महावीर जोंधळे:सत्वशील जगण्याचा पाठपुरावा!- डॉ.जगदीश कदम
महावीर (भाई ) जोंधळे
(आज महावीर जोंधळे उर्फ भाई यांचा वाढदिवस .त्याचे औचित्य साधून नांदेडचे प्रख्यात साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांनी ही भावना काव्यात्म शैलीत व्यक्त केली आहे.-संपादक,साहित्याक्षर.)
महावीर जोंधळे:सत्वशील जगण्याचा पाठपुरावा!
🎍🎍🎍
महावीर जोंधळे उर्फ महावीर भाई आता सत्तर वर्षांचे झाले.पाहता पाहता आड्यावर बसलेल्या चिमणीसारखा सगळा भूतकाळ भुर्कन उडून गेला.
भाईंचा भुईशी चिकटून असलेला प्रवास दिसायला लागला लख्ख.तीसेक वर्षांपासूनचा भाईंशी असलेला मैत्रभावही झाला ताजातवाना.
भाई हे मराठवाड्याच्या मातीतल्या पत्रकारितेची आब राखून असलेलं नाव.
अनंत भालेराव, बाबा दळवी या भूमिकानिष्ठ नायकांच्या सहवासातून पत्रकारिता कशी करावी याचे गिरवले धडे.जे लोक असतात मनापिंडानं धड त्यांनीच उचलावी पत्रकारितेची पालखी.नसतेच ही पालखी पोटोबाच्या पूजेची.सगळ्यात मोठा माणसाचा कस नांदायला येत असतो याच पालखीत.गोरगरिब,मोडक्या-तोडक्या,लुळ्या-पांगळ्या,
आंधळ्या-खुळ्या माणसाचा कळवळा गाठीला बांधून चालावं लागतं तिला आपल्या पायानी.नसतेच ही पालखी पितापूत्र अथवा गै-यागबाळ्या गणगोताला उजळून काढणारी कायाकल्प कांडी.कळायला हवं हे सारं.त्यानंच उतरावं पत्रकारितेच्या घनगर्द बारवेत.आणि शेंदत जावी बारव आपल्या नेकदार पोह-यानं.लांडी-लबाडीनं टिकत नसतो पत्रकारितेचा संसार.साटंलोटं करून नाही सरत तिचं दुखणं.नाहीच होत तडजोडीनं आजारमुक्त.तिला हवा असतो इमानदार हात.नसते गरज दहा बोटांची.लागतात दोनच.पण सर्वपरी सुरक्षीत.मालकाच्या धाकाखाली पत्रकारिता होते खूपदा घामाघूम.थरकापते उदराकडं पाहून जराशी.हाच क्षण असतो पत्रकाराच्या कसोटीचा.ही कसोटी ज्याला करता येते पार तोच खरा पत्रकार.बाकी अधिस्विकृती वगैरे हे सगळे असतात वरपांगी बेगड.कणा कणखर हीच असते खरी पावती.
ज्याला विकत घेता येतं वेळोवेळी व्यवस्थेचं वैर तोच ठरतो पत्रकारितेचा पहारेदार.बाकी मायबाप जनतेच्या टिंगलटवाळीचे हक्कदार!
*
उमेदवारीच्या दिवसांत महावीर भाईंवर झालेले हे संस्कार नाही झाले टाकावू विद्यमान क्षणापर्यंत.म्हणून पत्रकार भाई राहिले निर्मळ,निरामय.त्यात सेवा दलाचे संस्कार.साठेबाज लोकांवर वचक ठेवून जगण्याची ठामेठोक भूमिका.ही भूमिका भाईंना दैनिक ‘मराठवाड्या’तून करता आली प्रशस्त.अनंतरावाची मुक्त मुभा हे त्याचं नेमकं कारण.अशी मुभा नाहीच येत हल्ली पत्रकारांच्या पेनीसाठी स्वतःचे टोक घेऊन.आपल्या पेनाची टोकं मोडून रचावे लागतात अग्रलेखही मालकाच्या मर्जीनुसार.
दुःख याचं अतीव की भलेभलेही सुटत नाहीत या मोहपाशातून.पेन की पोट या पेचात घुटमळत राहतात कैक दिवस शेंबडात माशी अडकून पडावी तसे.त्यातूनच जन्माला येते नादान पत्रकारिता.जिला लाचारीचं रवंथ करणंही करून घ्यावं लागतं गोड.
*
या पार्श्वभूमीवर महावीर भाईंची कारकीर्द राहिली खूप म्हणजे खूपच उजळ. ‘मराठवाडा’ दैनिकांतून नव्यानं लिहित्या हातांना दाखवता आला दखलदार दरवाजा.आज जी नावं दिसतात साहित्याच्या प्रांतात टाळसार.ती इथंच पहिल्यांदा नोंदवून गेली नाव.पुढं बाबा दळवींच्या आग्रहाखातर ‘लोकमत’ला आले भाई.खूप दमदार पुरवणी येऊ लागली ‘अक्षररंग’ नावानी.भाई हा चांगुलपणावर प्रेम करणारा माणूस.कसलंही करप्शन न मानवणारा.माणूस हा आतूनबाहेरून असलाच पाहिजे सहज स्वच्छ.जसं लिहितो तसं जगण्याची कसोशी असायलाच हवी त्याच्याकडं.अशी माफक आशा ठेवणारा हा पत्रकार-संपादक.तिच त्याची भूमिका.
भवताल भयभीत अथवा भानगडबाज करून भौतिक बांधाबांध करणं या गड्याला कधीच नाही जमलं.वर्तमानपत्राचा मालक भलत्याच ठिकाणी नाक खुपसत असेल आणि उत्तम पत्रकारितेला पायदळी तुडवू पाहात असेल तर त्याचा पाळीव नोकर होणं या माणसाला कोणत्याही परिस्थितीत नव्हतंच पचणारं.टिचभर कोरा कागद अन् दिमखदार सही एवढं भांडवल घेऊन पडला बाहेर.इथून
बाहेर पडताना जे रामायण घडलं ते मांडलंच आहे भाईंनी सविस्तर.पहिलं पान नको आभासी जगातल्या अर्धनग्न नटीसाठी.नकोच तिथं नाटकी नखरे.उजळून निघेल सामान्याचं जगणं असा प्रकाशपुंजका असावा प्रथम दर्शनी.हा आग्रह मोडीत काढणा-या काळाशी भाईंचं जुळणार कसं.घुसमट पचवण्यापेक्षा बाहेर पडणं बेहत्तर.हा विचार भाईंनी बांधला बहुतेक आणि पडले बाहेर.
*
ही झाली भाईंच्या पत्रकारितेची गोष्ट.भाई हे मुळात मोठे ललित लेखक.ललितबंध कसा असावा ते शिकावं महावीर भाईंच्या लेखणीकडूनच.भाईंचं लिखाण प्रायः ललितगद्यात्मक.ललित लेखक हा स्वतःल रचत जातो,बांधत जातो.विटामातीचं बांधकाम करावं तसं असतं बांधकाम.लेखक असतो आत आणि करत असतो स्वतः भोवती
वस्रासारखं विणकाम.भाईंची बहुतेक ग्रंथ संपदा आली याच अंगानी.नाल नसलेला घोडा,हिरवे ढग,हिरव्या डहाळ्या आणि करवंदी आभाळ,रससिध्दांताचा प्रदेश,तळ भोवरा,सातुचं पीठ,साळुंकीची सावली,पावसाचे पाय अशी पुस्तकं देतात त्याची साक्ष.बालकांसाठी काही लिहिणं आणि करणं हा महावीर भाईंचा निजीध्यास राहिलेला.खंड्या आणि कावळा,शिवाची वाडी अशी पुस्तकं बालकुमार वाचकांची भूक भागवतात जरूर.बालकुमार वाचकांसाठी लिहायला हवं असं आजही त्यांना वाटतं.किशोरचं काम केलं त्यांनी.खरं तर अशी गुणी माणसं मानवतच नाहीत मस्तवाल मामलेदारांना.व्यवस्थाही पाणी भरते अशाच मामलेदारांच्या अंगणात.महावीर भाई,माधव राजगुरू यांच्यासारखी सच्ची माणसं मोजता येतील बोटावर इतकी स्वल्प.पण त्यांनाही व्यवस्थेनं ढकलावं ‘ढ’ च्या ढाच्यात.याच्यापेक्षा संताप आणणारी कोणती दुजी गोष्ट!भाईंनीच काढावा कळकळीच्या कल्पकतेनं ‘पर्ण’ सारखा दिमाखदार अंक!
*
आठवतं मला पंचवीस वर्षांपूर्वी आम्हाला दिला आदेश भाईंनी.बहुधा भारतभूषण गायकवाड यांचा असावा तगादा.भाईंनी केला निरोप.’जगदीश,नायगावला बालकुमार साहित्य संमेलन घ्यायचंय.लक्ष घालावं लागेल’. मानला आम्ही भाईंचा आदेश शिरसावंद्य.नारायण शिंदे,सुरेश सावंत,दत्ता डांगे वगैरे मित्रमंडळींनी हे संमेलन घेतलं दिमाखात.बाबा भांड तर जाम खूष.बालकुमार साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी भाईंचे योगदान मोठेच.इंदुमती जोंधळे यांच्या ‘बिनपटाच्या चौकटी’तून भाईंच्या जगण्याचं सूत्र साररूपानं आलं.सर्वदूर चर्चा घडली या आत्मकथनाची.न पाहिलेल्या आयुष्याचा पट उभा राहिला भाईंच्या.याच कथनातून.मुळातूनच वाचावं असं हे.पुढं भाईंनीही लिहिलं ‘त्रिकाल संध्या’.
महावीर भाईंनी औरंगाबाद सोडलं.
पुण्यात स्थायीक झाले.’प्रभात’ मध्ये राहिले.तिथंही सानेगुरुजींच्या परोपकाराचा पायंडा पालथा घातला.’कवितेवरच पोट भरायचं कसं रे प्रकाश’असं बोललेच नाही नुसतं.प्रकाश घोडके या कलंदर कवीला काळोखातून काढण्याचा कलदार यत्नही केला.प्रभात मध्ये असताना एस.पी.च्या पाठीमागे असलेल्या सदनिकेत आणि पुढे कोथरूड परिसरातील फ्लॅट मध्येही आम्ही गेलो भाईंना भेटायला एक दोनदा.पुण्यात गेले आणि बदलले ते भाई कसले.’घेणार का?’ही पुण्याला बदनाम करणारी आदरातिथ्याची भाषा नाहीच आली ओठावर.स्वतःच गॅसवर चहा केला.चारदोन नवीन पुस्तकं आवर्जून आमच्या बॅगेत घातली.परत आमच्या सोबत चौकात येऊन पुण्याचा प्रसिद्ध चिवडाही बॅगेत कोंबला.भाईसोबत जेवण करणंही आनंददायी.ज्वारीची भाकरी,पिठलं,दही,ठेसा असलं जेवण.त्यासाठी स्वारगेटजवळचं हाॅटेल हमखास.भाईंनी मुक्त पत्रकार म्हणून भरपूर भ्रमंती केली.अख्खा कर्नाटक, आंध्र आणि सिमेलगतचा परिसर पायाखाली घातला.अनुभवांची इतकी दांडगी समृध्दी नाहीच सापडणार अन्य कोणाकडे.
चरितार्थ चालवायचा कसा ह्या प्रश्नाने भाई व्याकुळ झाले असंही नाहीच दिसलं कधी.मुलगी विदेशात.इंदुताईंचं पेन्शन.तरीही तक्रारीला तसूभरही जागा नाही.अत्यंत साधी राहणी.पुन्हा तेही संस्कार सेवादलाचेच.निराळं खाणपिण नाही.नको त्या सवय नाहीत.
*
भाई हा दोन पिढ्यांना जोडणारा मजबूत दुआ.सत्वशील जगण्याचा वस्तुपाठ.नि पाठपुरावाही.ही सत्वशीलता नाहीच उणी आणि उसणी.तिच्या जोडीला शिगोशिग संवेदना.याच संवेदनेचं ताजं उदाहरण.कणकवलीला ‘बैल अ-बोलबाला’ या नाट्याचा प्रयोग.भाईचा सातारचा विद्यार्थी राजीव मुळ्ये याच्या अथक परिश्रमातून साकारलेला.अत्यंत नावीन्यपूर्ण.कवी अजय कांडर यांच्या पुढाकारानं योजिलेला.भाईंनी पाहिला.केवळ डोळ्यांनीच नाही.मनातून..मनापासून..मग दादही तशीच..दहा हजाराचं बक्षीस दिलं..प्रयोग पाहाताक्षणी..भाईंचे हे दहा हजार लाखमोलाचेच!मिळालेल्या मानधनाचे.पै पै साठवून ठेवलेले.वाढदिवसासाठीचे..!
म्हणू नये अशा कृतीला उधळमाधळ.म्हणू नये वेडाचारही.हेच असतं ख-या अर्थानं सत्पात्री दान वगैरे!
तर सांगत हे होतो महावीर भाई गेले आता सत्तरीत.त्याचं निमित्त साधून पुण्यनगरीतील मैत्रभाव जपणा-या भाईंच्या गणगोतानं केला त्यांचा सत्कार.पुणेरी पगडी वगैरे डोक्यावर ठेवून.
आम्ही आहोत खूप दूर.तरीही भाईंच्या भक्कम जवळ.
आम्हाला लिहितं करणा-या भाईंचा हा पायप्रवास पुढे सुखरूप व्हावा,याच सदिच्छेसह!
– डॉ.जगदीश कदम
**********
डॉ.जगदीश कदम
परिचय
जन्म:रूई ता.हदगाव जि.नांदेड
निवास:अक्षर,भाग्यनगर-वर्कशाप रस्ता कैलासनगर,नांदेड-४३१६०५
संपर्क: भ्र.९४२२८७१४३२
जन्म ता.दि.१७जून १९५३
शिक्षण:एम.ए.बी.एड.डी.एच.ई.पीएच.डी.नेट
नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त.
कथा,कविता, कादंबरी,नाटक,समीक्षा इ.साहित्य प्रकारांत लेखन.
कवितासंग्रह: १)रास आणि गोंडर२)झाडमाती३)नामदेव शेतकरी,४)गाव हाकेच्या अंतरावर.
कथासंग्रह: १)मुडदे२)आखर३)मुक्कामाला फुटले पाय.
कादंबरी:१) गाडा.
नाटक: १)बुडत्याचे पाय खोलात२)वडगाव लाईव्ह
समीक्षा:१) साहित्य:आकलन आणि आस्वाद
चरित्र:म.ज्योतिबा फुले
संपादन:१)जगदीश कदम: व्यक्ती आणि वाड्मय, संपादक-डॉ.संजीवकुमार पांचाळ
२) जगदीश कदम यांची कविता, लेखक- डॉ.शिवसांब कापसे
३) नामदेव शेतकरी: एक अभ्यास ,प्रा.हेमचंद्र हडसनकर
‘बुडत्याचे पाय खोलात’ नाटकाचा कन्नड आणि हिंदी मध्ये अनुवाद
पुरस्कार – महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार-१९९८ आणि १९९९ सलग दोनदा.
विशाखा प्रथम काव्य पुरस्कार,नाशिक १९९९
भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,कोपरगाव१९९९
ऊर्मी साहित्य पुरस्कार,जालना २००९
जि.प.नांदेडचा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार २००९
प्रसाद बन साहित्य पुरस्कार २०१५
दर्पण साहित्यिक-पत्रकार पुरस्कार २०१७
दै.लोकमत (सर्व आवृत्ती) गांधीजींवर दैनिक सदर दि.१जाने.ते ३१ जाने.२०२०
साहित्याक्षरच्या वतीने आयोजित चांदबीबी काव्य महोत्सवात भाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .