याचा पुरुषाचा सहभाग असतो माणसाला असा बोध झाला आणि स्त्रीचे महत्व कमी होत गेले. पुढे विवाह, कुटुंब, धर्म, वर्ण जाती अशा संस्था निर्माण केल्या गेल्या. आणि हे सगळे टिकवून ठेवण्याकरिता स्त्रीला बंदिस्त व गुलाम करून ठेवणे आवश्यक होतं. त्या शिवाय ही व्यवस्था मजबूत होणे शक्य नव्हते.
हे सगळं साध्य करण्यासाठी स्त्रीचे महत्व कमी करून, तिला हीन दर्जाची ठरवणं आवश्यक होतं. म्हणूनच मग धर्मशास्त्रे निर्माण केली गेली. त्यातून स्त्रीवर अनेक आरोप करीत तिच्यावर अनेक बंधनांच्या बेड्यात अडकवले गेले. तिचे सगळे अधिकार काढून घेऊन मूल जन्माला घालण्यासाठी , घर नावाच्या कोठडीत कैद केले गेले .
तिला दृष्ट, पापी, स्वैर ठरवून स्वातंत्र्याच्या लायक नाही असा आरोप करून अनेक क्रूर कायदे तिच्यावर लादण्यात आले.
उदाहरणासाठी मनुस्मृति मधील *स्त्रियांचे धर्म* पान.क्र. १३४ . या नावाखाली स्त्रियासाठी सांगितलेले नियम इथे देत आहे.
*बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईने गृहातील एखादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.बाल्यावस्थेत पित्याच्या आधीन होऊन राहावे.तरुणपणी पतीच्या आज्ञेत असावे व पती मरण पावल्यावर पुत्राच्या समाधीने चालावे पण असते तिने कधीही स्वतंत्र होऊ नये.पिता पती किंवा पुत्र यास सोडून राहण्याची स्त्रीने कधीही इच्छा करू नये. कारण यांच्यापासून दूर राहणारी स्त्री दृष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुलास निंद्य करिते.पती जरी विरुद्ध असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. कुंड,उपकणीं इत्यादी भांडी घासून पुसून स्वच्छ ठेवावी. व खर्चाचा प्रसंग आला असता फार खर्च करू नये.पिता किंवा त्याच्या अनुमतीने चालणारा भ्राता ज्याच्या स्वाधीन करील तो जिवंत असेपर्यंत तिने त्याची सेवा करावी. व मरणानंतर त्याचे अतिक्रमण करू नये. वाग्दान समयी जे तिचे दान केले जाते तेच पतीच्या स्वामित्वाचे कारण होय ( अर्थात वाग्दानानेच ती पतिची वस्तू होते ) तिच्याशी विवाह करणारा पती तिला ऋतू समयी व समय नसताना नेहमी या लोकी सुख देणारा आहे, व त्याची आराधना केली असता तिच्या द्वारा स्वर्गांचा लाभ होत असल्यामुळे परलोकीही तोच सुख देत असतो.पती सदाचार असो की दुसऱ्या स्त्रीवर प्रेम ( इथे त्याचा व्यभिचार नाही तर प्रेम ठरते ) करणारा असो की विद्यादि गुणशून्य असो, तो कसाही जरी असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची सतत सेवा करावी.स्त्रियास दुसरा यज्ञ नाही, त्याच्या आज्ञेवाचून उपोषणादी नाहीत व व्रते ही नाहीत. तर ती आपल्या पतीची आनन्य सेवा करी ते तिच्या योगाने स्वर्गलोकी पूज्य होते.
( एकच स्त्री रजस्वला असल्यास किंवा जवळ नसल्यास दुसऱ्या स्त्रीच्या योगाने पतीची यज्ञादि क्रिया जशी होते तशीच स्त्रियांची भरत्या वाचून यज्ञ सिद्ध होत नाही. असा पूर्व वाक्याचा भावार्थ समजावा)पतीसह धर्माचरणाने संपादन केलेला जो स्वर्गादी उत्तम लोक त्याची इच्छा करणार्या साध्वी स्त्रीने जिवंत असलेल्या किंवा मरण पावलेल्या पतीचे येत्किंचितही अप्रिय करू नये. शुभ पुष्पे, मुळे व फळे यांच्या योगाने अल्प आहार करून देहास खुशाल क्षीण करून सोडावे. पती मरण पावल्यावर परपुरूषाची नावही घेऊ नये.मरणापर्यंत तिने क्षमायुक्त व नियमयुक्त होऊन श्रेष्ठ धर्म त्याची इच्छा करीत व पूर्ण ब्रम्हचर्य पाळून राहावे.
ज्या साध्वी स्त्री आहेत त्यास दुसरा पती करण्याविषयी कोणत्याही शास्त्रात सांगितले नाही.
आपल्या क्षत्रियादी दरिद्री हींन पतीस सोडून जी ब्राह्मणादी
किंवा श्रीमंत पतीचा स्वीकार करते ती लोकांमध्ये नींद्य होते.
व तिचा पूर्वी दुसरा पती होता असे लोक म्हणतात.
भर्त्यास सोडून परपुरूषाशी समागम करणारी स्त्री या लोकी निंद्य होते. व मेल्यावर ती शृगालयोनीमध्ये उत्पन्न होते आणि कुष्ठादी पापरोग तिला पीडा देतात. मनवानी देह याचे नियमन करून जी स्त्री कायिक वाचिक व मानसिक क्रियांचे आयोगाने आपल्या पती सोडून कधी राहत नाही ती भरत यासह संपादन केलेल्या लोकी जाते.
याप्रमाणे श्रीधर मरणाने स्त्री धर्माचरण आने वाणी व त्याचा निग्रह करून जी आनंदी मनाने पतीची सुश्रुषा करिते तिची या लोकी उत्तम कीर्ती होते व मरणानंतर पतीसह मिळविलेल्या स्वर्गादि लोकास ती जाते*
याच्याच सोबततच खालील ओळीत एक महत्त्वाचा नियम दिलेला आहे जो पुरुषांकरिता आहे…
पूर्वी मेलेल्या भार्येस अंत्यंकर्मामध्ये
अर्थात अग्नीत समर्पण करून गृहस्थाश्रमाकरिता पुत्र झालेला असो की नसो पुनर्विवाह करावा व विधीने पंचायत ज्ञानाचा त्या करू नये तर दुसर्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ती रोज करावे आयुष्याच्या दुसऱ्या भागात विवाह करुन गृहस्थाश्रमात धर्माचे अनुष्ठान करीत राहावे.स्त्रियांना संन्यासवृतीचा अधिकार नाकारताताना पुढील कारण सांगितले आहे.स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचे संस्कार वैदिक मंत्र शिवाय करायचे असतात.स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसते कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता वैदिक मंत्र उच्चारला तर पाप नष्ट होते ज्या अर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चारू शकत नाहीत त्या अर्थी त्या असत्य पापमय स्थितीत राहणाऱ्या आहेत.”
स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नसल्याने त्यांना संन्यासवृत्तीचा अधिकार नाकारला गेला. वेध शिकण्याचा अधिकार कोणी व का नाकारला ?
स्त्रियांपेक्षा अधिक पापी जगात दुसरे काहीही नाही.. पुरूषांना मोहीम करण्यासाठी परमेश्वराने स्त्रीयांच्या रूपात हडळी निर्माण केल्या आहेत.(४४६. महाभारत)
धर्मशास्त्राच्या पानापानांतून स्त्रीयांना अपमानीत, लाचार बनवणारे त्यांचं माणूसपण नकारणारे व आपली सत्ता, वर्चस्व कायम राहील असे कायदे, नियम
एवढ्या हिणकसपणे हे सगळे तयार केले गेले.
पशू पेक्षाही हीन दर्जा स्त्रीला देण्यात आला.
हे सगळे नियम नैतिकतेच्या सगळ्या पातळ्या पार करून तयार केले गेले आहेत.
मानव समुहातील एका गटाला जो मानव समुहाचा अर्धा हिस्सा आहे. त्याला एवढी अमानवीय वागणूक दिली गेली.
मातृसंस्कृतीत ज्या ज्या गोष्टींना प्रतिष्ठा होती त्या गोष्टी हीन अप्रतिष्ठीत ठरवल्या गेल्या..
उदा:
मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योनीरुपात उपासना केली जात होती.
मात्र धर्मशास्त्रांनी नरकाचे द्वार ठरवून टाकले.
तिचं चरित्र, शील, पवित्रता , सर्व फक्त योनीशुचितेशी जोडून तिच्या अस्तित्वाचा असा संकोच करण्यात आला.
तिला ज्ञानार्जन वर्ज्य करून आत्मविकास साधण्याच्या वाटा बंद केल्या. स्वर्ग नरक अशा गोष्टींची भिंती दाखवून तिच्या विचार करण्याच्या शक्तीला संपवले गेले. तिच्या वरील अन्यायकारक नियमांचे उदात्तीकरण करण्यात आले.
तिचे चारित्र्यहनन करणाऱ्या शिव्यांची निर्मिती हे सुद्धा तिला हीन ठरवण्यासाठी जाणीवपुर्वक विकृत मानसिकतेने केलेले आहे.
या कपटपुर्ण तयार केलेल्या नियमांचा ताराबाई शिंदे यांनी “स्त्री पुरूष तुलना” या ग्रंथात चांगलाच समाचार घेतला आहे.
*”एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रीयांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यपेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून आयुष्यभर अंधार कोठडीत रहावे त्या प्रमाणे बायका मेल्या म्हणजे दाढ्या मिशा भादरून यावत् जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे?एक बायको मेली म्हणजे दहाव्या दिवशी दुसरी करून आणावी असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे तो दाखवा बरे.?
* तुमचा जीव तुम्हाला प्यारा तसा स्त्रियांचा त्यांना नसेल काय?
* जशी तुम्हाला चांगली बायको हवी तसा तिला चांगला नवरा नको का?
दुर्गुणांची उत्पत्ती आधी आपल्या पासूनच झाली. मन मानेल तसे वर्तन करणे.. रांडा ठेवणे , आता रांडा कोण? या कोणी देवाने केलेल्या? तर तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रीया असतात
*ताराबाई शिंदे* यांनी अठराशे ब्याऐंशी या सालात व्यवस्थेचे ढोंग अशा शब्दांत उघडे पाडले.
साहित्याने स्त्रियाबाबतचा जो आकस बाळगला त्याचाही त्या समाचार घेतात.
धर्मशास्त्रात स्त्रियांचे जसे हीन तुच्छ वर्णन केले तीच परंपरा पुढे मनोरंजनत्मक साहित्याने चालविली.
अशाच स्त्रियश्चरित्र व अशा इतर ग्रंथासारख्या रंजनवादी ग्रंथातून स्त्रियांचे विकृत मानसिकतेतून केलेल्या चित्रणावर आसुड ओढले आहेत.
ताराबाई शिंदे सारखी एखादीच क्रांतीकारी, विचारशील महिला सोडली तर
इतर सगळ्याजणी एकविसाव्या शतकात ही हे गुलामीचे गाठोडे अगदी विनातक्रार वागवत आहेत.
हे संस्कार स्त्रियांच्या मनात एवढे रूजले की ते आपल्या भल्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत झाली.
एकविसाव्या शतकातही बिनदिक्कतपणे
आई कडून मुलीकडे चांगल्या संस्कारांची शिदोरी समजून गुलामीच्या बेड्या अडकवल्या जातात.
मात्र आपल्याला गुलाम करणारे विचार आपल्याला मुक्ती देऊ शकत नाहीत हे अजूनही स्त्रीयांच्या लक्षात येत नाही. महत्मा फुले, माय सावित्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे
आज शिक्षणाच्या वाटा मोकळ्या आहेत मात्र आपण आत्मविकास करू शकलो का हा चिंतनाचा विषय आहे.
आपल्यात स्वतंत्र विचार क्षमता विकसित झाली आहे का?
आपण स्वत:ला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व समजतो का ?
की एखाद्या जात धर्मातील “स्त्री ” समजतो ?
जाती धर्म स्त्रियांनी निर्माण केले नाहीत. या संस्थांनी स्त्रियांना गुलामच केले, मग या गोष्टीचा एवढा दुराभिमान का बाळगावा ?
याचा स्त्रियांनी विचार करायला हवा. वैचारिक प्रगल्भता, , निर्णय क्षमता, विकसित करीत आत्मोनत्तीवर लक्ष केंद्रित करायला हवे.आर्थिक परावलंबन हे एक गुलामीचे एक महत्त्वाचे कारण आहे.स्वावलंबी होत महिलांनी आत्मसम्मानाच्या जगण्याचा पुरस्कार करायला हवा.
धर्मकारण, राजकारण समाजकारण, याचा ताबा फक्त एकाच समुहाकडे रहावा या हव्यासापोटी स्त्रीला गुलाम स्त्री- पुरूष नैसर्गिक सहजीवनाचं विकृतीकरण घडवून आणले गेले.
हे सगळं कोणत्याही देवाने केलेले नाही तर माणसाने तयार केलेले नियम आहेत आणि हे माणसानेच ध्वस्त करायला हवेत.
स्त्रियांनी आपल्या जीवनात काही स्वतंत्र उदिष्ट ठेवून आत्मशोध घ्यायला हवा.
*”स्त्री ही जन्मत नाही तर घडविली जाते”* हे *सिमोन द बोहुआर* या रशियन लेखिकेचं वाक्य समस्त स्त्री जीवनाचा सार आहे.
” स्त्रीवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्या निकृष्टतेचे व दुरावस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.आजही हे चित्र पालटलेले नाही . ही बाबच खरी क्लेशकारक आहे.” हे थोर इतिहास संशोधक आ. ह. साळूंखे यांनी हिंदू संस्कृती आणि स्त्री या ग्रंथात नोंदवलेले मत स्त्रीयांच्या आजच्या परिस्थितीवर प्रकाश टाकते.
यावरून स्त्रियांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
अपमान, उपेक्षा, शोषण, यांची सवय झाली. हा अन्याय आहे असंही वाटत नाही. कारण वर्षानूवर्ष मनावर हेच बिंबविलं गेलंय.
हजारो वर्षांपासून अंगवळणी पडलेल्या गोष्टी जीवनातून वगळणं सोपं नाही त्या करिता ” भारतीय नारी ” हे गुलागिरीचं सोनेरी कवच फोडून बाहेर पडावं लागेल.
हा मार्ग सोपा नक्कीच नाही.
पंडिता रमाबाईंनी एकटीने या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून स्वत:च कर्तृत्व सिद्ध केले.
माय सावित्रीलाही या विकृत मानसिकतेने छळलं . मात्र त्यांचं उद्दिष्ट हे स्त्रीला मुक्त करण्याचं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीला माणूस म्हणून जगता यावे यासाठी आजीवन प्रयत्न केले. स्त्रीयांच्या हितासाठी अनेक कायदे केले.
सद्यस्थिती :
हे जरी खरं असलं तरी स्त्रीया जो पर्यंत गुलाम मानसिकतेतून बाहेर पडलेल्या नाहीत.
याची उदाहरणे पावलो पावली बघायला मिळतात.
उपास तापास नवस सायास स्त्रीयाचं करताना दिसतात.
नवरात्रीत दररोज एका नव्या रंगाची साडी नेसून त्यावर मॅचिंग दागीने घालायला मिळाले पाहिजे एवढंच धेय्य असतं.
साडी, दागिने, खाणं, पिणं मिळालं म्हणजे झालं . जन्मभर सेवा करायची, अपमान सहन करायचा. मार खायचा. हे सगळं सहन करणारीला मग चांगली म्हटलं जातं. आशिलाची लेक एवढा त्रास काढून नांदली वगैरे..
एवढं म्हणून घेण्यासाठी बायका सहन करीत जातात.
माहेरातूनही सांगितलेलं असतं की
” नांदून नाव कर नाहीतर मरून नाव कर मात्र परत फिरून येवू नकोस. बापाच्या पागोट्याची शान राख. ” ही सद्यस्थिती आहे. मग तिच्या पुढे दोन पर्याय असतात. एक सहन करणं, दुसरं जीव देणं.
नवरा म्हणजे देव , त्याच्या आधी जेवायचं नाही . गळ्यात मंगळसूत्र नसेल तर पाणी सुद्धा प्यायचं नाही.
नवऱ्याला अहो- जाहो म्हणायचं . नाव घ्यायचं नाही. उलटं बोलायचं नाही. प्रश्न विचारायचे नाहीत. पैशाचा हिशेब विचारायचा नाही.
हुंडा कमी म्हणून छळ . दररोज माहेरच्यांचा पाणउतारा.
हे सगळं तिला निमूटपणे ऐकून घ्यावच लागतं.
कारण आता माहेर परकं झालेलं असतं . पुढ्यात जे येईल त्याला तोंड देणं भाग असतं.
ग्रामीण भागातच नाही तर नोकरी करणाऱ्या मध्यम वर्गीय सुशिक्षितांच्या घरातही उच्चशिक्षित स्त्रीयांची हीच अवस्था आहे.
लहाणपणापासून होणाऱ्या संस्कारांनी त्यांना आधीच व्यवस्थेपुढे शरणागती पत्करायला लावलेली असते.
तिच्या शिक्षणाची किंवा तीची माणूस म्हणून काही मोल नसतं.
हेच आई पुढे मोठ्या अभिमानाने आपण कसा त्रास काढला यातून इथवर आलो. आज सगळे आपला आदर करतात हे आपल्या मुलीला सांगते व तू माझं नाव कर असं भावनिक आवाहन करते . असा हा वारसा पिढी दर पिढी चालत राहतो.
वरून सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत म्हणून ओरड केली जाते मात्र या कायद्याचा लाभ किती महिला घेतात.हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
सामाजिक दडपणामुळे या महिला कायद्यापर्यंत पोहचू शकत नाहीत.
हे झालं घरात राहणाऱ्या महिलांसाठी घराबाहेर पडून नोकरी , व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या पुरूषसत्ताक मानसिकतेला सामोरं जावं लागतं. सहकारी किंवा वरीष्ठाकडून सन्मानाची वागणूक मिळेलच असे नाही. काही वेळा त्यांच्या नैतिक -अनैतिक
इच्छा थोपण्याचाही प्रयत्न केला जातो. तिने ते धुडकावून लावले तर मग अडवणूक करणे , इतर कारणांसाठी त्रास देणे , ब्लॅकमेल करणे , टिंगल टवाळी करणे , चुकीच्या गोष्टी पसरवणे अशा गोष्टी केल्या जातात.
हे सगळं का होतं, तर याच्या मुळाशी तीला भोगवस्तू समजणारी पारंपारिक मानसिकता कारणीभूत आहे.
तिचं कर्तृत्व ,तिची बुद्धिमत्ता, विद्वत्ता यांच्याशी काही देणंघेणं नसतं . ती माणूस आहे याच्याशी तर दूरदूर पर्यंत संबंध नसतो. इथे फक्त तिचं शरीर हीच तिची ओळख असते. एकविसाव्या शतकात माणूस ही मानसिकता घेऊन जगतो ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे.
संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले असले तरी
महिलांना वारसाहक्क मिळत नाही. त्याकरिता व त्या अश्रीतासम जीवन जगतात
काही दिवसांपूर्वी metoo या द्वारे अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या शोषणाविषयी, अन्यायाविषयी बोलत्या झाल्या.
अनेकिंच्या मनात बराच काळ आत घुसमटत राहिलेलं याद्वारे बाहेर पडले.
हे सुरू असताना समाजमाध्यमातून त्यावर येणारी मतं चर्चा या आजही स्त्रीच्या बाबतीत पुरूषसत्ताक मानसिकतेत तसूभरही बदल न झाल्याच्या निर्देशक होत्या.
‘ ती आधी कशी काय तयार होते ? किंवा चांगल्या माणसाला बदनाम करतात या , दोघांच्या मर्जीने झालेलं असतं. ‘
याही पेक्षा अजून खूप खालच्या दर्जाची भाषा असायची.
हे असं का ? काम मागायला गेलं म्हणजे तिच्या जवळ फक्त शरीराचीच मागणी करायची असते का? इतर कोणत्याही क्षमता तिच्यात नसतात. तिचं काम बघून निवड का केली जाऊ नये ?
वरून समाज तिला दोषी ठरवून मोकळा . ही स्त्रीला दासी समजणारीच मानसिकता आहे.
चित्रपट किंवा मालिका मधून हेच विचार पुढच्या पिढ्यापर्यंत पोहचवले जात आहेत.
सहन करीत जाणारी, निर्णय न घेणारी दुसऱ्याच्या विचारांवर चालणार आदर्श सुन, शिकलेली स्त्री वाईट, चारित्र्यहीन दाखवली जाते. हे सगळं नवीन स्वरूपात जमाजमनावर बिंबविलं जात आहे.
खानदान की इज्जत, या व अशा संकल्पना अजून मजबूत करून तिच्या पायातील बेड्या मजबूत केल्या जाता आहेत. या संकुचित विचारांतून आपल्या समाजात आजही अॉनर किलिंगच्या घटना घडून येतात.
माणूस म्हणून आपण नेमके कुठे चाललोय यांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
स्त्री – पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत . शरीररचना ही वेगळी असणं हे सर्वच प्राणीमात्रांना प्रजननासाठी निसर्गानेच निर्माण केली आहे. त्यावरून कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरू शकतं नाही.
या वेगळेपणाच्या विचारामुळे स्त्री पुरुष दोघेही एकमेकांपासून दुरावले गेले आहेत.
एकाकी पणाचे शिकार झाले आहेत. यावर मात करण्यासाठी विवेकशील पुरुष मंडळींनी समतेवर आधारित समाज रचनेकरिता पुढाकार घ्यायला हवा . ही काळाची गरज आहे.
ही दास्यत्वाची – स्वामित्वाची भावना नष्ट होवून पुरुष जेव्हा तिचं माणूसपण मोकळ्या मनाने स्विकारेल तेव्हा समाजात अस्वस्थता उरणार नाही.
तो पर्यंत
स्त्रीदास्य टीकून राहील. सोबत सगळ्या शोषक संस्थाही !!
– छाया बेले,नांदेड
*संदर्भ*:
१) स्त्री पुरुष तूलना ( ताराबाई शिंदे)
२) स्त्री आणि हिंदू संस्कृती ( आ. ह साळूंके)
३) श्रीमनुस्मृति
४) हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
५) डॉ. आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध ( डॉ.यशवंत मनोहर )
६) निर्ऋती ( अशोक राणा)