2020 एप्रिल

संघर्ष जिवघेणा…

सा हि त्या क्ष र 

प्रा.डॉ.संजय नगरकर


माणसाच्या जीवनात एक असा विशिष्ट काळ येतो की, एकाच वेळी त्याला द्वंद्वात्मक स्थितीशी सामना करावा लागतो. या अवस्थेत व्यक्ती उभं राहण्याचं तरी बळ प्राप्त करते किंवा कोसळते तरी. कोसळणारा कुणाच्यातरी सहानुभूतीचा विषय होतो; परंतु उभा राहणारा परिस्थितीवर स्वार होण्याचा प्रयत्न करतो. माझं आजपर्यंतचं आयुष्यदेखील अशाच अनेक प्रकारच्या द्वंद्वांनी भरलेलं आहे.आजपर्यंतचा प्रवास अनेक हेलकावे खात, आज कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक, मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले, तसेच अपमानही वाट्याला आले. कधी संघर्ष, तर कधी तडजोड स्वीकारावी लागली. काही वावटळी आल्या आणि गेल्या.
चौथीत असतानाच अचानक आमच्या घरावर एक संकट कोसळलं. आमच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले. विधवा आई, अंध असलेली परितक्त्या गंगू आत्या, एक भावजय आणि सहा भावंडं असा नऊ माणसांचा संसार वार्‍यावर सोडून वडिलांनी सोडचिठ्ठी घेतली.या जगापासून. मोडकीतुटकी झोपडी, दोन पत्र्यांच्या खोल्या आणि एक पानाचे दुकान मागं ठेवून. घरात वडीलधाऱ्यांचा धाक नसल्यामुळे भावांची शिक्षणं हळूहळू बंद झाली.मी घरात चार नंबरचा आणि दहा-अकरा वर्षांचा.त्यामुळे मला त्याची झळ थोडी कमी बसली.आमची आई मोठ्या धीराची. तिने कंबर कसली आणि मोलमजुरी करून घर सावरू लागली.
माझं शिक्षण पण बंद होतं की काय? या द्वंद्वात मी सापडलो. पहाटे उठून मला पण भावाबरोबर पाव-बटर विकायला जावं लागायचं. कसाबसा मी एकटाच नववीपर्यंत शिकलो. नववी झाल्यावर गावातल्या एका मारवाड्याच्या नातेवाईकाकडे नारायणगावला आईने मला घरकामाला पाठवले. मला शिकण्याची खूप आवड होती; म्हणून पुढचं शिक्षण करण्याच्या बोलीवर मी नारायणगावला गेलो. दोन महिने झाले, शाळा सुरू झाल्या तरी आमचे शेठ शाळेत नाव घालायला तयार नव्हते. शेवटी मी ते काम सोडून बेलापूरला आलो. बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालयात दहावीला प्रवेश घेतला. बापूसाहेब पुजारी सरांसारख्या शिक्षकांनी खूप मदत केली. माझं इंग्रजी पहिल्यापासूनच कच्चं आणि पर्यायाने दहावीला इंग्रजी विषयात नापास होऊन घरी बसलो. पुढं काय? हे द्वंद्व निर्माण झालं.दरम्यान मोठा भाऊ सुभाष सीमा सुरक्षा दलात भरती झाल्यामुळे पानटपरी बंद पडली होती. आईने पाच रुपयाची नोट हातात दिली आणि ” पानटपरी उघड ” असं सांगितलं. मी रागाने ती नोट आईच्या अंगावर फेकली आणि तिथून निघून जाऊ लागलो. “आरं बापाची गादी आहे ती. कोणीतरी चालवा रं . ” असं म्हणून आई रडायला लागली. मी बाहेर निघून गेलो. दिवसभर भटकलो.माझं मन मलाच खाऊ लागलं. “आपण बाईशी असं वागायला नको होतं. किती कष्ट करते ती ” असं मनातल्या मनात बोलतच संध्याकाळी घरी आलो. बाईची माफी मागून पाच रुपयावर दुकान चालू केलं. दोन वर्षात दुकानाची घडी चांगली बसली. दररोज घरी दहा रुपये पण देऊ लागलो.
या दोन वर्षात पानटपरीवर येणारे गिऱ्हाईक व त्यांच्यासाठी घ्यावा लागणारा पेपर यामुळे मी माणसं वाचता वाचता पेपरही वाचू लागलो.मोठ्या भावाचा मित्र अन्सार पठाण दररोज दुकानात यायचा. त्याच्या हातात पुस्तक असायचं. मला पण ते पुस्तक पाहून उत्सुकता वाटायची. हळूहळू तो पण मला पुस्तक वाचायला देऊ लागला. त्यातलं काही कळत नव्हतं.पण वाचायचा छंद लागला. दुकानासमोरच जे. टी.एस.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज होतं. माझ्या वर्गातले बेलापूर खुर्दच्या शाळेतले मित्र ११वी साठी तिथं आले. दुकानापुढंच ते सायकली लावायचे. माझं मन मलाच खायचं. “आपण पास झालो असतो, तर यांच्यासारखेच कॉलेजला गेलो असतो ” हळूहळू मनात जिद्द निर्माण झाली. आणि मी आषाढी-कार्तिकी करून एकदाचा कसाबसा दहावी पास झालो. मधल्या दोन वर्षातल्या अनुभवांनी खूप काही शिकवलं होतं. वाचनामुळे मेंदू तल्लख झालेला. आमच्या कुटुंबाविषयी लळा असलेले प्रा. विनायक बंगाळ सर जे.टी.एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य होते. मी त्यांना जाऊन भेटलो. मला पुढे शिकण्याची प्रेरणा त्यांनी दिली. मी कॉलेजला जाऊ शकत नव्हतो. त्यांनी सहकार्य केले. फक्त घटक चाचणी देण्याच्या अटीवर मला आर्ट्सला प्रवेश दिला. लहाना भाऊ राजू शिकला नाही. पानटपरी शेजारीच असलेल्या अनुप मेडिकलमध्ये तो काम करायचा . त्याला मदतीला घेऊन मी घटक चाचणी देणे, कॉलेजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेणे सुरू केले. मला कबड्डी,खो-खो खेळण्याची आवड निर्माण झाली. भारत क्रीडा मंडळाचे भुजबळ सर यांच्यामुळे कबड्डीच्या संघात सहभाग मिळाला. गॅदरिंगमध्ये एकांकिकेत सहभाग घेतला. बारावीच्या निरोप समारंभात भाषण करण्याची उबळ आली आणि माझी फजिती झाली. बंगाळ सर मराठी विषय खूप छान शिकवायचे. तसेच “पेपरमधील अग्रलेख वाच” असे सांगत. पुस्तके कशी वाचावी? टिपणे कशी काढावी? हेही सांगायचे. मी दुकानात गिऱ्हाईक नसताना हे करायचो. इंद्रभान पुजारी हा मित्र टपरीवर यायचा. त्याच्या हातात वही असायची. “आज मी इथं इथं कविसंमेलनाला चाललो” असे तो म्हणायचा. एक दिवस मी त्याची वही पाहिली. “अरे! अशी लिहितात का कविता?” असे म्हणत मी पण मोडक्या-तोडक्या कविता लिहू लागलो. बारावीची परीक्षा दिली.आणि काय आश्चर्य मला बारावीला ६८ टक्के मार्क मिळून मी केंद्रात तिसरा आलो. होतो. “आपण काही एवढेही मठ्ठ नाही” याचा साक्षात्कार झाला. एफ. वाय.बी. ए.साठी सात किलोमीटरवर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी.एन.बी. कॉलेजला प्रवेश घेतला. मोठा भाऊ नवनाथ पुण्यातले काम सोडून गावाकडे आला होता. तो पानटपरीवर बसू लागला.आणि माझं कॉलेज सुरू झालं. मला नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिपदेखील मिळाली ( वर्षाल ४५०/-) त्यात कॉलेजची प्रवेश फी, वह्यापुस्तके, एक ड्रेस आणि आयुष्यात पहिल्यांदा स्लीपर चप्पल घेतली. एक जुनी सायकल पण. माझे कॉलेज सुरू झाले. सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत कॉलेज आणि कॉलेजहून आल्यावर पानटपरी. असा क्रम सुरू झाला. बोरावके कॉलेज खूप मोठे. तिथेही मी अधाशासारखा जे जे कॉलेजमध्ये असेल त्यात भाग घ्यायला लागलो. एन.सी.सी., कबड्डी, खो-खो, क्रॉसकंट्री,भित्तिपत्रक, एकांकिका, कवितावाचन, शुद्धलेखन,वक्तृत्व स्पर्धा यात भाग घेत होतो. प्रा. सुहास निर्मळे, प्रा.भगवान शिंदे, प्रा.अविनाश कांबळे( सांगोलेकर) प्राचार्य विजय कसबेकर, ग्रंथपाल कारखानीस सर, रैनाक मॅडम, चांगदेव कांबळे सर, प्रा. ब.ह. विलायते सर अशा मराठीच्या सर्व सरांच्या अध्यापनाचा लाभ घेऊ लागलो. विशेषतः प्रा. सुहास निर्मळे सरांनी माझ्या सामाजिक जाणिवा विकसित केल्या. अशोक कर्णे, धनंजय मलाव,अनिल आंबरे या सायन्स कडील मित्रांना बरोबर घेऊन सर अंधश्रद्धा निर्मूलन,परितक्त्या मुक्ती चळवळ, पथनाट्य या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे संस्कार करीत. प्रेमानंद गज्वी यांच्या ‘घोटभर पाणी’, ‘गहाण’ या एकांकिकांचे प्रयोगही केले. प्राध्यापक डॉक्टर अविनाश कांबळे (सांगलोकर) सरांनी भित्तिपत्रक आणि पूर्ती नियतकालिकासाठी लिहिते केले.
अर्थात घरातली परिस्थिती अजूनही प्रतिकूल होती. म्हणून पटकन छोटी-मोठी नोकरी मिळवण्याची धडपड होती. कंडक्टरचा बॅच काढून त्यासाठी प्रयत्न करीत होतो. पोलीस किंवा मिल्ट्री भरती होण्याचीही धडपड चालू होती. आणि एस. वाय.बी.ए.ला असतानाचे वर्ष पुन्हा एक नवे द्वंद्व घेऊन आले. एकाच वेळी पोलीस खात्यात आणि एस. आर. पी.मध्ये भरती झालो होतो. परंतु पोलीस भरतीला स्टे लागला आणि एस. आर.पी. भरतीमध्ये एका मध्यस्थाने फसवले.त्याच वर्षी शासनाने बारावीच्या धर्तीवर डी.एड. करण्याचा निर्णय घेतला. माझ्या बारावीच्या काही मित्रांनी त्यासाठी फॉर्म भरायला सांगितला. पहिल्या यादीत नंबर लागला परंतु डी.एड.साठी ३५००/- रुपये फी व नगरसारख्या ठिकाणी जाणे परवडणार नसल्यामुळे डी.एड. ला जाता आले नाही. एस. वाय. बी. ए.ला ७० टक्के मार्क पडल्यामुळे शिक्षकांनी टी.वाय. पूर्ण करण्याचा सल्ला दिला. आणि मी पुढे शिकू लागलो. बोरावकेसारख्या मोठ्या कॉलेजमध्ये एन.सी.सी.चा सिनिअर अंडर ऑफिसर, कॉलेज कबड्डी, खो-खो संघाचा प्लेयर, आविष्कार भित्तिपत्रकाचा सदस्य. नाट्यक्लबचा सदस्य असा मान मिळत होता. ग्रंथपाल कारखानीस सर माझी वाचनाची आवड पाहून नियम बाजूला ठेवून मला केव्हाही व कोणत्याही दिवशी पुस्तक द्यायचे. एक विशिष्ट लेखक घेऊन त्यांची मिळेल ती पुस्तके वाचणे व त्यांच्या नोंदी करणे ही सवय लावून घेतली. त्यामुळे आनंद यादव, उद्धव शेळके, व्यंकटेश माडगूळकर,रा.रं.बोराडे यांची पुस्तके वाचून काढली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मासिक व विशेष कार्यक्रमास उपस्थित राहू लागलो. त्यामुळे साहित्यविषयक जाणीव विकसित होऊ लागली. वि.ना.गवाणकरांच्या ‘एक होता कार्व्हर’, व्हिक्टर ह्युगोच्या ‘ला मिझरेबल’चा साने गुरुजींनी केलेला अनुवाद ‘दुःख पर्वताएवढे’ आणि विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती’ या पुस्तकांनी तर माझ्या जगण्यालाच एक नवी दिशा व दृष्टी दिली. साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘साहित्यप्राज्ञ’ या परीक्षेत श्रीरामपूर केंद्रातून पहिला आलो. अखिल भारतीय महिला प्रबोधन संमेलन(डोमेग्राम),ज्वाला साप्ताहिक नारायण सुर्वे काव्यवाचन पुरस्कार (बेळगाव), नॅशनलिस्ट मुव्हमेंट ऑफ इंडिया, पुणे आयोजित ‘किमया सुवर्णपदक काव्यवाचन स्पर्धा’, फर्ग्युसन कॉलेजमधील साहित्य सहकार आयोजित भा.म गोरे लघुतम कथालेखन स्पर्धा या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली. टी.वाय.बी.ए.ला पुन्हा ७०टक्के गुण मिळवून पहिला आलो. व त्याचवेळी एन.सी.सी.ची ‘सी सर्टिफिकेट’ परीक्षाही उत्तीर्ण झालो.पुन्हा एक नवे द्वंद्व पुढे आले. एम. ए. चे पहिले वर्ष चालू असतानाच बी.एड.ला नंबर लागला व मिल्ट्रीमध्ये हवालदार पदावर निवड झाली ; परंतु बी.एड.ची फी भरणे अशक्य होते.मोठ्या भावाचा मिल्ट्रीत जाण्यास विरोध. आदरणीय डॉ.र.बा.मंचरकर सरांसारखे गुरुवर्य आम्हाला शिकवायला असल्यामुळे एका वेगळ्याच वांड्.मयीन धुंदीत होतो. त्यामुळे एम.ए.पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान दुकान ते कॉलेज व कॉलेज ते दुकान क्रम चालू होता. डॉ. मंचरकर सरांचे तास म्हणजे मेजवानी असायची. त्यातूनच समीक्षा विषयक दृष्टिकोन तयार होऊ लागला.त्यांच्यामुळे डॉ. आनंद यादव, बाळकृष्ण कवठेकर,रवींद्र पिंगे, द.ता.भोसले अशा अभ्यासकांची व्याख्याने ऐकता आली.पाहता पाहता वर्ष पूर्ण होऊन ६८टक्के गुण मिळाले. ‘पूर्ती’ या वार्षिक अंकात ‘ एक होता कार्व्हर : पुस्तक परीक्षण’ व ‘वाड्.मयीन दृष्टी व दृष्टिकोन’ हा लेख छापून आल्याचा आनंद अवर्णनीय होता. एम.ए.तर झाले पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. बरोबरीच्या डी.एड.केलेल्या मित्रांना नोकऱ्यापण लागल्यामुळे हेवा आणि पश्चाताप वाटायचा. मंचरकर सरांना कौटुंबिक स्थिती माहित असल्यामुळे त्यांनी बी.एड. पूर्ण करून लवकरात लवकर स्थिर होण्याचा सल्ला दिला. तर निर्मळे सरांनी, “बी.एड. करून स्वतःवर मर्यादा लादून न घेता जे करायचे ते उच्च असे काहीतरी कर.”असे सांगितले. संभ्रम तर होताच. सगळीकडे अर्ज भरलेले. पुन्हा संगमनेरला बी.एड.साठी आणि पुणे विद्यापीठात एम. फिल.साठी नंबर लागलेला.आमचे सिनीयर मित्र राजेंद्र सलांलकर आमच्या पुढील आदर्श. सलालकर विद्यापीठात एम.फिल. करीत होता. एम.फिल.ची फीदेखील बी.एड.च्या तुलनेत खूप कमी होती, म्हणून परवडणाऱ्या एम.फिल.लाचप्रवेश घ्यायचे निश्चित केले.
