प्राचार्य डॉ. एस. ओ. हलसगी सर
अधिकार, सत्ता, पद मिळविण्यासाठी माणसं काय नाही करत! सत्ता, पद हे अधिकार गाजवायलाच असतात अशा समजुतीने ते आपल्या पदरात पाडून घेण्याचा अनेकांचा कसोसिचा प्रयत्न असतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सहज भेटतील. पण याला काही अपवादात्मक उदाहरणं अशीही भेटतात की काही माणसं पदाचा, अधिकाराचा अहंम न ठेवता आपल्या अनुभवाचा उपयोग करून आपण करत असलेल्या सेवेला परिपूर्ण बनवत असतात. त्यातलेच एक नाव म्हणजे नुकतेच निवृत्त झालेले कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ओ. हलसगी सर! ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त हा छोटासा लेख प्रपंच.
सरांचा सहवास तसा एक वर्षांचाच मला लाभला. या एक वर्षात सरांचं साधं, स्वच्छ, मार्गदर्शी, समंजस, उत्तम आणि अनुभवी व्यवस्थापक, संयमी आणि तितकंच शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व मला भावलं. याचा अनुभव या एक वर्षात मला अनेक वेळा आला आहे. अगदी सुरवातीलाच मी महाविद्यालयात हजर होण्याच्या काही महिने आधी सरांनी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यामुळे मी आल्या आल्या त्यांच्या केबिन मध्ये प्रवेश केला. सर उठून उभे राहिले आणि तत्क्षणी स्वतः मला स्टाफरूम मध्ये घेऊन जाऊन सर्वांशी माझी ओळख करून दिली. ओळख करून देताना माझ्या साहित्य चळवळीची आणि कार्याची माहिती द्यायला ते विसरले नाहीत. ‘आपल्या महाविद्यालयात तुम्हाला राबविण्यासारखे जे काही नवीन उपक्रम असतील ते मला सुचवा, त्यासाठी लागणारी सगळी मदत मी देईन’ असं त्यांनी पहिल्याच दिवशी सुचवून मला ऊर्जा देण्याचं काम केलं. त्यांच्या या सहकार्याच्या भावनेने मला पहिल्यांदा मोहित केले.
सरांचे नाव आणि त्यांच्या बुद्धिमतेची महती मला इथे येण्या आधीच बेळगावमधील बी. के. कॉलेजमधील वाणिज्य विभागाच्या अनेक प्राध्यापकांच्या तोंडून मी ऐकली होती. इथे रुजू झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली. सरांनी प्राचार्य म्हणून कार्यभार स्विकारल्या स्विकारल्या तीन मुख्य संकल्प केले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयाचे तीन नियतकालिके (स्मणिका सह) प्रसिद्ध करणे, NAAC ची (3rd Cycle) तयारी करून पीर कमिटी बोलावणे, भव्य क्रीडा भवन पूर्ण करून उदघाटन करणे. यापैकी कोविड-१९ मुळे पीर कमिटी येऊ शकली नाही अन्यथा त्यांनी केलेले सारे संकल्प पूर्ण केलेत. या दरम्यान त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि बुद्धिमतेची चुणूक जवळून अनुभवता आली. आपल्या सह प्राध्यापकांशी बंधुत्वाच्या नात्याने संबंध ठेऊन प्रत्येक कार्य उत्तम कसे करून घ्यावे हे डॉ. हलसगी सरांकडून शिकण्यासारखे आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आणि स्टाफ मध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच त्यांच्या निवृत्ती
निमित्त सत्कार सोहळ्याला लॉकडाऊन असतानाही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (सामाजिक अंतर राखून सोहळा पार पाडला)
या सत्कार सोहळ्यात प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांनी सरांविषयी मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांच्या एका विद्यार्थिनीने मांडलेले मनोगत लक्षात घेतले तर समजू शकेल की विध्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या प्रति किती ममत्व आहे. “अंधारातही उजेड पेरणारे हलसगी सर माझ्या वडिलांच्या जागी इतके थोर आहेत, की माझ्या प्रत्येक यशाची बातमी मी आधी सरांना कळवते. माझ्या बिघडलेल्या मनोवृत्तीला आधारभूत वाटणारे कवितेचे एक सुंदर पान म्हणजे हलसगी सर आहेत.” या तिच्या मनोगतातून लक्षात येते विद्यार्थ्यांचे ते लाडके का असावेत. आजपर्यंत त्यांचे असंख्य विद्यार्थी सी.ए., एम.बी.ए., उच्च पदवीधर होऊन देशभरासह अनेक देशांमध्ये कार्य करत आहेत.माणूस म्हणून डॉ. हलसगी सर मोठे आहेतच पण विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणूनही ते खूप मोठे आहेत.
बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये वाणिज्य शाखेचे एक संशोधक म्हणून सरांची छाप आहे. वाणिज्य शाखेतील अनेक महत्वाची पुस्तके सरांनी लिहिली आहेत; ज्यांचा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातून नोट्स म्हणून वापर केला जातो. त्यांच्या एकंदरीत अनुभवाचा संस्थेच्या जडणघडणीतही त्यांनी वापर केलेला दिसून येईल. ग्रामीण अप्रगत भागात महाविद्यालय असलेल्या ठिकाणी ज्ञानाची उतुंग परंपरा निर्माण करण्यामध्ये डॉ. हलसगी सरांचा वाटा मोठा आहे हे स्टाफसह व्यवस्थापन कमिटीही अभिमानाने सांगतात.
सेवेची ३७ वर्षे फक्त आणि फक्त उत्तम विद्यार्थी घडविण्यात खर्च करून सर आज सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या साध्या, समंजस, शिस्तप्रिय, प्रतिभावान, मार्गदर्शी, प्रोत्साहित व्यक्तिमत्वासारखी माणसं मिळणे विरळच! सरांना शुभेच्छा देण्यासाठी जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते म्हणाले, “तुमचा विभाग मोठा करा. भरपूर वाचा आणि भरपूर नवीन ज्ञान मिळवा. तुमची ओळख तुमच्या ज्ञानातून, कार्यातून झाली पाहिजे.” असे मार्गदरर्शन करणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्व डॉ. एस. ओ. हलसगी सरांना मनोमन सलाम केला. त्यांचे सेवा निवृत्तीनंतरचे जीवन सुख-समाधानाचे, उत्तम आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे जावो हीच मनोकामना!
प्रा. अशोक रघुनाथ आलगोंडी
मराठी विभाग प्रमुख,
शिवानंद महाविद्यालय, कागवाड,
जि. बेळगाव.
९०३५३९५९२३