2020 मे

वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी : डॉ.संजय बोरुडे

सा हि त्या क्ष र 
वसंत मुरदारे ,7666346415

प्रतिभासंगम साहित्य व संस्कृती मंच च्या वतीने मी अनेक कविसंमेलनाचे आयोजन करायचो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला शेवगावचे ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे आवर्जून  उपस्थित रहायचे.. या कार्यक्रमातूनच संदीप काळे ( पाथर्डी ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी) यांसारखे नवे कवी पुढे आले. साम टीव्हीचे निवेदक दुर्गेश सोनार (पंढरपूर) यांना उमेदीच्या काळात आमच्या मंचाने खूपदा बोलावले. ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) तेव्हा विद्यार्थीदशेत असताना इकडे नेहमी यायचा. या गोष्टीला विजय नांगरे (चांदा), रामदास सोनवणे ( घोडेगाव ), रामकृष्ण जमदाडे (खडका फाटा), कैलास गडाख (सोनई), दत्ता साकोरे (निमगाव म्हळुंगी)यांसारखे अनेक लोक साक्षीदार आहेत. त्यावेळची कात्रणे, फोटोही उपलब्ध आहेत. 

     साधा शर्ट आणि पॅन्ट असा पोशाख असण वसंतरावांनी कधी कुणाच्या कुचाळक्या केल्याच्या मी पाहिल्या नाहीत. अनेक प्रतिष्ठित मंचावरून आपत्या कविता ऐकवताना स्वत : ला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. मुक्तछंदातील असो वा लयीतली कवित त्यांचे सादरीकरण लक्षवेधी आणि लक्षात राहणारे असायचे. शेवगाव ग्रामपंचायतच्या जकात नाक्यावर काम करणारे मुरदारे यांची आर्थिक स्थिती जेमतेम असली तरी महाराष्ट्रभर चांगले मैत्र जपले आहे. कवितेच्या प्रमोशनसाठी कुणाकडेही लाळघोटेपणा न करता आपली कविता ते व्रतस्थपणे जपत राहिले.आजच्या पिढीला कदाचित वसंतराव ठाऊक नसतील . पण सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की, त्यांच्या कविता वाचून तत्कालीन साहित्य रसिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पत्र पाठवले होते आणि ‘अनुष्टुभ’ ने ते प्रकाशित केले. यावरून त्यांच्या कवितेचा दर्जा लक्षात यायला हरकत नाही. 

     यशवंतराव गडाख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या हस्ते वसंतरावांचा सत्कार करण्यात आला होता. वसंतरावांचे दोन कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकअशित झाले आहेत. त्यापैकी ‘बोभाटा‘ हा कविता संग्रह रसिकांच्या आजही लक्षात आहे. पुढे त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चक्क शेवगाव येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांचा ‘तेच लोक होते’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यात मारवाडी, मराठा अशा सर्व जातीचे व्यापारी होते. मला वाटते, महाराष्ट्राच्या साहित्यविश्वामधली, ग्रामीण भागातली ही एकमेव घटना असावी. अनेक कविसंमेलने गाजवणाऱ्या वसंत मुरदारे यांच्या निवडक चार कविता या निमित्ताने आपल्या पुढे ठेवतो – 

वसंत मुरदारे यांच्या कविता

१.

तेच लोक होते

माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवणारे

त्यांच्याच हातातले धारदार सुरे होते

माझ्या पोटात खोल खोल वार करणारे

तेच लोक होते

माझ्यावर फुले उधळणारे

त्यांच्याच फुलांत जहरी नाग होते

मला जागोजाग दंश करणारे..

तेच लोक होते

मला वाकून नमस्कार करणारे

त्यांच्या नमस्कारातही जादुई चमत्कार होते

माझ्या मानेला जिथल्या तिथं मुरगाळणारे..

तेच लोक होते

माझ्याशी गोड गोड मधाळ बोलणारे 

त्यांच्या गोड बोलण्यातही शिव्याशाप होते

मला पूर्णत:रसातळाला पोहोचवणारे…

तेच लोक होते

माझ्या गुणांचे गोड गोड कौतुक करणारे

त्यांच्या कौतुकातही कुटील षड्यंत्र होते

मला मृत्यूच्या खाईत जखडविणारे…

तेच लौक होते

माझ्या मढ्यावर ओक्साबोक्सी रडणारे

त्यांच्या रडण्यातही भेसूर सूर होते

मला जिवंतपणीच सरणावर चढविणारे..

तेच लोक होते

माझ्या राखेतल्या अस्थि गोळा करणारै

अस्थि गोळा करण्यातही त्यांचे वितंडवाद होते

माझी राख दाखवून स्वतःचे पोट भरणारे..

२.

जुना कष्टाचा म्हातारा बैल मेला

दूरवरुन गिधाड उडत आले

मीठ घालून त्याला शेतात पुरावे म्हटले 

तर नुस्तेच हाडाचे सांगाडे उरले..

रक्तपिपासू प्राण्यावर 

नको तितके विष फवारले

वासानं जनावरच मेले

गोचीड मात्र जिवंत राह्यले..

करकुंजाचे असंख्य थवे

टोळधाडीसारखे भुईवर आले

बिचाऱ्या भर जवानीतल्या करडीचे 

नाहकच इज्जतीचे पंचनामे झाले..

घडोघडीला रंग बदलणारे सरडे

एवढे कसे शक्तीशाली बनले..

न जाणो त्यांच्या अंगात 

कुणा नेत्याचे बळ शिरले..

हौसेखातर पाळलेले मांजर 

एवढे कसे नेभळट निघाले

राजरोस घरातले उंदीरदेखील 

त्याच्या अंगाखांद्यावर लोळू लागले..

खाऊन खाऊन लठ्ठ झालेले कुत्रे

एवढे कसे मुजोर बनले

आता भाकरीच्या तुकड्यावरही ते

खुशाल वर तंगडी करु लागले..

काळे कुळकुळीत लोभी कावळे

एवढे कसे व्यवहारी बनले

पिंडाला शिवायचेही 

ते आता पैसे मागू राह्यले..

हे कुठले लफंगे लोक

नको त्याला पुष्पहार घालू लागले

देवळात कधीपासून देव

बिचारे पानाफुलांसाठी तरसू लागले…

३.

चांद चांदोळ्याच्या राती

असा वारा थरथरतो

पदराआधी

माझ्या ऊरीचा पाचोळा

त्याच्या नभाळी गरगरतो…

तुझी सय आली

लय वाऱ्याची होऊन

कसा उफणू जोंधळा

माझ्या  पापण्यांच्या टोपलीत

तू बसला जोंधळा होऊन…

४.

ताटाला हुडहुड /कणसाला लुडबूड /शिवारी पाखरु बिंगबिंगला…

मोटेची खडखड/थारोळं गडगड/कांद्याचा डेंगळा डेंगडेंगला…

भल्लरी दुडदुड /पाथीचं थुडथुड/सूर्य गं कासरा वरवरला

कासोटा तड्तड्/विळ्याची वढवढ/बुचुडा ताटाचा चरचरला

झुडुपात झुडझुड/चित्तर तुडतुड/गोफणीनं दगड वंगवंगला

खुरुडं खुडखुण/पिलाची ऊडऊड/पिकात कठाळ्या घुसघुसला

केळीचं घडघड/पानांची गडबड/भुंगा गं कमळ गुंगगुंगला

देठाची झडझड/मिरचीची पडपड/मधीच डिंगऱ्या डिंगडिंगला

डोहात बुडबुड/थंडीनं थुडथुड/झिंगा गं पाण्यात झिंगझिंगला

झाडं झिम्म झिम्माड/मनकवडं मन्नडं/राजबिंडि मुखुटा गुदगुदला

फेट्याची फडफड/ऊसात खडबडं/मागमूस जागीच मुसमुसला

पधराची सडसड/उरात धडधड/गावभर बोभाटा ऊठऊठला

****

तळटीप : वसंत मुरदारे सरांचा पुढचा कविता संग्रह आर्थिक कारणास्तव अजूनही प्रकाशित झाला नाही.’खानदानी कविता’ हे त्याचे शीर्षक आहे. ‘साहित्याक्षर ‘च्या वतीने तो लौकरच प्रकाशित करण्याचा मानस आहे. सदर कवितांची वही गेली अनेक वर्षे संपादकांकडे पडून आहे..

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment