प्राचीन भारतीय आरमार
डॉ.अशोक राणा,यवतमाळ.
( हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ ऑक्टोंबर १६५७ रोजी आरमाराच्या उभारणीचा प्रारंभ केला होता. म्हणून या दिवसाला ‘मराठा आरमार दिन ‘म्हणतात. या दिवसानिमित्त प्राचीन भारतीय आरमाराचा परिचय करवून देणारा हा लेख )
आरमार हे समुद्री युद्धासाठी आवश्यक असे एक प्रभावी साधन आहे. आपल्या देशांच्या सीमांचे रक्षण तसेच विदेशी व्यापारासाठी आवश्यक अशा जहाजांच्या संरक्षणाकरिता अनेक देशातील लोकांना आरमाराची उभारणी करावी लागली. जगातील जहाज बांधणीचा प्रारंभ साधारणपणे इ.स.पू.४०००च्या दरम्यान इजिप्तमध्ये झाला. त्यामुळे समुद्र प्रवासाला चालना मिळाली. प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास सिंधू संस्कृतीपासून प्रारंभ होतो. इ.स.पू.३२०० हा तिच्या समृद्धीचा काळ संशोधकांनी मान्य केला आहे. अर्थात,आजपासून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती अनेक अंगांनी बहरली होती. तिचा विस्तार आजच्या अफगाणिस्तानपासून हिंद महासागरापर्यंत तसेच पूर्व आणि उत्तर भागापर्यंत झाला असल्यामुळे ते त्या काळातील जगातील सर्वात अधिक मोठे साम्राज्य होते. सुसंबद्ध प्रगत शहरे,अनेक मजली विटांनी बांधलेल्या इमारती, जलव्यवस्थापनाचे विस्तृत जाळे, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था,जगातील इतर संस्कृतीपेक्षा अतिशय प्रगत असे धातुकाम,समुद्री व्यापारासाठी आवश्यक अशा होकायंत्राची निर्मिती आणि सुनियोजित व्यापाराचे जाळे,तख्ताबंद जहाजे आणि प्रशिक्षित नाविकदल ही या संस्कृतीची वैशिष्ठ्ये होती. त्यामुळे तिचा व्यापार पश्चिम आशिया,मेसोपोटेमिया,आफ्रिका आणि आणि बंदरे असलेल्या अनेक देशांपर्यंत पसरलेला होता. अगदी अमेरिकेपर्यंत या संस्कृतीतील जहाजे जाण्यास सक्षम होती.
ही संस्कृती व्यापारकेंद्रित संस्कृती असल्यामुळे तत्कालीन राज्यकर्त्यांनी व्यापाराला प्रोत्साहन व संरक्षण दिले असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे देशातील उत्पादन इतर देशांमध्ये विकण्यासाठी सिंधू संस्कृतीतील व्यापारी परदेशी जात असत. त्या काळात प्रवासासाठी समुद्रमार्ग हाच एक पर्याय उपलब्ध होता. आपला माल परदेशात जावून विकण्याकरिता निघालेल्या व्यापाऱ्यांना समुद्री चाचांचा उपद्रव असे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी युद्धनौका तैनात केल्या असणे स्वाभाविक आहे. अर्थातच त्या काळी आरमार उभारलेले असणार,यात शंका नाही. त्यामुळे प्राचीन भारतीय आरमाराचा प्रारंभ सिंधू संस्कृती पासून झाला असल्याचे म्हणता येते. या संस्कृतीतील लोकांनी मोठमोठी जहाजे बांधली होती. त्यामधून एकाच वेळी ५०० लोकांना महासागरामधून कोठेही वाहून नेण्याची क्षमता होती,असे प्रकाश चरण प्रसाद यांनी आपल्या ‘ Foreign Trade and Commerce in Ancient India’ या ग्रंथामध्ये म्हटलेले आहे.परमार राजा भोज यांच्या ‘युक्ति कल्पतरू ‘ या ग्रंथात नौकांच्या इतर प्रकारांसोबतच युद्धनौकांचाही उल्लेख आढळतो. त्याचा परामर्श पुढे आपण घेणार आहोतच.
या आरमाराचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नसले तरी इतर आनुषंगिक पुराव्यांच्या आधारे अभ्यासकांनी या वास्तवावर प्रकाश टाकला आहे. या संस्कृतीच्या लोकांचा व्यापार सुमेरिया व असिरिया अर्थात मेसोपोटेमिया या मध्य पूर्वेतील देशांसोबत असल्याचे तेथे आढळलेल्या नाणी व इतर पुरातत्वीय अवशेषांवरून सिद्ध होते. हा व्यापार इजिप्त तसेच ग्रीस या युरोपीय देशांपर्यंत वाढला होता,याचेही पुरावे उपलब्ध झाले आहेत. हरप्पाकालीन लोथल येथे आढळलेल्या बंदरावरून त्याला पुरातत्वीय पुष्टी मिळाली आहे.
लोथल येथील गोदी
लोथल हे गुजरातमधील सिंधूसंस्कृतीकालीन नगर असून जगातील सर्वात प्राचीन बंदर येथे उभारण्यात आले होते. ते अहमदाबाद जिल्ह्यात धंधुकाजवळ अहमदाबादच्या आग्नेय दिशेस सुमारे ८२ किलोमीटरवर असून भगवा व साबरमती या नद्यांमधील सपाट प्रदेशात खंबायतच्या आखातापासून १९ किलोमीटरवर सरगवाल या खेड्याजवळ वसले आहे. येथील अवशेष प्रामुख्याने एका टेकाडात मिळाले. या टेकाडाची उंची सहा मीटर असून भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने १९५४ ते १९६२ दरम्यान तिथे सलग उत्खनन केले. त्यानंतरही येथे पुन्हा १९७३ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यातून सिंधू संस्कृतीशी सादृश दर्शविणारे असंख्य प्राचीन अवशेष सापडले. त्यात एका सुबद्ध नगराची रूपरेषा दिसून येते. उत्खनित अवशेषांचा काल कार्बन १४ च्या आधारे इ.स.पू.२४५० ते १६०० या दरम्यान ठरविण्यात आला आहे. इ.स.पू.२३०० हा या गोदीचा काळ काही पुरातत्व संशोधकांनी निश्चित केला आहे.
लोथल येथे जहाजांकरिता बांधलेली एक कृत्रिम गोदीही सापडली आहे. अशा तऱ्हेची गोदी सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत यापूर्वी मिळालेली नव्हती. येथील गोदी साधारणतः समांतर द्विभुज चौकौनाच्या आकाराची असून तिची पूर्वेकडील लांबी २०९ मीटर, पश्चिमेकडील २१२ मीटर,दक्षिणेची ३४.७ मीटर व उत्तरेची ३६.४ मीटर होती. त्याचे क्षेत्रफळ साधारणतः २१४ x ३६ मीटर एवढे होते. भरतीच्या वेळी पाणी आत घेईपर्यंत गोदीचा दरवाजा उघडा ठेवण्यात येई आणि ओहोटी सुरू व्हावयाच्या आतच हा दरवाजा बंद करीत. या योगाने जहाजे आत येण्याची सोय होत असे. गोदीला लागूनच विटांचा एक धक्का बांधलेला होता. गोदीच्या पुराव्यावरून लोथलपर्यंत प्राचीन काळी समुद्र असला पाहिजे, असे काही तज्ञांचे मत आहे. त्यावरून लोथलचे रहिवासी नौकानयनात कुशल असावेत आणि तिथल्या बंदरातून परदेशाशी व्यापार चालत असे, असा निष्कर्ष काही संशोधकांनी काढला आहे. परंतु लोथल हे बंदर होते आणि तिथे आढळलेली गोदी हे त्याचे स्पष्ट द्योतक आहे, हे मॉर्टिमर व्हीलर, एस्. आर्. राव आदी पुरातत्त्ववेत्त्यांचे मत लॉरेन्स एस्. लेश्निक यांसारख्या संशोधकांना मान्य नाही. त्यांच्या मते हा पाण्याचा बांधीव तलाव असावा.
लोथल हे बंदर होते किंवा नाही,याविषयी संशोधकांमध्ये मतभेद असले तरी भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील अनेक पुरातत्वीय स्थळी बंदरे असल्याचे निष्पन्न झाले आहे. १९५४ ते १९५८ या दरम्यान समुद्र किनाऱ्यावरील कच्छ,काठीयावाड तसेच दक्षिण गुजरातमध्ये झालेल्या सर्वेक्षणात नदीच्या मुखाजवळ सिंधुकालीन बंदरे आणि हरप्पा संस्कृतीतील वसाहती असल्याचे दिसून आले. कच्छच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर तोदिओ येथे छोटेखानी हरप्पा बंदर आढळले आहे. तेथे बोटी ठेवण्याकरिता गोदाम उभारण्यात आल्याच्या खुणा दिसतात.
त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीमधील मुद्रा तसेच मृद्भांड यावर समुद्री नौकांच्या प्रतिमा आढळलेल्या आहेत. त्यामुळे प्राचीन भारताच्या समुद्री व्यापाराच्या वास्तवावर प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन भारतीय आरमाराच्या खाणाखुणा दिसून येतात.
सिंधू संस्कृतीमधील नौकाचित्रित मुद्रा व मृद्भांड
मोहेंजोदारो येथील उत्खननात शंखजिरा दगडातील मुद्रा आढळली असून तिच्यावर नौकानयनाची प्रतिमा चित्रित केलेली आहे. अर्नेस्ट जे.एच.म्याके यांनी तिचे संशोधन केले असून ती दोन तुकड्यात विभागली गेली आहे. या आयताकार मुद्रेवर अपूर्ण अवस्थेतील आकृतिबंध रेखाटलेला आहे. तिच्या मागील बाजूस ओबडधोबड खरवडलेल्या स्थितीतील एकमेकींवर आच्छादित रेषा असून वरील बाजूस नौकेचे स्पष्ट स्वरूप दिसून येते. त्यावरून सिंधुजनांच्या नौकानयन क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन होते. सिंधू नदीवरून आपल्या सामानाची ने-आण तसेच प्रवासासाठी ते लोक नावेचा तसेच जहाजाचा वापर करीत असत, असा निष्कर्ष त्यामधून निघतो. आजही तसा वापर तेथील लोक करीत आहेत.
1 | एका मृद्भांडावरसुद्धा नौकेचे ठळकपणे केलेले चित्रण आढळते. या भांड्याच्या त्रिकोणी तुकड्यावर ज्या बोटीचे चित्रण केले आहे,ते कोरीव कलेचा उतृष्ट नमुना नसला तरी त्यातील आकृतीबंधामध्ये विविधता आहे. त्यामधील बोटीला काटेकोरपणे पुढील बाजूस वाक दिलेला आढळतो. साधारणपणे सर्वच बोटींमध्ये आढळणारी वैशिष्ठ्ये या चित्रात आहेत. प्राचीन मिनोअन मुद्रांमध्ये तसेच इजिप्तच्या राजवटीच्या आधीच्या भांड्यांमध्ये आणि सुमेरच्या दंडगोलाकृती मुद्रांवरही अशीच बोटींची आकृती दिसून येते. असिरीयन संस्कृतीच्या उदयाच्या काळात अशा प्रकारच्या बोटी वापरात होत्या. लूव्र वस्तुसंग्रहालयातील इजिप्तच्या प्रागैतिहासिक काळातील ‘गेबेल-एल-अरक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चाकूच्या हस्तिदंती मुठीवर शिल्पित केलेल्या बोटीशी साधर्म्य सांगणारे चित्रण सिंधू संस्कृतीतील मातीच्या मुद्रांवर आढळते. |
या मुद्रांवर शिडाची जहाजे आणि त्यांच्या मागील रुंद भाग स्पष्टपणे दिसून येतो. इजिप्तच्या आदिम काळातील बोटींसारखे तसेच दक्षिण बॉबिलोनियातील दलदलीतून जाण्याकरिता वापरात येणाऱ्या बोटींच्या सारखे कुशल स्वरूप या बोटींचे आहे. तिच्या मध्यवर्ती भागात एक झोपडी किंवा पूजास्थान दिसून येते. मोहेंजोदारो येथे आढळलेल्या एका मुद्रेमध्ये एक मनुष्य पुढे बसून बोट चालविताना दिसून येतो. त्याचे मस्तक त्यातून नाहीसे झाले असले तरी बोट चालविताना त्याची होणारी हालचाल आपण समजू शकतो. मुद्रा कोरणाऱ्या कोरक्याला कदाचित तिचे स्वरूप नेमके कसे असावे याविषयी जाणीव नसावी. सिंधू संस्कृतीतील लोक वापरीत असलेल्या भांड्यांवर अशा प्रतिमा आढळल्यामुळे तत्कालीन लोक अशा बोटींचा वापर नदीच्या पलीकडे जाण्याकरिता किंवा समुद्री व्यापाराकरिता करीत असावे असा निष्कर्ष निघतो.त्याचप्रमाणे या भांड्याचा मालक नाविक दलातील सदस्यांपैकी असावेत हेही स्पष्ट होते.
नौकानयनविषयक इतिहासलेखन लिहिणारे अभ्यासक बासिल ग्रिन्हील यांनी या बोटीविषयी आपले निरीक्षण नोंदविलेले आहे. ते म्हणतात-‘लांब,आखूड,सपाट तळ असलेल्या,दोन्ही टोकांना चौकोनी असलेल्या बोटी पाण्याच्या अंतर्गत कार्याकरिता लांब खांबाच्या साहाय्याने चालविल्या जात असाव्यात. या बोटींच्या चित्रावर लिपीबद्ध ओळी आढळल्या आहेत.’
जोपर्यंत या लिपीचे अधिकृत वाचन होत नाही,तोपर्यंत त्याविषयी निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. सिंधू मुद्रेवर शरीराला मानवी मस्तक न दाखविण्यामागे नाविकाचा नौकानयन करताना झालेला मृत्यू दाखविण्याचाही कलावंताचा हेतू असू शकेल.
मोहेंजोदारो येथे आढळलेल्या तीन बाजूंनी मोडलेल्या एका मुद्रेमध्ये खालचा भाग सपाट असून मधोमध एक झोपडी आणि तिच्या बाजुला पणे असलेले दोन खांब आहेत. बोटीच्या काठावर दोन पक्षी बसलेले असून तिच्या मागील भागात दोन सुकाणू दिसतात. दुसऱ्या बाजूस आपल्या लांब नाकात एक मासा धरलेली सुसर चित्रित केलेली आहे. तिसऱ्या बाजूस सिंधू लिपीतील आठ प्रतीके चित्रित केलेली आढळतात. पक्व मृदा(terra cotta)मध्ये तयार केलेल्या या मुद्रेची लांबी ४.६ से.मी.तिची जाडी १.२x१.५ एवढी असून ती MD 602 या मोहेंजोदारो येथील स्थळामध्ये आढळली आहे.
आजही अशा बोटी या परिसरात जलवाहतुकीकरिता वापरल्या जातात.
हरप्पा येथील उत्खननात पक्व मृदेमधील (Terra cotta)खेळण्याच्या स्वरूपातील एक बोट आढळली असून ती मुलांच्या खेळण्यासाठी बनविलेली असावी.
इ.स.पू. २०००च्या आसपास सिंधू खोऱ्यातील खाडी तसेच खंबातच्या आखातादरम्यान बोटींच्या द्वारे देशांतर्गत व्यापार आणि जलप्रवास होत असावा असा एक अंदाज आहे. गुजरातमधील काठेवाडच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील जामनगर जवळच्या अमरा आणि लखवाद ही दोन बंदरे त्याकाळात विकसित झाली होती. याच परिसरातील पोरबंदर जवळील किंदरखेडा,वेरावळ जवळील प्रभास (सोमनाथ) आणि कोडीनार जवळील कांजेतर हा तत्कालीन मुख्य व्यापारी मार्ग होता. उत्तर हरप्पाकालीन काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्यावरील खाडीतील ही महत्वाची बंदरे होती.
जहाजांच्या देखभालीसाठी लोथल येथे उभारलेले लाकडी आश्रयस्थान हे हरप्पाकालीन लोकांच्या नौकानयन क्षेत्राच्या प्रगत अवस्थेतील सर्वात प्राचीन अवशेष आहे. त्याठिकाणी जहाजाचे नांगर ठेवल्रे जात तसेच उत्तम प्रतीचे तांदूळ.कापूस आणि गहू यांच्या व्यापारासाठी आवश्यक असे गोदाम होते. यथील रहिवासी आपला शेतीमाल तसेच सागरी उत्पादनाच्या विदेशी व्यापाराकरिता त्याचा उपयोग करीत असत. त्याचबरोबर तेथील मोठ्या संख्येतील लोकसंख्येला नित्याच्या वापराकरिता आवश्यक अशा वस्तू आणि प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल तसेच रत्नाचे खडे आणि धातू यांची साठवण तेथे केली जात असे. सुदूर दक्षिणेकडे नर्मदा आणि किम या नद्यांच्या मुखाशी वसलेल्या मेघम व भागत्रव या इतर दोन व्यापारी केंद्राची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे एकंदर कच्छ,काठेवाड आणि दक्षिण गुजरात पर्यंतचे १४०० किलोमीटरचे अंतर हरप्पा बंदरांनी विस्तारले होते. काही बंदरे त्याही पूर्वीची म्हणजे सुमारे इ.स.पू.३००० वर्षांपूर्वीची आहेत. जॉर्ज एफ.डेलस यांनी पास्नी खाडीवरील सोत्का-कोह या नव्या हृरप्पा बंदराच्या मक्रम किनाऱ्यावरील सर्वेक्षणामधून हा निष्कर्ष काढला आहे. हे स्थळ सुत्कागेन-डोर या हरप्पा संस्कृतीच्या सुदूर पश्चिमेला असलेल्या वस्तीच्या पूर्व-दक्षिण दिशेला १३० किलोमिटर अंतरावर आढळले आहे. म्हणून इ.स. पूर्व चार हजार वर्षांपूर्वी सागरी व्यापाराकरिता हे बंदर निर्माण करण्यात आले असावे असे त्यांचे मत आहे.
काही अभ्यासकांच्या मते,काठेवाडपासून कच्छमधील देसलपूर आणि मध्य सौराष्ट्र मार्गे सिंध प्रांतापर्यंत जाण्याकरिता जमिनीवरील मार्गाचा वापर हरप्पा लोक करीत असावेत. अलीकडील उत्खननानंतर देसलपूर हे हरप्पा संस्कृतीमधील एक छोटी वसाहत होती हे सिद्ध झाले आहे. तेथून मूठ असलेले वाडगे आणि करड्या रंगाची मृत्पात्रे प्राप्त झालेली आहेत. के.व्ही.सौंदरराजन या पुरातत्व संशोधकांनी देसलपूर येथील प्राचीन थर इ.स.पू.२००० च्या आसपासचा ठरविलेला आहे. कांसुतरीया आणि सुजनीपूर ही लोथलच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेली प्रागैतिहासिक स्थळे हरप्पा संस्कृतीच्या संक्रमण अवस्थेतील आहेत. त्यानंतर काही शतकांमध्ये हरप्पा संस्कृतीच्या प्रगत अवस्थेत रंगपूर आणि लोथल या ठिकाणच्या लोकांनी तिला टोकाला पोहोचविले. त्यामुळे सिंध पासून काठेवाडपर्यंत दक्षिणेकडे येण्याकरिता हरप्पा संस्कृतीच्या व्यापाऱ्यांना लोथलसारखे जवळचे कोणतेही स्थान नव्हते. म्हणूनच लोथलच्या दक्षिणेस प्राचीन हरप्पा लोकांनी वसविलेले भागत्राव हे बंदर ओळखले गेले. हरप्पा संस्कृतीचे लोक त्यामुळेच दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्याकडे वळले. अशा कितीतरी बंदरांचा शोध संशोधकांनी पुरातत्वीय उत्खनने आणि सर्वेक्षणाच्या आधारे घेतला आहे. परंतु,स्थलाअभावी त्यांचा परामर्श या ठिकाणी घेता आला नाही.
लोथल येथे जहाज थांबविण्याचे दगडाचे सात नांगर आढळले आहेत. त्यापैकी पाच बंदरामधून तर एक गाळात आणि टेकाडात प्राप्त झाले आहे. चार नांगर चुनखडीच्या दगडात तर दोन वालुकाश्मात आढळले आणि एक बांधकामाच्या दगडात सापडला . अशा अनेक दगडी नांगराच्या प्रती गोवा तसेच काही पुराण वस्तू संग्रहालायांमध्ये प्रदर्शनास ठेवलेल्या आहेत. त्यातून आपणास सिंधू संस्कृतीच्या सागरी व्यापाराची कल्पना येते. आर्यांच्या आक्रमणानंतर मात्र या व्यापाराला खीळ बसली.
आर्यांचे आक्रमण भारताची पीछेहाट
आर्यांच्या आक्रमणानंतर मात्र सिंधू संस्कृतीची पीछेहाट झाली आणि भारताच्या प्रगतीला अडसर निर्माण झाला. आर्यांचे आक्रमण की आगमन तसेच आर्य बाहेरचे की भारतातील, हा इतिहास संशोधकांमधील चिरंतन चर्चेचा व संशोधनाचा विषय आजवर राहिला आहे,तसाच तो यापुढेही राहणार आहे. कारण की,काही लोक स्वतःला आर्य तसेच काही लोक स्वतःला अनार्य म्हणजेच द्रविड समजतात. या समजुतीला छेद देणारे संशोधन अलीकडेच प्रकाशात आले आहे. त्यानुसार जगातील सर्वच लोक एकाच प्रकारचे असून त्यांच्यामध्ये कोणताही वंशभेद नाही. हवामानातील बदलामुळे त्या-त्या प्रदेशातील लोकांची चेहरेपट्टी,त्वचेचा रंग,केस तसेच इतर शारीरिक वैशिष्ठ्यांमध्ये फरक झालेला दिसून येतो. अर्थात वंश संकल्पनाच आता कालबाह्य ठरलेली आहे. त्यामुळे Anthropology या इंग्रजी शब्दाचा पर्याय म्हणून प्रचलित असलेल्या मानववंशशास्त्र या शब्दाऐवजी ‘मानवशास्त्र’ हा शब्द प्रचारात आला आहे.
भारतात अनेक देशांमधून अनेक कारणांनी लोक आलेले आहेत. भारताच्या भौगोलिक रचनेमुळे तसेच येथील विविध प्रकारच्या हवामानामुळे ज्यांना-ज्यांना जे-जे वातावतरण व भौगोलिक परीस्थिती अनुकूल वाटली,ते-ते लोक त्या-त्या ठिकाणी स्थायिक झालेत. त्यामुळे त्यांचे मूळ शोधायचे झाल्यास जनुकांद्वारेच ते शोधता येते. अगदी एका कुटुंबातील सदस्यांचीही जनुके वेग-वेगळी असू शकतात. तरीही उपासना पद्धती व व तत्वज्ञानाची उभारणी या कारणामुळे तसेच एकमेकांवर कुरघोडी करून वर्चस्व गाजविण्याच्या इर्षेपोटी हे सारे वाद जिवंत ठेवण्यात काही लोकांना रस आहे,तसाच तो यापुढेही राहणार आहे. त्यामुळे इतिहासकारांच्या काही पिढ्या आजवर या वादात गुंतून मौलिक संशोधनापासून मुकल्या तसेच या पुढेही होत राहणार आहे.
आर्यांच्या धर्मकल्पनांचा प्रभाव व द्रविड
आर्यांचा धर्म हा यज्ञप्रधान तर भारतातील मूळच्या द्रविड लोकांचा धर्म पूजाप्रधान होता. आर्यांची चातुर्वर्ण्य व्यवस्था गुण व कर्मावर आधारली होती,असा एक समज आहे. परंतु,प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही. आपल्या विरोधकांना शूद्र वर्णात टाकण्याची सोय हे तिचे वैशिष्ठ्य होते. त्यामुळे ज्यांना त्यांनी क्षत्रिय किंवा वैश्य म्हणून या व्यवस्थेत स्थान दिले होते, ते वरचढ व्हायला लागले तर त्यांना त्यांच्या उच्च स्थानापासून खाली ढकलण्याकरिता त्यांनी शूद्र हा तथाकथित चौथा वर्ण कृत्रिमरीत्या तयार केला होता. कालांतराने त्यांनी कलियुगात पहिला व शेवटला अर्थात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक राहिले अशी घोषणा करून टाकली. ही घोषणा गेल्या चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीच्या धर्मग्रंथांमधून आढळत असली तरी तशी स्थिती त्यापूर्वीही होती असे दिसते. सिंधू संस्कृतीच्या पाडावानंतर त्यांच्यामधील शरण आलेल्यांना स्वीकारण्याकरिता आर्यांनी अनेक विधी तयार केले होते,त्यावरून हे स्पष्ट होते. आर्यांच्या ऋग्वेद या ग्रंथाचे रचयिता अनेक आर्यपूर्व द्रविड आहेत,या वास्तवाचा विचार केल्यास त्यामध्ये आलेले सिंधू संस्कृतीतील लोक व त्यांची संस्कृती यांचे चित्रण द्रविडांनी केलेले आहे हे स्पष्ट होते. त्यांनी आर्यांच्या धर्म कल्पना स्वीकारल्या असल्या तरी आपल्या राहणीमान तसेच प्रथा-परंपरांचा त्याग केलेला दिसून येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या व्यापार व प्रवासासाठी नौका नयन हे माध्यम सतत वापरले होते असे दिसते. ऋग्वेदातील या विषयीच्या संदर्भामधून या वास्तवावर प्रकाश पडतो.
ऋग्वेदातील नौका-संदर्भ
राधा कुमुद मुकर्जी यांनी आपल्या ’ A History Of Indian Shiping And Maritime Activity From The Earliest Times ‘ या ग्रंथाच्या प्रारंभीच ऋग्वेदातील एका ऋचेचा उल्लेख केला आहे,ती अशी-
द्विषो नो विश्वतोमुखाति नावेव पारय l
स नःसिन्धुमिव नावयाति पर्षाः स्वस्तये l ऋग्वेद,१,९७,७ व ९
1 | ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ही ऋचा असल्यामुळे ती उत्तरकालीन आहे,हे स्पष्ट आहे. ऋग्वेदाचे पहिले व दहावे मण्डल उत्तरकालीन अर्थात नंतर जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याची निर्मिती आर्य भारतात आल्यानंतर झालेली आहे हे सिद्ध होते. या ऋचेमध्ये आमच्या कल्याणासाठी बोट समुद्र ओलांडून नेण्यास मदत करो’ अशी प्रार्थना करण्यात आली आहे.यावरून त्यांची ही प्रार्थना स्थानिक नावाड्याला उद्देशून केलेली असावी हे दिसून येते. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात (१.२५.७) वरूण हा आपली जहाजे चालविण्याच्या साठी आवश्यक अशा प्रकारच्या सर्व समुद्री मार्गाचा उत्तम जाणकार होता,असा उल्लेख येतो. विदेशी व्यापारासाठी त्याकाळी समुद्री प्रवास करणाऱ्या बोटी मोठ्या प्रमाणात होत्या असे यावरून दिसून येते. ऋग्वेदातील एका (१.५६.२)ऋचेमध्ये समुद्री व्यापारी समुद्राच्या कोणत्याही भागामध्ये प्रवास करीत असल्याचा उल्लेख येतो. एका ऋचेमध्ये ( ७.८८.३-४) वसिष्ठ आणि वरुण हे कौशल्यपूर्ण जलप्रवासासाठी योग्य असल्याचा संदर्भ आहे. तर दुसऱ्या एका ऋचेमध्ये ( १.११६.३) राजर्षी तुग्र याने आपल्या भुज्य नावाच्या मुलाला दुसऱ्या बेटावरील शत्रुविरुद्ध लढण्याकरिता मोहिमेवर पाठविले असल्याची कथा आहे. या कथेमध्ये भूज्यचे जहाज वादळामुळे उद्ध्वस्त झाल्याने त्याला आपले हात व पाय ठेवायलाही जागा नसते. अशावेळी आश्विनीकुमार आपल्या शंभर सहकाऱ्यासह त्याच्या लांब जहाजाच्या सहाय्याने त्याला वाचविण्याकरिता आला,असे म्हटले आहे. अथर्ववेदामध्येही प्रशस्त,मजबूत आणि सर्व सुविधा असलेल्या जहाजांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदाचा काळ हा इ.स.पू. १२०० ते १३०० असल्याचे विद्वानांचे मत आहे. अर्थात सिंधू संस्कृतीच्या भरभराटीनंतर एक हजार वर्षांनी या ग्रंथाची रचना झाली,तसेच इ.स. पू.१६०० मध्ये आर्य भारतात आलेत. त्यानंतर सिंधू संस्कृतीला उतरती कळा लागली.वेदानंतरच्या ब्राह्मणग्रंथ तसेच इतर वैदिक ग्रंथांमध्येही नौकानयन विषयक उल्लेख आढळून येतात. या नंतरच्या बौद्ध ग्रंथांमध्ये सुद्धा नौका- नयनाचे संदर्भ आढळतात. |
बौद्ध साहित्यातील नौकानयन
इ.स.पू.सहाव्या शतकात होऊन गेलेल्या बंगालच्या सिंहबाहू राजाने आपल्या विजय या राजपुत्राला ७०० प्रवाशांसह पांड्य वधूला आणण्याकरिता जहाज पाठविले होते आणि नंतर त्यात ८०० प्रवासी श्रीलंकेपर्यंत पोहोचविले गेलेत,असे महावंश या पाली ग्रंथात लिहिले आहे. विजय हा श्रीलंकेचा पहिला राजा मानला जातो. त्याच्या या विजयाचे चित्रण अजिंठा येथील १७ क्रमांकाच्या गुहेत केलेले आढळते. इ.स,पू.५४३ ते ५०५ हा त्याच्या कारकीर्दीचा कालखंड होय. इ.स.पू.४०० ते १०० या दरम्यानची एक पक्वमृदा मुद्रा बंगालमधील चान्द्रकेतू गड या पुरातत्वीय स्थळी उत्खननात आढळली असून तिच्यावा एका बोटीचे चित्रण केलेले आहे.
सुप्पारक या बोधिसत्वाने भृगूकच्छ म्हणजेच आजच्या भडोच पर्यंत ७०० व्यापाऱ्यासोबत श्रीलंकेपर्यंत प्रवास केल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात येतो. नाविक सुप्पारक या नावाने तो ओळखला जात असे. नाविक सुप्पारक जातक कथेनुसार त्याचे डोळे आजाराने जावून तो आंधळा झाला होता. त्यामुळे एका राजाकडे त्यांनी नोकरी केली परंतु,राजाने त्याच्या प्रामाणिकपणाचा सन्मान केला नाही. त्यामुळे तो राजीनामा देऊन आपल्या घरी गेला. त्याच्या योग्यतेची कीर्ती ऐकून काही समुद्री व्यापारी त्याच्याकडे गेले व त्यांनी एका जहाजाचा कप्तान म्हणून त्याची नेमणूक केली. त्याच्या नेतृत्वाखाली आपले जहाज घेउन ते सुदूर विदेशात गेले. वाटेत मोठे वादळ आले,त्यामुळे त्यांचे जहाज भरकटले. तरीही आपल्या नौकानयन कौशल्यामुळे सुप्पारकाने त्याला खुरमाला,अग्गीमाला,दपिमाला इ.ठिकाणी जावून तो परत भरुकच्छ येथे पोचला. वाटेतील दूरवरच्या ठिकाणांमधून सुप्पारकाने अनेक मूल्यवान रत्ने आणि द्रव्य काढून आणले होते.त्यामुळे व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघाले. महावंस या पाली ग्रंथामध्ये इ.स.पू.५४३ ते इ.स.पू.३५२ पर्यंतच्या इतिहासाची नोंद असून या ग्रंथाची रचना महानाम या लेखकाने केली आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात हा ग्रंथ रचला गेला. आणखी एक बौद्ध ग्रंथ ‘समुद्ध वानिज जातका’मध्ये एक हजार सुतार कारागीर वाहून नेणाऱ्या जहाजाचा उल्लेख आढळतो. शूर्पारक (सोपारा) आणि भृगुकच्छ (भडोच) ही व्यापारी बंदरे असल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. वाबेरू जातकामध्ये एक भारतीय व्यापारी बेबिलोनमध्ये कावळे आणि मोर विकायला गेल्याचा संदर्भ येतो.
पाश्चात्य देशांशी संबंध
इ.स.पू.सहाव्या शतकाच्या मध्यात इराणमध्ये सम्राट सायरस याच्या नेतृत्वाखाली हखामनी साम्राज्य स्थापन झाले.त्याचा उत्तराधिकारी दारा प्रथम (इ.स.पू.५२२-४८६) याने सिंधू आणि पंजाब प्रांत जिंकून भारताला आपल्या साम्राज्याचा भाग बनविले होते. यावेळी भारताचा पाश्चात्य देशांशी व्यापार वाढला होता. दाराचा नाविकदल प्रमुख स्कायलेक्स याने या दोन देशांमधील लाल समुद्रातून जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध लावला होता. त्यामुळे भारतातील व्यापारी पाश्चात्य देशांमध्ये जाऊन व्यापार करू लागले व श्रीमंत झाले.
भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवर काही इराणी मुद्रा आढळल्या आहेत.त्यातून इराण व भारताच्या व्यापाराविषयी माहिती मिळते.इराण मार्गे भारतीय व्यापारी इजिप्त आणि ग्रीस या देशांमध्ये जात असत. सिकंदराच्या आक्रमणानंतर भारत व ग्रीस मधील व्यापाराला गती आली. पाश्चात्य अभिजात साहित्यावरूनही भारतात मोठ्या प्रमाणात व्यापारी जहाजे तसेच युद्धनौका निर्माण होत आणि त्यामधून व्यापारी पाश्चात्य देशांमध्ये जात असल्याचा उल्लेख आढळतो. टोलेमीने भारतातून पश्चिमी देशांमध्ये दोन हजार नौकांमधून घोडे तसेच इतर पदार्थ पाठविल्याची नोंद केलेली आहे.
मौर्यकाळात विदेशी व्यापारात प्रगती
संपूर्ण भारताला एका सूत्रात गोवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा मौर्य काळात झाला. राजकीय व्यवस्था एकाच सत्तेखाली येण्याचा हा काळ होता. या काळातील सक्षम राजकीय पार्श्वभूमीने व्यापार व उद्योगाच्या विकासात मोलाचे योगदान दिले.यावेळी सिरिया,इजिप्त तसेच इतर पाश्चात्य देशांशी भारताचे संबंध स्थापित झाले. ग्रीक-रोमन लेखकांनी भारताच्या सागरी व्यापाराविषयी लिहून ठेवले आहे.
एरियनच्या म्हणण्यानुसार भारतीय व्यापारी आपला माल विकण्याकरिता ग्रीसच्या बाजारात जात असत. व्यापारी जहाजांची निर्मिती करणे हा त्याकाळातील प्रमुख उद्योग होता. विदेशातील व्यापाऱ्यांच्या संरक्षणाचे कार्य नवाध्यक्ष आणि पणाध्यक्ष नावाचे अधिकारी करीत असत असे अर्थशास्त्र या कौटिल्याच्या ग्रंथात लिहिलेले आहे. विदेशी सार्थवाह भारताच्या उत्तर-पश्चिमी व्यापारी मार्गावरून व्यापार करीत आल्याचे उल्लेख आढळतात. मौर्य काळात भारत व इजिप्तमधील व्यापार उन्नत अवस्थेत पोचला होता. टोलेमी या इजिप्तचा राजाने या व्यापाराला प्रोत्साहन देण्याकरिता लाल समुद्राच्या किनाऱ्यावर ’ बरनीस ‘ नावाचे एक बंदर निर्माण केले होते. तेथून इजिप्तच्या सिकंदरिया या विख्यात बंदरापर्यंत जाण्याकरिता तीन जमिनीवरील मार्ग उपलब्ध होते.
प्राचीन काळात समुद्र मार्गे व्यापार चालत असे त्या अर्थी जहाजांच्या संरक्षणाची व्यवस्था असणारच, पण त्याचे भक्कम पुरावे मिळत नाहीत. त्यामुळे भारतीयांचे पहिले आरमार बाळगाण्याचा मौर्य साम्राज्याकडे जातो. चंद्रगुप्त मौर्याच्या संरक्षण खात्याचे एकूण सहा विभाग होते व त्यातील पहिलाच विभाग हा आरमारी विभाग होता. या विभागाचे ५ अधिकारी होते आणि ते आरमार प्रमुखाशी संलग्न रहात असत. या आरमाराचे मुख्य काम समुद्री सीमा, नद्यांची मुखे, नद्या आणि तळी यांच्यावर लक्ष ठेवणे हे असे. हे आरमार समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करीत असे. हे आरमार श्रीलंकेपर्यंत तर जात असेच, पण अगदी इजिप्त, सिरीया येथपर्यंतही पोहचत असे. मौर्यांच्या आरमाराची बंदरे भारताच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनारपट्टीवर होती.
मौर्यांच्या नौदलाचे उल्लेख अशोकाच्या शिलालेखामध्येही आढळतात. मौर्यांच्या नंतर सातवाहन राजांचे मोठे आरमार असल्याचे उल्लेख मिळतात. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा पुळूमावी याचे शक्तीशाली आरमार होते. पुळूमावीच्या काळातील चलनी नाण्यांवर दोन शिडांच्या जहाजाचे चित्र असलेले दिसते. सातवाहनकाळात भारताचा व्यापार खाडीतले देश आणि अगदी इजिप्तशीही चालायचा.
सातवाहनांच्या नंतर दक्षिण भारतात होवून गेलेल्या पल्लव राजांचेही शक्तीशाली आरमार होते. पल्लव घराण्यातील नरसिंहवर्मन या राजाने श्रीलंकेवर आक्रमण करून तो देश ताब्यात घेतला होता.
भारतीय आरमाराची ही परंपरा पुढेही चालूच राहिली. चालुक्य, राष्ट्रकुट, चोल, शिलाहार या सगळ्यांच्या राजवटीत त्यांची-त्यांची आरमारे होती. चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या आरमारात किमान १०० जहाजे होती. त्याने ओरिसातील पुरी शहरावर समुद्रमार्गे आक्रमण केल्याचे उल्लेख मिळतात. पुलकेशी दुसरा याचा नातू विनयादित्य याने लंकेवर आक्रमण करून तेथील राजाला पराभूत केले होते. विनयादित्या प्रमाणेच राष्ट्रकूट सम्राट कृष्ण तिसरा यानेही लंकेवर हल्ला करून लंकेच्या उत्तर भागावर आपले राज्य स्थापन केले होते.
1 | दक्षिण भारतातील चोल साम्राज्याचे आरमार आकाराने मोठे, आधुनिक आणि आक्रमक होते. चोल साम्राज्याची स्थापना इ.स. पूर्व ३-या शतकात झाली असली तरी नवव्या ते तेराव्या शतकात हे साम्राज्य फारच बलाढ्य झाले होते. चोलांच्या आरमारात सुमारे १००० जहाजे होती. या आरमाराचे वैशिष्ठ्य असे की यात आजच्या नौदलासारखीच अधिकाराची पदे असत. नौदलाचा सर्वोच्च प्रमुख चक्रवर्ती म्हणजे चोल सम्राट असे. नौदलाचा प्रत्यक्ष प्रमुखाला जलाधिपती म्हणत. हे पद आजच्या Admiral पदासारखे असे. जलाधिपतीच्या खालोखाल नायगन हे पद असे, तो नौदलाचा विभागीय प्रमुख असे. त्यानंतर क्रमाने गणाधिपती (Rear Admiral), मण्डलाधिपती (Vice Admiral), कलपती (Captain of Navy), कापू (Weapons Officer), सीवाई (Engineering Officer), एथिमार (Captain of Marines) ही पदे होती. |
चोलांच्या नौदलाचे लढाऊ विभागाशिवाय कस्टम वगैरे इतरही विभाग होते.
या आरमाराची भरीव कामगिरी म्हणजे समुद्र मार्गे कलिंगवर हल्ला, तसेच लंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया हे देश ताब्यात घेवून तेथे चोलांचा अंमल स्थापन करणे.
123 | चोलांच्या काळात दक्षिण भारताचा समुद्रमार्गे होणारा व्यापार भरभराटीस आला होता. त्या काळात व्यापारी जहाजे चीन पर्यंत जात असत. निर्यात होणा-या वस्तूंमध्ये मसाल्याचे पदार्थ, कापड, सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून सिरिया,आशिया मायनर,ग्रीस,इजिप्त इत्यादी देशांशी त्याचा संबंध असल्याची माहिती मिळते. या देशांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करण्याकरिता अशोकाने आपले धम्मप्रचारक पाठविले होते. धर्मप्रचाराच्या निमित्ताने त्यांचे या देशांमधील व्यापाऱ्यांशी संबंध प्रस्थापित झाले. मौर्यांच्या राजधानीमध्ये विदेशी नागरिकांच्या संरक्षण आणि इतर सुविधांसाठी एक वेगळी समिती स्थापन केल्याचा उल्लेख ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये आढळतो. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर दक्षिणेकडे सातवाहन आणि उत्तर-पश्चिम दिशेकडे कुशाणांचे बलाढ्य शासन स्थापित झाले. या काळात भारताचा मध्य आशिया आणि रोम सोबतच इतर पश्चिमी देशांशी व्यापारी संबंध अधिक जोमात वाढले. |
भारत-रोम संबंध
इसवी सनाच्या प्रारंभी भारताचे रोमशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्याचे उल्लेख ऐतिहासिक अवशेषांमध्ये आढळतात. पोंपेई या प्राचीन शहराच्या उत्खननात भारतीय शैलीतील इ.स.पू.दुसऱ्या शतकातील हस्तिदंती यक्षिणीची एक मूर्ती प्राप्त झाली आहे. प्राचीन साहित्यातील उल्लेख व पुरातत्वीय अवशेषांवरून इ.स.पू.२७-१४ या ऑगस्टस काळात उत्तर-पश्चिम आणि भारतीय उप महाद्विपाच्या प्राय द्विपीय क्षेत्रांमध्ये रोमचे व्यापारिक संबंध विकसित झाले होते. इ.स.च्या दोन शतकांपर्यंत ही आर्थिक उलाढाल अधिक वाढली आणि आगामी शतकांमध्ये कमी प्रमाणात परंतु,सुरू राहिली. शक,पहलव तसेच कुशाणांच्या ताब्यातील उत्तर भारतातील व्यापारी महामार्गाद्वारे हा व्यापार चालूच राहिला.
भारताच्या दक्षिण भागात तसेच रोम मध्ये व्यापाराच्या सीमा विस्तृत होत रोमचे नागरिक आणि भारतीय व्यापारी यांनी आपले संबंध अधिक दृढ केलेत. या कार्यात त्यांच्या शासकांनीही त्यांना मदत केली. त्यातून त्यांना भरपूर महसूल प्राप्त होत असे. पेरीप्लस प्लिनी याने भारताचे व्यापारी तसेच नाविक आफ्रिका आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उपस्थित राहत असल्याचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला आहे.
प्रिंसिपेट (ऑगस्टस)काळातील साहित्यात आलेल्या उल्लेखावरून रोममध्ये भारतीय दूतमंडळ जात असे. वर्मिंग्तन साहित्यामध्ये भारताच्या उत्तर-पश्चिम,काठेवाड भागातील भडौच,तसेच दक्षिण भारतातील चेर आणि पांड्य या राज्यांमधून ऑगस्टसच्या राजवटीत वेगवेगळ्या भागातून चार दूतमंडळ आल्याचा उल्लेख आढळतो.
मार्क अंतोनी पासून तो जस्तीनियन ( इ.स.पू.३०-५५०)पर्यंतच्या राजवटीत भारता आणि रोम या देशांमधील व्यापारी संबंध सर्वात महत्वाचे होते. इ.स.पू.११६ मध्ये भारताकडे जाणाऱ्या जहाजाला पाहून ट्रेझन म्हणाला होता की, ‘जर मी तरुण असतो,तर लगेच उडी मारून त्यात बसलो असतो.’ ऑगस्टसच्या काळात या व्यापाराला अधिक उभारी आली आणि नीरो (इ.स. ६५)च्या काळापर्यंत तो चालू होता,असे दक्षिण भारतात प्राप्त झालेल्या मुद्रांवरील उल्लेखांवरून स्पष्ट होते. याच काळात विविध प्रकारच्या सुखोपभोगासाठी लागणाऱ्या वस्तू भारतातून या देशांमध्ये पाठविण्यात आल्या.
वर्मिंगटन यांनी याविषयी आपले संशोधन मांडताना म्हटले आहे की, नीरोच्या काळानंतरही भारत आणि रोम या देशांमध्ये व्यापार तसाच चालू राहिला. तो माघारल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही,असे त्याचे मत आहे.
ऑगस्टसने टर्रक्को( स्पेन) मध्ये इ.स.पू.२६-२५ मध्ये एका दूतमंडळाचे तसेच समोसने इ.स.पू.२१ मध्ये दुसऱ्याचे स्वागत केले होते. याविषयी स्त्रोवोने म्हटले आहेकी,कोणत्या तरी भारतीय शासकाने ऑगस्टसच्या दरबारात आपले दूतमंडळ पाठविले होते. अभ्यासकांनी तो शासक पोरस होता असे म्हटलेले आहे.
वाटेवरील संकटांमुळे फक्त तीनच प्रतिनिधी तेथे पोहोचू शकले. त्यांनी आपल्यासोबत एक हात तुटलेला माणूस,साप आणि कासव नेला होता. दक्षिणेतील पांड्य राजांनीही ऑगस्टसच्या दरबारात आपले दूत पाठविले होते. ऑगस्टसच्या नंतरही भारतीय दूतमंडळ रोममध्ये हात राहिले. टर्जन (इ.स.१०७) तसेच हेडीयन (इ.स.११७-११८)या रोमच्या राजांनीही भारतीय दूतमंडळाचे स्वागत केले होते.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात (इ.स. ४५ मध्ये) एक ग्रीक नाविक हिप्पोलस याने भारतियांना अरबी समुद्रात उठणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या विषयी माहिती दिली होती. त्याच्या या शोधामुळे भारत-रोम व्यापार वृद्धिंगत झाला. त्यामुळे खोल समुद्रात जहाजे चालविण्यातही त्यांना यश आले. भारतीय व्यापारी अरबी समुद्रातून त्यामुळेच पश्चिमी आशियातील बंदरांवर सुखरूपपणे पोहोचू शकले. हिप्पोलसच्या या शोधाचा फायदा इजिप्तच्या व्यापाऱ्यांनाही झाला. पूर्वी इजिप्तच्या शहरांमधून पूर्वेकडील देशांमध्ये वर्षभरात सुमारे वीस जहाज जात असत. त्यानंतर अंदाजे दररोज एक जहाज जाणे सुरू झाले. त्यामुळे एकीकडे वेळेची बचत झाली तर दुसरीकडे समुद्री चाचांच्या हल्ल्यांपासून त्यांची सुटका झाली. भारत-रोम व्यापार अशारितीने बिनधोकपणे सुरू राहिला व तो प्रामुख्याने दक्षिणेकडील भागातून आणि बाजूच्या बेटांमधून होत असे.
‘पेरीप्लस’
या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेला ग्रंथ हॅनो या इ.स.पू. पाचव्या शतकात होऊन गेलेल्या प्रवाशी लेखाने लिहिला असून त्याचे शीर्षक ‘दी पेरिप्लस ऑफ हॅनो ‘असे आहे. त्याने तो आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे समन्वेषण करून तेथे वसाहतींचीही स्थापना केली.तो कार्थेजीनियन मार्गनिर्देशक होता. कार्थेज येथून ६० गलबते आणि ३०,००० स्त्री-पुरुषांसह निघून तो जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून अटलांटीक महासागर येथे आला. अटलांटिक महासागरातूनच आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने तो दक्षिणेस गेला.
प्रथम त्याने थायमिआटेरिआन (सध्याचे मोरोक्कोतील कनीत्र) या ठिकाणाची स्थापना करून कँटिन (मेडौझा) भूशिरावरील सोलोइज येथे मंदिर बांधले. त्याशिवाय त्याने सध्याचे मोरोक्कोच्या अटलांटिक किनाऱ्यावर आणि सभोवतालच्या परिसरात पाच नगरांची स्थापना केली. तसेच मोरोक्कोच्या किनाऱ्यावर कॅरिअन गढी बांधली. येथेच प्यूनिक वसाहतकऱ्यांचे पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांनी दक्षिण भागात दे ओरो उपसागराच्या काठावर सर्न या व्यापारी ठाण्याची स्थापना केली. पुढे आफ्रिकेच्या किनाऱ्याने गँबिया, सिएरा लिओनमार्गे ते कॅमेरूनपर्यंत पोहोचले. त्यानंतर मात्र खाद्यपदार्थांचा तुटवडा आणि प्रतिकूल व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे ते तेथून परत फिरले.
सफरीवरून परतल्यानंतर हॅनो याने कार्थेज येथील बाल मंदिरावर लेखशिला स्वरूपात आपल्या सफरीचा वृत्तान्त लिहून ठेवला. दी पेरिप्लस ऑफ हॅनो (१९१३) या नावाने ग्रीक भाषेत त्यांच्या प्रवासाचा वृत्तान्त जतन करून ठेवला असला, तरी तत्कालीन परिस्थितीत प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांच्या हातात खरी माहिती पडू नये, म्हणून त्यात जाणीवपूर्वक संभ्रमित माहिती दिली गेली होती. त्याचा वृत्तान्त म्हणजे बहुधा प्यूनिकचे ग्रीकमधील भाषांतर असावे. आफ्रिकेतील त्यांची सफर कार्थेजियन व्यापाराचा तेथे विस्तार करण्यासाठी आणि वसाहतींची स्थापना करण्यासाठी होती, हे स्पष्ट होते.
1 | त्याच्या ग्रंथामधून आपणास पश्चिम तसेच पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील बंदरे आणि त्यावरील बाजारांविषयीची तसेच त्याठिकाणी आयात-निर्यात होणाऱ्या वस्तूंचीही सविस्तर माहिती मिळते. भारतातील दक्षिणेकडील तमिळ देश या व्यापारात आघाडीवर असल्याचेही या ग्रंथाच्या आधारे समजून घेता येते. त्याकाळात वस्तूविनिमय ही व्यापार पद्धती होती. परंतु,त्यात आवश्यक अशा वस्तू देण्यात रोम सक्षम नव्हता. त्यामुळे भारतीय मालाच्या मोबदल्यात चांदी आणि सोन्याची नाणी दिली जात,त्यामुळे व्यापाऱ्यांना ही सुवर्ण संधीच होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांचा या ग्रंथात बेरीगाजा (भडौच),सोपारा,कल्याण,नेल्सिडा आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरांचा तसेच बाजारपेठांचा कोल्वी,कमरा(कावेरीपत्तन),पोदुका,सोपत्मा इ. शब्दांनी उल्लेख आढळतो. मुझारिस, मुचिरीस हे केरळ मधील बंदर होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतीय आरमार किती प्रगत झाले होते,याचा अंदाज आपणास या माहितीवरून दिसून येते. आशिया खंडातील काही देशांमध्येही भारतीय व्यापाऱ्यांनी मुलूखगिरी केली आहे,त्यामुळे त्याही देशांमध्ये भारतीय आरमार पोहोचले होते. |
रामायण-महाभारत व पुराणांमधील संदर्भ
1 | रामायण-महाभारत या महाकाव्यांमध्ये सुद्धा समुद्री व्यापाराचा उल्लेख येतो. रामायणाच्या अयोध्याकांडात (९५)नदीत नौका व लढणाऱ्या सैन्याचा उल्लेख आढळतो. महाभारतात तर नौसेना हे सेनांग म्हटलेले आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नावाध्यक्ष (२.२८) या प्रकरणात शत्रूच्या नौकांचा विध्वंस करावा असे म्हटले आहे. परंतु,आरमाराचा त्यात उल्लेख नाही. पुराणांमध्ये नौका व नौका बांधणी यांचे उल्लेख आहेत. गुप्त कलिंग,हर्ष,यादव,कादंब व शिलाहार यांच्याकडेही आरमार असावे. चौल राजांनी आरमाराचा उपयोग करून जावा, सुमात्रा व कम्बोज या देशांमध्ये साम्राज्यविस्तार केला होता. |
अकबराच्या काळातील विद्वान अबू फजल याच्या आईने-अकबरीत मोगली आरमाराची माहिती मिळते.
राजा भोज यांचे आरमारविषयक लेखन
अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात ( इ.स.सुमारे १०००-१०५०)माळव्यातील परमार घराण्यात होऊन गेलेला राजा भोज हा एक विद्वान,कलाभिद्न्य व कलावंतांचा पोशिंदा राजा होता. वाक्पतिराज ऊर्फ मुंज याचा धाकटा भाऊ सिंधुराज याचा पुत्र. सिंधुराजाच्या मृत्यूनंतर परमारांच्या गादीवर इ. स. सु. १००० मध्ये तो आला. त्याच्या कारकीर्दीतील उपलब्ध कोरीव लेख इ. स. १०२० ते १०४७ दरम्यानच्या काळातील आहेत. त्याच्या कर्तृत्वाविषयी भोजप्रबंध या ग्रंथात विपुल माहिती मिळते. राज्यारोहणानंतर त्याने आपली राजधानी उज्जयिनीहून (उज्जैन) धारानगरी (विद्यमान धार) येथे नेली. त्यामुळे त्याला धारेश्वर हे नामाभिधान मिळाले. दक्षिणेतील चालुक्य (कल्याणी) व परमार या दोघांत पिढीजात वैर होते. चालुक्य राजा जयसिंह यावर त्याने कलचुरी गांगेयदेव व तंजावरचा राजेंद्र चोल यांची मदत घेऊन स्वारी केली पण तीत त्याचा पराभव झाला. पुढे भोजाने दक्षिणेकडील आदिनगर (मुखलिंगम), कोकण, लाट (दक्षिण गुजरात) वगैरे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले व राज्यविस्तार केला परंतु इ. स. १०२० मध्ये चालुक्य जयसिंहाचा मुलगा पहिला सोमेश्वर याने परमार राज्यावर स्वारी करून मांडूचा किल्ला घेतला आणि धारानगरी लुटली. भोज परमारने बुंदेलखंडातील चंदेल्ल, ग्वाल्हेरचे कच्छपघात आणि कनौजचे राष्ट्रकूट यांच्याशीही युद्धे केली होती पण त्यांत त्याला फारसे यश आले नाही. नंतर त्याने कलचुरी गांगेयदेवाचा पराभव केला पण गांगेयदेवाचा मुलगा कर्ण याने गुजरातचा राजा चालुक्य भीम याच्याशी मैत्री करून माळव्यावर आक्रमण केले. त्याच सुमारास भोज निधन पावला असावा.
123 | परमार राजा भोज याने विविध विषयांवर एकूण ८४ ग्रंथ रचल्याचे सांगितले जाते. परंतु, अभ्यासकांनी त्यापैकी १३ ग्रंथ त्याचे असल्याचे सिद्ध केले आहे. भारतातील तो एकमेव सर्वाधिक लोकप्रिय राजा होऊन गेला. त्याच्या समरांगण-सूत्रधार आणि युक्तिकल्पतरु या ग्रंथांमध्ये आरमाराच्या उभारणीविषयी शास्त्रीय माहिती आलेली आहे. आरमाराच्या उभारणीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्याचे श्रेय राजा भोज याच्याकडे जाते. सर्वात प्रथम त्यानेच या विषयावर लेखन केले आहे. ‘युक्तिकल्पतरु’ या त्यांच्या ग्रंथात नौकांच्या लांबी-रुंदीचे प्रमाण १० :१ व रुंदीचे प्रमाण १:२५ असते,त्या नौका अस्थिर असतात आणि ज्यांचे प्रमाण २:१ व १:१ असते,त्या संकट आणतात,असा इशारा देण्यात आला आहे. आरमाराच्या उभारणीविषयीचा प्राचीन इतिहास त्यामधून आपणास मिळतो. या ग्रंथांमध्ये शिल्पशास्त्र, वास्तुकला, चित्रकला तसेच शासनव्यवस्था, सैन्याचे प्रकार, नौकानयन, कर व अर्थव्यवस्था इ. विविध विषयांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. |
शिलाहारांचे आरमार
1 | दहाव्या ते तेराव्या शतकात महाराष्ट्रावर राज्य केलेल्या शिलाहार राजांकडेही त्यांचे आरमार होते. शिलाहार राजा दुसरा भोज याने विजयदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला होता. शिलाहारांच्या काळात समुद्रमार्गे खाडीतील देशांशी व्यापार चालत असे. एकसर येथील वीरगळ हा असा एक पुरातत्वीय पुरावा आहे,की ज्यात समुद्री युद्धाचे प्रभावी चित्रण केलेले आढळते. मुंबईच्या बोरीवली या उपनगराजवळील एकसर या गावात तो आहे. |
एकसर येथे एकूण सहा वीरगळ असून त्यापैकी दोन वीरगळांवर जमिनीवरील युद्ध कोरले आहे तर इतर चार वीरगळांवर नौकायुद्धाचा प्रसंग कोरला आहे. त्यातील एका वीरगळावर एक शिलालेख सुद्धा आहे. हे दोन्ही वीरगळ हे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. या वीरगळांबाबत दोन प्रवाद इतिहास अभ्यासकांमध्ये आहेत. एक म्हणजे परमार राजा भोजदेव याने कोकणावर विजय मिळवला (इसवी सन १०२०) आणि जमीन एका ब्राह्मणाला दान दिली, त्याकाळाचे आहेत तर काही अभ्यासक असे म्हणतात की हे वीरगळ शिलाहार काळात उभारले गेले असल्याची शक्यता आहे.
कझेन्स नावाचा एक संशोधक होऊन गेला. त्याच्या म्हणण्यानुसार शेवटचा शिलाहार राजा व देवगिरीचा महादेव यादव यांच्यात इसवी सन १२६५ मध्ये यांच्या चतुरंग दलात जे युद्ध झाले त्याचे हे चित्रण आहे. याचा उल्लेख हा हेमाद्री पंडीत याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथात येते. हेमाद्री म्हणतो की, ‘ शिलाहार राजा सोमेश्वर याला जलमरण आले. कदाचित महादेव राजाच्या क्रोधयुक्त अग्नीपेक्षा समुद्रात बुडून मरणे सोमेश्वरला जास्त योय वाटले असावे”.
एकसर येथील काही वीरगळांवर हातघाईची लढाई आहे. तर काही वीरगळांवर नौका आहेत. या नौका वल्हे वापरून पुढे नेल्या जात असत हे लगेच कळून येते. येथे नौकांवरूनच लढाई चालू असलेली दिसते. कदाचित भाले किंवा बाणांनी लढत असावेत. परंतु यावरून हे लक्षात यायला मदत होते की त्याकाळातील नौदल युद्धे कशा प्रकारची होत असत आणि यातून कळून येते की समुद्रावर वचक ठेवण्याची मानसिकता कोणत्या प्रकारची होती ते.
मार्को पोलो या १२५४ ते १३२५ या काळात होऊन गेलेल्या व्हेनिस प्रजासत्ताकातील साहसी प्रवाशाने आपल्या भटकंतीच्या दरम्यान आलेल्या अनुभवातून भारतीय जहाजे प्रवाशांशिवाय त्यांच्या सोयी-सुविधांसाठी आपल्या १०० ते ३०० च्या दरम्यान संख्या असलेल्या कुशल नाविकांना सोबत घेउन जात असत असे लिहून ठेवले आहे. त्यांची जहाजे सोने,चांदी,तांबे आणि इतर सजावटीच्या मौलिक वस्तूंनी अतिशय सुंदर रितीने सजविलेली असत असेही तो म्हणतो.
विजयनगर साम्राज्य (१३३६-१६४६) हे दक्षिण भारतातील एक बलाढ्य साम्राज्य होते. या साम्राज्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या तीनही सीमा समुद्राला भिडलेल्या होत्या. या साम्राज्याकडेही आरमार होते. या साम्राज्यात ३०० बंदरे होती. आरमाराच्या प्रमुखाला नाविकगडप्रभू हे पद होते. कृष्ण देवरायाच्या काळात हानोवर तीम्मोजू हा विजयनगरच्या आरमाराचा प्रमुख होता.
123 | पोर्तुगीजांचे भारतात आगमन झाल्यावर चौल राणी अब्बक्काने आपल्या आरमाराच्या सहाय्याने पोर्तुगीजांच्या नाकी नऊ आणले होते. तसेच तिला कालीकाताचा राजा झामोरीन याच्या जहाजांनी आरमारी मदत केली होती. या इतिहासावरून असे दिसून येते की मनुस्मृतीतील सिंधुबंदी भारतीयांनी झुगारून दिली होती, किंवा तिचे पालन ठराविक वर्गच करत होता. तसेच या इतिहासामुळे भारताने कधी कुणावर आक्रमण केले नाही हा कांही लोकांचा आवडता दावाही फोल ठरतो. |
पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा १४९८ साली दक्षिण भारतातील कालिकत बंदरात पोहोचला. त्यानंतर अनेक युरोपीय शक्तींनी भारताच्या किनाऱ्यावर येऊन व्यापारास प्रारंभ केला. इंग्लिश, डच (वलन्देज), पोर्तुगीज (फिरंगी), फ्रेंच (फरासीस) आदी शक्तींनी भारतीय किनाऱ्यावर वखारी स्थापन केल्या. पंधराव्या शतकात कालिकतचा राजा सामुद्री (झामोरीन) याने कुंजली मराक्कर या सागरी सेनानीच्या अधिपत्याखाली आरमार उभारून पोर्तुगीजांना विरोध केला. पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यानंतर साधारण दीडशे वर्षांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मराठा आरमाराचा उदय झाला.
संस्कृत ग्रंथ घटक कारिका (१६ ते १८ वे शतक) व औरंगजेब कालीन फतिया-इ-इब्रिया या ग्रंथात नौकाविषयीची वर्णने आहेत. समुद्र ओलांडून जाणारे जे लोक असत,त्यांचा धर्म नाहीसा होत असे,अशी एक धर्माज्ञा होती. कलिवर्ज्य नावाने प्रसिद्ध अशा एका ग्रंथामध्ये ती आलेली आहे तीविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
कलिवर्ज्य म्हणजे काय ?
कलियुगात कोणकोणत्या बाबी वर्ज्य कराव्यात याविषयीचे जे नियम केले गेले आहेत, त्यांना कलिवर्ज्य असं म्हणतात. या नियमांमध्ये सुद्धा एकसूत्रता नाही. म्हणून त्याविषयी ‘महाराष्ट्र संस्कृती’ या ग्रंथात डॉ. सहस्रबुद्धे म्हणतात, ‘ कलिवर्ज्य ही स्मृती नाही. तो एक निबंध आहे. अनेक श्रृतिस्मृतिपुराणवचने एकत्र करून रचलेलं ते धर्मशास्त्र आहे. इ.स. १००० ते इ.स.१२०० या काळात त्याची रचना झाली, असं विद्वद्रत्न दप्तरी यांनी दाखवून दिलं आहे. कलीच्या प्रारंभीच धर्मवेत्यांनी लोकरक्षणार्थ काही कृत्ये वर्ज्य ठरवली आहेत आणि या साधुसज्जनांनी निश्चित केलेल्या धर्माज्ञा असल्यामुळे त्या वेदाप्रमाणेच प्रमाण आहेत, असं कलिवर्ज्यकार म्हणतो ‘
कलिवर्ज्य प्रकरणामुळे कोणकोणते अनर्थ झाले, हा एक आणखी स्वतंत्र विषय आहे. त्याविषयी पुढे डॉ. सहस्रबुद्धे म्हणतात – ‘… समुद्रगमन पूर्वी भारतात रूढ होतं. साम्राज्यासाठी, धर्मप्रसारासाठी व व्यापारासाठी हिंदू लोक इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापर्यंत जगभर संचार करीत होते. धर्मशास्त्रालाही ते मान्य होतं. हा विश्वसंचार कलियुगातच होत होता, तरी कलिवर्ज्यकाराने तो कलीत निषिद्ध ठरवला आणि हिंदू समाजाने तो निषेध मानून प्रत्यक्षात नसलेलं कलियुग निर्माण करून ठेवलं. पतितपरावर्तनाच्या बाबतीत हेच घडलं. परधर्मात गेलेल्यांना, पतितांना, हिंदू समाज पूर्वी थोड्या प्रायश्चित्ताने परत स्वधर्मात येत असे. बलात्काराने झालेलं धर्मांतर हे धर्मांतरच नव्हे, असं मनूने म्हटलं आहे. सिंधमध्ये महंमद कासीमने सक्तीने बाटवलेल्या हजारो हिंदूंना, देवल ऋषींनी नवी स्मृती रचून शुद्ध करून घेतलं. असं असून कलिवर्ज्य प्रकरणाने पतितपरावर्तन निषिद्ध ठरवलं. हिंदू समाजाने ती आज्ञा वंद्य मानली व एकदा बाटलेले हिंदू हे कायम मुस्लीम किंवा ख्रिस्ती राहण्याची सोय करून ठेवली आणि या समाजाच्या विनाशाची योजना आखून टाकली.’
शिवरायांचा कलिवर्ज्य विरोध
छत्रपती शिवरायांनी मात्र या कलिवर्ज्याला आपल्या स्वराज्य संस्थापनेत काडीइतकीही किंमत दिलेली नाही. समुद्रपर्यटन निषिद्ध असतानाही त्यांनी सागरी मोहिमा व व्यापार केला. समुद्रावर आपलं वर्चस्व राहावं, यासाठी आरमाराची उभारणी केली तसंच जलदुर्ग बांधलेत. परधर्मातील लोकांना त्यांनी सन्मानाने वागवलं. त्याचप्रमाणे जे मुस्लीम झालेत त्यांना शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेतलं. प्रस्थापित धर्मव्यवस्थेला त्यांनी या रीतीने शह दिला.
याउलट लोकमान्य टिळकांनी परदेश जाण्याकरिता समुद्रपर्यटन केलं म्हणून प्रायश्चित्त घेतलं. त्यांच्या दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या शिवरायांचा आदर्श त्यांना घेता आला नाही. त्यांचंच अनुकरण त्यांच्या अनुयायांनी पुढे केलं. त्यामुळे बुरसटलेल्या सनातनी विचारांना प्रोत्साहन मिळालं. आजही त्या विचारांचा प्रभाव काही लोकांवर आहे.
कलिवर्ज्याचे दुष्परिणाम
कलियुगाची संकल्पना इ.स.पूर्व चौथ्या किंवा तिसऱ्या शतकात निर्माण झाली, असे ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या भारतरत्न म. म. काणेकृत सारांश रूप ग्रंथ पूर्वार्धाच्या प्रकरण ९३ मध्ये म्हटलेले आहे. भारतातील पहिला सम्राट अशोक याचा नातू बृहद्रथ याचा कपटाने खून करून सत्तेवर आलेल्या पुष्पमित्र शुंगाच्या काळात या कल्पनेने जोर धरला व याच काळात मनुस्मृतीही निर्माण झाली. तसंच कलिवर्ज्य प्रकरण यादवांच्या काळातील हेमाद्रिपंडितासारख्या धर्मपंडिताने निर्माण केलं होतं, हे स्पष्ट होतं. गेल्या सातशे वर्षापासून आपल्या धर्मानुकरणावर प्रभाव गाजवत असलेल्या या संकल्पनेने आपली सर्वच क्षेत्रांतील प्रगती रोखलेली आहे. विशेषकरून समुद्रपर्यटन निषिद्ध ठरवल्यामुळे परदेशाशी होणारा आपला व्यापार थांबला व आर्थिक क्षेत्रात आपली घसरण सुरू झाली. ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आदान-प्रदानही त्यामुळे झालं नाही. एक खोटी व निराधार कल्पना आपल्या सर्वागीण विकासात अडसर ठरू शकते, याचं एक हे मोठं उदाहरण आहे.
कलिवर्ज्याकडे डोळेझाक
‘कलिवर्ज्य’ या धर्म-निबंधाच्या आज्ञा झुगारून काही व्यापारी व राज्यकर्त्यांनी परदेशी जाण्याच्या हेतूने समुद्र पर्यटन केलेले असल्याचे प्राचीन इतिहासात दिसून येते. त्यामुळे त्यांचा धर्म नष्ट न होता,त्यांनी त्या-त्या देशांमध्ये भारतीय संस्कृती व धर्माचा प्रचार व प्रसार केल्याचे दाखले मिळतात.
कच्छी, गुजराती, तांडेलांनी(मालीम) इ.स.१७०० मध्ये ‘ मालीमनी पोथी ‘ लिहून ठेवली आहे. या पोथीमध्ये पाण्याची खोली, वाऱ्याची दिशा, शिडांचा उपयोग इत्यादिची, अनुभव आणि निरीक्षणाअंती मिळालेल्या ज्ञानाची नोंद आहे. या संदर्भातली जहाजांची, नाण्यांची, स्तूपातील शिल्पांची चित्रे उपलब्ध आहेत.
भारतातील आरमाराचा इतिहास असा समृद्ध व वैभवशाली आहे. स्थलाआभावी आपण त्याचा विस्तृत परामर्श या ठिकाणी घेऊ शकलो नाही. परंतु,जितके संदर्भ या निमित्ताने आढळले ते मात्र डोळे दिपविणारे आहेत,यात शंका नाही.
संदर्भ :
1) A History Of Indian Shiping And Maritime Activity From The Earliest Times,Radhakumud Mookerji,LONGMANS,GREEN AND CO.BOMBAY,1912
2) Foreign Trade and Commerce in Ancient India,Prakash Charan Prasad, Abhinav Publications, 1977
3) The indian Economic & social History Review,Jean Deloche,1 January 1978,
4) Further Excavations at Mohenjo-daro, E.J.H. Mackay, 1938
5) Boats and Boatmen of Pakistan,Basil Greenhill, David & Charles, 1971
6) Kalivarjyas Or Prohibitions In The Kali Age Their Present Legal Bearing- Batuknath BHattachary,University Of Culcutta,1943
7)Yukti-kalpataru,king bhoja,Edited By-Pandit Isvara Chandra Sastri,कलिकातानगर्याम I,१९१७
8)Samarangana Sutradhara, king bhoja,
9) Memorial Stones of India by Mr. Gunther
१०)राजा भोज,विश्वेश्वरनाथ रेऊ,हिंदुस्थानी एकेदेमी,उ.प्र.,१९३२.
११)राजा भोज का रचनाविश्व,भगवतीप्रसाद राजपुरोहित,पब्लिकेशन स्कीम,जयपुर,भारत,१९९०.
१२)महाराष्ट्र संस्कृती,पु.ग.सहस्रबुद्धे,कॉनटीनेनटल प्रकाशन,पुणे,
१३)महाराष्ट्रातील वीरगळ- श्री. सदाशिव टेटविलकर,श्रीकृपा प्रकाशन,२०१४.
१४)मराठी विश्वकोश,मराठी विश्वकोश मंडळ,मुंबई.