हिरव्या हातांचा माणूस : गोविंद के. पाटील
हिरव्या हातांचा माणूस अर्थात काका कुलकर्णी
आजची सकाळ ही नको असलेली अस्वस्थ बातमी घेऊन उगवलीय… माझ्या शेतघराच्या अवतीभवतीची नारळीची झाडं ज्यांनी भेट म्हणून पाठवली होती तो महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार विजेता हिरव्या हाताचा माणूस-गुंडोपंत तथा काका कुलकर्णी यांचा पुण्यात अटॅकने मृत्यू झाल्याची भयंकर बातमी कळली आणि डोक्यात आळवणींचं काहूर माजलंयकाळम्मावाडी डावा कालवा येण्याआधीचं नाधवडं गाव…ओढ्यालगतच्या मोजक्या विहीरी….त्या पाण्यावर माळवं दळवं आणि खरीपावर गुजराण असणारं गाव.. एक विहीर तशीच बामणाची…आमच्या गावच्या वायव्येला असणा-या या विहिरीलगत पन्हाळी खापरीचं साधं मातीचा शेतावरचं घर… अनंत कुलकर्णी हे काकांचे वडील अकाली गेले आणि संसाराचा भार काकांवर आला… तीन भाऊ आणि आई असा मोठा खटाला… कॉलेज सुटलं..ट्रकधंदा आणि शेती वाट्याला आली…बावीस एकर क्षेत्र एका तळावर पण पुरेसं पाणी नाही… अशावेळी स्वताची नर्सरी उभा करून काकांनी सगळ्या रानावर नारळ, निलगिरी,सागांचं प्लॅंटेशन केलं… त्यांच्या हाताने वनराई उभी केली… शेतात वेगवेगळे प्रयोग केले… अत्यंत आपुलकीने झाडांचा सांभाळ करीत भावांची शिक्षणं, नोकरी,लग्नं अगदी सगळं यथासांग पार पडलं.. आपल्या तीन मुलांनाही शिकवलं… स्वताच्या पायावर उभा केलं… सांसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडत असतांनाच समाजाच्या सुखदुःखात हा माणूस मनस्वी सहभागी झाला… गावच्या राजकारणात शंकरराव पाटील यांच्या गटाकडून तीन चार वेळा ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्था चेअरमन म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलं… चांगल्या माणसांचा गोतावळा असलेला हा पंचक्रोशीतील एक रसिक माणूस… आम्ही लिहणारी पोरं त्यांच्या वनराईत जमून त्यांनीच आणलेली दही खर्डा भाकर खात चर्चा करायचो… आदरणीय विजय निंबाळकर आणि मोहन पाटील अशी लेखक समीक्षक मंडळीही त्यात सहभागी असायची…माझ्या वैयक्तिक आयुष्यात वयाने मोठा असूनही मैत्र जपणारा हा माणूस… आमच्या दारावरून कुठं जायचं असेल तर स्कूटर थांबवून बाहेरूनच उंच आवाजात साद घालणार..”म्हातारे… गुरूजी आहेत काय घरात…”आणि मग मागच्या अंगणात खुर्ची टाकून सिगारेट शीलगावत माझी,मुलांची त्यांच्या शिक्षणाची सखोल चौकशी गप्पा तासभर तरी….. कन्येच्या नोकरीचं कळाल्यावर केवढा आनंद झाला होता त्यांना… महाराष्ट्र शासनामार्फत वृक्ष लागवड आणि पर्यावरण यासंदर्भातला पुरस्कार दिला जातोय हे समजल्यावर तो प्रस्ताव व्ही डी पाटील,एन डी पाटील आम्ही तयार केला आणि त्यांना वनश्री पुरस्कार जाहीरही झाला… त्यांच्याबरोबर ना धो महानोर यांनाही तो मिळाला होता याचा त्यांना केवढा अभिमान वाटायचा… एक शांत,सज्जन, दुस-याला सतत सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन करणारा हा माणूस एकदा आला… वळवाच्या वा-यात आमच्या जनावरांच्या घरावरचं सिमेंट पत्र्याचं छप्पर उडून जाऊन चक्काचूर झालेलं.. बघितलं नी म्हण्ले याचं आता काय करणार… मी रुफकाम करून खापरी घालणार म्हणालो तर म्हणाले… उद्या सकाळी ट्रॅक्टर पाठवून दे… तीन झाडं तोडून भरून देतो..सरळ बेंडस्यावर नेऊन कापून आण…मला आठवतंय माझ्या एकूण आयुष्यात छप्पर उडालेल्या घरावर छप्पर व्हावं म्हणून मदत करणारा हा एकमेव माणूस होता…. खूप भेटी.. खूप बोलणं..भुदरगडातला हिरव्या हाताचा माणूस हे आर्टीकल मी लिहिलं होतं वनश्री स्विकारायला जाण्याआधी.. काकांचे भाऊ नाना, भालचंद्र…चांगले परिचयाचे…नाधवड्यातल्या काकांच्या घरगुती कार्यक्रमात ते आवर्जून बोलवायचे…काकांचा धाकटा भाऊ बापू माझा वर्गमित्र… काकांची मुलगी जावई आणि थोरला मुलगा अमेरिकेत.. त्यांना भेटायला जायचं म्हणून मेडिकल फिटनेससाठी ते धाकट्या मुलग्याकडे गेलेले पुण्यात.. याआधी बायपास झालेली.. आता एक छोटं आॅपरेशन होऊन प्रकृती सुधारत असताना काळानं काकांना गाठलं …किती साधी,सरळ आपुलकीने वागणारी माणसं…आज त्यांच्या सांत्वनाला माझ्याकडे शब्द नाहीत… साधारण चौथी पाचवीला असताना लहानपणी टिळक जयंतीला त्यांच्या विहीरीवरच्या गुलाबाच्या ताटव्यातली पिशवी भरून फुलं नजर चुकवून चोरून आणल्याच्या पासून या आठवणी…काका कुलकर्णी हा माणूस आपल्या सभोवती जोवर ही झाडंपेडं आहेत… कायम स्मरणात राहील….= गोविंद के.पाटीलमु.पो.कोनवडे.,ता.भुदरगड, जि.कोल्हापूर
परिचय :
प्रकाशित साहित्य
महाराष्ट्रातील आघाडीचे गेय कवी…
अनेक संमेलनाच्या कविसंमेलनाचे अध्यक्ष …
मायणी येथील बळवंत महाविद्यालय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष…
गावशिवार हा शेतीमातीच्या कवितेसाठी चालवलेला यू ट्यूब चॅनल…
प्रकाशित साहित्य…
1)गावकिर्तन 2002
2)उध्वस्त त्र्ऊतूंच्या कविता..।2006
3)धूळधाण…2014
प्राप्त पुरस्कार
१)पद्मश्री विखे पाटील पुरस्कार.. प्रवरानगर
2))यशवंतराव चव्हाण पुरस्कार पुणे
3)मायबोली पुरस्कार राधानगरी
पदाधिकारी
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शिक्षक साहित्य परिषद
कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा.कोल्हापूर
जिल्हा नेते,पुरोगामी शिक्षक संघटना कोल्हापूर
****
काकांनी दिलेली नारळाची झाडे
——————————————
आपण अक्षर वांडमय चा ताजा अंक वाचला आहे का?