2025 मराठी मार्च लेख/ आलेख

कालिकट येथे झालेला राष्ट्रीय कविता उत्सव

सा हि त्या क्ष र 
कालिकट बीच

हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, अहिल्यानगर,प्रस्तुत

राष्ट्रीय बहुभाषिक कविता उत्सव   | KERALA POETRY FESTIVAL |

     18 & 19 May 2024 अ ह वा ल  व  वृ त्तां त : सुजाता भोजने-सरवदे
_________________________

हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र

       हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, अहिल्यानगर या संस्थेची स्थापना डॉ. संजय बोरुडे यांनी २०१४ मध्ये केली असून तिचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र /४६२/अहमदनगर, क्र. एफ. १८१०७ असा आहे. या संस्थेद्वारे अनेक उपक्रम दरवर्षी घेण्यात येतात. संस्थेची स्थापना झाली त्या वर्षी शहराच्या वर्धापन दिनानिमित्त पालशेत, ता. गुहागर येथे तेथील नागरिकांच्या सहकार्याने कवितेची कार्यशाळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या राज्यस्तरीय कार्यशाळेत राज्यभरातून सुमारे ६४ जण सहभागी झाले होते. त्यामध्ये जुन्नर येथून शिवंजली परिवारचे संस्थापक श्री. शिवाजी चाळक, संदीप वाघोले, वैशाली सावंत आणि त्यांचे इतर सदस्य; बोधेगाव ता.शेवगाव येथील राजेंद्र मराठे,अस्मिता मराठे ; बीड येथून भारत टाकणखार आणि कैलास साळुंके इ. मान्यवर तसेच खरे-ढेरे महाविद्यालयाचे कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

    ‘कविता’ या शब्दाच्या व्याख्येने सुरुवात करून डॉ. लबडे यांनी कवितेचे प्रकार आणि सर्व प्रवाह स्पष्ट केले. गझलकार ए. के. शेख यांनी गझल लेखनाचे तंत्र विषद केले तर डॉ. संजय बोरुडे यांनी कवितेच्या सादरीकरणाचे अंतरंग उलगडून दाखवले. या प्रसंगी दिमाखदार कविसंमेलनही झाले. भोजन व्यवस्था आणि निवास व्यवस्था रयत शिक्षण संस्था, शाखा- पालशेत, उपसरपंच बंडू कानेटकर, कवी तांडेल मोहन पाटील यांनी पाहिली.

                                                         पालशेत प्राचीन बंदर

   पालशेत हे प्राचीन बंदर असून तिथे त्यांचे अवशेष आहेत.डेक्कन कॉलेजने केलेल्या उत्खननात आणि पाहणीत बरेच पुरावे डॉ. मराठे यांना मिळाले आहेत. समुद्रकिनाऱ्यापासून  ५०० मीटर अंतारवर लांबच लांब भिंत बांधलेली उपग्रहातून काढलेल्या फोटोमध्ये दिसते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या गावात  तीन चित्रपटाची शूटिंगही झालेली आहे.(सुंदर मी  होणार,काकस्पर्श, चिरंजीव) म्हणून तेथील कार्यशाळेत समुद्रपर्यटन आणि परिसर भेटही आयोजित केली होती.

    समारोपासाठी प्रसिद्ध कवी सौमित्र अर्थात किशोर कदम आले होते. त्यांच्या हस्ते सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.

    त्यानंतरच्या वर्षात २०१५ मध्ये केदारनाथ सिंह यांच्या सन्मानार्थ त्यांच्या निवडक कवितांचे वाचन संजय बोरुडे, देवयानी वाखारे, शब्बीरभाई शेख,रचना यांनी केले.हे वाचन बारस्कर केबल नेटवर्कवरुन प्रसारित करण्यात आले. नगर येथील रहमत सुलताना हॉल येथे कविसंमेलन घेण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध लेखक महावीर जोंधळे उपस्थित होते. या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले गेले.

   २०१६ मध्ये पाबळ, ता. शिरूर येथे मस्तानीच्या कबरीपाशी मस्तानी कविता उत्सव साजरा केला. या उत्सवासाठीही राज्यातून अनेक साहित्यिक आले होते. मस्तानीबद्दल पाबळ कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संजय घोडेकर यांनी माहिती सांगितली. मस्तानीसारख्या उपेक्षित, कर्तबगार आणि गूढ स्त्रीच्या स्मृतीनिमित्त हे कविसंमेलन घेतले गेले.कार्यक्रमात प्रा. विजय लोंढे, शंकर नऱ्हे, संदीप वाघोले , रुपाली अवचरे, पत्रकार इनामदार,

   २०१७ साली राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बरखा बहुभाषिक कविता उत्सव पावसाळ्यात घेतला. या प्रसंगी हिंदीतील प्रसिद्ध कवी व लेखक प्रदीप जिलवाने (मध्य प्रदेश) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या समन्वयक रचना यांच्या ‘स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदन ’ या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन झाले.

    २०१८ साली नगरच्या निजामशाहीतील कर्तबगार स्त्री चांदबीबी हिच्या स्मरणार्थ ‘चांदबीबी कविता उत्सव ’ साजरा करण्यात आला. या नियोजनात रयत शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. डॉ. संजय नगरकर यांनी विशेष सहकार्य केले. या उत्सवात हिंदी, मराठी आणि उर्दू कविता सादर करण्यात आल्या.

    २०१९ ते २०२२ कोरोना काळात कोणतेही कार्यक्रम संस्थेला घेता आले नाहीत. सन २०२३ मध्ये संस्थेच्या वतीने प्रदीप जिलवाने यांच्या ‘आठवा रंग @पहाडगाथा’ या हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद शब्बीरभाई शेख यांनी केला; तो निशिराज पब्लिकेशन्स, पुणेच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. तसेच विजय जावळे यांच्या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद केला. संस्थेच्या सदस्यांकडून ‘आकंठ’  या दिवाळी अंकासाठी सातत्याने हिंदी कथांचा मराठी अनुवाद केला आहे.

    २०२४ साली संस्थेच्या वतीने पहिल्यांदा केरळ येथे बहुभाषिक कविता उत्सव घेण्याचे ठरले. त्यानुसार १८ आणि १९ मे २०२४ रोजी केरळच्या कालिकट येथे कोलकाता येथील ‘अनहद’संस्थेच्या सहकार्याने हा उत्सव आयोजित करण्यात आला. त्याचा वृतांत व अहवाल संस्थेच्या हितचिंतका आणि कवयित्री सुजाता भोजने (अंबाजोगाई ) यांनी पुढे दिला आहे..  सदर उपक्रम तथा कार्यक्रम हा सहभागे लोक, परिसरातील रसिक व्यक्तींच्या सहकार्याने घेण्यात आले असून संस्थेला अद्याप कोणतीही शासकीय मदत अथवा अनुदान मिळत नाही.           

कालिकट बहुभाषिक कविता उत्सव :

    साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम सातत्याने साहित्यिक करत असतात. आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजात वेळोवेळी परिवर्तन  करण्याचे कार्य साहित्य करत असते. साहित्य निर्मिती एकाएकी होत नाही, त्यासाठी लिहित्या हातांना प्रोत्साहन द्यावे लागत. नावाजलेले दोन-चार राहिले तर अनेक नवोदित परंतु दमदार असे कवी लेखक पुढे कसे येणार ? अशा  सर्वांना एक अत्यंत सन्माननीय विचारमंच उपलब्ध करून देण्याचं कार्य हिंदी अनुसंधान केंद्र, अहिल्यानगर करत असते..

   असाच एक भव्य दिव्य बहुभाषिक साहित्य संमेलनाचा घाट त्यांनी हिंदी अनुसंधान केंद्राच्या वतीने घातला, आम्हा सर्व कवयित्री यांना खूप आधीपासून कल्पना देऊन सर्वांना गोळा करत करत ते निसर्गरम्य केरळ या ठिकाणी हे बहुभाषिक साहित्य संमेलन आयोजित केले.

   दिनांक १८  मे २०२४  व दिनांक १९ मे २०२४  या दिवशी हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र अहमदनगर व MTF ANHAD,कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने हे बहुभाषिक साहित्य संमेलन केरळ येथील सुंदर अशा पार्क रेसिडेन्सी मध्ये नेटके आयोजित करण्यात आले .

दि. १८  मे २०२४  सर्वांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. यावेळी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होता..  जास्त तामझाम व उगीचच भाराभर खर्च न करता उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब साहित्य अकादमी अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक सुखदेव सिंग सिरसा, तसेच केरळ येथील साहित्यिक डॉ. शिवन कुट्टी त्याचप्रमाणे जळगाव येथील सुनील गायकवाड आणि नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

    अतिशय सुंदर प्रीतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रमुख पाहुण्यांचा परिचय मा. आशा डांगे (छत्रपती संभाजीनगर) यांनी आपल्या दमदार शैलीमध्ये करून दिला. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. संजय बोरुडे (संस्थापक व सचिव हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र,अहमदनगर) यांनी विस्तारित रूपात केले व पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगितली. यानंतर प्रमुख पाहुणे सुखदेव सिंग सिरसा यांनी पंजाबीमध्ये जोरदार भाषण केले. तसेच प्रसिद्ध कवींच्या गाजलेल्या रचना देखील आपल्या पहाडी आवाजामध्ये सादर केल्या .साहित्याला भाषेची बंधनं नसतात..तिची स्वतःचीच एक भाषा असते.. त्यामुळे अगदी सहजपणे आम्हाला पंजाबी खूप आपलीशी वाटून गेली.

     दुसरे प्रमुख पाहुणे डॉ.  शिवनकुट्टी हे खास केरळमधील पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते.. त्यांच्या पुस्तकाचे देखील प्रकाशन होणार होते. डॉ. कुट्टी यांनी मल्याळम् साहित्याचा आम्हा सर्वांना परिचय करून दिला. यानंतर सुनील गायकवाड जे जळगाव येथून आले होते (त्यांनी आदिवासी बोलीभाषेवर भरपूर साहित्य लिहिले आहे) त्यांनीही आपण ‘प्रमाणभाषेचा आग्रह न धरता आपल्या बोलीमध्ये लिहा; तिचा विकास करा; आपल्या भाषेला कुठलीच बंधनं नको,’ अशा प्रकारची भूमिका मांडली. त्यांनी सुंदर अशा आदिवासी बोलीतील रचना सादर केल्या आहेत..

     देविदास फुलारी सर यांनी ‘असे मंच किती आवश्यक आहेत,’ याची छान माहिती दिली. ते नांदेड येथील प्रसिद्ध कवी असून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत.. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये ‘रात अभी बाकी है’ हे देविदास फुलारी यांचे तर ‘रिश्तों का बंजर होना’ या मनीषा पाटील यांच्या रचना यांनी केलेल्या हिंदी अनुवादित ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

 आणखी महत्त्वाची लक्ष्यवेधी बाब म्हणजे उत्सवात एकूण तीन परिसंवाद झाले. ‘कविता : स्वरूप आणि परिचय’

 या विषयावर बोलताना मा. फुलारी सर यांनी खोलवर माहिती दिली. मराठी कवितेचे स्वरूप कसे बदलत गेले व सध्या कशी आहे याबद्दल विस्तृत चर्चा केली. प्रणिता तेली यांनी ‘एक तुतारी द्या मज आणुनी ’ पासून बालकवितेपर्यंतचा प्रवास आपल्या भाषणामध्ये मांडला..  सुनील गायकवाड यांनी ‘प्रमाणभाषेसोबत बोली भाषेवरही आपण प्रेम केलं पाहिजे ,बोलीत जास्तीत जास्त निर्मिती केली पाहिजे.’ असे प्रतिपादन केले. अशा प्रकारे हे चर्चासत्र वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे ठरले .

     यानंतर कवी संमेलनाच्या पहिल्या बहुभाषिक सत्राला सुरुवात झाली; ज्याचे स्वाती पाटील यांनी रंगतदार असे सूत्रसंचालन केले. सहभागी कवींनी एकापेक्षा एक अशा सरस कविता सादर केल्या या सत्रात जयसिंग गाडेकर, सुजाता भोजने, बापू दासरी, सुधीर शेरे ,सोनिया इथापे(इंग्रजी) ,स्वाती पाटील, सविता लोंढे,(हिंदी)श्रीजा कृष्णन (मल्याळम) हे होते.

     यानंतरच्या सत्रामध्ये ‘समकालीन कविता’ या विषयावर परिसंवाद  होता. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. महेश मोरे यांनी अभ्यासपूर्ण रीतीने केले. या सत्रात चंद्रकांत बाबर, रचना(हिंदी), महेश मोरे, सुखदेव सिंग सिरसा, (पंजाबी), शशीचंद्र (मल्याळम ),जास्मिन शेख(दखनी) यांनी विस्तृत मांडणी केली.

सुखदेव सिंग सिरसा

     यानंतर परत एकदा कवी संमेलनाचे सत्र झाले. या संमेलनाचे सूत्रसंचालन मनीषा रायजादे-पाटील यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलं. यामध्ये जास्मिन शेख, पूनम भोसले, जबीन शेख ,आशा डांगे, प्रवीण काळे, मनीषा घेवडे, महेश मोरे , अॅड.  विजय कस्तुरे, डॉ. डी. बी. खरात या कवी-कवयित्रींनी दर्जेदार अशा कविता सादर केल्या. पुढील सत्राचे संचालन सारिका पाटील यांनी केले. यामध्ये डॉ. संजय बोरुडे, रचना, आर्या पाटील, प्रणिता तेली, देविदास फुलारी, मनीषा पाटील, सरिता सैल(कन्नड),सुनील गायकवाड (भिलोरी बोली),सारिका पाटील, डॉ. शोभा लोंढे (हिंदी), सी. अरूर (मल्याळम) हे सहभागी होते.

  अशी काव्यसत्रे संपल्यावरही प्रत्येक जणाचा उत्साह अगदी कायम होता. शेवटी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. सर्व सहभागी कवी-कवयित्री यांनी आपल्यातील विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम  सादर केले. सोबत आलेल्या लहान मुले-मुली यांनी नृत्य व गीतगायन केले. तसेच काही कवी कवयित्री यांनी आपली गायन कला सादर केली.

  सर्वांना आवडली ती मनीषा घेवडे यांनी साकारलेली ‘हिरकणी’ एकपात्री नाटिका. अत्यंत उत्स्फूर्त अभिनयातून सादर केलेला आविष्कार उपस्थित आमच्या डोळ्यातून पाणी काढणारा ठरला. अशा प्रकारे पहिल्या दिवसाची सुंदर अखेर झाली.

   दुसऱ्या दिवसाची सुरुवातही चर्चासत्राने झाली.विषय होता-भारतीय कवितेतील भूमिनिष्ठा  या विषयावर डॉ. संजय बोरुडे, डॉ. प्रवीण काळे, मनीषा पाटील, डॉ.  जयसिंग गाडेकर, डॉ. शिवन कुट्टी या मान्यवरांनी दमदारपणे आपली मते मांडली .

    यानंतर लगेचच कवीसंमेलनाचे सत्र झाले. त्याचे सूत्रसंचालन बापू दासरी यांनी केले. यामध्ये जास्मिन शेख,पूनम भोसले,सारिका पाटील, जबीन शेख, आशा डांगे, प्रवीण काळे ,बापू दासरी ,सविता लोंढे, श्रीधरन पॅराकोडे ,शशीधरन ,या कवी कवयित्रींच्या आपापल्या भाषेतील कविता होत्या .

   पुढील सत्रात डॉ. संजय बोरुडे यांच्या ‘लोकधन या लोकसाहित्यावरील ग्रंथाचे व डॉ.शिवन कुट्टी यांच्या ‘पीलथॉएपीसटीनहेंगेल’  या मल्याळम पुस्तकाचे प्रकाशन झाले.

     परत एक कवी संमेलनाचे सत्र घेण्यात आले ज्याचे संचलन डॉ. संजय बोरुडे यांनी केले. यामध्ये डॉ. संजय बोरुडे ,रचना मनीषा पाटील ,देविदास फुलारी, सुनील गायकवाड, डॉ.  शिवन कुट्टी ,श्रीजा कृष्णन या कवी कवयित्री यांनी सहभाग घेतला.  पुढील सत्राचे संचालन सुजाता भोजने व जयसिंग गाडेकर यांनी केले. यामध्ये सुजाता भोजने-सरवदे, स्वाती पाटील, मनीषा रायजादे ,अब्दुल समद ,सुधीर शेरे, सोनिया इथापे, विठ्ठल जाधव ,आर्या पाटील, शुभा लोंढे, प्रणिता तेली, मनीषा घेवाडे ,महेश मोरे, डॉ. जयसिंग गाडेकर, विजयकुमार कस्तुरे, डॉ.  डी.  व्ही.  खरात यांनी सहभाग घेतला .

शेवटी सर्वांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

सर्व सत्रांमध्ये चहापान व जेवण अतिशय रुचकर होते. निसर्गरम्य केरळमध्ये झालेले हे शानदार संमेलन सर्व मराठी कविता कवींसाठी पर्वणीच ! खूप आधीपासून याचे नियोजन आदरणीय संजय बोरुडे सर व रचनाताई करत होते . त्यांच्या अथक प्रयत्नातून आम्ही सारे चौदाशे किमी लांब अंतर पार करून मराठी कवितेचा जागर कोझीकोडे येथे केला.

  प्रसिद्ध पंजाबी कविता, मल्याळम कविता, त्याचप्रमाणे दख्खनी कविता ,हिंदी कविता अशा प्रकारे खऱ्या अर्थाने बहुभाषिक कविता ऐकायला मिळाल्या. परिसंवादातून आपली समज अधिक व्यापक करायला हवी हे समजले. वाचनाचे महत्त्व अधोरेखित झाले. वक्ते किती तयारी करून येतात, याची प्रचिती आली.

या संमेलनातून खूप छान मैत्रिणी भेटल्या . त्यांच्या कविता वाचायला भेटतात. अनेक नवीन ओळखी झाल्या. या संमेलनात पुढील बहुभाषिक कवी- कवयित्री सहभागी झाले होते- प्रवीण काळे – माजलगाव; डी . बी. खरात,चिखली; सोनिया इथापे, पुणे; डॉ. स्वाती पाटील , सांगली; मनीषा पाटील, क. महंकाळ; सारिका पाटील, कोल्हापूर; विजय कस्तुरे (वय -९० ); सुनील गायकवाड, चाळीसगांव; वितथाल जाधव, शिरूर कासार-बीड ; प्रिया ए. तामिळनाडू ; सी . अरूर, कोची; शशीधरन, मलप्पुरम; श्रीजा कृष्णन, कासारगोड; डॉ. सिवन कुट्टी, मलप्पुरम ; डॉ. अब्दुल समंद, कोची; पूनम भोसले, पुणे ; श्री. व सौ. जयसिंग गंडेकर,आळे ;सुजाता भोजने, अंबाजोगाई ;मनीषा रायजादे, सांगली; प्राणिता तेली, कोल्हापूर; जॅस्मिन शेख,सांगली; बापू दासरी, नांदेड; प्रा. महेश मोर, नांदेड; देविदास फुलारी, नांदेड, प्रा. सविता लोंढे, सांभाजीनगर, सुखदेव सिंग सिरसा, चंदीगढ;श्रीधरन पॅराकोडे,आंध्र प्रदेश; चंद्रकांत बाबर, आरग; डॉ. शुभा लोंढे, वाई आणि स्थानिक बहुभाषिक कवी.

 एक समृद्ध व चिरंतन स्मरणात राहणारा अनुभव या संमेलनाने दिला .

हिंदी अनुसंधान केंद्र, अहिल्यानगरचे हार्दिक आभार.

 त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. यासाठी आम्ही सदैव ऋणाईत राहु.!

सुजाता भोजने सरवदे,अंबाजोगाई

**************************************************************************************************************

एग्रो न्यूज, फलटण येथील पुरस्कारप्राप्त बालकादंबरी

हवेलीचे रहस्य

किंमत – १५०/- ब्लॉग वाचकांसाठी पोस्टेज फ्री