पुस्तकांच्या कविता : जनार्दन देवरे
(आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त या पुस्तकांच्या वेगळ्या,नव्या कविता )
जागतिक पुस्तक दिन वगैरे……… (उत्तरार्ध)
-१-
पुस्तके खुणावताहेत…
मला,तुम्हाला,सर्वांना-
आपले जगण्याच्या बेडीत अडकलेले पाय मात्र वळत नाहीत तिकडे….
पुष्कळदा खिशास घालूनही साकडे…
पुस्तकांपर्यत पोहचतच नाही व्यवहारी मन तोकडे..!
-२-
काचेच्या कपाटात सजलेली,
वाचनालयांपर्यंत पोहचलेली पुस्तके वाट पाहताहेत जिवंत स्पर्शाची …
कोणीतरी पाने चाळत राहण्याची…
म्हणून तर,
सारखी खुणावताहेत पुस्तके –
-३-
प्रकाशकाच्या दारात आणि गोदामात असलेली पुस्तके तर पार खचूनच गेलीत…
ते खुणावताहेत कुणाला तरी ….
हे कुणाच्या गावीही नाहीये –
लेखकाच्या कित्येक रात्रींचं जागरण आणि वंचनेच ओलेपण अनुभवलेली पुस्तके खुणावताहेत आपल्याला मनापासून..
– ४-
घरात केवळ दिखाव्यासाठी आणलेली अन बुकशेल्फमध्ये सजवलेली पुस्तके तर आतूनच कोसळलीत…
पण वरुन कोरेच्या कोरे !
घरमालकासारखे…!
वाचन संस्कृतीच्या पोचट
आरत्यांनी वैतागलेली पुस्तके
तरीही खुणावत राहतात
मागचे सारे अपमान माफ करीत….,
एखाद्या जीवलग ,खेळकर मित्रासारखे….!
-५-
लेखकाने स्वखर्चाने काढलेली
किंवा प्रकाशकाने सशुल्क नफा काढीत प्रकाशित केलेली
अन लेखकाच्या घरी आणून टाकलेली
गठ्ठेबंद पुस्तकेही
अद्याप लेखकाच्याच घरात पडून….!
घरच्यांना नाहक अडचण ठरलेली हि पुस्तके
स्टाॕलवाल्यांनी मागितले होते
बराच भाव पाडून..
(सत्तर टक्के आम्हाला अन तीस टक्के तुम्हाला अशी अट घालून..!)
लेखक काही बधला नाही
पुस्तकांचा वनवासही संपला नाही..
म्हणून राहून राहून खुणावताहेत पुस्तके
पण
व्यवहार काही जमत नाही…
लेखकही मनावर घेत नाही…!
तरीहि पुस्तके खुणावताहेत नवनवीन लिहणा-यांना..!
वाचून,नेमक ते नव्यान मांडायला….
-६-
अर्ध्याहून अधिक पुस्तके आपल्या साहित्यिक मित्रांना वाटूनही उरलेल्या पुस्तकांच काय होत असेल…. ?
नवलेखक त्याच दुःख कुठे मांडत असेल ?
यावरच एक पुस्तक लिहायला हव कुणीतरी
असही आता पुस्तकांना वाटू लागलयं ….,
म्हणून तर ते खुणावत नसतील आपल्याला…?
-७-
पुरस्कारासाठी पाठवलेली हजारो पुस्तकेही आता आयोजकांच्या घरच्या पोटमाळ्यावर निपचित पडलीत…!
हजार-पाचशेंसोबत मानपत्र
अन,
फोटोसहित आलेल्या बातमीशिवाय त्यांना काहीच भेटल नाही…!
आपल्या पुस्तकाबददल लेखकाने लिहून घेतल अनेकांकडून…
प्रस्थापित ,कंपूबाज वगैरेनांही पाहिल जरा हलवून…
पण वाहून गेल पाणी
गच्च भरल्या घड्यावरून.
समाज माध्यमांच्या रंगबेरंगी वाॕलवरून….!
– ८-
समीक्षकांनी अद्याप ढूंकूनही न पाहिलेली पुस्तके तर पार भ्रमिष्टासारखीच वागू लागलीत म्हणे हल्ली….
राहून राहून त्यांना होतय गरगरल्यासारखं….!
भंगारात पडलेल्या रद्दीसारखं !
तरीही खुणावत राहतात पुस्तके
लाडिवाळ, अजाण बालकासारखे…!
– ९-
जागतिक पुस्तकदिन वगैरे
ठीकच आहे पण,
उदंड सोहळ्यातला एक सोहळा ;
चारचौघांचा झकपक मेळा..
सायंकाळी चोळामोळा.!
दुस-या दिवशी कुलूप कपाटाला…!
याच वाईट वाटतय पुस्तकांना….!
अनेकांना स्वावलंबी बनवणारी पुस्तके
परावलंबीच ठरतात अखेर….!
वाचल तर कळत मूल्य
नाहीतर पानोपानी शल्यच शल्य…!,
तरीही पुस्तके खुणावत राहतात….!
संधीच सोन करायला सांगतात ..!
– १०-
धीर देणारी, दुःख शाकारणारी,
जगण्याच अन जगवण्याच भान देणारी,
शब्दांतून फूंकर घेऊन येणारी,
जगणं हलक करणारी
सारीच पुस्तके खुणावताहेत आता…!
एकांतात जाता- जाता..!
***********************************
–जनार्दन देवरे,मनमाड
[दि. २३/०४/२०२० ]
संपूर्ण नाव –
जनार्दन विठ्ठलराव देवरे.
▪पत्ता -बी-१, आय.यु.डि.पी,,मनमाड ,ता.नांदगाव ,जि.नासिक -४२३१०४
▪भ्रमणध्वनी -९३२६६६७५८०
▪प्रकाशित साहित्त्य –
*इंद्रधनू ( बालकथा)-१९९८ व २००५ (द्वितीय आवृत्ती)
*अंतर्दाह (काव्यसंग्रह)-२००४
*गाणी ! शाळेतली …गळ्यातली ,,!(२००१) –संपादन
* आनंदाने गाऊ या !(बालकविता)-२०१७
* ▪आकाशवाणी जळगावच्या अनेक नभोनाट्यात/ श्रुतिकेत नाट्यकलावंत म्हणून सहभाग.
*▪अहिराणी तील पहिल्या “ढोल” नामक त्रैमासिकात लेखन.
*▪ ‘शब्दांनी प्रकाश द्यावा..,!’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन व सादरीकरण (८० प्रयोग)
*▪अनेक साहित्य पुरस्कार व वाडृःमयीन नियतकालिकात कथा / काव्यलेखन.
*▪आकाशवाणी ,जळगाव, मुंबई व नाशिक केंद्रावर काव्यवाचन.
* ▪सध्याचा व्यवसाय –
पदवीधर प्राथमिक शिक्षक .,जि.प.नाशिक.
*▪e-mail —
janardandevre33 @gmail.com