अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण- प्रभाकर साळेगावकर
।।अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण।।
शाहिरी कवितेच्या अविष्काराची मुळं यादवकालाच्या पुर्वीपासुन राजस्थानातुन आलेल्या भाटगिरीत रूतलेली आहेत.पारंपारिक शाहिरी कवितेला ब-या पैकी राजाश्रय आणि लोकाश्रय ही मिळाला हे लक्षात येते.अगदीच थोडक्यात सांगायचे मःहणजे१७ व्या शतकाच्या उतरार्धापासुन पारंपरिक वाडःमयाच्या निर्मितीची सुरूवात आहे.
यातील संत साहित्याने अध्यात्माचा विचार केला तथापि शाहिरांनी करमणूक विभाग संभाळताना पराक्रम ,प्रेम ,विरह याचे दर्जेदार कथनाची बाजु लावुन धरलेली होती ,म्हणुनच ती लोकाश्रीत अधिक राहिली.
लोकसमुहास शाहिरी अधिक जवळची होण्याचे दुसरे कारण म्हणजे लोकजीवनावर प्रकाश टाकतच अधात्म सहजतेने संभाळणे आणि प्रबोधन करणे याचा लयदार बाज या वाड्ःमय प्रकाराला आहे.
शाहीरीचे प्रकार पाहता ती किती विविधतेने नटलेली आहे लक्षात आल्या वाचुन राहत नाही.
गण ,गौळण ,लावणी ,पोवाडा ,भेदिक गाणे ,तमाशा ,भेदिक तमाशा ,अशा संवाद ,संगीत ,वेशभुषा या त्रिवेणी संगमावरची ढंगदार शाहिरी प्रत्येक कालखंडात स्वत।चा ठसा उमटवतच दिमाखात खुलत गेली आहे.
आपण उपरोक्त वर्णंंन हे आण्णाभाऊ ची शाहिरी समजुन घेण्यासाठी त्यातील वेगळे पण अधोरेखित करण्यासाठी पुर्वपिठीका ,भूमिका म्हणुन लक्षात घेतले पाहीजे.
विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पारंपरिक शाहिरी कवितेला नव्या अविष्काराचे नवे धुमारे फुटूलागले.
अज्ञानी ,अडाणी ,निरक्षर समाजाला नवी दिशा प्रदान करण्यास तमाशाचे रूप पालटत जाउन कर्ते सुधारक मंडळी ” लोकनाट्य” संज्ञा घेवुन समाज प्रबोधन करु लागली हे सर्व श्रुत आहे. या लोकनाट्यात अंर्तभूत असणारी सत्यशोधकी जलसे ,आंबेडकरी जलसे ,राष्ट्रसेवादलकलापथक ,लालबावटा कलापथक ही सारी रुपं शाहिरीचीच आहेत .
समाजपरिवर्तनाचा विचार मांडत वास्तवाचे जिवंत दर्शन वाड्ःमयीन बंधमुक्त राहून ज्यांनी मांडले ते आहेत आ्णाभाउ साठे.
समकालाचे भान ठेवुन विषमता ,अन्याय यांच्या विरूद्ध बंड करून उठण्याची प्रेरणा आण्णाभाऊ यांच्या लेखनीत आहे म्हणुनच आण्णाभाउ यांच्या साहित्याचा माणुस हाच केंद्रबिंदू आहे.
साहित्यसम्राट आण्णाभाउ असा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा त्यांच्या लेखनाचा प्रवाहही काळजावर गोंदवणे महत्वाचे आहे.
प्रथम शाहिरी ,नंतर कथा ,आणि त्यानंतर कादंबरी असा आण्णाभाऊंचा लेखन प्रवास आणि प्रवाह आहे.या वरुन एक बाब पुन्हा गडद होते साहित्यिकाची पहिली निर्मिती ही त्याची चार दोन ओळी का होईना पण कविताच असते.
सर्वसामान्यपणे आण्णाभाऊ साठे यांनी १९४२ पासुन आपल्या शाहीरी लेखनास सुरूवात केलेली आहे असे दिसुन येते.
शाहिर द.ना.गव्हाणकर ,शाहीर अमर शेख मुंबईत आले आणि त्यांची आण्णाभाऊ यांच्याशी ओळख झाली .कम्युनिस्ट पार्टीला हे तीन रत्ने मिळाली.
लालबावटा कलापथक समाज प्रबोधनासाठी गतिमान झाले.
१९४२ते १९६९ या कालखंडात आण्णाभाऊ साठे यांचे झालेले शाहिरी लेखन अतिशय कसदार आणि बहुआयामी मानले जाते.
लोकनाट्याशिवाय ज्या पद्य रचना आहेत त्या मधील प्रबोधनाचा विचार पिळदार आहे.
अस्सल संयत विद्रोह आणि क्रांतिकारी विचार या सोबतच
सर्वसमावेशी समुहभावना जपण्याचे कसब या साहित्य रत्नाच्या लेखणीला अवगत झालेले होते म्हणुनच आण्णाभाऊ साठे यांची पद्द्य रचना कालातीत आहे.
आण्णाभाऊ साठे यांच्या सागररूपी शाहिरीचा माझ्या अल्पमतीने मोती टिपण्याचा केलेला प्रयास आपल्या पुढ्यात ठेवतो आहे.
*गण* …
” प्रथम मायभू च्या चरणा
छत्रपती शिवबाचरणा
स्मरोनी गातो कवना..।।ध्रु।।
क्रांतीकारी विरांना आणि
त्यागी भूषणा
पणा लावुनिया प्राणा
अर्पियले जीवना…।।१।।
…पारंपरिक तमाशा मध्ये वंदन , देवदेवताचे स्मरण करुन रसिक मायबापाना आशिर्वाद मागण्यासाठी गण या प्रकाराची निर्मिती आहे ,परंतु आण्णाभाऊ साठे यांनी गण या पद्य प्रकारा पासुनच वैचारिक ,काल सुसंगत अधिष्टान मांडणीला सुरूवात केली.
उपरोक्त उदाहरणात कर्ताकरवित्या कलात्मक इशासोबतच मातृभूमी , देशभक्त ,हुतात्मे ,राष्टरवीर यांनावंदन करून कालसुसंगत मांडणीचा गण ते सादर करत असायचे हे लक्षात येते.
*आण्णाभाऊंची म्हणणी*
पारंपरिक तमाशा च्या स्वरुपात गण झाला की ‘गौळण ‘ असते.
गौळणीला अध्यात्मिकता कमी आणि श्रंगार अधिक असतो
आण्णाभाऊ यांनी गौळण हा प्रकार वजा केला करून ,नाकारून ” म्हणणी ” हा प्रकार कथासुत्राचा काव्यमय परिचय करुन देण्यासाठी रूढ केला.
“खानदेशामधी गाव राजुरी खेडे एक लहान
त्या गावची गोष्ट सांगतो घ्यावी ऐकुन ..।।१ ।।
एक सावकार ,दुसरा गवळी असे दोघेजण
मित्र भावाचे नांदत होते आनंदात ।।२।।
करती काळा बाजार दोघांचै नफ्यावर ध्यान
स्वार्थासाठी शेतक-याची मुरगळती मान ।।३।।
वरील म्हणणी आहे ” अकलेची गोष्ट ” या लोकनाट्या मधील कथासुत्र मांडणीची ,जी प्रयोगपुर्वी सादर केली जात असे.
पोवाडा
पोवाडा हा शाहिरी प्रकार गद्य आणि पद्य रूप धारुन करुन प्रारंभी पासुनच नटलेला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत दुस-या अध्यायात “पवाडा ” हा शब्द आलेला आहे. स्तुती अथवा भांडण या अर्थाने हा शब्द निर्माण झालेला असला पाहिजे.
आण्णाभाऊ साठे यांनी त्या काळाशी एकरूप होवुन व्यक्तीपर आणि घटना वर्णनपर पोवाड्यांची निर्मिती केलेली आहे.
काळ्या बाजाराचा पोवाडा ,
बर्लिनचा पोवाडा
महाराष्ट्राची परंपरा
बंगाल ची हाक
अमळनेरचे अमर हुतात्मे
मुंबई चा कामगार
या सारखे त्यांचे गाजलेले पोवाडे आहेत.
कलात्मक दृष्टीने विचार करायचा झाल्यास सहा चौकी असा महाराष्ट्र् परंपरा हा पोवाडा आण्णाभाऊ ची या प्रकारातली सर्वोत्तम कलाकृती वाटते..
” महाराष्ट्र मायभू आमुची मराठी भाविकांची
संतमहंताची ज्ञानवंताना जन्म देणारी ।।
नवरत्नाची दिव्य भांडार
समरधिर घेती जिथे अवतार …जी ..जी….
महाराष्ट्र भूमीचे भौगोलिक ,ऐतिहासिक ,भाषिक ,सांस्कृतिक दर्शन या पोवाड्यात उधृत केलेले आहे. प्राकृत भाषेतुन मायमराठीला प्रतिष्ठा मिळवुन देणारे
संत ज्ञानेश्वर , स्वराज संस्थापक छत्रपती राजे शिवाजी महाराज , समाजक्रांती चे अग्रदूत म.ज्यो.फुले ,क्रांतिसिंह नानापाटील ,अच्युतराव पटवर्धन यांचेही वर्णन या पोवाड्यात येते.
*लावणी*
आण्णाभाऊ साठे यांनी मोजक्याच परंतु अजरामर लावण्या लिहील्या आहेत.
लावणीचा धाट जुना परंतु आशय आणि विचार नवा हे या लावण्यांचे खास वैशिष्ट्य आहे.म्हणुनच आण्णाभाऊ ची लावणी ही कुलीन ,संस्कारी ,प्रबोधनपर अशीच आहे.
१.सुगी २.साता-याची त-हा ३.मुंबई ची लावणी ४.कथा मुंबई ची ५.माझी मैना गावावर राहीली.
कलात्मक गुंफणीचा या लावण्या उत्कट अविष्कार करतात.
मुंबई ही माणसाला भूरळ घालते.
त्या काळातही मुंबई चा सुक्ष्म अभ्यास आण्णाभाउनी केलेला आहे. श्रीमंती ,दारीद्र्य ,यातील विषमतेचे भिषण वास्तव टिपताना आण्णाभाऊ लिहीतात..
” फोरास रोड ,तीन बत्ती गोल पिठा , नाक्यावरती
शरीर विकुन किती पोट भरती ..।।
प्राचिन मराठी लावणीत असा श्रंगार मांडुन काळीज पिळवटुन टाकणारे आण्णाभाऊ या अर्थाने चिरंतन मुल्य संभाळतात असे म्हणावे लागेल.
आण्णाभाऊ ची माझी मैना गावाकड राहीली ही संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील समरगीताची भूमिका निघावते असे मला वाटते.
दोन विभागातील लावणी म्हणजे मुंबई चा कामगार आपल्या पत्नीला गावाकडं सोडुन इथं काम करतो आणि दुसरा विभाग बेळगाव ,कारवार ,गोवा येथील मराठी माणसाची मुंबई जणु मैनाच आहे.
आण्णाभाऊ साठेयांच्या प्रतिक ,प्रतिमांच्या ,शब्दकळेला आलेला बहर या लावणीत अधिक गडद पणे ठसा उमटवतो..हेच पहा..
” ओतिव बांधा ,रंग गव्हळा ,कोर चंद्राची ..
उदात्त गुणाची ,मोठ्या मनाची ,सिता ती माझी रामाची …।
उपरोक्त ठळक शाहिरी प्रकारा शिवाय आण्णाभाऊ साठे यांनी लोकगितांच्या परंपरेला नवेपरिमाण देऊन काही रचना लिहुन लोकभावनेच्या काळजाला हात घातलेला आहे.
१. जग बदल घालुनी घाव
२.उठला मराठी देश
३. दुनियेची दौलत सारी.
४.भारताची पहिली दिपावली .
५. शिवारी चला..रे
या रचना लोकप्रिय आहेत.
गरीबा विषयीचा कणव , दया ,मानवतावादी दृष्टी , मराठी मातीची ओढ , समकालीन तत्वज्ञान शाहीरी तुन ,स्फुट गीतातुन मांडणारे साहित्य सम्राट ,आण्णाभाऊ साठे हे मराठी लोकसाहित्य ला कालातीत असे नवे परिमाण देतात. लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांच्या
या समृद्ध अशा अफाट आणि अचाट अलौकिक ,वास्तव वादी ,प्रतिभेला त्या़च्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमीत्ताने अंतःकरण पुर्वक वंदन.
(संदर्भ….श्री दत्तात्रय पाटील यांचे
आण्णाभाऊ साठे आणि शाहिरी वाड्ःमय )
– प्रभाकर साळेगावकर
9422295304