कोरोनाचा विळखा : नितीन माधव
(नितीन माधव हे एक मुक्त आणि अभ्यासू पत्रकार आहेत,इलेक्ट्रोनिक तसेच प्रिंट मीडियाचा त्यांना अनुभव आहे.त्यांनी हा आजचा ब्लॉग लिहिलाहे.मात्र या लेखात त्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.- संपादक,साहित्याक्षर.)
कोरोनाचा विळखा.. पत्रकाराच्या नजरेतून
सध्या आपल्या भोवती जे काही घडतय, ते ना काल्पनिक आहे ना योगायोग.
डिसेंबरच्या 31 तारखेला चीनसह जगभरात नव्या वर्षाचा जल्लोष साजरा केला गेला.
सर्वच न्यूज चॅनल्सच्या स्क्रिन्स आणि वृत्तपत्रांचे मुखपृष्ठ नवंवर्षाच्या मनोहारी दृष्यांनी
व्यापलेले होते…ते थेट आज सतत 24 तास आणि सातही दिवस कोरोनाच्या भयावह बातम्यांनी
धडकी भरवणारे टीव्ही स्क्रिन्स आणि वृत्तपत्रांचे मुखपृष्ठ.
सध्याच्या या परिस्थितीत पृथ्वी फिरायची थांबलीये, वैविध्यपूर्ण बातम्यांनी व्यापलेले टीव्ही
स्क्रिन्स अचानक कोरोनाच्या बातम्यांवर फ्रिझ झालेत की काय..असा भास झाल्याशिवाय राहत
नाही. आज सगळ्याच माध्यमातून जनतेला सांगितलं जातय, सतत आवाहन केलं जातय की
घराबाहेर पडू नका, घरातच थांबा. मात्र तरीही नागरीक न जुमानता इतरत्र भटकतांना,
गर्दी करताना दिसताहेत. खरं तर ज्या जनतेला संडास कुठे करावी हे टीव्ही
जाहिरातींमधून सांगावं लागतं, त्यांच्याकडून लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर न पडण्याची
भाबडी अपेक्षा करणंच व्यर्थ.
कोरोनासमान संकट ओढवल्याची ही पहिली घटना असली तरी काही दशकांपूर्वी आलेली
प्लेगची साथ आणि दुष्काळ अशा भयानक संकटांचा सामना जगासह भारतीयांनीही मोठ्या
धिराने केलाय. तेव्हा तर आता आहेत तशी प्रसार माध्यमे, सोशल मिडिया नव्हता.
जनजागृतीसाठी केवळ वृत्तपत्रे, दुरदर्शन आणि रेडिओ हीच
माध्यमे होती. त्यामुळे केवळ विश्वासार्ह माहितीच जनतेपर्यंत पोहचायची. बाकी..मौखिक
अफवांचं पेव
तेव्हाही फुटायचं मात्र
त्याची गती आताच्या सोशल मिडियाइतकी तुफान नव्हती. तरीही साऱ्यांनी मिळून अशा
विश्वव्यापी संकटांवर यशस्वी मात केली होती. अगदी त्याच प्रमाणे कोरोनावरही आपण मात
करू मात्र भविष्यातील आपली जीवनशैली
आतासारखी नसेल कदाचित. कोरोनापासून बचावात्मक सुरक्षाकवच म्हणून आपल्या जगण्यात
अनेक बदल झालेले असतील. भेटल्यावर एकमेकांना आलिंगण देणे, मायेने चेहऱ्यावरून हात फिरवणे,
हस्तांदोलन करणे या सगळ्या पद्धती ईतिहासजमा झालेल्या असतील. त्याऐवजी भेटल्यावर केवळ
लांबून नमस्कार करणे हीच सोशल डिस्टेन्सिंगची पद्धत पाळावी लागेल. स्पर्शातून केवळ प्रेमाचा
प्रसार
होतो ही भावना भयावह वाटू लागेल.
ऑफिसच्या कामामुळे घरच्यांसाठी वेळच मिळत नाही म्हणणारे आता घरच्या गोंगाटामुळे कामासाठी
एकाग्रता मिळत नाही अशा तक्रारी करू लागतील कदाचित..
शहरी भागात सकाळी उठल्यापासून ते नीज येईपर्यंत पक्षांचा
किलबिलाट ही खरी तर अपूर्वाई.मात्र हा आनंद लुटतांना प्रत्येकाच्या मनाला एक धाकधूक
लागलेली
आहेच. खिडकीतून डोकावत
बाहेर प्रदुषणविरहीत निळंशार आभाळ बघतांना मनातल्यामनात एका अनाहुत भितीचे काळे
ढग दाटून आल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की काही काळानंतर एकदा का
सारं काही पूर्ववत झालं की किलबिलाट आणि निळ्या आभाळाचा आनंद विरून जाईल
आणि सर्वांना
तेच हव आहे.
प्रशासन, डॉक्टर, पोलीस जिवाची पर्वा न करता जनतेसाठी झटत आहेत. प्रत्येकाचा दृढ विश्वास
आहे की..
.शक्य तितक्या लवकर ही परिस्थिती बदलेल आणि कोरोनासारख्या अजात शत्रूशी सुरू असलेलं
युद्ध आपण जिंकलेलं असेल.
धन्यवाद !
*****
नितीन माधव, मुक्त पत्रकार, बोरिवली, मुंबई
9869782706
परिचय : नितीन माधव,
चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई
सुरुवातीला दैनिक लोकसत्ता मधून ‘अभयारण्ये’ मालिका लेखन. पुढे
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर अँकर तर टीव्ही 9 मराठी मध्ये बुलेटीन प्रोड्यूसर अशा जबाबदार्या.
शिवाय आकाशवाणी मुंबईच्या 107.1Mhz ‘एफएम रेनबो’ रेडिओ वाहिनीवर रेडियो जॉकी म्हणून
जबाबदारी.
भावगीते, कवी कट्टा, राजकीय सभा अशा मंचीय कार्यक्रमांच सूत्रसंचालन.
कविता लेखन आणि कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्या कवितांच साभिनय सादरीकरण.