फेसाटी: अठराविश्व दारिद्र्याचे प्रतीक
कादंबरीच्या नावातच आपल्याला कादंबरीचा आशय समजून येतो. #फेसाटी म्हणजे दुःख, त्रास, वेदना. नावाला अनुसरूनच कादंबरीचा प्रवास चालू असतो. ही कादंबरी म्हणजे लेखक नवनाथ गोरे यांनी जगलेले जीवन. अत्यंत प्रतिकूल, संघर्षमय आणि दारिद्र्यसंपन्न (मुद्दामच हा शब्दप्रयोग करतोय कारण कथाच तशी आहे) परिस्थितीत जीवनाच्या वेगवेगळ्या संकटांना तोंड देत त्यांनी एम.ए पर्यंतचा केलेला प्रवास या कादंबरीत उलगडलेला आहे.
मनाला वेदना देणारा, वाचताना अंगावर काटा आणणारा हा प्रवास खरंच एका संघर्षापेक्षाही खूप मोठा आहे. आयुष्यभर कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे चित्र या कादंबरीत मांडलेलं आहे. आयुष्यातील अनेक चढ-उतारांना तोंड देत, वाईट संगती मधून बाहेर पडत जीवनाला आकार देण्याचे बळ देणारी ही कादंबरी आहे. परिस्थितीमुळे बळी पडणारा माणूस आणि पुन्हा आयुष्यात उभं राहण्यासाठी केलेली तगमग याचा संगम या कादंबरीत आपणाला दिसून येतो.
जतची बोलीभाषा असणारी ही कादंबरी वाचताना मनाला वेळोवेळी वेदना देत राहते आणि याच वेदनेतून माणसाला बळ देण्याचे देखील काम समांतरपणे करत असते. नाथा गोरे आणि त्याच्या पाच बहिणी आणि थोरला भाऊ असे हे सात भावंड आणि काकू आणि काका या कुटुंबाची कहाणी आहे. रोज दुसऱ्याच्या शेतात काम करायचं आणि पोट भरण्यापूरत कमवायचं. कधी-कधी तर मकेची कणसं भाजून पोटाची भूक भागवायची. असं जीवन जगत असताना त्यांच्यावर आयुष्यभर कर्जाचा डोंगरंच राहिला. या कर्जात सासुरवासाने केलेला हिराबाईचा दुर्दैवी अंत म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. एवढे पैसे जमवून, उभा करून लग्न जमवलं आणि तिचा हा दुर्दैवी अंत झाला. असं हे दुर्दैवी जीवन त्यांचं चालू होतं. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढायचं. म्हणजे पूर्ण जीवन कर्जाच्या विळख्यातच गेलं. मेंढ्या, शेळ्या, कोंबड्या विकायच्या आणि कर्जदारांचे हप्ते फेडायचे.
या कठीण जीवनात सतत काही ना काही अडचणी समोर येत. त्यातच नाथा ला लागलेली दारू, तंबाखू आणि सिगारेटची सवय. म्हणजे संगतीमुळे माणूस किती बदलतो याचा दृष्टांत या कादंबरीत दिलेला आहे. घरात नीट जेवायला मिळत नाही आणि हा स्वतःचे थाट पूर्ण करण्यासाठी पैसे चोरत आणि थाट पूर्ण करत. एवढंच काय तर शाळासुध्दा नीट शिकला नाही. मास्तर मारतो, बोलतो म्हणून कित्येक दिवस शाळेत जात नसे. कधी-कधी महिनाभर शाळा बुडवत आणि दिवसभर दगड्यासोबत हिंडत आणि नशा करत. परिस्थितीची जाणीव आहे हे कळूनसुद्धा त्याला ती जाण कधी वळवता आली नाही. कळतं पण वळत नाही असंच झालं होतं. एकूणच तो परिस्थितीच्या खेळातला कठपुतला झाला होता. म्हणजे जसं परिस्थिती त्याला खेळवते तसं तो खेळत होता. तो नकळतपणे परिस्थितीचा बळी पडत होता. यात त्याची सगळी चूक आहे असंही नाही. जेवढी चूक त्याची आहे तेवढीच त्याच्या परिस्थितीची आणि आपल्या व्यवस्थेची चूक आहे. माणूस गरिबीमुळे मरतो, गरिबीमुळे नीट जीवन आकारू शकत नाही. यात तेवढीच चूक व्यवस्थेची आहे जेवढी ती परिस्थिती न बदलू शकणाऱ्या माणसाची.
यात व्यवस्था कशी काम करते तर त्यांच्या काकाची जमीन पैशासाठी नामदेवकडे असते. तर तो यांना न सांगता जमीन विकतो. तहसील कार्यालयातून नोटीस आलेली असते पण पोस्टात पैसे देऊन ती अडकवलेली असते. मग या इथे व्यवस्था चुकते. जर तिथल्या माणसांनी प्रामाणिकपणे काम केले, शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या तर देशातील गरीबी मिटवायला तेवढाच हातभार लागेल. बँका गरीबाला शक्यतो कर्ज देत नाहीत म्हणून गरीब माणूस सावकाराकडून, श्रीमंत माणसाकडून पैसे घेतो. मग तिथे व्याज जास्त असतं. ती माणसं गरिबीचा फायदा घेऊन त्यांना पूर्ण लुटतात. कित्येक वर्ष लोक फक्त व्याजच भरत असतात. यात पण पुन्हा चूक व्यवस्थेची आहे. व्यवस्था नीट काम करत नाही म्हणून अशा लोकांना पैसे कमविण्याचे असले मार्ग सापडतात. हे सर्व लेखकासोबत देखील झालेलं आहे. अर्थात परिस्थितीमुळे माणसाला किती भोगावे लागते, सर्व कळत असूनसुद्धा त्यांच्यासमोर कोणताच मार्ग राहत नाही. एका अंधाऱ्या गुफेसारखं त्यांचं आयुष्य अंधारमय झालेलं असतं.
लेखकाने खूप कष्टमय जीवन जगलं आहे आणि ते इथं सांगण्यापेक्षा सर्वांनी ती कादंबरी वाचावी म्हणजे कळेल की आपलं जीवन किती सुखकर आहे. त्यांनी भोगलेलं खडतर आयुष्य, संकटांना केलेला प्रतिकार आणि परिस्थितीवर केलेली मात हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आणि बळ देणारा देखील आहे. पण या खडतर प्रवासापेक्षा काही नवीन, महत्त्वाच्या गोष्टी या कादंबरीतून व्यक्त होतात. लेखकाने आपला संघर्ष सांगताना नकळतपणे अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. त्यांनी त्यांचा संघर्ष, लढा आपणासमोर मांडत असताना नकळतपणे खूप महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा मांडलेल्या आहेत.
त्या अशा की, एकतर नाथाला कधीच शाळा शिकू वाटली नाही. थोडे दिवस जायचा, मग कोणत्या मास्तरने मारले की परत बंद करायचा. मनाचा पूर्ण निश्चय करून शाळा बुडवायचा. कोणी कितीही सांगितलं तर ऐकत नसायचा. फक्त काकू बोलल्या की त्याला परिस्थितीची जाणीव होत आणि तो पुन्हा शाळेत जात. अस त्याच्या आयुष्यात कितीतरी वेळा घडलं. यात नवीन काय तर ते असं की लेखकाने आपल्या देशातील मातृसत्ताक परंपरेला उजाळा दिलेला आहे. मातृसत्ताक परंपरेनुसार घरात स्त्री बोलेल तेच करावं लागायचं, स्त्रीच घरासंबंधीचे निर्णय घेत असत. याचा प्रत्यय या कादंबरीतून होतो. यावरून लेखकाने देशात मोडकळीस चाललेल्या परंपरेस पुन्हा उजाळा देण्याचे काम केलेले आहे. आपल्या देशाची खरी परंपरा पुन्हा उजागर करण्याचे काम त्यांनी केले आहे. भलेही त्यांनी ही भोगले, अनुभवले आणि तेच लिहिले पण त्यांच्या घरात मातृसत्ताक परंपरा आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी ही बाब नकळतपणे समाजासमोर मांडलेली आहे.
दुसरी अशी गोष्ट की, दारिद्र्य हे कधी जात-पात बघून येत नसते. दारिद्र्य कोणत्याही जातीतल्या लोकांना भोगावे लागते. दारिद्र्याला कोणती अट नाही वा कोणती सीमा नाही. दारिद्र्य हे दारिद्र्यच असतं आणि भोगावंच लागतं. मग ही गोष्ट मांडताना त्यांनी कधीच त्यांच्या आडनावाचा उल्लेख कादंबरीत केलेला नाही. शाळेत नाव सांगताना देखील ते शांत उभा राहील मान खाली घालून. यावरून त्यांनी एकच गोष्ट स्पष्ट केली ती अशी की, दारिद्र्य हे स्फटिकासारखे पारदर्शक आहे त्यात कोणती जात नाही ना कोणती जमात नाही. दारिद्र्य अशी गोष्ट आहे जी कधी कोणाला भोगावी लागेल, त्याचा कधी कोणाला सामना करावा लागेल याचा नेम नाही. म्हणून लेखकाने ही गोष्ट आकारताना कोणत्याच जातीचा उल्लेख केलेला नाही. फक्त त्यांनी त्याचा कसा सामना केला आणि उरलेल्या आयुष्याला कसा आकार दिला हे सांगण्यावर जास्त भर दिलेला आहे. भारतासारख्या देशात जिथे लोक गरिबीची, परिस्थितीची सहानुभूती घेतात आणि नाव कमावतात; त्याच देशात लेखकाने अशी कोणतीही गोष्ट न करता केलेला संघर्ष लोकांसमोर प्रामाणिकपणे मांडलेला आहे. त्यात कोणतीही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येत नाही ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
तिसरी गोष्ट अशी की, नाथाला कधीच शाळा शिकू वाटली नाही. त्याला शाळेबद्दल कधीच रस वाटला नाही. याची कारणं शोधली तर परिस्थिती हे एक आहे. म्हणजे पोटापाण्यासाठी धावपळ करत असताना शाळा शिकू वाटत नाही आणि शाळेबद्दल गोडी निर्माण होत नाही. हे खूप सामान्य कारण आहे शाळा न शिकण्या पाठीमागचं. म्हणजे ज्याची परिस्थिती हालाखीची असते त्याला शाळेबद्दल रस न वाटणे साहजिक आहे. पण या मागचं दुसरं कारण म्हणजे शाळेतील वातावरण. म्हणजे जुन्या काळात मास्तर खूप मारायचे आणि तेही खूप जोरात. मग यामुळे मुलांमध्ये भीती बसते. एकतर मारतात आणि वरून बोलतानासुद्धा नीट बोलत नाही. घालून-पाडुनच बोलतात. पहायला गेलं तर, एवढासा जीव असतो मुलांचा त्यात त्यांना खूप जोरात मारतात आणि परत दोन शब्द सूनवताना अपशब्द वापरतात. या गोष्टींमुळे जसा नाथा शाळेत जात नव्हता तशी अजून कित्येक मुलं-मुली असतील जी अशाच कारणामुळे शाळेत गेली नसतील. म्हणजे एकूणच शाळेतील वातावरण तेवढेच कारणीभूत आहे जेवढी परिस्थिती कारणीभूत आहे.
लेखकाचा हा सगळा खडतर प्रवास वाचताना मनाला अत्यंत वेदना होतात. हा संघर्षमय प्रवास वाचत असताना अंगाला काटा येतो इतका हा वेदनादायी आहे. या प्रवासातून एकच कळते आपल्याकडे जे आहे ते आपल्या दृष्टीने कमी आहे, आपण त्यात समाधानी नाहीये. पण तेच दुसऱ्याच्या दृष्टीने पाहिले तर ते खूप आहे. म्हणून आपल्याकडे जे आहे त्याची किंमत केली पाहिजे, समधानी राहील पाहिजे. हा धडा देणारी नवनाथ गोरे लिखित 'फेसाटी' कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचली पाहिजे आणि जीवनाला आकार देताना या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे.