2020 एप्रिल

पंढरी :खानोलकरी प्रतिभेचा अंगावर येणारा अनुभव

सा हि त्या क्ष र 

चिं. त्र्यं.खानोलकर 

 पंढरी :खानोलकरी प्रतिभेचा अंगावर येणारा अनुभव 
 इसवी सन १९६० नंतर कथाकार म्हणून उदयास आलेल्या आरती प्रभू उर्फ चिं .त्र्यं .खानोलकर यांचे सनई (१९६४ ),राखी पाखरू(१९७१) आणि  बाप (१९७८)  हे तीन कथासंग्रह आणि गणूराया चानी आणि चाफा व  देवाची आई इत्यादी दीर्घकथांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत .
      १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या’ राखी पाखरू’ या कथासंग्रहातील ‘पंढरी’ ही कथा वाचकांच्या मनाला स्पर्शून वाचकांच्या मनात पक्के घर करून राहते . आईविना पोराची होणारी फरफट वाचताना आजही मन हेलावून जाते .खरंतर खानोलकर यांची ही कथा म्हणजे ‘माणसाचा स्वभाव शरीराबाहेर येणाऱ्या वासना आणि विकार यांच्या ताणातून  नातं निर्माण झालेली शोकात्मिकाच  होय .
       पंढरी अगदी दोन तीन महिन्याचा असतानाच त्याच्या आईचा मृत्यू होतो . त्यामुळे त्याच्या आयुष्याची फरफटीत त्याला त्याच्या आईची आठवण येत नाही . येणार तरी कशी ? त्याने त्याच्या आईचा चेहरा पाहिलेला नसतो . आईनंतर पालन पोषण करणारी आजी त्याला दुःखाच्या प्रसंगी आठवत राहते .
       जन्मकुंडली सारख्या भंपक बाबीवर विश्वास ठेवणारा ,दिवसभर पंचांग पुढ्यात घेऊन बसणारा ,अगदीच अल्प आर्थिक प्राप्ती असणारा पंढरीचा बाप म्हणजे जणू माणूस आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती ,त्याचे दारिद्र्य ,त्याची मध्यमवर्गीय स्थिती आणि त्यातून निर्माण झालेली नकारात्मक मनोवृत्ती होय.
     पंढरीच्या जन्मदात्या पित्याला या गोष्टीचेही भान नाही की पत्नी नंतर अतिशय सुंदर असणाऱ्या एकुलत्या  एक मुलाची पालन पोषणाची जबाबदारी ही आपलीच आहे .याउलट मुलाच्या पत्रिकेत सुख कमी आहे व आपल्या पत्रिकेत आपण स्वतःच्या पोटात लागेल इतपतच मिळवत असल्याचे व ‘ब्रह्मदेवाच्या भविष्यात आपण बदल करणारे कोण असा विचार करून आईविना पोरास आजी नंतर कुंडली पाहून एका शुभमुहूर्तावर घराबाहेर काढतो .याप्रसंगी खानोलकर कल्पनारम्य भावविश्वाचा चित्रणाऐवजी मानवी मनात चालणाऱ्या भावनाच्या आंदोलनाचे वास्तव पंढरीच्या रूपाने चित्रण करतात . आई व आजीच्या मृत्यूनंतर पारखा झालेल्या पंढरीला त्याच्या बापाचे हे क्रूर व माणुसकीशून्य रूप पाहून आजीची खुप आठवण येते . तो आजीच्या वळकटीजवळ जातो आणि त्यातही आजीचे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो . शिरावर बाप असताना स्वतःच्या पोराला निराधार बनवणाऱ्या बापाच्या क्रौर्याची सीमा आणि व्यवहारी जगाचा अनुभव नसलेल्या पौंगडावस्थेत असलेल्या, स्वतःच्या निष्पाप मनाचा हातबलपणा पंढरीला काही केल्या ठरवता येत नाही . झोपेत सुद्धा पंढरी तळमळत राहतो .
       खानोलकरांनी पंढरीच्या देखणेपणाचे वर्णन काही वेगळ्या शब्दात केले आहे. ते म्हणतात ‘आभाळी मंद डोळ्यांचा ,पिंगट कुरळ्या केसांचा, लालसर गालांचा आणि सरळ नाकाचा , उभट चेहऱ्याचा पंढरी अतिशय सुंदर दिसत असे . दाहीदिशा मुक्त असणारा पंढरी एका विठोबाच्या मंदिरात आश्रयाला जातो . पित्याचे छत्र कायम असतानाही बेवारशी अवस्थेत  झोपलेल्या पंढरीला उठवत पुजारी त्याची ओळख करून घेतो .
      कथेचे निवेदन येथे अतिवास्तव पातळीवर येते . पुजारी काका बाक्रे त्याला शेंगदाणे भाजून विकावयासाठी द्यायला तयार होतात व एक वेळच्या जेवणाची सोय करतात .कसलाही कामाचा अनुभव नसताना केवळ एक वेळच्या जेवणासाठी व्यवहाराचा विचार न करता पंढरी तयार होतो .कारण दोन वेळच्या जेवणाची व डोक्यावर गरज भासणा-या निवाऱ्याची त्याला भ्रांत असते . या कथेतील काका बाक्रे या पात्राची मनोवृत्ती अतिशय संकुचित दिसून येते . रोज दोन रुपये कमावून देणाऱ्या पंढरीने  एक दिवस कमी पैसे आणले म्हणून रागावणारे  , जेवण बंद करणारे अतिशय भेदरलेल्या, घाबरलेल्या पोरसवदा पंढरीला आपल्या खोलीत झोपू न देणे म्हणजे अति संकुचित मनोवृत्ती होय .
     शेंगदाणे विकावयास गेल्यानंतर ‘ए पोऱ्या ‘अशी हाक मारून लोक त्याचे शेंगदाणे विकत घेतात परंतु त्याच्या गालाचा चिमटा घेत . मानसशास्त्रीय दृष्ट्या विकासाच्या पौंगाडा वस्थेत असणाऱ्या पंढरीला नुकतीच  लैंगिकतेची   जाणीव होऊ लागलेली असते . गालाला घेतल्या जाणाऱ्या चिमट्याने तो पुरता बिथरून जातो . चक्क पोरींसारखा लाजतो  परंतु त्याला ते नकोसेही  वाटत असते . खानोलकर यांच्या कथेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पात्रांच्या मनातील भाव , विचार भोवतीच्या परिस्थिती, घटना यांचे चित्रण व प्रतिमायुक्त निवेदन शैली यावरून दिसून येते .
    एक दिवस तुळसकरची नजर पंढरीवर पडते आणि त्याच्या मनातील वासना जागृत होते . तो पंढरीला शेंगदाणे विकत घेण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून त्याच्या आईची चौकशी करु लागतो . त्याच्या गालाचा चिमटा घेऊन लगट करण्याचा प्रयत्न करतो . पंढरीला या सर्वांची कळस येते . आपल्या मेलेल्या आई विषयी  याचा काहीतरी वाईट हेतू आहे ,हे त्याच्या लक्षात येते .आई विषयी कधीही, कसलाही मनात विचार न आलेला पंढरी ‘आपले आई कशी  असेल ? ‘यावर विचार करू लागतो पण त्याच्या मनात विषयी प्रेम निर्माण न होता आपली आई सुंदर होती ,याचा त्याला तिटकारा येतो . जेव्हा वास्तविकता समजू शकत नाही तेव्हा चांगल्या बाबीही वाईट भासतात . या मानवी स्वभावाची जाणीव खानोलकर  या पात्रांच्या  यानिमित्ताने करून देतात .
       जशी रात्र होऊ लागते तशी पंढरीला आईविषयी नवी जाणीव होऊ लागते . ‘आपल्या आईच्या सौंदर्यावर सारे जग उठले आहे , अन आपल्यावर तिच्या संरक्षणाची जबाबदारी आहे . ‘या जाणिवेने त्याला झोपच येत नाही . त्या रात्री वासनांध मानवी मनाच्या पाशवी अत्याचाराचा  त्याला  अनुभव येतो . माणसाच्या विकारी मनाचे  क्रौर्य खानोलकरांनी अतिशय प्रभावीपणे रेखाटले आहे .
        या अनुभवानंतर मात्र पौंगडावस्थेतील  पंढरीच्या मनावर खोल परिणाम होतात . मूर्तीतील देवपण , ब्राम्हणांचे संस्कार त्यांच्या दृष्टीने कुचकामी ठरतात . ब्राम्हण असूनही ब्राम्हण असणाऱ्या पंढरीला खोलीत झोपू न देणाऱ्या बाक्रेकाकांची जागा आता तिरस्काराने घेतली जाते .तर दुसरीकडे चांभार असूनही पंढरीच संरक्षण करू इच्छिणाऱ्या अंतुनानाबद्दल विश्वास निर्माण होतो . त्यामुळे विठूरायाला नमस्कारही न करता पंढरी अंतुनानाकडे रहायला जातो .शेवटी माणूस गरजांशी निगडित जीवन जगतो व माणूस नियतीच्या हातचे बाहुले आहे . हे ही सत्य खानोलकर येथे अधोरेखित करतात .
         खानोलकर यांच्या या कथेतील पंढरी म्हणजे निष्पाप मनाची कोरी पाटी . ज्यावर  कोवळ्या वयातच भयंकर अनुभव कोरले जातात . आरावकर शास्त्री पंढरीचे वडील भारतीय समाजातील जबाबदाऱ्या टाळणाऱ्या पालकांचे प्रतिक ज्यांना परिणामाची जराही खंत नसते .  बाक्रेकाका म्हणजे बहुतांशी समाजात दिसून येणारी दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेत आपल्या नफ्याचा विचार करणाऱ्या मध्यमवर्गीय संकुचित मनोवृत्ती तर तुळसकर म्हणजे समाजातील पाशवी विषयासक्त मानवी मनाचे प्रतिक होय .
         अशा तऱ्हेने समाजातील सर्व तऱ्हेच्या लोकांच्या वर्तनामुळे, स्वभावामुळे ,विचारांमुळे निष्पाप असणाऱ्या घटकाला मरणयातना भोगाव्या लागतात. माणसा-माणसातले परस्परसंबंध माणूस आणि समाजाने उभ्या केलेल्या नियमनांचा व मूल्यांचा संघर्ष . माणसाला मुळापासून उखडून टाकायला निघालेली नियती . शारीरिक विकृती यांनी ग्रस्त असलेल्या माणूस दुसऱ्या व्यक्तीशी बांधला गेल्याने वाटयाला येणारे दुःखभोग सोसणारा माणूस अशा स्तरावरच्या शोकात्मिका या कथेतून जाणवतात .

— रचना
पूर्वप्रसिद्धी : आरती मासिक,मार्च २०१२

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment