कब्रीतला समाधिस्थ :अलौकिकाची ओढ – डॉ. बाळासो. लबडे
महाकवी सुधाकर गायधनी
जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या महाकवी सुधाकर गायधनी यांचा हा पहिला संग्रह आजपासून बरोबर ४६ वर्षापूर्वी प्रकाशित झाला .त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली असून त्या निमित्ताने आजचा ब्लॉग लिहिला आहे,सुप्रसिद्ध कवी डॉ.बाळासाहेब लबडे यांनी.विशेष म्हणजे हा कविता संग्रह गायधनी यांना स्वत:लाच एम.ए.ला अभ्यासाला होता.मराठी साहित्यात हा पहिलाच योगायोग होता.सुधाकर गायधनी यांच्या ‘महावाक्य’ या ग्रंथामुळे डॉ.प्रल्हाद वडेर,निर्मलकुमार फडकुले,द.भि.कुलकर्णी,के.ज.पुरोहित,वि.स.जोग,सदानंद मोरे यांनी त्या ग्रंथाला ‘महाकाव्य’एकमुखाने मान्यता दिली. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या अनेक कविता देशभर आपल्या भाषणातून पोहोचवल्या.पद्मश्री नाकारून हयातभर खऱ्या कवितेची पाठराखण ते करत आलेले आहेत.त्यांच्या ‘खापा’ या जन्मगावी साडेतीन एकरामध्ये नगरपालिकेने ‘महाकवी सुधाकर गायधनी उद्यान’ वसवलेले आहे.जिवंतपणी असा सन्मान होणे ही सुद्धा मराठी साहित्यातील एकमेव घटना आहे. सध्या ते नागपूरच्या सोमलवाडा या ठिकाणी वास्तवास असून त्यांचे ‘महावाक्य’,’तुका अभंग मृदंग विठ्ठल’,’मृद्गंध आणि ओंजळ’,’योगिनींच्या स्वप्न्सावल्या’,गोफणगोटा’ इ.ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.लायब्ररी ऑफ कॉंग्रेस,वॉशिंग्टन यांनी ‘एक्सलंट एपिक इन मराठी लिटरेचर ‘ म्हणून ‘महावाक्य’चा सन्मान केला आहे.
— संपादक,साहित्याक्षर
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇 “कब्रीतला समाधिस्थ” कविता वाचल्या ही एका कविची लौकिकाकडून अलौकिकाकडे पाहण्याची अस्तित्ववादी धुनी आहे .गायधनींची स्व:ताला सोलताना लागलेली समाधी कबरीतुन उजागर होऊन शून्याच्या निर्व्याज्य पोकळीपर्यंत जाऊन पोहचते .स्व:तातील न्युनत्वाचा शोध घेताना ती शूद्रत्वाहून आकाशाकडे झेप घेते. ती फकिराची राख असल्याची ग्वाही देते तर अनंताच्या प्रवासाची साक्षी आहे.
वेगळ्या प्रतिमा, चिंतन, आणि तत्वज्ञानाची मोडतोड यांचा मिलाफ म्हणजे सुधाकर गायधनी यांची कविता. यात आपलेपण आहे .वेगळे चिंतन आणि नाविण्यपुर्ण आकृतीबंधामुळे कवितेला स्वता:चा चेहरा आहे. जो मराठी इतर कवींपेक्षा वेगळा आहे. कवितेची लय वेगळी आहे. सलग एक आशय कवितेतून व्यक्त होताना कविता आपले कविता पण सोडत नाही. ती दुर्बोधही होत नाही .सामान्यही होत नाही. तिच्यात आसक्ती आणि अनासक्ती यांचा जोरदार संघर्ष दिसून येतो. एका वेळी जीवनातील परस्पर विरोधी दोन गोष्टींचे आकर्षण असणे आणि विरोध असणे असा वेगळा संगम या कवीतेत दिसून येतो.व्यक्तीच्या ठिकाणी असणारे वितरागीपण ही जशी अधोरेखित करते .तशीच शुद्रत्वाने लुडबुडण्याची वृत्तीही सांगते.जीवनाविषयी गहन, गहीरा, भाव व्यक्त करताना ती तत्वज्ञानाच्या असिम पातळीवर वाचकाला नेऊन सोडते. त्याच्या मनात अर्थाची अनेक वलये निर्माण होतात. आपले हात तोकडे आहेत याची जाणीव त्याला होते. इथुन तिचा खरा प्रवास सुरु होतो .गायधनी ह्यांची कविता द्विपदरी आहे. ती एकावेळी आत्मकेंद्री आणि विश्वात्मक असा दोन्ही भाव घेऊन येते.तरीही ती स्वमग्नतेच्या पातळ्या ओलांडून आपले बाहू मानवतेला कवेत घेण्याची तयारी करते. तीला आपल्या सामर्थ्य आणि मर्यादांची जाणीव आहे. ही कविता प्रयोगशील नसुनही क्रिएटीव्ह आहे जी आपल्या जगण्याचा धागा सोडत नाही.इंद्रियसंवेद्य प्रतिमा येऊनही ती भावना चाळवणारी वाटत नाही.तिचे नक्की रंगरूप कोणते आहे या संभ्रमात वाचक पडतो .तिची जातकुळी वेगळी आहे. हिच्यात अध्यात्म आहे पण ते पारंपरिक नाही. कविने जीवनाविषयी केलेली अनेक विधाने जगण्याच्या व्याख्या करणारी आहेत.केवळ कवितेतुन बहुसंदर्भ देणे व पाडित्यप्रदर्शन करणे हे तिचे प्रयोजन नाही या उलट जगण्याचा नवा भाव,नवसुभाषितत्व रेखाटणे,स्वता;ला उलटेपालटेकरत जगण्याची धुनी रेखाटने इथे आहे .म्हणून ती मराठी कवितेत वेगळी ठरते. 🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇प्रा डॉ बाळासाहेब लबडे🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
गायधनींचा संपर्क : +91 98226 95736
या संग्रहातील निवडक कविता :
१.मी
माणसाच्या औलादीचा असूनही
मी लपता लपता
फाटक्या काफनातून दिसलो
कालपरवापर्यंत
गच्च आभाळ नेसून होतो
बारा होतो!
आज चार चौघांच्या खांद्यांसाठी
मुका होवून बसलो
जिंदगीचा हिसाब घेणाऱ्यानां
खुदा म्हणून फसलो .
***
२.धुनी
परमेश्वर वेषांतर करतो तर
मी साधूशी शरीरांतर केले म्हणून
कोण मला धुनिजवळ बांधून गेले?
मी तर धुंद धुनीचे सर्पण
ही आत्महत्या स्सामाजून
कोण धुनी विझवून गेले?
***
३.दान
दर्याखोर्यात
घुमणारे माझ्या हाकेचे
प्रतिध्वनी….
चिडून माझ्याच कानावर आदळता
माझी कर्णपटले फाटतात
मी बधीर होतो पूर्ण
आता बेफिकीरपणे हाक मारतोय
दूरस्थ अंध फकिराला
डोळ्यांचेही दान करण्यासाठी .
***
डॉ.संजय बोरुडे आणि महाकवी गायधनी ,कोरोडी (नागपूर) येथे
गायधनी स्वत:च्या स्मारकासमोर ,फोटो सौजन्य : डॉ.संजय बोरुडे