शरद पाटलांची क्रांतिकारक कमिटमेंट : राजकुमार घोगरे
शरद पाटलांची क्रांतिकारक कमिटमेंट
शपांचा चौथा खंड Primitive Communism, Matriarchy-Gynocracy and Modern Socialism ने भारतीय अॅकेडमिशियन्सवर ज्याप्रमाणात प्रभाव टाकला त्यापेक्षा अधिक प्रभाव आंतरराष्ट्रीय बुद्धिजीवीवर टाकला. त्या ग्रंथाच्या प्रचारात मोठा वाटा ‘वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीज’चा होता. त्यांनी त्यावरील अभ्यासासह त्याचा समावेश स्वित्झर्लंडच्या त्यांच्या मॅट्रिआर्काइव्हमध्ये करण्याची इच्छा व्यक्त करणे महत्वपूर्ण ठरले.
वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीजच्या जगभर पसरलेल्या नेटवर्कमध्ये तो ग्रंथ चर्चेचा विषय बनला होता. इटलीच्या त्यांच्या प्रतिनिधी, गिफ्ट इकाॅनाॅमीच्या प्रवर्तक जिनिव्हा वाॅन यांनीही ग्रंथाचे कौतूक केले. त्यांच्या द.आफ्रिकेच्या प्रतिनिधी बेरनडीथ मुथियन या आफ्रिका, आशिया खंडाच्या कन्व्हेनर आहेत. त्यांनी त्यांच्या जगभरच्या प्रतिनिधीच्या गॅदरिंगमध्ये म्हणजेच ‘वर्ल्ड मॅट्रिआर्कल काँग्रेस’मध्ये काॅ. शरद पाटील, काॅ. नजूबाई गावित यांनी लेक्चरस डिलिव्हर करण्याविषयी इच्छा व्यक्त केली. परंतू आंतरराष्ट्रीय प्रवास व त्याचे सोपस्कर, त्यामध्ये वाया जाणारा पैसा, वेळ यामुळे जेव्हा-जेव्हा हा प्रस्ताव शपापुढे ठेवला त्यांनी त्याला नकाराच दिला.
शेवटी भारतात, शिलाँगला होऊ घातलेल्या त्यांच्या ‘आंतरराष्ट्रीय पिस कान्फरन्स’मध्ये तरी काॅ.शरद पाटील व काॅ नजूबाई गवित यांनी पार्टिसिपेट व्हावे, अशी इच्छा व्यक्त करणारे इमेल आलेच. बेरेनडिथ मुथियान खूप उत्सुक होत्या की काॅ.शरद पाटील व काॅ नजूबाई गवित यांनी त्यांचे मातृसत्ताक व स्त्रिसत्ताक समाजावरील दृष्टिकोन त्यांच्या प्रतिनिधी बरोबर शिलाँग काॅन्फरन्समध्येतरी शेअर करावेत. मी त्यांना मेल करुन सांगितले हा प्रस्ताव मी काॅ. शरद पाटील यांच्यासमोर ठेवला आहे. मला दोनतीन दिवस द्या. मी त्यांचे उत्तर आपल्याला कळवितो.
बेरेनडिथ मुथियान या स्वतः स्त्रि शोषण-पीडनाशी संबंधित एका संघटनेच्या प्रमुखही आहेत. त्यांचे यावरील लिखाण द.आफ्रिकन पाॅलीसी मेकरसाठी मार्गदर्शक ठरते. त्यांचा Ova नावाचा स्त्रीच्या प्रश्नांना सामावणारा काव्यसंग्रहही जगभर खूप प्रशंसनीय ठरला आहे.
काॅ. शरद पाटील व नजूबाई गावितांच्या शिलाँगमधल्या पिस काॅन्फरन्सला स्वीकृती मिळविण्यासाठी बेरेनडिथ मुथियान उत्सुक होत्या. त्याचे कारण, शपांची नवी मांडणी, ‘केवळ मातृसत्ता वा मातृवंशक समाजमूल्ये जगभरामध्ये शोषणपीडनाला नष्ट करुन शांतता नांदवतील ही रोमँटिक कल्पना आहे. त्याच्या पलिकडे जाऊन पाहिले तर, मातृसत्ताक व स्त्रिसत्ताक समाज ही दोन सामाजिक स्थित्यंतरे आहेत, पृथक समाज आहेत. मातृसत्ताक समाजाचे स्त्रिसत्ताक समाजामध्ये जोपर्यंत स्थित्यंतर होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य, समता, मित्रता या मूल्यत्रयी हाताशी लागत नाहीत.’
त्यांनी मला शिलाँगचे प्राध्यापक लेबान सिर्तो यांचा फोन नंबर दिला. लेबानही खूप उत्सुक होते की त्यांनी या काॅन्फरन्ससाठी सहभागी व्हावे म्हणून. सतत फोन करुन ते संपर्कात राहत.
आता, वर्ल्ड मॅट्रिआर्कल स्टडीजचे, शपाविषयी हे अगत्य, हि उत्सुकता केव्हा बनलीय; तर,
या चौथ्या खंडात त्यांच्या ४०-४२ रिसर्च पेपरसना शपांनी अक्षरश: खोडून काढल्यानंतरही. विरोधकांच्या दृष्टिकोनाविषयी ही उदारता, त्याच्या वादविवादाला अवकाश मिळवून द्यायचा त्यांचा प्रयास सर्वच काही संशोधनासाठी पोषक असा दृष्टिकोन होता त्यांचा.
या खंडाच्या प्रकाशन समारंभानंतर शिलाँग काॅन्फरन्सला जाण्याविषयी शपांना विचारले. शपा म्हणाले, ‘प्रकाशन समारंभाचा खर्च झालेला आहे. परत खर्च नको. वेळही खूप वाया जाईल. तेवढ्या खर्चात आणि वेळेत आपली कार्यकर्त्यांसाठी एक-दोन शिबिरे होऊन जातील. आणि चौथा खंड मराठीत येण्याची लोक वाट पाहतायेत. ते सर्वात महत्वाचे कार्य सोडून मी त्या आंतरराष्ट्रीय पीस काॅन्फरन्साला जाऊ इच्छित नाही.’
आपल्या क्रांतिकारक कार्याविषयी प्रचंड कमिटमेंट असणारे, विद्वतेच्या भूलीमध्ये तरंगत राहण्यापेक्षा, सर्वहारा अंगी क्रांतिकारकत्व निर्माण होण्यासाठी स्वत:ला ज्ञाननिर्मितीमध्ये अक्षरश: गाढून घेणारे, शपा होते ते.
शपा! तुमच्याविषयी नेहमीच अभिमान बाळगू.
— राजकुमार घोगरे +919890839838