आता पुण्यात राहायचे कुठे? खायचे काय? कसे होणार? असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी मोठा भाऊ नवनाथच्या हाती पानटपरीचे सर्व व्यवहार सुपूर्त केले. आणि माझी सायकल, अंथरून पांघरून, दोन ड्रेस आणि खिशात एक हजार रुपये घेऊन पुणे गाठले. दोन दिवस होस्टेल क्रमांक ३ मध्ये एम.एस्सी. करणाऱ्या दत्ता भालेराव या मित्राच्या रूमवर राहिलो. घराकडून आर्थिक मदत तर शक्यच नव्हती. म्हणून छोटी-मोठी अर्धवेळ नोकरी शोधता शोधता सुनील पुंड या गावाकडच्या मित्राच्या ओळखीने जंगली महाराज रोडवरील हॉटेल पथिकमध्ये रात्रपाळीची नोकरी मिळाली. आठशे रुपये महिना, एक वेळचे जेवण आणि ओव्हर टाईमचे वेगळे पैसे मिळायचे. निर्मळे सरांच्या ओळखीमुळे पांडवनगर येथील कॉलेजमध्ये काम करणाऱ्या महात्मा शिंदे व कणसे सरांच्या रूममध्ये जनवाडीला राहायची व्यवस्था झाली. होस्टेल मिळणे त्यावेळी फार जिकरीचे होते. हॉटेलमधले कामही सुरू झाले आणि पाठोपाठ विद्यापीठातले वर्गदेखील सुरू झाले. दुपारी दोन ते पाच या काळात तासिका असायच्या, तर साडे पाच ते रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेलमधले काम. हा दिनक्रम सुरू झाला. पगारातले सहाशे रुपये एक वेळचे जेवण,रूम भाडे आणि चहा नाश्त्यासाठी लागायचे. उरलेल्या दोनशे रुपयात बाजीराव रोड किंवा डेक्कनच्या जुन्या पुस्तकाच्या दुकानातून पुस्तके आणायचो.’धार आणि काठ’, ‘व्यासांचे शिल्प’, ‘अभिनव काव्यप्रकाश’ यासारखी पुस्तके खूप कमी किमतीत तिथे मिळाली. दोन ट्रंक भरून पुस्तके या काळात जमा झाली. शिवाय घरीसुद्धा ओव्हर टाईममधून मिळालेल्या रकमेतून शे – दोनशे रुपये आईला पाठवायचो. मजेत सर्व चाललेले.
विभागप्रमुख आदरणीय डॉ.आनंद यादव सर, डॉ. सु.रा. चुनेकर सर,डॉ.कृष्णा किरवले, डॉ.कल्याण काळे, प्रा.अ.वा. कुलकर्णी यांच्यासारख्या शिक्षकांनी संशोधनाची आणि समीक्षेची बैठक पक्की केली. याच काळात मेहबूब सय्यदसारखा एक सच्चा मित्र भेटला. त्याच्या माध्यमातून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेशी संबंध आला आणि किशोर ढमाले प्रतिमा परदेशी, किशोर जाधव,उमेश बगाडे, दिलीप चव्हाण यासारखे खूप चांगले मित्र देखील भेटले.काँ.शरद पाटलांच्या कृतिसत्रातून ‘मार्क्सवाद,फुले-आंबेडकर वादाची’ शिदोरी मिळाली. क्रांतिसिंह नाना पाटील अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे संस्कार व्हावे म्हणून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मी देखील सहकार्य करू लागलो. कधीकधी कामाला सुट्टी असेल तर तास संपल्यावर आम्ही सारे विद्यार्थी हिरवळीवर बसायचो. त्यातून निशा भंडारे आणि अनिल अवसरकर, सिद्धार्थ तांबे, नामदेव बनसोडे, बाळासाहेब लाहोर, बाळासाहेब लावरे, बाळासाहेब लबडे,कल्पना रोकडे, केदार देशमुख,दत्ता यादव यासारखे अनेक मित्र जोडले गेले. मेरीटनुसार मी वर्गाचा वर्गप्रमुख म्हणून निवडला गेल्यामुळे कधीकधी माझ्या खांद्यावर बंदूक असायची. विद्यापीठ असो किंवा कॉलेज गट-तट, वाद-विवाद रुसवे-फुगवे असणारच. त्याचा अनुभव येथेही आला. गॅदरिंगसाठी नामदेव सभागृह न मिळाल्यामुळे झालेले आंदोलन व निषेध म्हणून हिरवळीवर झालेली गॅदरिंग आणि महाबळेश्वरची सहल या न विसरता येणाऱ्या आठवणी. या वर्षभरात सिनियर्स आणि ज्युनियर्स अशा सर्वांचाच खूप चांगला स्नेह मिळाला. वर्ष समाप्तीच्या वेळी मार्गदर्शक मिळेना.मार्गदर्शकांकडे एकही जागा नव्हती. पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. फक्त पेमराज सारडा कॉलेजमधील प्रा. डॉ. सु.प्र.कुलकर्णी यांच्याकडे एक जागा असल्याचे कळले. मी थेट त्यांच्याकडे गेलो. जाताना ‘मराठी लघुकादंबरी व पाचोळा: एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर केलेलला संशोधन आराखडा घेऊन गेलो. त्यांनी विषयाची तयारी पाहून तात्काळ मला स्वीकारले व दुसऱ्या दिवशी मी सादरीकरण परीक्षेला हजर झालो. परंतु विषय निवड समितीने विषय नाकारला. पुन्हा द्वंद्व. पुढे काय? सु.प्र.सरांना फोन लावला. त्यांनी “दोन दिवसात कोणताही विषय निवडून मला सांग. मी पत्र देतो” असे सांगितले. त्याचवेळी माझ्याकडे उषा हस्तक यांचे पुस्तक होते. त्यात ‘एक विषय : तीन कादंबऱ्या’ हा लेख होता. तो वाचला. टिपणे काढली. त्यातील कादंबऱ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता येईल? याचे ठोकताळे बांधले. आणि त्यातील दोनच कादंबऱ्या घेऊन ‘ निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (ह.मो.मराठे) व अरे संसार संसार (प्रभाकर पेंढारकर) या दोन कादंबऱ्यांचा महानगरीय वास्तवाच्या दृष्टिकोनातून एक अभ्यास’ असा विषय आराखडा लिखित स्वरूपात तयार करून, सरांकडून पत्र घेऊन आलो. आणि विषय मंजूरही झाला.
प्रबंध लेखनाचे काम सुरु झाले होते. मी गावाकडे जाऊन काय करणार? म्हणून पुण्यातच दुसरी नोकरी शोधू लागलो. याच काळात दैनिक सकाळकडे शिकाऊ सहसंपादकासाठी जागा निघाल्या. मी अर्ज केला. दरम्यान परीक्षा व मुलाखतीसाठी बोलावणे आले. आणि तेवढ्यातच मोठ्या भावाने “बेलापूरला कॉलेज सुरू होत असून तू ताबडतोब ये ” असा निरोप दिला. गावचे सरपंच आदरणीय मुरलीधर खटोड, संस्थेचे अध्यक्ष वासुदेव नाना कोळसे, सचिव बाळासाहेब खटोड, सदस्य प्रल्हाद पाटील कोळसे,प्रा. विनायक बंगाळ सर, बापूसाहेब पुजारी सर, डॉक्टर सुरेश मुथा, शरदशेठ सोमाणी या सर्वांनी मला भेटल्याबरोबर प्रोत्साहन दिले आणि अध्यापक म्हणून माझा प्रवास सुरू झाला. वर्षभर सी.एच.बी.वर बिनपगारी काम केले. कॉलेज नवीन होते. परंतु माझे होते.त्यामुळे झोकून देऊन काम सुरू केले. याच काळात एम.फिल.च्या सादर प्रबंधाला पुणे विद्यापीठाचा कै.सुहासिनी लद्दू उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला व त्याच वर्षी मी सेट परीक्षाही पास झाल्यामुळे लगेच पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून माझी निवड झाली. त्यावेळी माझे मित्र डॉ. शिरीष लांडगे यांनी निवड होण्यासाठी खूप मदत केली. हळूहळू महाविद्यालयाने चांगले बाळसे धरण्यास सुरुवात केली. उत्साह आणि विद्यार्थ्यांप्रती बांधिलकी यामुळे कॉलेजमध्ये लोकप्रिय झालो.परंतु विद्यापीठीय राजकारण आणि स्थानिक समज-गैरसमज यातून माशी शिंकली व बेलापूर शिक्षण संस्थेत अंतर्गत कलह सुरू झाला. त्यात तीन-साडेतीन वर्षे गेली. माझ्याकडे काही काळ प्रभारी प्राचार्य पदाचा पदभार होता. कधीतरी मिळणारा ५००/- महिनासुध्दा बंद झालेला.दरम्यान १९९८ साली काँलेज ऐन भरात असताना लग्न झालेले. त्याची वेगळीच गम्मत… तिसगाव,पाथर्डी येथील एक माध्यमिक शिक्षक साखरे सर एका पाहुण्यांच्या माध्यमातून मला पाहायला आलेले.घरात चहापत्ती नव्हती पुतण्याला २रु.देऊन मागच्या दाराने पिटाळले.सरांना स्पष्ट सांगितले, “अनुदान नाही. पगार नाही. दररोज छटाक-आतपाव आणून खातो. फक्त नोकरी पक्की आहे.दोन वर्षात अनुदान सुरू होईल. प्राँपर्टी काहीच नाही. फक्त राहते घर आणि एक पानटपरी, पाहा तुम्ही “त्यांनी माझे शिक्षण व प्रामाणिकपणा पाहून धाडस केले. घरच्यांचा विरोध पत्करून मुलगी दिली. अनुदान नाही,अंतर्गत संघर्ष, सहकाऱ्यांच्या मनातील अशाश्वतता, दोलायमान स्थितीत स्वतःच्या हक्काचे कॉलेज सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण पगार नसल्यामुळे घरात जावाजावांमध्ये कलह सुरू झाला. शेवटी प्रभारी प्राचार्य पदाची झूल अंगावर घेऊन जनलक्ष्मी पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून दारोदार फिरून १० रुपये २० रुपये कलेक्शन करायला सुरुवात केली. महिन्याला थोडेफार उत्पन्न सुरू झाले. पाहुण्याराऊळ्यात हासू होऊ लागले. पत्नीचाही दुसरीकडे नोकरी शोधण्याचा लकडा सुरू झाला. शेवटी होणाऱ्या या कुत्तरओढीमुळे बाहेर नोकरी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु अनेक ठिकाणी वाईट अनुभव येऊ लागले. कुठे निवड समिती व संस्था यांच्यातील मिलीभगत, कुठे जात आडवी आली. शेवटी १९९९ साली शिरीष लांडगे आणि मी रयत शिक्षण संस्थेच्या मुलाखतीसाठी वाशी येथील मॉडर्न कॉलेजमध्ये गेलो आणि त्याच मुलाखतीतून माझी निवड झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे नोकरी मिळाली. बेलापूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करुन बाहेर पडलो. राजापूर येथे नऊ वर्षे केलेली नोकरी म्हणजे एका स्वतंत्र ग्रंथांचा विषय होईल. कारण आगीतून फुफाट्यात जाऊन पडलो. तिथेही पूर्ण पगार सुरू व्हायला २००४ साल उजाडले. दुर्गम भागातील, परंतु निसर्गसंपन्न परिसरातील नऊ वर्षे म्हणजे एक स्वप्नच. २००६ मध्ये पुणे विद्यापीठात रिफ्रेशर कोर्स करायला आलो तेव्हा डॉ.तानाजी पाटील व डॉ. राजेंद्र ठाकरे आणि मी असे तिघे एका रूममध्ये राहत होतो. या काळात तानाजी पाटील यांनी माझ्यातील संशोधकाला जागे केले. आणि मध्ये वाया गेलेल्या सात-आठ वर्षांविषयी मी पश्चातापदग्ध झालो व पीएच.डी.ची तयारी सुरू केली. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग मला अंतराच्या दृष्टीने जवळ होता. पीएच.डी. करण्याच्यादृष्टीने आमच्या रयतेच्याच शाहू कॉलेजमध्ये माझे शिक्षक सांगोलेकर सर असल्याचे व त्यांच्याकडे जागा असल्याचे कळल्यामुळे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्याचे ठरविले. ‘बदलते ग्रामवास्तव व चौथ्या पिढीची ग्रामीण कादंबरी’ या विषयावर तीस ते पस्तीस पानांचा विषय आराखडा संदर्भसाधनांसह तयार केला. सुट्टीत गावाकडे आलेलो असताना मंचरकर सरांना तो दाखवला. त्यांनी समाधानदर्शक संमती दर्शवली. त्यानंतर पुन्हा राजापूरला आल्यानंतर एक दिवस कोल्हापूर विद्यापीठात जाऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात व विषयाच्या दृष्टीने विभागप्रमुख डॉ. किरवले सरांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर संशोधन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मला धक्का बसला. त्यानंतर सांगोलेकर सरांची बदली एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर येथे झाली. माझे स्वप्न अपूर्णच राहते की काय ? असे वाटू लागले. मंचरकर सरांशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून ‘झाडाझडती’च्या संदर्भात विषय निघाला आणि ‘विस्थापित’ ही संकल्पना घेऊन काही करता येते का? या दृष्टीने विचार करू लागलो. संदर्भ शोधू लागलो. याच वेळी मेधा पाटकर यांनी चालविलेल्या आंदोलनाचे मुखपत्र ‘आंदोलन’ राजापूरच्या वाचनालयात येत होते. तिथे चळवळीत काम करणारे आदरणीय मदन हजेरी सर प्रा.विनोद मिरगुले व बी.के.गोंडाळ सर यांच्या प्रोत्साहनातून, ‘ महाराष्ट्रातील विस्थापित व मराठी कादंबरी’ (प्रारंभ ते २००५) ‘ असा विषय समोर ठेवून संशोधन आराखडा तयार केला. तो मंचरकर सर व संगोलेकर सरांना दाखवून विद्यापीठात सादर केला. आणि विषयाला मंजुरी मिळाली. याच काळात २००८ मध्ये माझी बदली अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात झाली. याठिकाणी आल्यावर डॉ.सुधाकर शेलार, डॉ.प्रकाश जाधव, डॉ.प्रकाश सूर्यवंशी, डॉ.मच्छिंद्र मालुंजकर यासारख्या मित्रांची साथ मिळाली. डॉक्टरेटचे अपूर्ण राहिलेले स्वप्न उशिरा का होईना २०१० साली पूर्ण झाले. या काळात विषय मंजुरीपासून ते पदवी प्राप्त होईपर्यंत गुरुवर्य डॉ.अविनाश सांगोलकर, डॉ.अशोक शिंदे, डॉ.स्नेहल तावरे, डॉ. शिरीष लांडगे यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
राजापूर येथे असताना कणकवलीच्या कॉलेजमध्ये काम करणारे डॉ.वसंत शेकडे सरांमुळे ‘ भाषाविज्ञान परिचय ‘ , ‘ मराठीतील ठळक वाड्.मयीन प्रवाह’ , ‘व्यावहारिक व उपयोजित मराठी ‘ या ग्रंथांच्या संपादनात मोलाची भूमिका निभावता आली. तसेच ‘ निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी : एक अभ्यास’ यासारखा छोटेखानी स्वतंत्र ग्रंथ साकार झाला. व स्नेहवर्धन प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून डॉ.स्नेहलताई तावरे यांच्यामुळे ‘मराठी कादंबरीतील शोकांतिका’, व ‘महाराष्ट्रातील विस्थापित व मराठी कादंबरी’ हे दोन स्वतंत्र ग्रंथ साकार होऊ शकले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘अ.वा. कुलकर्णी समीक्षाग्रंथ गौरव पुरस्कार’ देखील या ग्रंथाला मिळाला.
मुंबई विद्यापीठाच्या एन.एस.एस.चा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे मी संपादित केलेल्या ‘माई’ या वार्षिक अंकास सातत्याने तीन वर्षे पुरस्कार मिळाले.
आज मी औंध, पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांमध्ये उपप्राचार्य, प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख म्हणून खूप सन्मानित पदावर व समाधानकारक वेतन घेऊन कार्यरत आहे. तसेच ज्या विद्यापीठामध्ये मी शिकलो त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आमचे मित्र डॉ. तुकाराम रोंगटे सर विभागप्रमुख असल्यामुळे दोन वर्षे अभ्यागत प्राध्यापक म्हणून ‘ समीक्षाविचार’ सारखी अभ्यासपत्रिका शिकविण्याची संधी प्राप्त झाली. यापेक्षा आणखी काय हवे ? या प्रवासात माझी सुविद्य पत्नी सुलभाने खूप मोलाची साथ दिली. खरेतर प्र. के. अत्रे म्हणतात त्याप्रमाणे ‘चोराच्या आळंदीला मी जाणार होतो; परंतु आज देवाच्या आळंदीला येऊन पोहोचलो आहे’ परिस्थितीशरण होऊन हात-पाय गाळण्यापेक्षा हात-पाय हलवून परिस्थितीवर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर माणसाच्या जीवनात अंधाराचा काळोख चिरून प्रकाशाची बेटं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही हेच खरे.
( भ्रमणध्वनीवर टंकित केल्यामुळे मुद्रित शोधनाच्या चुका समजून घ्याव्या.)

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment