शपा : जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू
शपा : जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू
प्राच्याविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांच्या प्रति विनम्र अभिवादन.
“प्राचीन भारताचे पहिले धननिर्माते – वरकड मालाच्या अर्थी- दास व शुद्र होते. सुमरे ३०००० वर्षे त्यांनी ऊर फुटेतो अखंडपणे केलेल्या श्रमांनी जी महान प्राचीन संस्कृती जन्माला घातली व पोसली, तिनेच त्यांच्या गुलामगिरीच्या बेड्या घडवल्या व घट्ट केल्या. राज्यासंस्थेने त्यांच्या धुमसत्या दास्यात दडपून ठेवले, धर्माने त्यांच्या जन्मजात दास्याच्या कर्मकहाणीचे संकीर्तन केले, ….” भारतीय व्यवस्थेला शरद पाटील अश्रूविहीन शोषणाची अनन्य परंपरा असा उल्लेख करतात. शरद पाटलांनी विस्तृत पुराव्यांच्या आधारे मांडलेला हा सिद्धांत लक्ष्मणशास्त्री जोशी यांना “भारतीय विचारवंतांना दिलेले फारच मोठे आव्हान’ वाटतो.
शरद पाटलांनी विचारवंतांसाठी इतिहासाकडे बघण्याची नवी दृष्टी दिलेली आहे. ते म्हणतात, “इतिहासज्ञाचे काम ऐतिहासिक घटनेच्या सिद्ध सत्यतेबद्दल शंका उपस्तित करीत राहणे हे नसून, त्या घटनेला जन्म देणाऱ्या कारणाचा वा कारणांचा शोध घेणे हे असते”. त्यामुळेच शरद पाटलांनी भारतीय इतिहासाला नवा आयाम दिलेला आहे.
प्राच्यविद्यापंडित असल्याने शरद पाटलांनी भारतीय साहित्य व पुरातत्व साधने मुळातून अभ्यासून आपली सैद्धांतिक मांडणी केलेली आहे. २० व्या शतकात कष्टकऱ्यांच्या हितासाठी चालवलेल्या अनेक आंदोलनात ते आघाडीचे नेते होते. त्यामुळे भारतातील कष्टकरी-शोषित समाजाप्रति त्यांची बांधिलकी तर होतीच पण भारतीय साहित्यात शोधलेल्या निष्कर्षांना समाजाच्या लोक परंपरांमध्ये त्यांची त्यांना मूळे शोधता आलेली आहेत.
डॉ. धर्मेंद्रनाथ शास्त्री शरद पाटलांच्या या मांडणीला ‘युप्रवर्तक कृती’ संबोधतात तर, डॉ. इर्फान हबीब त्यांची ही कृती ‘प्राचीन भारताच्या आकलनाला वैशिष्ट्यपूर्ण योगदान आहे’ असे सांगतात. डॉ. रोमिला थापर सांगतात “प्रबंधाचा केलेला विकास तपशीलात सापेक्षत: नवा आहे. किमानपंथी हा प्रबंध प्राचीन भारतीय कालखंडावर नव्या त्रिमिताचा आग्रह धरतो”. प्रा. मे. पु. रेगे आणि डॉ. अ. भि. शहा हे शरद पाटलांच्या मांडणीची तुलना प्रा. दा. ध. कोसंबीं, प्रा. देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्याशी करीत असलेतरी प्रा. मे. पु. रेगेंना शरद पाटलांची मांडणी अधिक शिस्तबद्ध वाटते.
शरद पाटील सैत्रांतिक मार्क्सवादी विचारवंत होते, त्यांनी समाजाच्या पररात्मिकातेचे सूत्र सांगितलेले आहे, ते म्हणतात, “जे समाज भौतिक अस्तित्वातून लयाला जातात, ते धार्मिक पंथ व स्वर्गीय वा नारकीय समाज म्हणून अस्तित्वात राहतात.” शरद पाटील बुद्ध आणि ब्राह्मणी सौदर्य दृष्टीतील विरोधाभास मांडताना सांगतात “बौध्द सौंदर्यदृष्टी विजातीय, किंबहुना वर्णजातीविरोधी होती, तर ब्राह्मणी सौंदर्यदृष्टी जातीय होती”. बुद्धाने “जातीव्यवस्थेला वैज्ञानिक विरोध करायची वैचारिक हत्यारे तयार करून ठेवली.” असल्याचे ते नमूद करतात. ‘ब्राह्मणशाही व भांडवलशाही’ हे भारतातील सम्यक समतेचे शत्रू होत. हे सम्यक समतेचे ‘सूत्र’ मांडून बाबासहेबांनी ‘अनन्य राज्यशास्त्रीय योगदान’ दिलेले असल्याचे कॉम्रेड शरद पाटील नमूद करतात.
भारतातील तत्कालीन समाजाच्या प्रश्नाची मुळे जातीव्यवस्था व भांडवलशाही यांच्या दुहेरी मांडणीत गुंफलेली आहेत. म्हणून शरद पाटलांनी केलेल्या वैचारिक मांडणीचा उपयोग समाजाच्या प्रश्नांची उकल करून ते सोडविण्यासाठी होते. त्यामुळेच भालचंद्र नेमाडे हे जयराम सांगळे सारख्या तरुण कार्यकर्त्याला पडलेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी शरद पाटील यांच्याकडे जाण्याचा सल्ला देतात. महाराष्ट्रातील अनेक विचारवंत व कार्यकर्ते समाजाच्या तत्कालीन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शरद पाटलांच्या साहित्याकडे ‘मार्गदर्शक’ म्हणून पहात आहेत. कॉ. किशोर मांदळे, श्रीमंत कोकाटे, राजकुमार धोगरे, सुभाषचंद्र सोनार, धम्मसंगिनी असे अनेक तरुण विचारवंत व कार्यकर्त्यांकडे त्या दृष्टीने पहाता येईल.
प्राच्याविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील हे भारतातील जात्यांतक प्रबोधनाचे महामेरू आहेत.
डॉ. विजय भगत
अकोले.