2020 एप्रिल

मोठया भावाबद्दल : पी. विठ्ठल

सा हि त्या क्ष र 

हे माझे मोठे भाऊ. प्रभाकर.  खरं तर त्यांच्याविषयी मी यापूर्वीच लिहायला हवं होतं; पण नाही लिहिलं. लिहायलाही योग्य काळ,  वेळ यावी लागते हेच खरं.

भाऊ औरंगाबादच्या बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुमारे साडेतीन दशके प्रदीर्घ कष्टाची नोकरी केल्यानंतर उद्या  निवृत्त होत आहेत. वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी. एकोणविशे बासष्ट हे त्यांचे जन्म वर्ष.  माझ्यापेक्षा सुमारे तेरा वर्षांनी ते मोठे. (आम्ही तिघे भाऊ. मी धाकटा.  मधला भाऊ शंकर. आम्ही तिघेही अनुक्रमे औरंगाबाद,  पुणे आणि नांदेड या शहरात राहतो.)  म्हणजे वयाचं हे अंतर पाहता निखळ खळाळत्या मैत्रीसारखं वगैरे नातं निर्माण होणं शक्यच नव्हतं. पण वयाच्या अधिकारानं  त्यांनी सतत माझ्यावर पितृतुल्य असं प्रेम केलं. हे प्रेम इतकं निरपेक्ष आणि निस्वार्थी आहे की आजच्या व्यावहारिक भौतिक जगात एक भाऊ दुसऱ्या भावावर असं प्रेम करू शकतो, यावर विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. खरं तर आमच्यात  जो संवाद होतो,  तोही पुष्कळ तुटक  स्वरूपाचा असतो. पण  त्याने काही बिघडत नाही. शिवाय  वैचारिक पातळीवर आमच्यात काही  बाबतीत पुष्कळच मतभेद असले तरी त्या मतभेदासकट आम्ही एकमेकांवर निस्सीम प्रेम करतो.

माझ्या आयुष्याला जे काही नीट वळण मिळालं त्याचं   पुष्कळच  श्रेय माझ्या भाऊचं  आहे. मी आज जो काही आहे तो त्यांच्यामुळे. लहानपणापासूनच अत्यंत जिज्ञासू,  चिकित्सक आणि अत्यंत प्रामाणिक असलेल्या या माझ्या भावाने निवृत्तीपर्यंत आपली ही ओळख कसोशीने जपली आहे. नोकरीबरोबरच सातत्याने कितीतरी सामाजिक प्रकल्पात त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. म्हणजे आजच्या काळात चार- दोन वस्तूंचे वाटप करून फोटो काढून समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या तथाकथित समाजसेवकांपेक्षा त्यांचे सातत्याने  उपक्रमशील असणे,  मदतीसाठी तत्पर असणे ही घटना मला अधिक मोलाची  वाटते. अगदी सुरुवातीच्या काळापासून कौटुंबिक स्तरावरची मोठी प्रतिकूलता वाट्याला येऊनही त्यांनी त्या काळात आश्रमशाळेत राहून आणि पुढे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळवली. आणि संपूर्ण कुटुंबाची एक जबाबदार पालक म्हणून काळजीही घेतली. भोवतालात संघर्ष असूनसुद्धा त्यांनी त्याविषयी कधी तक्रार केली नाही. माझ्यासाठीच नव्हे तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर केलेला त्याग कदापि विसरता येणार नाही.

मला तर अगदी शालेय वयापासून त्यांची सतत मदत होत आली आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनातले सगळे चढउतार त्यांनी पाहिले आहेत. त्यांनी मला कधीही मानसिकदृष्ट्या खचू दिलं नाही. मी ज्या-ज्या गोष्टी  त्यांना मागितल्या  त्या गोष्टींची पूर्तता त्यांनी विनातक्रार केली.  हे करताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही त्रागा दिसला नाही. अगदी कॉलेजला असताना त्यांनी मला घेऊन दिलेली हिरो होंडा मोटरसायकल असो किंवा माझ्याच हट्टापायी घरी घेतलेला लँडलाईन फोन असो किंवा माझी पुस्तके प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी त्या काळात केलेला मोठा खर्च असो  (म्हणजे वीस पंचवीस वर्षांपूर्वीच्या या सगळ्या गोष्टी ) त्यांनी हे सगळं खूप मनापासून केलं.  माझी नोकरी,  लग्न  या सगळ्या काळात त्यांनी मला अत्यंत खंबीर अशीच साथ दिली.

मी  ‘कवी’ असण्याचा त्यांनी कायमच अभिमान बाळगला.  “हा माझा भाऊ विठ्ठल. कवी आहे. विद्यापीठात प्राध्यापक आहे. ” हे मित्रांना सांगताना त्यांच्या डोळ्यात मी कायम एक आनंद पाहिला आहे. ‘आराम’ नावाची गोष्ट त्यांना ठाऊक नाही. सतत काही ना काही करत राहणे ही त्यांची वृत्ती. ‘आळस ‘ आणि ‘अशक्य’ हे दोन शब्द त्यांच्या शब्दकोशात नाहीत.  सतत क्रियाशील राहण्यातच त्यांना आनंद मिळतो. मला कळतं तेव्हापासून त्यांच्या दैनंदिनीत बदल झालेला नाही. ऋतू कोणताही असो-  सकाळी लवकर उठणे,  योगा- प्राणायाम करणे आणि थंड पाण्याने आंघोळ करणे,  यात खंड पडलेला नाही.  खाण्यापिण्याबद्दलची कोणतीही आसक्ती  नाही. संपूर्ण शाकाहारी व्यक्तिमत्व. चहा,  कॉफीच काय,  पण अपवादानेसुद्धा दूध किंवा इतर पेयाला  कधी स्पर्श केला नाही. आत्यंतिक सात्विक जगणं.  (आणि मी मात्र नेमका त्यांच्या उलट.) 

रात्री-अपरात्री जागरणं झाली तरी त्यांच्या दैनंदिनीत खंड पडत नाही.  एसएसवायचे शिक्षक आणि नॅचरोपॅथीचे मार्गदर्शक ही त्यांची एक महत्त्वाची ओळख. ही ओळखच  त्यांना सकारात्मक ऊर्जा पुरवत आली आहे.  त्यांचे अनेक मित्र माझेही मित्र आहेत. मी कवी किंवा प्राध्यापक असण्यापेक्षा मला ‘पवार गुरुजींचा भाऊ’ असं कुणी म्हटलं की जास्त आनंद होतो. ही  ओळख मला अधिक प्रिय वाटते.  विद्यार्थी होतो तेव्हा अनेकदा मी भाषणाला,  स्पर्धेला वगैरे जायचो किंवा कार्यक्रमाचे स्वतंत्र आयोजन करायचो.  माझ्या व्यक्तिगत आवडीनिवडीवर किंवा स्वच्छंद जगण्यावर त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही किंवा राग व्यक्त केला नाही. एखादी गोष्ट फारच खटकली  तर अत्यंत सहजपणे,  सौम्यपणे ते जाणीव करून देत.

मला इतरांसारखं सामाजिक नातेसंबंधात फारसं  रेंगाळता येत नाही. ही माझ्या स्वभावाची एक मर्यादा आहे. ( शंकरभाऊला मात्र हे छान जमतं.  तो कोणत्याही अनोळखी वा ओळखीच्या नातेवाईकांत सहज मिसळून जातो.)  प्रभूभाऊलाही ते  फारसं  जमत नाही. पारंपरिक स्वरूपाच्या किंवा कौटुंबिक सुखदुःखाच्या गोष्टी फारशा करता येत नाहीत.  गप्पांचे निरर्थक फड  रंगवण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. खरंतर त्यांच्या शेकडो आठवणी माझ्याकडे आहेत. माझ्या बहुतेक मित्रांना ते ओळखतात. माझ्या प्रत्येक मित्रांविषयी त्यांच्या मनात आत्मीयता आहे. 

त्यांना आयुष्यात फारसे व्यावहारिक वागता आले  नाही. आणि त्यामुळे गरजेपेक्षा अधिक कोणतीच भौतिक संपत्तीही त्यांना जमवता आली नाही;  पण जे मिळवलं ते स्वतःच्या हिमतीने,  प्रामाणिकपणाने. हजारो माणसांचा आत्मीय गोतावळा ही त्यांची मोठी उपलब्धी आहे.  भाऊ म्हणून त्यांनी मला जे दिलं,  त्याचा एक अंशही मी त्यांना परत करू शकलेलो नाही. आणि ते शक्यही नाही.  नोकरी,  घर,  नातलगांना सांभाळत स्वतःचे छंद आणि आवडीनिवडी जपत त्यांनी स्वतःला ‘तरुण ‘ ठेवलं  आहे. वेळ मिळेल तशी त्यांची भटकंती सुरू असते. युट्युबच्या  माध्यमातून ते त्यांच्या फॉलोवर्सना  भेटत असतात.  या  वयातही त्यांचे उत्साही असणे खूप आश्वासक वाटते.

अर्थात त्यांच्या या सगळ्या प्रवासात सोबत असलेल्या सौ. वहिनींचा मी उल्लेख केला नाही,  तर तो कृतघ्नपणा ठरेल. वहिनींनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकसंध ठेवलं आहे.  प्रत्येकाच्या भल्यासाठी त्यांनी  प्रयत्न केले आहेत.  वादविवाद टाळून,  कौटुंबिक हिताचाच त्यांनी विचार केला. मानअवमान पचवून,  मोठी आर्थिक झळ सहन करूनही त्यांनी कधीच कुरबूर केली नाही. ‘सहनशीलता’ आणि ‘समंजसता’ हे वहिनींचे सर्वोच्च गुण आहेत. त्यांच्या या समंजतेमुळेच भाऊला सामाजिक पातळीवर कार्यशील राहता आलं आणि नोकरीचा हा प्रदीर्घ पल्लाही सहज पार करता आला.

परवा भाऊंचा सुजाताला फोन आला. (भाऊ आणि मी  क्वचितच थेट बोलतो. अनेकदा वहिनी आणि सुजाता यांच्यामार्फतच  आम्ही अधिक बोलतो.)  ते कंपनीत होते. अवघ्या एक दोन दिवसानंतर या कंपनीतून  आपण कायमस्वरूपी बाहेर पडणार ही अस्वस्थ करणारी जाणीव त्यांच्या मनात असावी. आणि ते स्वाभाविकही होते. 
या कंपनीविषयी,  त्यांच्या ऑफिसविषयी कायमच  त्यांना आस्था वाटत आली आहे.  सुजाताला त्यांनी  व्हिडिओ कॉल केला.  मी,  अर्णव आणि ओवी सोबत होतोच.  मग त्यांनी कंपनीचा संपूर्ण परिसर,  कार्यालय,  त्यांचे केबिन सर्व काही अत्यंत उस्फूर्तपणे दाखवले. ते खूप उत्साहाने बोलत होते. त्यांचा उत्साह आणि कंपनीच्या शेवटच्या दिवसाची जाणीव यामुळे सुजाताही गहिवरून गेली. कितीतरी वेळा ‘थँक्यू भैय्या. काळजी घ्या ‘ वगैरे ती बोलत राहिली.  फोन कट झाला.

आता उद्या भाऊ खरोखरच निवृत्त होत आहेत. आयुष्याच्या एका नव्या पर्वाला ते सामोरे जात आहेत. वय थांबत नाही. काळ थांबत नाही. काळाबरोबर आपल्यालाही धावावं लागतं. त्यांच्या नोकरीला उद्या पूर्णविराम मिळणार असला तरी त्यांचे कार्य मात्र थांबेल असं वाटत नाही. ते थांबूही नये. त्यांना अधिकाधिक आत्मिक बळ मिळो आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो की सद्भावना इथे व्यक्त करतो.

निवृत्तीनंतरच्या काळात मात्र  त्यांनी खूप वाचायला हवं.  अगदी ‘ठरवून’ वाचायला हवं.  शक्य असेल तर लिहायलाही हरकत  नाही.  प्रवास टाळून घरी कुटुंबाला वेळ द्यायला हवा,  असं मला मनापासून वाटतं.  उद्या त्यांचा वाढदिवसही  आहे. हा वाढदिवस नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. खरंतर यावेळी आम्ही सर्वांनी एकत्र असायला हवं होतं;  पण लॉकडाऊनमुळे ते शक्य नाहीय.  त्यामुळे इथूनच शुभेच्छा देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.

खूप खूप शुभेच्छा!

p_vitthal@rediffmail.com

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment