शम्स जालनवी
१.
उर्दू शायरीचा सूर्य मावळला
– – –
” शम्स जालनवी” उर्दू चे महान शायर जग सोडून गेले.
वय वर्ष 97. वली औरंगाबादी, सिराज,बशर नवाज
आणि शम्स जालनवी या मराठवाड्यातील कवींनी उर्दू
शायरीचा झेंडा भारतभर नव्हे तर जगभर फडकवला. एवढा मोठा शायर पण किती साधी राहणी,किती विनम्रता .
स्वातंत्र्यपूर्व काळातील ते ग्रॅज्युएट होते.
भारतातील जवळपास सगळे
नामांकित व परदेशातील दोनेक डझन देशात उर्दुतील पहिल्या फळीतील दिगग्ज कविसोबत मुशायरे केलेला
हा कवी सायकलवर फिरून शेवटपर्यंत वर्तमानपत्र
वाटप करण्याचे काम करीत होता हे वाचून खरे वाटणार
नाही पण हे वास्तव आहे.
त्यांच्यासाठी काही करावे असे खूप वाटत होते पण
आपल्यासारखा सामान्य माणूस काय करू शकतो. त्यासाठी रविंद्र केसकर वगैरे मित्रांच्या मदतीने
एक योजना आम्ही काही मित्रांनी आखली होती पण
तिला यश आले नाही.
काही मित्रांनी एका कविसंमेलनाचे आलेले मानधन तसेच
ठेवले व म सा प चे अध्यक्ष नीतीन तावडे यांच्याशी चर्चा
करून शम्स साहेबांना 11,000/ रु चा जीवन गौरव
पुरस्कार उस्मानाबाद म सा प च्या वतीने देण्याचे निश्चित
केले. आमची मानधनाची रक्कम छोटी होती. खर्च
मोठा होता. त्या पुढील खर्चाची जबाबदारी नितीन
तावडे यांनी स्वीकारली.
हा कार्यक्रम एवढा देखणा आणि अप्रतिम झाला की
विचारूच नका.पुरस्कार दिल्यानंतर जी मैफल झाली
तशी मैफल माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत ऐकली
नाही.
शम्स साहेब गेले पण त्यांची शायरी वली दखनी
औरंगाबादी , सिराज, बशर नवाज यांच्या शायरीप्रमाणेच
जनमानसात जिवंत राहील यात शंका नाही.
शम्स साहेबांना विनम्र आदरांजली.
- डी. के. शेख, उस्मानाबाद.
२.
●शम्स जालनवी शहनशाह-ए-गज़ल !
‘ चश्म को अश्क बार करता हूँ । साफ दिल का गुबार करता हूँ ..!’
असं बाणेदार पण हसत हसत बोलणारे ऊर्दू /हिंदी चे प्रख्यात शायर शम्स जालनवी यांचं आज वयाच्या 97 व्या वर्षी दु:खद निधन झालं … शम्स साहब ! हे जरी ऊर्दू लिहिणारे आणि बुजूर्ग असले तरी त्यांचा वावर नेहमी मराठी लिहिणा-या जुन्या -नव्या कवी, लेखकांमध्ये असायचा . जालन्यात अत्यंत गरीब परिस्थीतीत जीवन जगतांना अजन्म सायकलवर न्यूज पेपर वाटणारा हा कवी शायरीच्या दरबारात मात्र शहनशहा होता . आणि तिथं त्यांना ऐकणारा प्रत्येकजण अगदी भारावून जात असे. त्यांची स्मरण शक्ती आणि आवाज याही वयात अचंबित करणारा होता.. भावनेनं ओथंबलेली त्यांची शायरी जीवनाचं अलौकीक तत्त्वज्ञान अगदी सहज साधेपणाने व्यक्त करते . गज़ल गाताना शब्द उच्चारण्यातील त्यांची नजाकत इतकी लाजवाब होती की..पत्थर दिल माणूसही विरघळून जात असे .
शम्सजींची आणि माझी ओळख 20 वर्षापूर्वी एका कविसंमेलनात झाली तेव्हा पहिल्या भेटीत माझी कविता ऐकून कार्यक्रम संपल्यावर मला म्हणाले ; “बडा़ अच्छा गाती हो , मिठी आवाज हैं तुम्हारी ! लिखते भी उमदा हो , अगर हिंदी में कोशिश करते हैं तो नँशनल लेव्हल पे बहुत कामयाबी मिलेंगी ! ” तेव्हा मिश्किल हसत मी माझ्या अत्यंत बेकार हिंदीत म्हणाले होते ; पहले इधर मराठी में दिये लगा के देखते हैं ! त्यावर खळखळून हसत भान हरपून त्यांनी टाळी दिली …आणि आमच्या वयातलं अंतर झर्रकन मिटून गेलं ते कायमचंच ! पुढे त्यांच्यासोबत अनेक सार्वजनिक आणि खाजगी मैफिली केल्या .प्रत्येक वेळी शम्स साहब अजीज वाटत राहिले.एकीकडे त्यांच्याबदद्दल कुतूहल आणि आदर वाढत गेला तर दुसरीकडे करूणा !
ते नेहमीच मैफिलीसाठी नव्या- नवेल्या कवीच्या उत्साहाने ‘अत्तर ‘लावून येत व अदबीनं बसत . शायरीवर त्यांची इतकी निष्ठा होती की कार्यक्रम छोटा – मोठा अशी वर्गवारी त्यांनी कधी केल्याचे आठवत नाही . शिवाय मान सन्मान , मानधन यासाठी हटून बसणे तर सोडा साधी विचारणाही ते कधी करत नसत . त्यामुळे साहित्य क्षेत्रात त्यांच्याबद्दल सर्वानाच आदर होता. त्यांंचं शायरीतील मोठेपण निर्विवाद होतं आणि राहिल . स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून जालन्यात राय हरिश्चंद्र साहनी ‘दु:खी ‘ , शोला , परिहार सर , दुर्राणी यांच्यासोबत शम्स जालनवींनी शायरीचं वातावरण तयार केलेलं होतं . अनेक नवे लिहिणारे जोडले जात होते . दरवर्षी ऊर्दू , हिंदी , मराठी मुशाय-यांंचं आयोजन उत्साहात केलंं जात असे . अनेक नामांकित शायर त्यामुळे जालनेकरांनी ऐकले . शिवाय हे इतकं खेळीमेळीने होत असे की भाषिक व्देष कधी कुणाच्या मनात उफाळून आला नाही .निखळ दाद दिली -घेतली जायची . दर महिन्याला होणा–या अनेक ऊर्दू मुशाय-यात मीही कविता वाचल्या आहेत . एक प्रसंग आवर्जून सांगण्यासारखा आहे .
एकदा जालन्यात दूरद्रुष्टीचे नेते मा. अंकुशराव टोपे साहेबांंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका त्रैभाषिक कविसंमेलनाचे आयोजन केले होते . व्यासपीठावर प्रसिध्द कवी विठ्ठल वाघ , फ . मु . शिंदे , शम्स जालनवी , इंद्रजित भालेराव , प्राचार्य भगवानराव देखमुख सारखे दिग्गज कवी आणि समोर अनेक राजकिय ,साहित्यिक सामाजिक ,सांस्क्रुतीक मान्यवरांच्या रसिकतेनं खचाखच भरलेला हाँल ! एक से एक कविता , सादरीकरणातील घरंदाजपण , नजाकत , एक दुस-याच्या घेतलेल्या फिरक्या , सांगितलेले किस्से , मिश्किल हास्याचे आवाज यामुळे सभाग्रहात एकदम चैतन्याचं सळसळतं उत्साही वातावरण तयार झालेलं . अशात शम्स साहब कविता सादर करण्यासाठी उठले . त्यांनी त्यांची अत्यंत आवडती गज़ल
” मेरा मन भी कितना पागल हैं ,काँटो से खुशबू की आशा , जहर से जीवन माँग रहा हैं । ” पेश केली . आणि ते थांबले …टाळ्याचा प्रचंड कडकडाट होत राहिला . तेवढ्यात अनावर होऊन विठ्ठल वाघ उठले व शम्स साहेबांजवळ येऊन त्यांनी त्यांना गच्च मिठी मारली . ती तशीच ठेवत लहान मुलासारखं वर उचलून ते शम्सजींना गोल गोल फिरवत होते . ..कितीतरी वेळ ! सभाग्रह भरल्या डोळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात हा अलौकीक नजारा (हिंदी -मराठीची गळामिठी / दोन जेष्ठांनी श्रेष्ठत्वाला दिलेली दाद ) पाहात होतं …आजही तो प्रसंग जशाचा तशा डोळ्यांसमोर उभा राहिला . अत्यंत निगर्वी ,शांत स्वभावाचे शम्स हयातभर कष्ट करून इमानदारीचं आरोग्यपूर्ण आयुष्य जगले . ईर्षा ,मत्सर त्यांच्या जवळपासही कधी फिरकताना दिसली नाही .
‘ मध्यान्ह का सूर्य ‘ या पुस्तकात त्यांच्या निवडक रचना प्रकाशित झालेल्या आहेत .
वैयक्तिक जगणं बाजूला करून हा माणूस केवळ शायरीसाठीच जगतोय !असंच वाटत असे.
कधी कविता ऐकाव्याशा वाटल्या की मी शम्संना फोन करत असे .
खाजगी मैफिलीत हिंदी , ऊर्दू शायरीबद्दल खूप गप्पा , चर्चा होत . नव्या जुन्या कविता गायल्या ऐकल्या जात . अनेक किस्से ऐकायला भेटत . ते सांगताना शम्स अगदी खुलून येत …ते सगळंंच आता परत कधी होणार नाही ! शहरात मला आवडणा-यांची संख्या कमी होते आहे आणि …..!!!
त्यांचाच एक शेर आठवावा अशी ही स्थिती..
“जिंदगी की राहों में आँसूओं के चिराग जलते हैं , हाय कैसा ये दौर-ए–हाजिर हैं खून पी पी के लोग पलते हैं ! “
एक कवी जगाचा निरोप घेऊन जातो तेव्हा इथे काय ठेऊन जातो …तर अजरामर कलाक्रुती !
त्यांच्या जाण्यानं जालन्यातील ऊर्दू शायरीचं आतोनात नुकसान झालं आहे. शिवाय बशर नवाज साहेबांच्या नंतर शम्स यांच्या जाण्यानं मराठवाडा आणि महाराष्ट्रातून ऊर्दू शायरीचं राष्ट्रीय स्तरावरचं प्रतिनिधित्व संपते की काय ..अशी परिस्थिती आहे .
ऊर्दू मध्ये लिहिणारे अनेकदा टोपन नाव धारण करून लिहितात . आणि ते नाव शक्यतो लेखकाचा पिंड दर्शवणारं असतं . ‘शम्स ‘ यांचंही मुळ नाव शमसोद्दिन होतं .त्यामुळे एकदा गप्पांच्या ओघात’ शम्स ‘ शब्दाचा अर्थ विचारला तर , म्हणाले ; “तळपता सूर्य !” अगदी खरंय , तसंही कवीचं काम सूर्यासारखंच तर असतं . दाह सोसून सत्यता समोर ठेवणारं….
शायरीच्या विश्र्वात हा सूर्य सदैव तळपत राहो…
त्यांना विनम्र आदरांजली !
- संजीवनी तडेगावकर, जालना
शम्स जालनवी यांची रचना
‘मध्यान्ह का सूर्य’ सूर्योदयापूर्वीच मावळला!
जालना शहरातील ख्यातनाम उर्दू आणि हिंदी शायर शमशुद्दीन मोहमद फाजील अंसारी ऊर्फ शम्स जालनवी यांचे आज पहाटे साडेपाच वाजता अकाली निधन झाले. मृत्यूसमयी ते ९४वर्षाचे होते.
उर्दू व हिंदी साहित्य विश्वाला आपल्या हृदयस्पर्शी शायरीने समृद्ध करणारे हे सारस्वत शायर हलाखीच्या परिस्थितीने तखलब जिवन जगत होते. आपल्या शायरीने कधीकाळी वर्तमानपत्राचा रकाना रंगविणारे हे शायर गेल्या पन्नास वर्षापासून वर्तमानपत्र विकून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते.सकाळी चार वाजता उठून ते वृत्तपत्र जमा करून ते वाटप करीत होते.
सन १९४५ मध्ये जालना शहरातूनच १० वीची परिक्षा उत्तीर्ण झालेले शम्स जालनवी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी लाहोर महाविद्यालयातून उच्चविद्या पदवी संपादन केली. शालेय जिवनापासून शायर चे वेड लागलेले शम्स जालनवी हे नावाजलेले शायर होते. शकील बदायूनी, नौशाद, गुलजार आदी नामवंत शायरांसोबत शम्स यांनी भारतभर आपल्या हृदयस्पर्शी शायरीने श्रोत्यांना वेड लावले व त्यांची मने जिंकली, त्यांच्या शायरीतून वास्तव व करूणा आपल्याला हाक देते. शम्स यांनी जे पाहिलं, जे जगलं, जे भोगलं तेच त्यांनी आपल्या शायरीतून मांडलं.
जर्द जर्द चेहरे है। जख्म दिल के गहरे है। वक्त है तमाशाइ ।। वो तसल्ली देते है।
जखमों पर नमक रखकर। खूब है मसीहाइ।। बज्मे ऐशसे फुरसत । जब मिले चले आना। बेकसोकी दुनियाँमे । वक्त के मसीहाँ वो। नापकर बता देना । तुम गर्मों की गहरायी।। एक दौर वो भी था। शम्स मुझसे डरती थी। गर्दीसे जमाने की। मेरी कस्म पुर्सी पर । दोस्तो के दिल टूटे।
दुश्मनों की बन आयी वो तसल्ली देते है। जख्मों पर नमक रखकर । खूब है मसीहा।
या त्यांच्या काव्यपंक्तीतून संघर्षमय जिवनाची हाक येते त्यांच्या शायरीने त्यांना जगणे व संघर्ष शिकविला शिवाय जगण्याची उमेदही वाढविली.
आज फिर अहसासे गम ताजा हुआ। मिल गये थे जाने पहचाने बहुत ।। तेरे चेहरे का भरम खुल जाएगा । रास्ते मे है, आईना खाने बहुत ।। शम्स’ रखिए अपनी चादर का खयाल लग गऐ तूम पैर फैलाने बहुत ।।
या त्यांच्या काव्यपंक्ती सामाजिक वास्तवतेचे भान दर्शवून देतात. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या तळहातावर तरलेली नसून श्रमिक, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे.’ हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांगतात. खरच ही पृथ्वी श्रमिक व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे,हे ९४ वर्षीय शम्स जालनवी यांनी आपल्या शायरी सोबतच पोटाची खळगी भरतांना दररोज जगाला दर्शवून दिले.
कैसे गीत सूनाऊ मै बैरी बन गया जग ही सारा । किसको गले लगा लू मै। तूम तो पिया परदेस सिधारे । सपनो मे ही आ जाओ। रात विरहा की उनसी लगी है। मन कैसे बहलाऊ मै ।
प्रेमाला जात-पात नसते. गरीब-श्रीमंतीचा भेदभावही नसतो मात्र प्रेमात विरह असतो हे त्यांच्या उपरोक्त काव्यपंक्तीतून दिसतो.
शम्स यांनी गरीबीशी संघर्ष केला. आपल्या शायरीतून अनेकांच्या जीवनात प्रकाश पेरणारे शम्स हे मात्र आयुष्यातील अंधारात चाचपडत राहिले. अंधाराशी सामना करतांना ते हतबल मात्र झाले नाहीत.
संघर्षमय जिवन जगतांना शम्स यांनी आपली स्वप्ने कधीकाळी खूडून टाकलेली होती. स्वप्न न बघता वास्तविक जिवन जगणारे शम्स हे श्रमिक व कष्टकऱ्यांचे खरे नायक होते. त्यांच्या शायरीतून त्यांनी समाज वेदना, आत्मा वेदना मांडल्या.
मेरा मन कितना पागल है। काँटों से खुशबू की आशा । जहर से जीवन माँग रहा है ।। सूखे पेड से छाया माँगे। पत्थर दिलसे माया माँगे। गुंगेसे वो प्यारकी बोली। निर्धनसे धन माँग रहा है। मेरा मन कितना पागल है ।। खुशबू कागज के फुलोंसे । थंडक भडके हुए शोलोसे । अंधोसे आखोंकी ज्योती। उससे दर्पन माँग रहा है। मेरा मन कितना पागल है । होती नही हर आशा पुरी। फिरभी बंधी है आस की डोरी।
पागल मनवा फिर पागल है। प्यार का आँगन माँग रहा है। मेरा मन कितना पागल है। बितें दिन नही लौट के आते। सुखे फुल नही मुस्काते। शम्स वो मेरी बुढी माँ से। मेरा बचपन माँग रहा है मेरा मन कितना पागल है। काँटोंसे खुशबू की आशा जहर से जीवन माँग रहा है।। उपरोक्त काव्यपंक्ती आजच्या सामाजिक व वास्तविक जिवनावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
मैफिलीत चाहत्यांनी त्यांना भरभरून दाद दिली. मात्र मैफिल संपताच शम्स यांचा जगण्यासाठीचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून नित्यनेम चालू होता. वास्तविक परिस्थितीशी संघर्ष करतांना कसं जगायच
हे सांगणारे शम्स हे चालते बोलते काव्यपिठ होते. अनेक ग्रंथ संपदा प्रकाशित असतांनाही कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवणारे शम्स हे एक उपेक्षित शायर होते.
आर्थिक अडचणी असल्याने त्यांच्या काही काव्य संग्रह प्रकाशनासाठी काही सामाजिक संस्था, राजकीय नेते मंडळींनी त्यांना मदत केली होती.
शरीर थकले तरी मनाची उभारी आकाशात उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे कायम ठेवणारे शम्स जालनवी हे याचे उत्तम उदाहरण होते.देशभरात आयोजित मुशायरा, साहित्य संमेलन, आदी ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शायरीने श्रोत्यांची मने जिंकणारे शम्स जालनवी यांना जालना शहरातील विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.नामवंत शायर आणि समिक्षकांनी शम्स जालनवी यांना’शहनशाह-ए-गझल’,’शान- ए- महाराष्ट्र’,’फक्रे जालना’,’शहंशाह-ए-तरन्नुम’आदी पदव्या दिल्या होत्या. अखेरपर्यंत जगण्यासाठी धडपड करणाऱ्या ख्यातनाम शायर शम्स जालनवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अजीम नवाज राही यांचा लेख