भक्ती-भीती-भास ‘ आहे काय?
नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि मराठी साहित्य संमेलनाच्या शुभारंभाला ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने सरांचे फँसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन 'भक्ती-भीती-भास'हे पुस्तक वाचकांच्या हाती आले.
भूतकाळाच्या पायावर वर्तमान भक्कमपणे उभा राहत असतो.अगदी मध्ययुगीन काळ आणि आज वर्तमानात देशात सामाजिक, राजकीय,आर्थिक पातळीवर घडलेल्या घटनांचे विश्लेषण सूक्ष्मतेने करुन त्यावर पत्रकाराच्या नजरेतून परखड,पारदर्शी विचारांनी माने सरांनी या पुस्तकात भाष्य केले आहे. अनेक घटना आपल्याला फक्त मथळ्याने माहित असतात. त्यामागची पार्श्वभूमी,त्या घटनांचे परिणाम याची सखोल माहिती मिळत नाही किंवा तसा प्रयत्न होत नाही.हा प्रयत्न या पुस्तकातून यशस्वी झाला आहे.
त्या त्या काळात फँसिझमच्या छायेत घडलेल्या घटना ,त्याचे परिणाम, त्यामुळे उठलेले विचारतरंग वर्तमानावरही कसे परिणाम करतात याचे अतिशय मार्मिक विवेचन या पुस्तकात आहे.भक्ती-भीती-भास या न दिसणा-या मानवी भावना मानवाच्या मानसिक, भावनिक पातळीवर कार्यरत राहून सतत त्याचे जीवन व्यापून टाकण्याचे,त्याला दिशा देण्याचे काम करत असतात.कुठल्याही प्रकारच्या फँसिझमचा प्रभावी प्रभाव या भावनांवर होत असतो.अतिशय समर्पक असे शीर्षक या विचार ग्रंथाला दिले गेले आहे.त्या अनुषंगाने मुखपृष्ठ वेधक झाले आहे.
पुस्तकात एकूण चौदा प्रकरणे आहेत. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रकरणांना विषयानुरुप आणि अतिशय मनोवेधक शीर्षक दिली आहेत.ब्रम्हवादिनीची जोडवी-पैंजणे,शाहबानो ते शायराबानो-व्हाया मंदिरप्रवेश! यातून स्री जीवन,त्यांचे हक्क स्वातंत्र्य यावरील अनेक पैलूंवर उजेड टाकला आहे. काळी-पांढरी तसेच दुस-या प्रकरणातून त्यांनी भारताचा कणा असणा-या शेतीविषयी वेळोवेळी घेतलेली धोरणे,झालेल्या चळवळी त्याचे परिणाम यावर मार्मिक विवेचन केले आहे.
इंग्रजांचे नरो वा कुंजरो धोरण,जुळे देश जुळ्या लोकशाह्या,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धर्मवाद व राष्ट्रवाद यासारख्या संवेदनशील विषयांना हात घालून माने सरांनी आपले विचार परखडपणे मांडले आहेत. शेवटची दोन प्रकरणे म्हणजे विचार कधीच मरत नाहीत!, आणि आशेवर जगणाऱ्या माणसांचा देश यातून अनेक गोष्टीत विविधता असणा-या भारताची जागतिक पातळीवर भूमिका यावर प्रकाश टाकला आहे तसेच या पार्श्वभूमीवर यशस्वी लोकशाही राबवणा-या भारताच्या दिमाखदार, उज्ज्वल विकासाचे कौतुक मांडले आहे. त्याबरोबर देशापुढील अनेक आव्हानांवरही प्रकाश टाकला आहे.
दर्जेदार वैचारिक पुस्तकांची मालिका देणा-या मनोविकास प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित करुन एक उत्तम पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे. इतिहासाचा मागोवा घेत वर्तमानातील समस्यांचा एका पत्रकारांच्या तीक्ष्ण नजरेने घेतलेला हा वेध आहे. हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख तर करतेच.त्याबरोबर त्याच्या जाणीवांचा विकासही करते.त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जुन वाचावे असेच आहे .चोखंदळ वाचक भक्ती-भीती-भास या पुस्तकाला नक्की प्रथम पसंती देतील .
सौ.सुरखा अशोक बो-हाडे
नासिक
मोबा.नं. 915877424
पुस्तक- फँसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन ‘भक्ती-भीती-भास’
लेखक – श्री.श्रीमंत माने
प्रकाशन -मनोविकास प्रकाशन
किंमत- ₹ ३५०/-