वडगाव लाईव्ह : एक अस्वस्थ अनुभव
वडगाव लाईव्ह : एक अस्वस्थ अनुभव
नांदेडच्या साहित्यिक,सांस्कृतिक वैभवात भर घालणारे जगदीश कदम सर,यांनी त्यांचे ‘वडगाव लाईव्ह’ हे दोन अंकी नाटक उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिले होते.ते नुकतेच वाचून काढले.छोट्या गावाची मोठी गोष्ट त्यांनी या संहितेत उभी केली आहे.कठोर ग्रामवास्तवावर ही गोष्ट बेतलेली.अशा गोष्टी मी फार जवळून अनुभवतो.
आरक्षणाचा आधारवड घेवून इथले राजकारण कसे खिचडी रुपात शिजते,याचे चित्रण मोठ्या खुबीने प्रस्तुत नाटकात लेखकाने केले आहे.एसटी प्रवर्गातील गणपत कोळ्याची ही कथा आहे.गणपत कोळ्याची बायको पारु ग्रामपंचायत निवडणूकीत सात्त्विक स्वभावाच्या भुजंगरावांच्या पाठिंब्याने सरपंच होते.ही गोष्ट रंगराव सारख्या महत्त्वाकांक्षी आणि खलनायकीवृत्तीच्या माणसाला खटकते.पारू आपल्या बाजूने येणार नाही हे लक्षात आल्यावर तिच्या नव-याला म्हणजे गणपत कोळ्याला रंगराव गळाला लावतो. गणपत त्याच्या मुत्सदीपणाचा बळी ठरतो.खरे तर
कयाधू नदीवर मासळ्या धरणे,पोटापाण्यासाठी जमेल तशी लोकांची कामे करणारा गणपत बायकोच्या सरपंचकीमुळे आमुलाग्र बदलून जातो.सत्तेची लालसा माणसाला कशी पदभ्रष्ट करते हे गणपतीला लागणार्या बोलण्यातून जाणवत राहते. भावभावकीचा विरोध पत्कारुन पारू निवडून येते.आरक्षणाच्या माध्यमातून सरपंच होते.परंतु हे पद कोणाच्या तरी हातातील कठपुतली आहे,हे तिला जाणवत राहते.सत्तेतील सम्राट या पदाचा वापर आपणास हवा तसा, आपल्या सोयीनुसार करू पाहतात.या माध्यमातून आपली गालावरची पकड कशी घट्ट करता येईल याची काळजी घेत असतात.ही बाब पारू सारख्या स्वतंत्रपणे विचार करू पाहणा-या स्त्रीला पटत नाही.
जोशी मास्तरच्या सल्ल्याने रंगराव काही डावपेच आखतो.शाळेच्या पटांगणातील मोकळ्या जागेत राम मंदिर बांधण्याचा घाट घालतो.हा प्रश्न भावनिक करून त्याला ग्रामस्थांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्नही करतो.आपल्या आप्तांच्या पोटापाण्याच्या प्रश्न सुटू शकतो ही मास्तरांची शक्कल असते.परंतु अनेक वर्षे सत्तेत असलेला भुजंगराव सारखा नेक माणूस ही खेळी हाणून पाडतो.पंधरा वर्षापासून मंदिरासाठी परवानगी देण्याचे टाळतो.विद्येच्या मंदिराचे करता दुसरे कुठलेच मंदीर त्याला महत्त्वाचे वाटत नाही.आता मात्र सत्तांतर झाले.शाळेच्या पटांगणात मंदीर उभारले जाते की काय या धास्तीने भुजंगराव व्यथीत होतो.आपण पारुला निवडून आणले खरे परंतु तिचा नवरा गणपत कोळी हा विरोधकांच्या गटात सामील झाल्यामुळे हे घडणे अशक्य नाही असे त्याला वाटते.पारू ही मात्र कुठल्याही चुकीच्या मार्गाने आपण जाणार नाही असा पवित्रा घेते.वेळ प्रसंगी गणपतलाही खडसावते. रंगरावच्याच्या गटाकडून खूप दबाव येतो.ज्या जातीच्या आरक्षणातून पारू सरपंच झालेली असते,तेच खोटे आहे अशी आवई उठवली जाते. जात वैधता प्रमाणपञ नसलेली पारु सरपंचपदी कशी राहू शकते असे बोलले जाते.वैधता प्रमाणपञ नसेल तर पद जावू शकते;परंतु जोशी मास्तरांना कायदे कानून माहित असल्यामुळे तेच हे पद अबाधित ठेऊ शकतात अशी बतावणी गणपत आपल्या बायकोकडे म्हणजे पारूकडे करतो.
रंगराव याला हे आयतेच कोलित मिळते. गावासोबत जिंकण्या- हरण्याचा हुन्नरबाज खेळ सुरु होतो.गणपत कोळयाला रंगराव सहज बगलेत घेतो.आणि आपली राजकीय गणितं सोयी प्रमाणे रचत जातो.
मिलींद सारखा गावातील परिवर्तनवादी विचाराच्या तरूण रंगराव आणि जोशी मास्तरांचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी समविचारी तरुणांना एकत्र करतो.शाळेच्या पटांगणात मंदीर बांधायचा दूराग्रह किती टोकाला जातो आहे आणि त्यामुळे गावातील वातावरण कसे दुषित होत चालले आहे हे समजावून सांगतो.गणपत कोळ्याच्या दबावाला न जुमानता सरपंच असलेली
पारु कसा दृढ निश्चय करते,शाळेच्या जागेत मंदिर नकोच अशी ठाम भूमिका घेते यांचे प्रत्ययकारी चित्रण नाटककार जगदीश कदम यांनी समर्थपणे या नाटकात केले आहे.सत्तेपासून दूर असलेला सरळ,साधा आणि घरात सत्ता येताच स्वार्थलोलूप बनलेला गणपत कोळी अशी एकाच व्यक्तीची दोन रुपे या नाटकात दाखविलेली आहेत.तसेच
एकाच कुटुंबातील दोन टोकं असलेली गणपत आणि पारू यांच्या परस्परविरोधी जगण्यातील ताणतणाव नेमकेपणाने इथे आलेले आहेत.पारु ही विचारी, विवेकशील,कृतज्ञ तर गणपत हा लालची,स्वार्थी,कृतध्न दाखवला आहे.
‘वडगाव लाईव्ह’ या नाटकात मध्ये पारंपरिकता आणि आधुनिकता यांच्यातील अंतर्गत द्वंद्व लेखकाने मोठ्या खुबीने उभा केले आहे.
या नाटकातील सूत्रधार आणि सोंगाड्या यांच्यातील संवाद हा मार्मिक आहे.नाट्यवस्तूची उकल अत्यंत समंजसपणे आणि गांभिर्याने करण्यासाठी हा संवाद विलक्षण उपकारक ठरलेला आहे.जणू काही आपल्या डोळ्यां समोर हे सारे घडत आहे,इतके हे नाटक लाईव्ह वाटते.याचे श्रेय
जगदीश कदम यांच्या संवाद लेखनाला जाते.
अशा गावकथेत अनेकदा अनैतिक गोष्टी बेभरवशाने पुढे येतात,ह्या बाबीना लेखकाने संधी दिली नाही,हे सुध्दा महत्त्वाचे .
सोंगाड्या,सूत्रधार,गणपत, पारु,भुजंगराव,भिकाजी,सय्यदभाई,जोशी,रंगराव,गौतम,नागू,
गणेश,रेशमाजी अशी काही पात्रे असलेली ‘वडगाव लाईव्ह’ ही नाट्य संहिता वर्तमान स्थितीचा जळजळीत अनुभव देते.
ग्रामीण राजकारणातील सूक्ष्म पदर पराकाष्ठेने परजत ठेवते.खरे तर हे नाटक म्हणजे एक जळजळीत अनुभव आहे.विख्यात चित्रकार
संतोष घोंगडे यांचे अर्थसूचक आणि प्रभावी मुखपृष्ठ सहज लक्ष वेधून घेते. समाजाची घुसमट वेगळ्या अंगाने मांडणा-या या लेखनासाठी जगदीश कदम सर यांना हार्दिक शुभेच्छा!
— प्रा.नागोराव तम्माजी उतकर, भ्र.९४२१६३७६९८
मरखेल ता.देगलूर जि.नांदेड
वडगाव लाईव्ह (नाटक)
लेखक : जगदीश कदम
९४२२८७१४३२
संगत प्रकाशन
विवेक नगर , नांदेड
प्रथम आवृती
२६ ऑक्टोबर २०१९