2020 एप्रिल

पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता : डॉ.जगदीश कदम

सा हि त्या क्ष र 

(ब्लॉगवरील लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच,असे नाही-संपादक,साहित्याक्षर ) 

 पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता: डॉ.जगदीश कदम

    सुनील यावलीकर हे चित्रकार म्हणून  विख्यात आहेत.माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अवतीभोवती जगण्याचा पसारा मांडणा-या रेषाकृती ही त्यांच्या रेखाचित्रांची खाशियत राहिलेली आहे, असे त्यांच्या चित्रांविषयीचे आमचे निरीक्षण आहे.या मुळात चित्रकार असलेल्या कवीची कविता सुध्दा हाच आशय गाभा अग्रस्थानी ठेवणारी आहे.माणूस आणि त्याच्या इतस्ततः विस्कटून पडलेल्या जगण्याचे सारसंदर्भ नेमकेपणाने अधोरेखित करणारी ही कविता आहे. यावलीकरांच्या अलीकडेच आलेल्या ‘पीळ’ या कवितासंग्रहातून ही कविता ठळकपणे आलेली आहे.आशयाला  पोखरत करणारी अभंग कळा हे या कवितेचे नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे.

    अभंग हा प्रकार संतांनी वापरला म्हणून शिळा होत नसतो,याचे ठाम भान कवीकडे आहे.म्हणूनच हा प्रकार योजताना कवीला न्यूनतेची नांगी नमवू शकत नाही.अभंग हा प्रकार तसा वाटतो तितका सोपा नाही.अक्षरांना आशयाशी बांधून घेताना कधी कधी कवीचा कारागीर होण्याची शक्यता असते.ही शक्यता या कवितेतील कुठल्याच कडव्यात जाणवत नाही.लयीचा स्वाभाविक पदर धरून आशयाची आवर्तनं घट्ट करणारी ही कविता आहे.गेयतेची ग्वाही देऊ गप्प करणे एवढेच या प्रकाराचे प्रमेय नाही.सूचकता आणि शब्दांचा समतोल ही या रचना प्रकाराची खरी कसोटी असते;आणि या कसोटीवर यावलीकरांची कविता तंतोतंत उतरते.

अष्टाक्षरी कवितेतून एक स्वतंत्र लय वाहत असते. त्या लयीचा एक घोटीवपणा असतो.तो कविता वाचताना रसिक,वाचक सतत अनुभवत असतो.आशयाला अधिक गच्च आणि मजबूत करण्यासाठी हा बंध खूप महत्त्वाचा ठरतो.या बंधातून आलेली कविता प्रवाहीपणाचे प्रत्यंतर  पटकन देते.कवी सुनील यावलीकर यांची ‘पीळ’ या कवितासंग्रहातून आलेली कविता याच धाटणीची आहे.

हा कवी समाजाचे निरीक्षण करता करता जेव्हा स्वत: मध्ये डोकावतो तेव्हा न सुटलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मेंदूतून झरझरत येतात.कवी स्वत:ला आरपार छिलत जातो.ज्याला असे छिलून घेता येते तोच कवितेच्या आसपास फिरकू शकतो.या दृष्टीने पाहिले तर यावलीकर हे कवितेला अमाप लगटून आहेत.म्हणून कवितेने आग्रहिलेला आशय आणि त्याला पूरक शब्दकळा याची वाणवा कवीला कधीच जाणवत नाही.

ज्याचा उभा जन्म वाकण्यात गेला,आतड्यांशिवाय ज्याच्यासमोर जगण्याचे निराळे तत्त्वज्ञान नाही असे जगणे फोलपटा पेक्षा वेगळे नसते. ते जगणे हा कवीच्या चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. कवी  अस्वस्थ होतो तो याच कारणापायी.कोणाला भजावे,कुठे नतमस्तक व्हावे हे न कळण्यासारखा आजचा भेसूर नि विद्रुप काळ आहे. या काळाच्या पार्श्वभूमीवर 

‘कोणतीच पोथी

नको डोक्यावर

कंठातला सूर

मुक्त होवो’

कुठलीच वस्ती,कुठलाच गाव

हा मायेनं वेढलेला दिसत नाही.जेथे तेथे स्वार्थ,मतलब आणि लुबाडणूक याशिवाय दुसरे काही दिसत नाही.आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती मावळली आहे.हे चित्र सर्वदूर आहे.

त्यामुळे आतली अस्वस्थता अतोनात पीळ घेऊन येते.

‘आतडे हे देती

दिवसाला पीळ

सातातला तीळ

हरवला’

एक तीळ सात जण वाटून खाणारा एक काळ होता.या काळाची तीव्र आठवण ही कवीच्या मनातील वर्तमानाविषयीची उग्र प्रतिक्रिया आहे.अत्यंत संयतपणे ही प्रतिक्रिया कवी नोंदवतो.

गावाच्या रोखाने धावत येणारे रस्ते सुध्दा सही सलामत राहिले नाहीत.तेही तेवढेच निबर बनलेले आहेत.

कापुनिया नेली

ओली गट्ट छाया

सडकेची माया

हरवली’

पूर्वी पांद असायची. रस्त्याच्या कडेला गर्द झाडी असायची.चालताना वाटसरूला त्रास होऊ नये याची काळजी घेणारे रस्ते आज असे बेपर्वा,बेदरकार बनले आहेत,याचे शल्य कवीला बोचत राहते.

इथे कशाचा पायपोस कशाला राहिला नाही.तोंडचोपडेपणा हा इथला आचार बनलेला आहे.व्यवहाराच्या पलीकडे जाऊन माणसाचा शोध घेण्याची वृत्ती लयाला गेली आहे.असा ढिसाळ वर्तमान आजूबाजूला पेटलेला आहे.ज्याच्या पुढे माथा टेकवावा,भक्ती प्रकट करावी अशा जागा सुध्दा सुमार आणि खुज्या झालेल्या आहेत.

‘देवळी सांडता

योनीतले रक्त

चटावले भक्त

चाटावया’

अशा शब्दांत ही कविता वर्तमानाचे जळजळीत वाभाडे काढते.इथे थेट तुकारामाशी आपले नाते असल्याची ग्वाही ही कविता देऊन जाते. 

स्त्रीच्या दु:खाची अनेक पदरी वीण या कवितेतून जागोजाग आलेली आहे.अनंत काळापासून ओझे वाहत आलेली आणि नशिबाला दोष देत कण्हत कुढत जगणारी स्री आता मोकळ्या श्वासास आतूर झालेली आहे.तिचे हे आतुरलेपण अधिक भक्कम व्हावे आणि ती स्वत:च्या मार्गाने मार्गस्थ व्हावी,हा कवी मनाचा ध्यास आहे.

‘पूस बाई आता

मस्तकीचा टिळा

स्वत:वर खिळा

ठोकू नको’

कवी यावलीकर हे आपल्या कवितेत ज्या प्रतिमा,प्रतीकांचे उपयोजन करतात ते अफलातून आहे. या प्रतिमा परंपरेने चालत आलेल्या आणि जगण्यातील सत्त्व हिरावून घेणा-या कालबाह्य बाबींना अचूकपणे पकडतात.कवीचे कालोचित भान ही या कवितेची वेगळी ओळख आहे.

जात,धर्म,पंथ यात विभागला  गेलेला माणूस ही कवीसाठी सर्वात चिंतेची बाब आहे.या गोष्टींचा उन्माद माणसाचे कळप तयार करतो;आणि कळपातली माणसं कुठल्याच कसोटीवर करुणेचा स्वर उजागर करीत नाहीत.त्यांच्यातील हिंस्रता हीच त्यांची ताकद असते.त्यामुळे आपोआपच भवताल भीतीयुक्त होते.

माणसाचे जगणे हा खरे तर एक रेटा असतो.माणूस स्वत:च्या मर्जीनुसार कधीच जगत नाही.त्यामुळे सतत एक प्रकारचे अंतर्द्वंद्व मनात चाललेले असते.पुरुषार्थ सपक व्हावा इतके मामुली जगणे शिरावर घेऊन तो चालत असतो.अशा वेळी  कवी यावलीकर लिहून जातात,

‘लिंग कापुनिया

न व्हावे हिजडा

स्वत:शी झगडा

बरा नव्हे’

कवी यावलीकर यांच्या ‘पीळ’ या कवितासंग्रहातील कवितेत निसर्ग येतो.हा निसर्ग आशयाची गरज म्हणून येतो.त्यासाठी कवीला वेगळी उठाठेव करावी लागत नाही.

बीज,माती,पाणी, पाऊस,चंद्र,सूर्य,औतफाटा,बैल,बारदाणा ही कास्तकाराच्या जगण्याशी जखडून टाकलेली

जंत्री या कवितेत जरूर दिसते.परंतु तिची जागा कुठेही चुकत नाही.

‘बैल थांबले जागीच

डोळा घेऊन गा पाणी

हिरव्या पेरत्या हातांची

मातीमोल जीनगानी’

शेतक-यांची अवकळा बैलांना सुध्दा बघवत नाही.जात्याच्या खुंट्यासाठी पाचर सापडू नये इतका कंगाल काळ त्याच्या वाट्याला आला आहे.आयुष्य गहाण ठेवण्याची ठणक त्याला वेढून राहिली आहे.कास्तकार हा सर्वच बाजूंनी अडचणीत आलेला आहे.शेतीचा व्यवहार तोट्यात आलेला आहे.शेतात माल आला तर भाव नसतो.दलाल भाव पाडून घेतात.शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार त्याला नाही.

‘कसायाचे दोर

होताच गा सैल

वळूहळू पाहे

डोळ्यातला बैल’

समोर सर्व बाजूंनी मरण दिसत असताना जगण्याची धडपड थांबत नाही.प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या माणसाचे जगणे किती खडतर झालेले आहे,याचा उसवता स्वर या कवितेतून हिंडताना सतत जाणवत राहतो.

हा स्वर चित्रांकित करताना कवी लिहितो,

‘सारवली भिंत

चित्रांनी भाबडी

उकरोनी सारी

केली का नागडी’

अल्पाक्षरत्त्व ही या कवितेची खाशियत आहे.अघळपघळ असणे या कवितेला मानवत नाही.सूचकता ही या कवितेला गवसलेली गर्वाची गोष्ट आहे.भाषेचे स्वाभाविक प्रवाहीपण ही या कवितेची मोठी तालेवारी आहे.

अनाठायी कधीच कोणाची आरती न करणा-या जीवालाही जेरबंद होऊन जगावे लागते,ही कवीची खंत आहे.

सत्य आणि न्यायाचा सतत आग्रह धरणारी ही कविता कवीच्या खोल  चिंतनाची साक्ष देते.चित्रमयी भाषा सौष्ठव लाभलेली ही कविता कधी कधी अनपेक्षित शब्दांचे वार करते त्यामुळे वाचक काहीसा चक्रावून जातो. जाणिवेच्या नव्या दर्शनाने विस्मित होतो.खरे तर  या कवितेतील अभंग स्वरूप रचनेचा बंध घट्ट असल्यामुळे आशय कुठेही विस्कळीत होत नाही.ज्येष्ठ कवी

वसंत आबाजी डहाके प्रस्तावनेत लिहितात त्याप्रमाणे’आत्मपर आणि समाजपर अशा दोन्ही जाणिवा यावलीकरांच्या अभंगातून व्यक्त झालेल्या आहेत.’

 या कविता संग्रहात कवीने रेखाटलेली काही रेखाटने आलेली आहेत.ही रेखाटने लक्ष वेधून घेण्यापुरतीच हजेरी नोंदवतात.ती कवितेवर स्वार होत नाहीत की कवितेचा आशय गोचर करण्याचा आटापिटा करीत नाहीत.कवीवर्य विठ्ठल वाघ आणि श्रीपाद अपराजित यांचा मलपृष्ठ मजकूर कवितेविषयी उत्कंठा वाढविणारा आहे.

मीडिया वॉच पब्लिकेशनने कवी सुनील यावलीकर यांचा ‘पीळ’ हा कवितासंग्रह अत्यंत देखण्या स्वरुपात प्रकाशित केला आहे.या कवितासंग्रहाचे वाचक,रसिक उत्तम स्वागत करतील याविषयी शंका नाही.

– डॉ.जगदीश कदम

@९४२२८७१४३२

+++

पीळ(कवितासंग्रह)                   

सुनील यावलीकर

पृष्ठे:११४ मूल्य:रु.१००

मीडिया वॉच पब्लिकेशन,

अमरावती

कवी संपर्क:९४०४६८९५१७

****

    लवकरच येत आहे या गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद : डॉ.संजय बोरुडे 

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment