2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

सा हि त्या क्ष र 

संक्षिप्त परिचय
_________________________
प्रा.राजाराम बनसकर.
महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.
निवृत्त:२०१२,
_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…
_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग..
_प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…
__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….
पत्ता:
प्रा.राजाराम बनसकर.
‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.
जि.हिंगोली.४३१७०२,
(९४२१३९१२३०)

**************************************************************

राजाराम बनासकर यांच्या काही कविता

 

१) ‘ ऑल वेल ‘

आता … कांहीच चुकत नाही कुणाचे
सगळेच ..कसे..’ऑल वेल’..!
जायज…ना जायज…
ठरवायचं कुणी…?
विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..?

सगळेच… वस्त्र हिन…
कामापुरते.. कपडे…
‘चलता है…” अपना ..
दुसऱ्या चे…ते.. लफडे…!

कसल्या… प्रतिक्रिया…?
सहज…सारे…मानायचे…
तकलादू…तुटणारे.. उद्याचे…
आज… कशाला..ताणायचे..?

२) ‘ निर्दोष ‘

वापरा…अन्…फेका…
काय‌ त्याची…खंत…?

स्वार्थाळल्या… गर्दीत..या..
कोण..येथे….संत ?

कळतो…गंध… नाकाला…
‘ अर्थ’…थांबवितो…पाय…!

कसली..जातपात… तेथे..
आवडते.. सगळ्यांनाच..साय..!

तुझा.. तरी…काय ..दोष..?
मंत्र.. येथे…. फायद्याचा…!

‘ भयमुक्त ‘…चालते..सारे…
विचार कसला…कायद्याचा..?

३) ‌’  नियमानुसार..’!

आग्रह..
नाही…तसा..
पण..
सगळीकडेच..सुरू.. आहे…!

करावंच..लागतं… प्रसन्न..
द्यावीच लागते दक्षिणा…
हात… प्रत्येक…वरचा…
खालच्या…हाताचा.. गुरू आहे…!

खाल पासून….
वर… पर्यंत….
हात….
सगळेच….भुकेले…!

लहान…हात..मोठा…हात…
हात…हाताला..जुळतो…!
ओझ्या खाली.. वजनाच्या…
कागद…. हातोहात…पळतो…!

नको..चिंता..नको काळजी…
सारं… नियमाने च…चालतं…
नियमालाच… धरून…असतां..
तिथं…कोण…काय…बोलतं…?!!

४ ) ‘ मस्ती ‘…!

उधळलेत…
बैल आता…
घट्ट..आवळ..
कासरा…!

नकोच…
मानेवर..जू.. त्यांना
स्वैर..ते..
दांडग्यांचा..आसरा..!

वाऱ्यावर…
स्वार..ते..
मस्तीत…
विसरले रस्ता..!

तुडविण्याचे…
काय… त्यांना..?
नाही…
कुणाशी वास्ता…!!

५) ‘ एक… स्वतंत्र बेट ‘ !

चला.. गड्यांनो…
तयार करुत.
आपणही…आपलं ..
एक… स्वतंत्र…बेट..!

देवूत… त्याला..एक..
छानसं ….. साजेसे..एक नाव..
अन्…लावूत .. त्याच्यावर…
एक झेंडा… आपल्या..रंगांचा..!

असेल.. आपल्या ही.. बेटांवर..
आपल्या..बेटाचं.. आपल्या पुरतं
आपलं एक…’बेट गीत…’
इतर… बेटांवरील.. मित्रांना न आवडणार !
राहुत..तिथं..आपण आपल्या तालात..
दुनिये पासून.. बे खबर..
करुत.. आनंद.. साजरा..
उधळीत स्तुती सुमने.. एकमेकांवर..!

ठरवून ..आपणच..
एकमेकांचे… मोठेपण..
आपल्याला ..काय..त्याचे..
काय.. म्हणतील..कोण..?

करूत..तयार आपणही.. काही
हव्या तश्या..लाटा.. त्सुनामी..
समोरच्या..बेटांवरील..बेट्यांवर फेकण्यासाठी…!
करुत.. उध्वस्त.. त्यांना..
आपल्या .. अस्तित्वासाठी..!

६) ‘ मार्ग ‘ !

बंबाळ..मी..
जखमा..
जखमांचं ..साऱ्या..!

वसूल कर्ते..ते…
अधिकार…त्यांचा.
लंबी चौडी..यादी…!

मौन…मी..
काळ च…तसा..
दुखमा..दुखमा..!

जो.. तो…
सरळ… अंगावर..
मार्ग च… त्याचा…!!

७) ‘ फां दी ‘

वाटलं होतं..
लागेल.. हाताला..
एखादी…फांदी..!

आलीही…होती..
पुरलेही होते..हात..
चार.. दोन…पानांना..!

लगेच…
घेतले.. हिसकावून..
हातचे..ते.. वाऱ्याने…!

तेवढीच…
हाताला..लागलेली..
चार.. दोन.. अर्धवट..पाने..!!

८ ) ‘ झेल्या ‘…!
_———————
मालक.. निर्णयाचा…
कधी..होताच…आलं नाही…
मला…!

नेहमी… दोलायमान..च..
ताक..खाऊ की,दही…?
की, पिऊन टाकू..दुधच..सारे..!

गोड.. बोलणं…त्यांचं
कुणी तरी ते असणं..
आंधळा..मी..त्यात.. माझं ..बसणं

झेलता.. झेलता…
तेवढे..झेलणेच…शिकलो…
जो..जसा..झुलविल..तसा..मी..झुकलो..!

______________________
९ ) ‘ सुप्तानंद’…!

एरव्ही.. तरी…
कोण..विचारतं…?

मीच… बापडा..
करीत ..असतो..
चौकश्या… नसलेल्या..!

फुंकर…
येता..जाता…
दु:खांवर..!

हसतो…उगीचच..
खोटे… खोटे…
सहभागी…आनंदात…!

समाधान.. तेवढेच..
कुणाच्या…जवळ.. गेल्याचं
कांहीं तरी…केल्याचं..!

अन्
एक..सुप्त .. आनंद..
स्वतः ला..लपवल्याचा…!!

__________________________
१० ) ‘ दे ह भू ल ‘…!
________________________
जाणून.. बुजून…
वासनाच….त्या…
जन्मोजन्मीच्या…!

देहात…
सदाच्या…
विरघळून… गेलेल्या..!

स्पर्श ही…साधा…
विकार…विचारांचा..
पुरेसा… त्यांना…
उफाळून.. येण्यासाठी…!

त्याच..तर..
ठरवितात…
देहाचे..सारे…
पाच पवाडे…!

उघडतात….
संगतीने.. मनाच्या..
देहासाठी….
नरक…कवाडे…!!

______________________
११) ‘ धु र  ळा’ !

नुसताच…
कोरडा..राग..
धुसफूस…
ढगोबांची…!

वर..पाहुन…
पुन्हा पुन्हा…
थकली मान…
गणोबाची….!

हवामान…
नेहमीचेच…
फसवे…
सारे… अंदाज..!

काल पर्यंत…
कांहीं च नाही..
किमान….
पडेल आज…!

देतोय…
हुलकावणी…
सदाचाच..
तो…काळा…!

संपली…
ओलं..सारी…
स्वप्नांचा…
पार..धुरळा..!!
_________________________
१२ ) ‘ वसा ‘

ते..तर..होतेच…
लेकरांचाही… त्यांनी…
तिथं…
टेकविला..माथा…!

त्यांना…
आवडणारी…
दिली..
त्यांच्या हाती गाथा..!

पढलेले…ते….
त्यांनाही…पढविले…
रस्त्यावर… आपल्या..
त्यांनाही…चढविले…!

झाले..ते…
कृत…कृत्य….
शिकवून…
आपला..अर्थ….

साधला होता..
त्यांनी..आपला..
आपला..
पिढीजात स्वार्थ…!!

___________________________
१३ ) ‘ वारी..’!

पाहण्याची…
द्रष्टी….तुझी…
गुन्हेगार..
ठरवून जाते…!

कागद…
तुझ्याच..मनाचा…
वही.. पूर्ण…
भरुन जाते…!

पुसून…जातात..
अक्षरे…सारी….
ठरवितेस….
हलका…भारी….!

दिंडी…
थांबते… रस्त्यालाच…
कलंकित…
माझी..वारी….!!

–____________________
१४)  ‘ भी ती ‘…!
–________———–
किती…
सहज..घडतं
उतरणं… नजरेतून
कुणाच्या…!

भीती..
वाटतेय….आता…
कौतुकाच्या…
पावसात… भिजतांना..!

तेवढ्या..पुरतं
तेवढेच…
नेतो मी…
हसण्यावर….!

रोकलय…
मी…मला..
इथं…तिथं…
बसण्यावर…!!

–___________________
१५ )  ‘ आ यु ष्य ‘….!

शेवटी… आयुष्य…
असते..तरी…काय..?
उद्यासाठी…आज…
थकवायचे…पाय..!

टाळताही…येत नाही..
थांबता ही..येत नाही..
पळावचं लागतं रोज..
अडखळत…पाय…!

नको…तेही…करावं…
हात.. पुढं… पसरुन..
तत्वांना..देत..बगल…
सारं कांहीं… विसरून..!

यांच्या.. साठी… त्यांच्या साठी..
नाव… पुढं…करायचं….
स्वीकारून…समोरचे…
उद्यासाठी…मरायचं…!!

+——–+——-+——+

  • राजाराम बनासकर / ९४२१३९१२३०

**************************************************************************************************************

‘साहित्यायन’ सटाणा येथील राज्य पुरस्कार विजेता अनुवादित काव्यसंग्रह

मूळ कवी : डॉ. फनी महांती (साहित्य अकादमी विजेते कवी )

किंमत – १२०/- ब्लॉग वाचकांसाठी पोस्टेज फ्री