कविचं पोस्टमार्टेम – संजय चौधरी
(संग्रह येण्याच्या आधी ज्यांच्या कविता रसिकांच्या तोंडपाठ होत्या,असा कवी म्हणजे संजय चौधरी.’गंगेवरची म्हातारी’,’घावांचे गाव’,’मला जर मुलगी झाली तर तिचे नाव सीता ठेवणार नाही’,’एकदा पावूस दंगलीत सापडला’ ,’जे व्यासपीठावर असतात..‘अशा अनेक कविता रसिकांच्या पाठ आहेत आणि होत्या.’आभाराचा भार कशाला,आता फुलांचा हार कशाला?’ ही तर महाराष्ट्रात सर्वदूर पोचलेली कविता आभार प्रदर्शनात भेटते. मध्यंतरीच्या कालखंडात कवितेवर आलेली सूज पाहून,जाकिटे घालून पाकिटे मिळवणारी मद्योन्मत्त कवींची जमात पाहून आपल्या मनातली सल त्यानी या मालिकेतून सही पकडली.त्यामुळेच या कविताने मोठी खळबळ माजवली,त्यातल्या तीन कविता येथे देत आहोत.त्यांनी स्वत:च आजचा ब्लॉग लिहिला आहे.धन्यवाद.-संपादक,साहित्याक्षर )
कविचं पोस्टमार्टेम – संजय चौधरी
“कविचं पोस्टमार्टेम” या शीर्षकानं मी मालिका कविता लिहीली आहे, अकरा तुकडे लिहून झालेत.अजून लिहितो आहे. हे खरं तर कुठल्याही कविनं केलेलं आत्मपरीक्षण ठरावं. कवितेचं ज्या पद्धतीनं अवमूल्यन होत आहे. कवितेच्या नावाखाली कवितेसारखं दिसणारं पण कविता नसलेलं असं आजूबाजूला खूप दिसतं. खरी कविता वाचायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. कविते पासून मिळणा-या फायद्यासाठी सगळा आटापिटा चाललेला आहे असं वाटतं. कवितेचे कार्यक्रम, मानधनं, प्रसिध्दी,पुरस्कार … त्यासाठी चाललेलं लांगुलचालन, कंपूशाही, विशिष्ट लोकांची मक्तेदारी या सगळ्या साहित्यातल्या प्रदूषणानं कुठलाही संवेदनशील माणूस व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही. हेच कवितेत मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. कविच्या आत चाललेला हा एक प्रकारचा झगडा आहे. ख-या कविते पासून दूर चाललेल्या कविसोबत हा कवितेतून केलेला संवाद आहे. ही काही कुणावर केलेली वैयक्तिक टीका नाही.कुणा कविला किंवा कविच्या समूहाला उद्देशून या कविता नाहीत. हे कविचं स्वत:चं असं आक्रंदन आहे. सभोवती ज्यांना अजून कविताच सापडलेली नाही पण जे महाकवीच्या आविर्भावात वावरत असतात.ज्यांच्यासाठी मी “महाकवीचा मास्क लावलेले” असा शब्दप्रयोग कविच्या पोस्टमार्टेम मधल्या कवितेत केला आहे.असे तथाकथित भुस्सा भरलेले कितीतरी कवी आसपास दिसतात. कवितेचं एकूणच वातावरण ज्यांनी नासवलं आहे. त्यामुळे कवितेच्या रसिकांची कवितेची अभिरूची देखील बिघडलेली आहे.
कविता अधिकाधिक नितळ असावी, निखळ असावी,अस्सल असावी. यासाठी हा प्रयत्न आहे.तूर्त त्यातील तीन तुकडे आपल्यासाठी इथे देत आहे.
– संजय चौधरी, नाशिक
********************************
# कविचे पोस्टमार्टेम- एक #
कवीच्या मनात त्यानं मांडलेलं असतं
दु:खाचं दुकान
जखमावरच्या खपल्या सतत काढून
जखमा ताज्या ठेवायला आवडतं कवीला
कवी करतो भांडवल
सगळ्या जगाच्या दु:खाचं
आई बापाला सुध्दा सोडत नाही कवी
आईच्या कष्टावर मोठ्या पोटतिडकीनं लिहितो कविता
पण तिच्या वाट्याला सुखाचे दोन घास यावे यासाठी
आपले बूड हलवत नाही कवी
कवी दुष्काळावर लिहितो
डोळ्यातून पाणी काढणा-या कविता
डोक्यावर हंडाकळशी घेऊन मैलोनमैल् फुफाट्याची वाट तुडवणा-या मायबहिणींवर
आणि
संध्याकाळी बसतो बारमधे बिअर ढोसत
सोबत बापाच्या अविरत कष्टावरच्या कवितांचा चखणा घेऊन
कवी वर्षानुवर्षे गिरवतो त्याच त्या कविता
आणि कवी संमेलनं करत हिंडत राहतो
खुर्द-बुद्रूक मधे
घरी बायको रेशनच्या दुकानासमोर उभी असते रांगेत आणि कवी बरळत असतो
जग बिग बदलण्याच्या षंढ गोष्टी
दु:खाला दूर भिरकावून मायबापाला आणि बायकापोरांना सुखाचे चार क्षण देण्याची धमक नसते छकडक कवीत
कवी लिहितो शिवाजी महाराजांवर आणि जगण्यातल्या अफजलखानाशी दोन हात करण्याची नसते त्याची तयारी
कवी लिहितो, बाबासाहेबांवर दाद घेणा-या कविता
त्यानं वाचलेला नसतो एखादा परिच्छेद
बाबासाहेबांच्या घटनेतला
कवी दु:ख चिवडतो चिवडतो … चिवडत राहतो
आणि निघून जातो इकडची काडी तिकडे न करता … या ग्रहावरून
कवीनं दिलेला असतो शब्दांचा ॲनेस्थेशिया
स्वतःला आणि भोवतीच्या जगालाही
✍️✍️✍️#######################################
संजय चौधरी
# कविचं पोस्टमार्टेम – दोन #
कविचा होत जातो साचा
कमी होत जाते हळूहळू त्याच्यातली लवचिकता
कवि लिहित राहतो तेच तेच, परत परत, आलटून पालटून
त्याचे पुढचे संग्रह म्हणजे मागच्या संग्रहाचीच पुढची पानं
कवी स्वतःच्याच प्रतिबिंबात अडकून पडलेला
कवि फोडत नाही चेह-यावरचा मास्क
आता लहान मुलासारखं
हमसून हमसून कुठं रडता येतं कविला ?
आणि हसताही येत नाही खळखळून किंवा सातमजली
कविला पडत नाहीत कोरी करकरीत स्वप्ने
कविचं भाबडेपण हरवून जातं मागच्या वळणावर … घुंगरातल्या खड्यासारखं
कवि आजन्म कैद … त्याच्याच कवितेत
कवि गजाआड … स्वतःच्याच प्रतिमेच्या
निसटतं कवितेचं बोट त्याच्या लिहित्या हातातून
कधी कविताच नकळत सोडून देते त्याचा हात
… होते परागंदा
कवि फिरत राहतो पत्ता हरवलेल्या लहान मुलासारखा … त्याच त्याच गल्ल्यांमधून
पण पोहोचत नाही मुक्कामाला
कविला खरोखरंच माहित नसते
आता तो कवि न उरल्याचं आणि
कुणी सांगत ही नाही त्याला समोर बसवून
काय लिहिण्यासाठी
झाला होता आपला जन्म
हेच कवि विसरून गेलेला
कविला आरसा दाखवला पाहिजे
आता कविला खरोखरंच आरसा दाखवला पाहिजे
कराल तुम्ही माझं हे छोटंसं काम ?
✍️✍️✍️#############################################
# कवीचे पोस्टमार्टेम – तीन #
कवी कविता लिहित नसतो
तर तो जे लिहितो
त्याला कविता म्हणत असतो ब-याचदा
कवी वर्षानुवर्षे लिहितो तशीच कविता …
कवितेला निर्मिती म्हणतात हे त्याला सांगितलेलंच नसतं कुणी
मिळवतो फुटकळ कविसंमेलनाची निमंत्रणं
लोकल पेपर मधे छापवून आणतो
त्याची हसरी छबी
कवी प्रकाशित करतो कवितासंग्रह एकामागोमाग एक
डुकरिणीच्या पिलांसारखे भसाभसा
गल्लीबोळातल्या फुटकळ प्रकाशकाला हाताशी धरून
कवी हे विसरून गेलेला की ,
खरा कवी नसतो कधीच पुस्तकात बंदिस्त
तो तर ओळी होऊन वसती करतो लोकांच्या ओठांवर
काळाच्या काळजात झुलत असतात
ख-याखु-या कवितांची घरटी … शतकानुशतकं
आपल्या पक्ष्यांची वाट पहात
कवी मांडतो त्याला मिळालेली स्मृतीचिन्हे दिवाणखान्यात परमवीरचक्र मिळाल्यासारखे
मात्र कवीला मिळालेल्या मोमेन्टोज् ला विचारत नाही
रस्त्यावरचं काळं कुत्रंसुध्दा
येत नाहीत साधे मूठभर खारे शेंगदाणे त्याच्या बदल्यात जगातल्या कुठल्याही बाजारात
तरीही शतकांपासून लिहितो आहे कवी आणि लिहितच राहील
एकटाच
गच्च काळोखात
सूर्य विझल्यानंतरही
… कुठल्याही काळात
✍️✍️✍️####################################################
संपर्क :९३७०११६६६५
संजय चौधरी आणि डॉ.संजय बोरुडे