2020 एप्रिल

पितृपक्ष : सोक्ष आणि मोक्ष – डॉ. अशोक राणा

सा हि त्या क्ष र 

डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेचे पौर्णिमेनंतरचा अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यालाच श्राद्धपक्ष असंही म्हणतात. पक्ष म्हणजे पंधरवाडा. भारतीय महिन्यांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. प्रतिपदा ते पौर्णिमा या पंधरवाड्याला शुक्ल किंवा शुद्धपक्ष तर त्यानंतरच्या प्रतिपदा ते अमावस्या या पंधरवाड्याला वद्य किंवा कृष्णपक्ष असं म्हणतात. अमावस्येनंतर कलेकलेने चंद्र वाढतो म्हणून पौर्णिमेपर्यंतचा काळ शुभ तर त्यानंतर चंद्राच्या कला क्षीण होतात म्हणून अमावस्येपर्यंतचा काळ अशुभ मानला जातो. जनमानसांत प्रचलित असलेली ही शुभाशुभाची कल्पना रूजवण्यात पंचांगनिर्माते, ज्योतिषी तसंच पुराणकथन करणाऱ्यांचा मोठा वाटा आहे. यामागे त्यांचा हेतू काय ? अमावस्या जर अशुभ असेल, तर पितृमोक्ष अमावस्या, पिठोरी अमावस्या, अश्‍विनी अमावस्या अर्थात दिवाळी हे सण तसंच सोमवती अमावस्यासारखे शिवपूजकांचे धार्मिकपर्व अमावस्येलाच का येतात ? पितृपक्ष हा सर्वांच्याच पूर्वजांच्याप्रती श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम काळ असेल तर, या काळात शुभकार्ये अथवा नवीन खरेदी करणं वर्ज्य का मानलं जातं ? पितर व पितरलोक या शब्दांचा मुळातला अर्थ कोणता ? श्राद्ध व यज्ञ या विधींमधला फरक काय ?

पितरपूजेची प्राचीन पंरपरा

आपल्या पूर्वजांना आपण पितर म्हणून संबोधतो. त्यांच्याप्रती श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतात श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा काळ राखून ठेवण्यात आलेला आहे.

तसाच विशिष्ट काळ किंवा दिवस जगातील काही देशांमध्येही नेमून दिलेले आहेत. चीन, जपान, ग्रीस, रोम या देशांमध्येही पूर्वजपूजेची पंरपरा आहे. आफ्रिकेतील मेलनेशियन जमातीमध्ये विशेषत: बंटू जमातीमध्येही पूर्वजपूजा प्रचलित आहे; परंतु दक्षिण अमेरिकेतील आदिवासीमध्ये ती नाही. मृत्यूनंतर मृत व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या देवांमध्ये समाविष्ट होते, या भावनेने एक दैवत म्हणून मृत व्यक्तींची पूजा केली जाते. या व्यक्तीतील जिवंतपणीचे दोष मरणानंतर गळून पडतात व ती व्यक्ती देवस्वरूप होते, अशी धारणा या मागे आहे. जमातीतील लोकांना स्वप्नांद्वारे ती प्रेरणा देते, अशी समजूत आहे. आदिम जातींमध्येही जमातीचे देव व कुटुंबाचे देव असे दोन प्रकार असून देवस्वरूप मृत व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यात जमातीतील व्यक्तींशी संपर्क साधून मार्गदर्शन करते, अशी श्रद्धा आहे.

टायलर या समाजशास्त्रज्ञाच्या मते, अदृश्य व अलौकिक अशा दैवी सामर्थ्यावर विश्‍वास असणं हे आदिम धर्मकल्पनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आदिवासी लोकांची अशी धारणा असते की, ही शक्ती सर्वव्यापी असून समाजाचं बरं-वाईट, हित-अहित या शक्तीमुळेच होतं. या शक्तीला संतुष्ट करून आपणास अनुकूल त्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. म्हणून त्यांना अनेक तऱ्हांनी संतुष्ट केलं पाहिजे. त्या धारणेतून त्यांना वंद्य असलेल्या पूर्वजांची पूजा करण्याच्या अनेक तऱ्हा यांनी अवलंबल्या. त्यातून पूर्वजपूजेची परंपरा सुरू झाली. मृत पूर्वजांची थडगी म्हणजेच त्यांची देवळं होतं, असं टायलर म्हणतो.

आपल्या वारसदारांनी आपल्याकरिता पशूबळी द्यावा, असं पूर्वजांना वाटत असावं, असं जग्गा जमातींच्या लोकांना वाटतं. जर त्यात आपण हलगर्जीपणा केला तर मृत पूर्वज आपणास त्रास देतील, अशी समजूत आहे. मनुष्याच्या शरीरात आत्मा असतो. तसाच तो बळी द्यावयाच्या पशूतही असतो. अशा पशूच्या मांसात त्याच्या आत्म्याचा काही भाग असतो, म्हणून तेच अन्न आपल्या मृत पूर्वजाला उपयुक्त आहे, असं त्यांना वाटतं. पूर्वज व पशू या दोहोंमधील एकरूपता जाणून मूळ पुरूष व पूर्वजांइतकाच मान ते पशूलाही देतात.

देशीदेशीच्या प्रथा

इजिप्तमधील भव्य पिरॅमिडची निर्मिती पूर्वजपूजेच्या भावनेतून झाली असावी. आपल्या प्रिय राजाच्या प्रेताला सुरक्षित ठेवलं, तर त्याला पुनर्जन्म लाभल्यावर तो त्याच देहात प्रवेश करून परत येईल, अशी धारणा तत्कालीन लोकांची होती. चीनमधील रानटी लोक पूर्वज म्हणून मृत व्यक्तीची पूजा करीत असत. या पूर्वजाचा लाकडी पुतळा तयार करून त्याची आराधना ते करीत. त्याला संतुष्ट करण्याकरिता बळी देत. चीन म्हणजे पूर्वजांचं निवासस्थान, अशी त्यांची धारणा होती. चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशियसनेही पूर्वजपूजेचा सन्मान राखला होता. प्राचीन लोकांच्या धर्मामध्ये मृतांच्या आत्म्याला मेनीझ (चांगल्या देवता) असं म्हणत असत. हे आत्मे दयाळू असतात, अशी त्यांची समजूत होती. पण त्यांनी आपणास पीडा देऊ नये म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांच्या थडग्यावर खाण्यापिण्याचे पदार्थ अर्पण करून त्याची पूजा ते करीत असत. पूर्वजांना अधोलोकात घर मिळवून दिलं की ते त्रास देत नाहीत, असं रोमन लोक मानतात. पारशी लोकांचा धर्मग्रंथ अवेस्ता पितरांना ‘फ्रवशी’ या नावाने संबोधतो. फ्रवशी हे दुष्काळाच्या वेळी स्वर्गातील सरोवरांमधून आपल्या वंशजांसाठी पाणी आणतात, अशी त्यांची समजूत होती. रोम व ग्रीक लोकांमध्ये जे वीरपूजेचं महत्त्व आहे, त्यामागे पूर्वजपूजा कारणीभूत आहे. गाव वसवताना त्याच्या मध्यभागी अधोलोकाचं द्वार म्हणून एक खंदक तेथे खणलेला असे. त्यात पूर्वजांसाठी बळी दिले जात. रोममध्ये असे खूप खंदक होते. विशिष्ट दिवशी या खंदकावरील दगड व माती बाजूला करून त्याची दारं उघडली जात असत. ज्यांचे वंशज आपल्या पूर्वजांना विसरतात किंवा ज्यांना वंशज नसतात, त्या पूर्वजांची अवस्था अतिशय वाईट होते, म्हणून वंशज नसलेल्या पितरांना तृप्त करण्यासाठी चीनमध्ये सार्वजनिकपणे पूर्वजांना संतुष्ट करण्याचा विधी होत असे. पूर्वजपूजेचा प्रभाव चीनमध्ये खूप होता. पूर्वजांना संतुष्ट करण्याकरिता तेथे कागदी वस्तू जाळल्या जात असत. त्या तयार करणाऱ्या अनेकांना पूर्वजपूजेमुळे रोजगार मिळाला होता. जपानमध्येही आपल्या सर्व मृत पूर्वजांचा सन्मान करण्याकरिता एक मोठा उत्सव दरवर्षी केला जात असे. याप्रसंगी सर्व पूर्वज घरी परत येतात, असा समज होता. भारतातही बलिप्रतिपदेला बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी समजूत आहे. राजा वा जमातप्रमुख यांच्या पूर्वजांची पूजा करण्याची परंपरा इजिप्त, बॅबिलोनिया, फिजी, आफ्रिका आदी देशांमध्ये होती. पॉलिनिशियामध्ये मात्र फक्त सरदारांचे आत्मे मृत्यूनंतर राहतात व सामान्य माणसांचे आत्मे लगेच नष्ट होतात, अशी समजूत होती.

पितरलोकांचे स्थान

मराठी विश्‍वकोशामध्ये (खंड ९, पृ. ६९२) पितर लोकांविषयी माहिती दिली आहे, ती अशी –

‘ पितर पितृलोकात राहतात व चंद्रलोक म्हणजेच पितृलोक होय. ते आकाशात वा अधोलोकात राहतात, तारे बनतात, सदैव घराजवळ राहतात, थडग्याच्या आसपास एखादा प्राणी वा वनस्पती बनून राहतात इ. कल्पना आढळतात. वनस्पती, प्राणी इत्यादींना पितर मानून देवक समजण्याची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. गाव वसवणाऱ्या व्यक्तीला गावाचा पितर म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियातील इग्नॉरोट जमातीत गावातील सर्वांचे पितर विशिष्ट अशा एकाच वृक्षात राहतात, असं मानलं जातं.’

पितरांविषयी आणखी माहिती देताना हा कोश म्हणतो, ‘सामान्यत: सर्व लोकांच्या मते, पितर हे बहुतेक बाबतीत जिवंत मानवासारखेच असतात; परंतु त्यांच्याजवळ काही अतिमानवी शक्ती असतात आणि त्याबरोबरच वंशजाकडून अन्न, पाणी इ. हवं असल्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबूनही असतात. त्यांना ऐकता व पाहता येतं. वंशजांशी संपर्क साधता येतो. त्यांना तहान, भूक, आनंद, दु:ख, शोक, क्रोध इ. विकार असतात. हिंदूंच्या कल्पनेनुसार मात्र त्यांना लोभ, मोह व भय असलं, तरी शोक नसतो. त्यांना मुखाने इच्छा व्यक्त करता येत नाही आणि मनोवेगाने कुठेही जाता येतं. पितृलोकात जाण्याचा आणि पिंड-तर्पणादींच्या स्वीकारासाठी पृथ्वीवर परत येण्याचा पितरांचा मार्ग म्हणजे पितृयान होय. पहिला मृत मानव यम हा पितृपती वा पितृराज, गया हे पितृतीर्थ, गुजरातेतील सिद्धपूर हे मातृतीर्थ, दक्षकन्या स्वधा ही पितरांची आई वा पत्नी, दक्षिण ही त्याची आवडती दिशा आणि अमावस्या ही पितृतिथी वा पितृदिन होय. पितरांमध्ये मी अर्यमा आहे, असं श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे. ऋग्वेदापासूनच पितरांचे निर्देश आढळत असले तरी हिंदूंच्या धर्मशास्त्रात इतर विषयांच्या तुलनेने पितृपूजेचं महत्त्व कमी दिसतं.’

याठिकाणी काही महत्त्वाच्या तथ्यांवर प्रकाश टाकला आहे व ती तथ्यं म्हणजे पितरांची आवडती दिशा दक्षिण, पितृतिथी अमावस्या व पिृतपूजेला तथाकथित हिंदू धर्मशास्त्रात महत्त्वाचं स्थान नसणं. यावर चर्चा करण्यापूर्वी त्यांच्या काही मतांचा परामर्श घेऊया. ते म्हणतात, ‘सर्वच समाजांतून मृतांविषयी काही ना काही विधी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. साठ हजार वर्षांपूर्वी मृतांबरोबर पुरलेल्या वस्तू उत्खननात सापडल्या आहेत; परंतु यातील सर्व विधी पितृपूजेत मोडत नाहीत. काही पितरांना वस्तू अर्पण करताना अनेकदा पूजेपेक्षा त्यांचे रक्षण करण्याची भावनाच अधिक प्रबळ असते. पितर दुबळे बनलेले असतात, त्यांना आश्रय हवा असतो, श्राद्ध केलं नाही तर त्यांना प्रेतात्मा व पिशाच्च बनून भटकावं लागतं इ. विचारांनी त्यांच्या सद्गतीसाठी वा परलोकात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वस्तू अर्पण केल्या जातात. हिंदूंच्या श्राद्ध तर्पणादींमध्येही काहीशी हीच भावना असते. अशा कृत्यांना अनेकदा पितृपूजा म्हटलं जात असतं, तरी तत्त्वत: ही कृत्यं पितृपूजेहून वेगळी आहेत, असंच म्हटलं पाहिजे.’

श्राद्धाच्या निमित्ताने पितरांना अर्थात मृत पूर्वजांना त्यांच्या आवडीच्या अथवा भटाला आवश्यक वाटणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात, त्यामागे पूर्वजपूजेपेक्षा वेगळा हेतू असतो, असा अर्थ या विधानांमधून निघतो. म्हणून श्राद्धांच्या निमित्ताने कोणकोणत्या गोष्टी घडतात. अर्थात या विधीचा तपशील कसा आहे, तेही पाहिलं पाहिजे.

श्राद्धविधीचे स्वरूप

महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथात ‘श्राद्ध’ या शीर्षकाखाली (पृ.७६) खंड ४ विभाग तिसरामधील नवव्या प्रकरणात माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘ धर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथांत श्राद्धाच्या व्याख्या दिल्या आहेत. ब्रह्मपुराणात –

देशे कालेच पात्रे च श्रद्धया विधिना चयत् |
पितृमुद्दिश्य विप्रेभ्यो दंत श्राद्धमुदाहृतम् ||
(परा. माघ. १.२ पान २९९)

असं म्हटलं आहे की, ‘पितरांना उद्देशून त्यांच्या हिताकरिता जे जे काही योग्य काळी, योग्य स्थळी, सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येतं त्याला श्राद्ध म्हणतात.’ पितरांना अर्पण करावयाच्या वस्तू ब्राह्मणांना अर्पण कराव्यात, अशी स्पष्ट सूचना ब्रह्मपुराणाने देऊन श्राद्धामागील हेतू स्पष्ट केलेला आहे. डॉ.आ.ह.साळुंखे यांनी श्राद्धतर्पणविधी पितृपूजेहून वेगळा आहे, असं मत दिलं आहे. त्यामागील कारणही हेच की, ब्राह्मणांच्या चरितार्थाचं एक साधन म्हणून या विधीची योजना आहे. पूर्वजपूजा येथे दुय्यम बाब ठरली आहे. डॉ. काणे यांनी ही बाब अधिक स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, ‘याज्ञवक्क्य स्मृतीने (१.२६८) म्हटलं आहे, की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसु, रुद्र आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्यांच्या पूर्वजांना संतोष देतात. ह्या श्लोकापासून असं समजावयाचं असतं की, श्राद्ध करणाऱ्याने तीन पूर्वजपिता, पितामह आणि प्रपितामह ह्यांचे श्राद्धामध्ये अनुक्रमे त्या त्या पितरांच्या अधिष्ठात्र्या देवता ज्या वसु, रूद्र आणि आदित्य ह्यांच्याशी ऐक्य असतं. श्राद्ध ह्या शब्दाने होम, पिंडदान आणि निमंत्रित ब्राह्मणांचं समाधान ह्या तीन गोष्टींचा बोध होतो. ह्या तिहींपैकी कोणत्यातरी एका गोष्टीला गौण अर्थाने श्राद्ध हा शब्द लावला जातो.’

श्राद्धविधीच्या प्रचलित स्वरूपावर भाष्य करताना डॉ. काणे यांनी श्राद्ध हा शब्द गौण अर्थाने होम, पिंडदान आणि ब्राह्मणांचं समाधान यापैकी एका गोष्टीला उद्देशून वापरला आहे हे सूचित केलं आहे. ती गोष्ट कोणती असावी हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही; परंतु होमाचं पावित्र्य तसंच ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व या दोन गोष्टींना श्राद्धामध्ये धक्का लागतो. श्राद्धतर्पणविधी करणाऱ्या ब्राह्मणांना ‘किरवंत’ म्हणून इतर ब्राह्मण हीन लेखतात. होमात अग्नी असतो व अग्नी हा नेहमीच पवित्र असतो, अशी धारणा आहे. त्यामुळे ब्राह्मणांना गौण स्थान देणारा हा शब्द आहे, असंच त्यांना सुचवायचं आहे; हे स्पष्ट होतं. पिंडदान हा पितरपूजेचा मूळ विधी आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य आहेच. श्राद्ध हा शब्द गौण ठरण्याचं खरं कारण हे की, तो ज्या पितर नावाच्या जमातीचा होता, त्यांनाच आर्यांनी हीन लेखलं होतं. पण श्राद्ध विधीच्या निमित्ताने ब्राह्मणांची पोटा-पाण्याची समस्या मिटली होती. म्हणून एक व्यवहार म्हणून श्राद्धाचा स्वीकार त्यांनी केला. हे पितर कोण? त्यांचं राहणीमान कसं होतं ? त्यांच्या धर्मविधीत श्राद्धाचं कोणतं स्थान होतं ? ते आज कुठे आहेत? श्राद्धविधीच्या तपशिलात जाण्याऐवजी या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेऊया.

पितर कोण व कसे?

पिता या शब्दापासून पितर हा शब्द तयार झाला आहे. पिता या शब्दाची व्याख्या ‘ पाति रक्षति अपत्यं य:’ अशी केली जाते. महाभारतात पित्याच्या या स्थानांविषयी म्हटलं आहे की –

पिता धर्म : पिता स्वर्ग : पिता हि परमं तप: |
पितरि प्रीतिमापन्ने सर्वा: प्रीणन्ति देवता || (म.भा. शांति. २६६.२१)

अर्थ : पिता हा धर्म आहे, तो स्वर्ग आहे, तो श्रेष्ठ तप आहे. तो प्रसन्न झाला असता सर्व देवता संतुष्ट होतात.

पित्याचं हे स्थान पितृसत्ताक समाजामध्ये होतं. त्यामुळे पित्याचं महत्त्व महाभारताने वरील शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ होती. म्हणून आर्यवैदिक ग्रंथांमध्ये तिचं समर्थन करण्यात आलं आहे. भारतात काही गण मातृसत्ताक तर काही पितृसत्ताक होते. अशाच गणातील लोकांना ‘पितर’ या नावाने संबोधलं जात असावं. भारतीय संस्कृती कोशात (खंड ५. पृ. ५६५) त्यांच्याविषयी म्हटलं आहे की – ‘पितरविषयक वैदिक, स्मार्त व पौराणिक साहित्याचे आलोडन करून ना. गो. चापेकर यांनी पितर हा देवा-मानवांप्रमाणे एक स्वतंत्र समाज होता, असं दाखवून दिलं आहे.’ त्यांच्या विवेचनाचा सारांश असा – देव, पितर आणि मनुष्य हे निरनिराळे समाज होते. असे अनेक उल्लेख वैदिक वाङ्मयात आढळतात. उदा: देवा: मनुष्या: पितर (श. ब्रा. ३.६.२.२५). देवा मनुष्या असुरा: पितर ऋषय: (अथर्व : १०.१०.२६). पुरातनकाली यज्ञ झाल्यावर त्याच्या योगाने ऋषी, मनुष्य व पितर उत्पन्न झाले, असं ऋग्वेदातही म्हटलंय, (१०.१०३.६)

विविध प्रकारची प्रजा निर्माण करताना ब्रह्मदेवाने पितर निर्माण केले, असं पुराणात म्हटलं आहे. मेलेल्या माणसांना आपण सामान्यपणे पितर म्हणतो. पण वरील उत्पत्तिकल्पना मृत माणसांच्या संबंधाने संभवनीय दिसत नाही. देव, असुर, मनुष्य यांच्याबरोबर पितर उत्पन्न झाल्याची कथा ब्रह्मांड पुराणात सांगितली आहे, तीच खरी वाटते.

पितृसमाजाचं मुख्य धार्मिक कृत्य म्हणजे पितृपूजा, पितृसेवा किंवा श्राद्ध हे होय. सांप्रत मृत पितरांचं श्राद्ध केलं जातं. पण अतिप्राचीनकाळी जिवंत पितरांचंही श्राद्ध करण्याचा प्रघात होता. सांप्रत मृत पितरांच्या स्थानी ब्राह्मणांची योजना करतात, तसंच प्राचीन काळीही करीत आणि जिवंत पित्याला पितृस्थानी बसवत. मनूनेही या गोष्टींचा उल्लेख केला आहे. (३.२२०) पिता जिवंत असूनही मुलाने श्राद्ध करण्याची प्राचीन काळी चाल होती, ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. यावरून पितृयज्ञ किंवा पितृपूजा हा पितर समाजाचा मुख्य धर्म होता, असं दिसतं. हे पितृश्राद्ध नित्य करायचं असे. ज्या मनुष्य समाजात अग्नीची नित्य उपासना विहित म्हणून सांगितली आहे. त्याच समाजात नित्यश्राद्धाची कल्पना उद्‌धृत होणं अस्वाभाविक दिसतं. श्राद्ध करणं हाच धर्म असल्यामुळे सर्व इष्ट गोष्टींची प्राप्ती श्राद्धाने होते, असा त्या समाजाचा समज होता. ज्याप्रमाणे वैदिक मानव निरनिराळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या इष्टी करीत, त्याप्रमाणे पितृसमाजात गोधनाच्या समृद्धीसाठी गोष्ठश्राद्ध, घोड्यांच्या विपुलतेसाठी अश्‍वश्राद्ध, प्रवासाला जाताना यात्राश्राद्ध, आत्मशुद्धीसाठी शुचिश्राद्ध अशी वेगवेगळी श्राद्धे करीत. श्राद्ध हे प्रत्येक कर्माचं एक अंगच मानीत. अशा श्राद्धाला कर्मांगश्राद्ध असं म्हणत.

पुररव-आर्द्रव व धुरिलोचन हे पितरांचे विश्‍वेदेव होत. वैदिकांच्या विश्‍वेदेवांहून हे वेगळे आहेत. मातली, यम आणि बृहस्पती हे पितृसमाजाचे नेते होते. देवकर्म स्वाहाकाराने होते, तर पितृकर्म स्वधाकाराने करावे लागते. एकच समाज असता तर हे भेद होण्याचं कारण नव्हतं. देवयान व पितृयान हे परलोकगमनाचे दोन मार्गही स्वतंत्र आहेत. यावरूनही पितृसमाजाचं भिन्नत्व प्रतीत होतं. मनुष्याचा राजा मनू,देवांचा राजा इंद्र व पितरांचा यम हेही भिन्नत्वसूचक आहे. त्यांच्या धर्मकृत्यांच्या कालातही फरक आहे. देवकार्ये पूर्वाण्ही, मनुष्यकार्ये मध्यान्ही व पितृकार्ये अपराण्ही केली जात. देवसमाज आपलं उपरणं डाव्या खांद्यावरून घेई, तर पितृसमाज जे उजव्या खांद्यावरून घेई. हीच गोष्ट सांप्रत यज्ञोपविताच्या सव्या-अपसव्याने सूचित होतं.

देवांच्या स्वभाववर्णनांत आणि पितरांच्या स्वभाववर्णनातही फरक आहे. पितरांना कधी राग येत नसे. ते शुद्ध राहात व ब्रह्मचर्याने वागत. विशेष म्हणजे ते आपल्या हातात शस्त्र धरीत नसत, असं मनू म्हणतो. हे वर्णन देवांच्या वर्णनाहून भिन्न आहे. क्रोध, इर्ष्या व शस्त्र यांचा संबंध सुटल्यानंतर समाजात वैर व भेद निर्माण होण्याचं कारणच राहत नाही. म्हणूनच यजुर्वेदात पितरांना समाना: (भेदरहित) व समनस: (एक दिलाने वागणारे) असं म्हटलं आहे.
पितृसमाजात काही लोक प्रेतं जाळत, तर काही प्रेतं पुरत. त्यावरूनच पितरांमध्ये अग्निष्वात अथवा अग्निदग्ध आणि अनग्निष्वात अथवा अनग्निदग्ध असे भेद होते. पितरांना सुवर्णनाणे वापरण्याचं माहित नसावं. त्यांची बसण्याची पद्धतही विलक्षण होती. ते उपरणं उजव्या खाद्यांवर घेऊन उजवा गुडघा जमिनीवर टेकून बसत.

पितरांचे प्रकार

ना. गो. चापेकर यांनी पितर हा मानवी समाजातील एक घटक होता, या वास्तवाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. विद्वतरत्न डॉ. के. एल. दप्तरी यांनीही ‘धर्मरहस्य’ या ग्रंथात पितरांविषयी असंच मत केलं आहे. (पृ.११६) महामहोपाध्याय सिध्देश्‍वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन चरित्रकोशामध्ये (पृ. ५८५) पितरांविषयी माहिती देऊन त्यांचे प्रकार दिले आहेत, ते असे –
‘ऐतरेय ब्राह्मणमते मानव वंशाचे गंधर्व, पितर, देव, सर्प आणि मनुष्य हे पाच प्रमुख उपविभाग होते. यापैकी देव आणि पितर यांपासून कालांतराने मनुष्याची निर्मिती झाली (ऐ. ब्रा. ३.३१). … वैदिक साहित्यात पितरांचं निवासस्थान असणारा पितृलोक हा स्वर्लोकाहून निराळा आहे. पितृलोकांचं द्वार आग्नेयेस असून (श. ब्रा. १३.८.१.५) स्वर्लोकाचे द्वार ईशान्येस होते (श. ब्रा. ६.६.२.४). अथर्ववेदमते पितृगण अंतरिक्ष, पृथ्वी आणि स्वर्ग येथे निवास करीत असत (अ. वे. १८.२.४९). … निरुक्तात पितृलोकाचं वैकल्पिक नाव माध्यमिक लोक असं दिलं असून (नि. ११.१८), यम हा तेथील राजा होता. पितृलोकी जाऊन पोहोचणारा सर्वप्रथम मानव यम हाच होता.’

तैत्तिरीय संहितामते, ‘स्मशानचिति’ करणाऱ्या हरेक माणसाला पितृलोकाची प्राप्ती होत असे (तै. सं. ५.४.११). धर्मशास्त्र हे पितृकार्य देवकार्याहूनही अधिक श्रेष्ठ मानलं आहे.

ऋग्वेदात पितरांचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन प्रकार सांगितले असून (ऋ. १०.१५.१) निम्मलिखित पितृगणांचा निर्देश येथे आढळतो : १) अंगिरस २) अथर्वन् ३) दशग्व ४) नवग्व ५) भुगु ६) वैरूप (क्र. १०.१४.५-६). यापैकी नवग्व आणि दशग्व हे पितृगण अंगिरस पितरांचेच उपविभाग असून, ते यमासमवेत निवास करीत असत (ऋ. १०.१४.३-४).

नंदिपुराणमते, अग्निष्वात, बर्हिषद्, काव्य सुकालिन् हे पितृगण विशेष प्रमुख असून, ते अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रवर्णीय होते.

दैवी आणि मानुषी पितर

(१) दैवी पितर – देवगणाद्वारा पूजित असे हे पितर अमूर्त, देवदेव, भावमूर्ती, स्वर्गस्थ आदि वैकल्पिक नावांनी सुविख्यात होते…
१) वैराज – हा पितृगण विरज्‌स (सत्य, सनातन) लोकांत निवास करीत असून, त्यामधील सदस्य, ब्रह्मसभेमध्ये उपस्थित होते (म. स. १३३). दैत्य, यक्ष, किन्नर, राक्षस, गंधर्व, अप्सरा, भूत, पिशाच्च, सर्प, नाग आदि यांचे उपासक होते. मानसकन्या-मेना.
२) अग्निष्वात – हा पितृगण वैभ्राज (विरजस्) लोकांत निवास करीत असून दैत्य, यक्ष, राक्षसादि याची उपासना करीत असत. मानसकन्या-अच्छोदा.
३) बर्हिषद – हा पितृगण दक्षिण दिशेकडील सोमप (सोमपद) लोकी निवास करीत असे. नामांतर -आर्तव. मानसकन्या-पीवरी.
महाभारतात तृतीय पितृगणाचं नाव एकशूंग दिलं असून तेथे बर्हिषद पितृगणाला मूर्त पितरांमध्ये समाविष्ट केलं आहे (म. स. ११.३०).

(२) मूर्त अथवा मानुषी पितर-हे पितर संतानक (सांतनिक), सूक्ष्ममूर्ती आदि वैकल्पिक नावांनी सुविख्यात असून, त्यामध्ये निम्नलिखित पितृगणांचा समावेश होत असे : –

१) हविष्मत् (काव्य) हा पितृगण मरीचिगर्भ लोकांत निवास करीत असून, ब्राह्मण लोक यांची उपासना करीत असत. मानसकन्या-गो.
२) सुस्वध – हा पितृगण कामग (कामधुक्) लोकांत निवास करीत असून क्षत्रिय लोक यांची उपासना करीत असत. मानसकन्या-यशोदा.
३) आज्यप – हा पितृगण पश्चिमेकडील मानस (सूमनस्) लोकांत निवास करीत असून वैश्य लोक यांची उपासना करीत असत. मानसकन्या-विरजा.
४) सोमप – हा पितृगण उत्तरेकडील सनातन (स्वर्ग) लोकांत निवास करीत असून शूद्र लोक याची उपासना करीत असत. मानसकन्या-नर्मदा.
महाभारतात हविष्मत्, सुस्वध आणि आज्यप यांऐवजी सोमप, बर्हिषद गार्हपत्य आणि चतुर्वेद या मानुषी पितरांचा निर्देश आढळतो. चित्रावशास्त्रींनी आधिक विस्तृतपणे पितर व पितृगणांची कन्या तसंच त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या राजवंशाची माहिती दिलेली आहे. त्यावरून खालील निष्कर्ष निघतात –

पितरांचा समृद्ध वारसा

अयोध्येचा राजा दिलीप याची आजी यशोदा ही सुग्वध या पितृगणातील होती. त्यामुळे दाशरथी रामाशी हिचा अप्रत्यक्षपणे जन्य-जनक संबंध दिसून येतो. त्याचप्रमाणे महाभारतातील ययातीची आई विरजा ही वैराज पितृगणातील होती. त्यापासून कुरूकुलाचा विस्तार झाल्याचं महाभारत सांगतं. यावरून भारतातील प्राचीन राजवंश व त्यांच्या पराक्रमाची गाथा गाणारे प्राचीन भारतीय महाकाव्य रामायण व महाभारत यांच्या निर्मितीस कारणीभूत पितर आहेत, हे स्पष्ट होतं. तरीही प्राच्यविद्या संशोधकांनी पितरांचा प्राचीन वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याचा प्रयत्न फारसा केल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे पितर हे अलौकिक व अदृश्य अशा अमानवी शक्तीचे प्रतीक म्हणून जनमानसात ठाण मांडून बसले. त्यांच्याविषयीची भीती व शुभाशुभाच्या कल्पना समाजात पसरल्या. पितृपक्षापुरते तसंच श्राद्धतर्पणापुरतं त्यांना सीमित करून भटा-भिक्षुकांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावण्याच्या कामी त्यांचा वापर केला. हे सारं का झालं व कसं झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर अधिक सखोल संशोधन होणं आवश्यक आहे. कारण तसं झालं तर आपला वैभवशाली वारसा आपणास त्यामुळे प्राप्त होईल. सोबतच अलौकिकाची भिती नाहीशी होऊन तिची जागा आदर व सन्मानाने घेतली जाईल. पितर हे गणसमाजी होते. गणव्यवस्था ही आत्यंतिक लोकशाही व्यवस्था होती. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशाला जो समृद्ध वारसा लाभलेला आहे, त्याची स्मृती यामुळे चाळवली जाईल. त्यासाठी पितरांचं मूळ शोधलं पाहिजे.

पितरांचे मूळ शोधण्याचे निकष

पितरांच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यायचा झाल्यास त्यांच्यासंबंधी प्राचीन ग्रंथांमध्ये जी माहिती आलेली आहे, तिची नीट तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्य निकष हा आहे की, ज्या ज्या बाबी आर्यांनी निषेधार्ह मानल्या, त्या त्या या देशातील मूळ रहिवाशी लोकांना शिरोधार्य होत्या. प्रारंभी दुर्लक्ष नंतर नकार, त्यानंतर स्वीकार अशी त्रिसूत्री कार्यपद्धती आर्यांनी येथील मूळ रहिवासी लोकांबद्दल स्वीकारली होती. अर्थात, जगातील सर्वच भागातील मूळ रहिवाशांसाठी बाहेरून आलेल्या आक्रमक वसाहतवाद्यांनी याच त्रिसूत्री कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे.

दुर्लक्ष करण्यामागे अनुल्लेखाने मारणे हा त्यांचा हेतू असतो. लक्ष देणे आवश्यकच असेल तर त्यांचा उल्लेख करताना त्यांच्याविषयी नकारात्मक माहिती जनमानसांत रूजेल, याची दक्षता घ्यायची. हा एकप्रकारे नकारच होय. याउपर स्वीकारणे आवश्यकच असेल तर आपणच त्यांचे निर्माते आहोत, असा टेंभा मिरवायचा. अशारीतीने आर्यविरोधी सर्वच जनसमूहांविषयी आर्यब्राह्मण ग्रंथांमध्ये माहिती झिरपत आलेली आहे. म्हणून तिची तपासणी करताना वरील मुद्यांचा आधार घेणं आवश्यक आहे. पितरांच्या बाबतीत त्यांचं मूळ शोधण्याच्या दृष्टीने जी माहिती प्राचीन ग्रंथात आली आहे. त्यातील मुख्य मुद्दे हे आहेत.

  1. पितरांचा जन्मदिन, पितृतिथी अथवा पितृदिन अमावस्या आहे.
  2. यम हा पितृपती वा पितृराज तसंच दक्षकन्या स्वधा पितरांची आई वा पत्नी.
  3. पितरांची आवडती दिशा दक्षिण आहे.
  4. पितृपक्षात शुभकार्ये करू नये, असा संकेत आहे.
  5. हिंदूंच्या धर्मशास्त्रात इतर विषयांच्या तुलनेने पितृपूजेचं महत्त्व कमी आहे.
  6. श्राद्ध या शब्दाला प्राप्त झालेला गौण अर्थ.
  7. पितर शस्त्रप्रिय नसून शांतताप्रिय होते.
    या मुद्यांच्या आधारे आपण पितरांच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू या.

पितृतिथी अमावास्या

प्रचलित समजुतीनुसार, अमावास्या अशुभ मानली जाते, पण वराहपुराणात ब्रह्मदेव पितरांना सांगतो – अमावास्यादिनं वोऽस्तु तस्यां कुशतिलोकदकै: | तर्पिता मानुषैस्तृप्तिं परां गच्छत नान्यथा || अर्थात, पितर हो, अमावास्या हा दिवस तुमचा असो. ज्या दिवशी कुशतिलयुक्त उदकाने माणसं तुमचं तर्पण करतील, त्यावेळी तुम्हाला परम तृप्ती लाभेल, अन्यथा नाही.
यावरून आज अशुभ मानली जाणारी अमावस्या पितरांसाठी शुभदिन होती. कॉ. शरद पाटील यांनी अमावस्या हे आद्यगणमाता निर्रुतीचंच एक नाव होतं, असं म्हटलं आहे. (दास-शूद्रांची गुलामगिरी, खंड १, भाग १, पृ. १०८) यावरून भारतातील आर्यपूर्वांची गणमाता अमावस्या हिला पितर लोक पवित्र मानीत असत हे स्पष्ट होतं. त्यामुळे तिचा निषेध करण्याकरिता आर्यग्रंथांनी तिची निंदा केलेली आहे. पण शिवरायांनी अमावास्येलाच मोहिमा आखल्या होत्या.

पितृराज यम

यम हा न्याय देणारा आर्यपूर्वांचा पराक्रमी नेता होता. पण त्याला आर्यग्रंथांनी मृत्युदेवता ठरवून त्याची निंदा केलेली आहे. त्याचप्रमाणे तो ज्या नरकगणाचा अधिपती होता, त्या नरकाचंही विकृत वर्णन केलेलं आहे. यमद्वितीया हीच भाऊबीज म्हणून महाराष्ट्रात साजरी होते. जनमानसात आजही यमाविषयी आदराची भावना आहे, याचं हे सूचक आहे. दक्षकन्या स्वधा ही पितरांची आई किंवा पत्नी या दोन्ही रूपात येते. पार्वतीची ती बहीण ठरते. त्यामुळे मूळ रहिवाशी लोकांशी तिचा निकटचा संबंध दिसून येतो.

पितरांची दिशा दक्षिण

दक्षिण ही राक्षसाची दिशा म्हणून अशुभ मानली जाते. पण ती पितरांची आवडती दिशा आहे. यावरून पितरांचा राक्षसांशी असलेला निकटचा संबध सूचित होतो. यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर, अप्सरा, नाग, सर्प या गणातील लोक पितरांची उपासना करतात. ही गोष्ट ही दक्षिणेकडे राहणाऱ्या आर्यपूर्व गणांचा पितरांशी असलेला संबंध सूचित करते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. महाराष्ट्रात हनुमानाचं मुख दक्षिणेकडे असतं. हनुमान हा यक्षदेव आहे.

श्राद्ध विरूद्ध यज्ञ

श्रद्धेने केलेली गोष्ट म्हणजे श्राद्ध होय. यज्ञामध्ये श्रद्धेपेक्षा यज्ञीय कर्मकांडाला महत्त्व होतं. आर्य आपल्या कार्यसिद्धीकरिता यज्ञ करीत तर पितर श्राद्ध करीत. यज्ञाविरूद्ध श्राद्ध असा हा तात्विक संघर्ष आहे. पण वैदिकांनी श्राद्धकर्माला होम हवनाचं रूप देऊन त्याचं वैदिकीकरण केलं. पण श्राद्धाला मात्र प्रतिष्ठा दिली नाही.

शांतताप्रिय पितर

पितरांच्या वर्णनात ब्रह्मचर्याची माहिती आवर्जून येते. त्यांच्या शांतताप्रिय श्रमण योग्यांच्या सिंधू संस्कृतीशी असलेला संबंध त्यातून सूचित होतो. शस्त्र धारण न करणारे पितर व सैंधव यात कमालीचं साम्य आहे. यावरून सिंधू संस्कृतीचे लोक म्हणजेच पितर होय हे स्पष्ट होतं. त्यांची पायाचा गुडघा वर करून बसण्याची व उजव्या खांद्यावर उपरणं ठेवण्याची रीत आजही खेड्यापाड्यांतील लोकांमध्ये प्रचलित आहे. आजचा सर्वसामान्य माणूस म्हणजेच पितरांचा वंशज होय हे यावरून दिसून येतं.


( ‘ सण-उत्सव’ या आगामी ग्रंथामधून)

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment