हे वयच असं असतं : लक्षणीय भाषिक प्रयोग डॉ . फुला बागूल
हे वयच असं असतं : लक्षणीय भाषिक प्रयोग
डॉ . फुला बागूल' हे वयच असं असतं 'ही कादंबरी संजय जाधव यांनी लिहिली असून भुसावळ येथील मैफल प्रकाशन यांनी 4 एप्रिल 2020 रोजी ती प्रकाशित केली. या 164 पानांच्या कादंबरीतील भाषाशैली लोकविलक्षण आहे. प्रामुख्याने तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या महाविद्यालयीन तरुणांच्या ओठी असणारी ही भाषा आहे . ग्रामीण व निमशहरी अशा भागातील ही तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतीच पोहोचलेली मुले आहेत . त्यांच्या भावविश्वात शारीरिक आकर्षण आणि प्रेम भावना या केंद्रस्थानी असतात . हे वयच असं असतं या कादंबरीच्या केंद्रस्थानी याच गोष्टी आहेत . कादंबरीची भाषा अत्यंत प्रासादिक आहे . कथानक अत्यंत प्रवाही आहे .संवादातून कथा फुलत जाते .व्यक्तिचित्रण व नाट्यपूर्ण प्रसंग वर्णन ही या कादंबरीची जमेची बाजू आहे .
कादंबरीतील संवादाची भाषा ही तशी गावरान भाषा आहे .कुठल्याही शब्दकोषात न आढळणारे शब्द कुठल्याही ग्रंथात न आढळणारे वाक्प्रचार या कादंबरीतल्या पानापानावर आपल्याला आढळतात .भाषेचे मुख्य कार्य संदेशन हे असते आणि हे संदेशन या कादंबरीतल्या भाषेने साध्य केले आहे . अगदी उदाहरण देऊन सांगायचं म्हटलं तर , ‘चड्डीत गुढीपाडवा व्हायचा ‘
, ‘घेतली बॉलिंग करून ‘
‘इज्जतचा एवढा फालुदा झाल्यावर गप्प बसावं ‘ , ‘
,हे असलं मांसाहारी बोलणं चालायचं ‘
, ‘वाया गेलेली केस ‘ ,
‘हे ऐकताच सगळ्यांच्या गोट्या कपाळात ‘ ,
‘भाषा ऐकल्यावर हा माणूस मराठीची माय आडवी घालणार हे समजलं’ ,
‘ मला लिहितांना पाहून हा पहा सिन्सिअर च्या पोटचा ‘ ,
‘मग साल्या त्याला म्हणायचं ना आपल्यातला कोणी झाटू तुला काही बोलला का सांग ? आता एकेकाची परेड घेतो’
, रव्याच्या सामानाला खाज सुटली,
‘उगाच पोरीला धक्का लागायचा आणि उपादी व्हायची’
‘दिवसभर भांगेची गोळी चढवून सुम मध्ये बसून राहायचा’
‘केलं असतं रे पण सोबत हरिभाऊ आहे’
येथे हरिभाऊ हा सांकेतिक शब्द खास ग्रामीण आहे .येथे भांगेच्या गोळीने आलेली नशा म्हणजे हरिभाऊ .
‘थोडेफार बोकड्या कापू गुजराती मला समजत होतं’ येथे आपल्याला अपरिचित असलेली भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याकडून भाषेची मोडतोड होते यालाच बोकड्या कापू भाषा असे म्हणतात .
“काय भोसडा विचार कर. आता मुठ्या मार साल्या तिच्या नावाने .”
” छातीच्या नावाने बोंब. तिची छाती काय चाटायची होती” अशी येथल्या युवकांची स्त्री विषयक भाषा आहे .
“वाण्याची लता चिपाड आहे” हे
उभार नसलेल्या स्त्री साठी वापरले जाणारे , खास युवकांच्या तोंडी येणारे विशेषण आहे .
” मला चक्क फुगे दिसत होते . विशिष्ट अवयवांना युवकांनी योजलेली ही तत्कालीन नावे होती . यातून योग्य ती देवान-घेवान होत होती . लेखक संजय जाधव काही प्रसंगांचे त्यांच्या भाषेत वर्णन करतात . उदाहरणार्थ “बाफना सरांनी जनरल एन्ट्री दिल्या होत्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं होतं. माझ्या डोळ्यात, शरीरात, रक्तात सुकन्याची एन्ट्री झाली होती. आता त्यात माझा काय प्रॉफीट होणार होता, कुठला लॉस होणार होता कुणास ठाऊक?”वाणिज्य शाखेला शिकणाऱ्या युवकांच्या तोंडी अशी भाषा स्वाभाविकही ठरते. विशिष्ट प्रकारचे वाक्प्रचार या युवकांच्या तोंडी येतात .हे वाक्प्रचार कोणी निर्माण केले हे अज्ञात असते . त्याचे उपयोजन मात्र सातत्याने युवकांच्या भाषा विश्वात होत असते . येथे बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात संकेतांची समानता असते . त्यामुळे संदेशनात अडथळे येत नाहीत .कुठला घोटाळा होत नाही .
उदाहरणार्थ “तू तर सगळ्यांना टांग मारलीस “
स्त्रीच्या शरीर धर्माच्या संदर्भाने युवक अशी चर्चा करतात , ” मित्रांनो एखादी स्त्री महिन्यातले चार दिवस अदृश्य होते तेव्हा ती पैठणी नेसून एकटीच कावळ्याशी गप्पा मारत असते .”
“साले ते कोल्हे बंधू रद्दी फटाके”
” चढ साल्या तू पण आता”
तुम्ही साले मुतायला जाल तरी सामान हातात धरायला विचार करणार .”
“त्याच्या मायला तुमचं सालं हे चुकतं . बॉल दाबायचे सोडून तुम्ही साले बटन मोजत बसता ” “रव्या गांडू साल्या मारु उडी पाण्यात . तिथं काय झक मारतोय ?”
“अरे रव्या तू पण करून घे बाबुरावची दाढी “
अशी ही युवकांची भाषा आहे .या भाषेला संकोच माहीत नाही .कुठल्याही प्रकारचे प्रोटोकॉल येथे पाळले जात नाहीत . आणि ते स्वाभाविक आहे .निमशहरी भागातील पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीची ही पिढी आहे .त्यातील जगणं कधीही एकट्याचं नसायचं .ते सामूहिक जीवन असायचं .तेथे औपचारिकतेचा भागच नव्हता . सगळं काही मोकळेढाकळे असायचं . त्यातून अशा प्रकारची भाषा योजणे यात नवल नव्हते . मानवी लैंगिक अवयवांना विशिष्ट अशा प्रकारची नावे या युवकांनी दिलेली असायची . बॉल ,फुगे, बाबुराव ,सामान यांसारखे शब्द ही खास या युवकांची निर्मिती होती. ही निर्मिती कुठल्याही अकॅडमीक अँप्रोचने होत नव्हती . त्यातून केवळ भाव संक्रमण एवढाच हेतू होता .लेखक संजय जाधव यांची भाषा प्रसंगी अलंकृत ही होते . उदाहरणार्थ “या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंवर मी फिरून पाहिलं. काहीच गवसलं नाही”
“पंधरा सोळा वर्षाची पोरं कुमार पण आणि तारुण्य यांच्या सीमेवर उभी. पाण्यात ठेवलेल्या फॉस्फरस सारखी. पाण्याबाहेर काढताच पेटून उठणारी. खरं-खोटं ,चांगलं-वाईट यांच्यातला नेमका फरक माहीत नसणारी.” अशी ही अलंकृतता .
गांडू, हिजडा, भोसडा, मादरचोद यांसारख्या शिव्या त्यांच्या बोलण्याचा नैसर्गिक भाग आहेत . किंबहुना शिव्या त्यांच्यासाठी संबोधन आहेत . मित्राला बोलवायचे असेल तर ए गांडू असेच ते संबोधन योजतात .
मुली आणि स्त्रिया यांच्या साठी येथल्या युवकांची स्वतंत्र भाषा आहे .
उदाहरणार्थ” हा आपला माल आहे ” “ती माझी ढाई”.
ग्रामीण व निमशहरी लोकांच्या तोंडी येणारी भाषा सुद्धा त्यांच्या सामूहिक जगण्याचे प्रतिबिंब उमटवणारी असते .
उदाहरणार्थ” तुम्हा शिवपूर च्या लोकांना भाव खायची सवय आहे का?”.
येथे केवळ एकट्या व्यक्तीचा निर्देश नसून संपूर्ण गावाची ती एक सामूहिक वृत्ती आहे याचा निर्देश होतो ..कादंबरीची निवेदन शैली प्रथमपुरुषी आहे . यौवन सुलभ भावना पानापानावर येथे प्रकटल्या आहेत . इथल्या खास गावरान भाषेमुळे कादंबरीत प्रतिबिंबित झालेल्या ग्रामीण व निमशहरी वातावरणामुळे या कादंबरीच्या विश्वाशी वाचक अत्यंत सहजतेने समरस होतो . इथले वातावरण त्याला चिरपरिचित असल्यासारखे वाटते .
येथल्या युवकांच्या तोंडी येणारे वाक्प्रचार विलक्षण आहेत . उदाहरणार्थ “कॉलेजच्या ऑफिसमधल्या क्लार्कला मी आणि प्रव्या ने व्यवस्थित घोडे लावले”.
हे ग्रामीण निमशहरी युवक एकमेकांची अश्लील थट्टामस्करी करतात. त्यातील भाषा कमालीची सांकेतिक असते. विशेष म्हणजे तिच्या योजनेने कुणालाही राग येत नाही .याचे कारण त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध .ही मैत्री त्याग आणि समर्पण यांच्यावर अधिष्ठित असल्याने भाषेवरून तिच्या उपयोजनेवरून त्यांच्यात कुठलाही बेबनाव होत नाही .रावशाच्या लग्नाच्या वेळी त्याचे मित्र त्याची थट्टा करतात . या प्रसंगी उपयोजिलेल्या भाषेच्या केंद्रस्थानी अश्लीलता असली तरी ती या भाषेच्या पृष्ठ स्तरावरून अजिबात जाणवत नाही . उदाहरणार्थ
“आम्ही आमच्या तर्फे त्याला गादी दोन उशा बेडशीट असा सेट दिला. त्याला रोज लागणारी वस्तू. आणि जेव्हा जेव्हा तो ती वापरेल तेव्हा त्याला आमची आठवण होईल. आम्ही ते गिफ्ट घेऊन त्याच्या जवळ गेलो .वाटलं त्याला आश्चर्य वाटेल पण त्याने एका वाक्यात सगळी हवा काढून टाकली . म्हणाला ,अरे साल्यांनो कशाला गादी घेत बसलात? मला सतरंजीवर सुद्धा जमतं सगळं .”पुढे तो म्हणतो” साल्यांनो लाईन मारू नका हिच्यावर” हाच तो मैत्री संबंधातला मोकळेपणा. लग्नाच्या वेदीवर आपल्या मित्रांना आपल्या नववधू संदर्भाने अशी विधानं करण्यासाठी जी निर्भयता, मनमोकळेपणा लागतो तो अशाच सच्च्या मैत्रीमुळे शक्य होतो . अशी भाषा याच मैत्री अधिष्ठानावर निर्माण होऊ शकते . लग्न प्रसंगातच बाजूला घेऊन मित्र त्याला म्हणतात ” तर श्रीयुत रावसाहेब देशपांडे, मुंबईला गेल्यावर नवीन दुकानाचे उद्घाटन कसं झालं ते कळवा नाहीतर गडावर चढायला काही त्रास बीस झाला तर ते पण कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची काहीही मदत लागली तर सांग . शेवटी मित्रच कामाला येतात “. आम्ही काय सांगतोय हे न कळण्याइतका बावळट नव्हता तो .त्याने ऐकून घेतलं आणि आमचं तंगडं आमच्याच गळ्यात बांधले .तो म्हणाला “नक्की नक्की. मला जुन्या दुकानात काम करायची सवय आहे त्यामुळे तशी काही अडचण येणार नाही. हे तर नवीन दुकान आहे .कुलूप उघडण्या पासून सगळं जमेल मला आणि मला पर्वत चढायला येतं .गड बीड काय घेऊन बसलात? ही तर टेकडी आहे “.
मराठी कादंबरीच्या संदर्भाने अशी सांकेतिक भाषा जिच्यातून अश्लील भावना संक्रमित होतात ती अपूर्व आहे .युवकांनी निर्माण केलेली अशी भाषा पृष्ठ स्तरावर अत्यंत सोज्वळ आहे पण अंतरंगी मात्र संयमित अशा प्रकारची अश्लीलता ठासून भरलेली आहे .
तोंडावर देवीच्या टिकल्या असलेल्या मुलीला यांनी एक विशेष नाव दिले ते म्हणजे ठोक्याचं पातेल .
याखेरीज काटा माल , झाटा माल , खवडी पोरगी, पचका व्हायचा यांसारखे सांकेतिक शब्द व विशेष वाक्प्रचार या कादंबरीच्या पानापानावर येतात . “लहानपणी डॉक्टर डॉक्टर खेळायचो त्यालाच आता प्रेम करणं म्हणतात”. अशी येथल्या प्रवीणची विशिष्ट भाषा आहे . ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजत असेल तर अशावेळी विशिष्ट वाक्प्रचार वापरला जातो . या कादंबरीतही तो आला आहे . उदाहरणार्थ
“रव्या बरा आहेस ना ? की जाऊ राहू आहे?”
तारुण्यसुलभ अशा हस्तमैथुनना संदर्भात कादंबरीतला प्रवीण म्हणतो “अरे हातगाडी चालवून याचं मनगट बारीक होत चाललंय . मावशी याचं मनगट बारीक होत चाललय .लग्न करून टाका लवकर”.
अशीही या युवकांची सांकेतिक भाषा आहे .
एखाद्याकडून अनपेक्षित भाषिक कृती झाल्यावर त्या कृतीचे वर्णन असे केले जाते .उदाहरणार्थ “आमची ताई पण कधीकधी नो बॉल वर सिक्स मारायची “.
अशी ही अत्यंत अचूक व यथार्थ वर्णन करणारी खास भाषा आहे . टिवल्याबावल्या करणे असा शब्दकोशात नसलेला वाक्प्रचार ही या कादंबरीत येतो .
क्वचित प्रसंगी अलंकृत भाषाही कादंबरीत येते . उदाहरणार्थ “पेट्रोल संपायला आलेल्या गाडी सारखं माझं प्रकरण आचके देत होतं”.
कादंबरीच्या शीर्षका प्रमाणे येथे यौवन सुलभ खोडकरपणा विविध प्रसंगातून अभिव्यक्त झाला आहे .पुन्हा पुन्हा मुलांकडे शिकवणीची फी मागणाऱ्या शिक्षकाला येथली मित्रमंडळी मुद्दाम लटकवत ठेवायची . पैसे असून द्यायची नाहीत .गल्लीतला वाणीबाबा खडूस आहे म्हणून त्याच्या अंगणात घाण टाकणे, आई-वडील रागावतात म्हणून मुंबईला पळून जाणे ,चालू वर्गातून चालत जात खिडकीतून उडी मारणे, मुलींवर फुलं टाकणे , मुलीं वरच्या परस्पर मालकी वरून मारामार्या करणे, घरच्यांना चोरून सिनेमाला जाणे, कुणालाही न सांगता सहली आयोजित करणे ,जीवाशी गाठ असणाऱ्या पैज लावणे ,पालकांना वठणीवर आणण्यासाठी घरातून पळून जाणे असे कितीतरी यौवन सुलभ खोडकरपणाचे प्रसंग कादंबरीत येतात .कादंबरीत दोन उपकथानके आहेत .ही दोन्ही प्रेमभावना विषयक आहेत . अर्थातच या मुग्ध प्रेमभावना आहेत . नायक रवींद्र वंदना यांची एक प्रेम कहाणी आणि दुसरी प्रवीण आणि निमाची प्रेम कहाणी अर्थातच ही प्रेम कहाणी . अर्थात कादंबरीत त्या यशस्वी होत नाहीत . सफल होत नाही . पण त्या निमित्ताने होणारी या दोघांची घालमेल कादंबरीकाराने चांगल्या प्रकारे अधोरेखित केली आहे .
कादंबरी ग्रामीण व निमशहरी पार्श्वभूमीवर असल्याने येथे गाव गाडा येतोच . मग यात देशपांडे बाबाने केलेले गाव लफडे येते .
कादंबरीत शैक्षणिक वास्तव प्रतिबिंबित झाले आहे .विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षेचे गुण न पाठवणे ,मुलाखतीला अयोग्य प्रश्न विचारणे इत्यादी.
कादंबरीत थोडीबहुत तात्विक चर्चा येते ती तशी वरवरची आहे . उदाहरणार्थ
“आपण अपेक्षा केलेली नसते आणि काही वेळा अशा गोष्टी भेसूर पणे आपल्यासमोर येऊन आदळतात .आपण त्या वेळी केवळ हतबल होतो .हतबल म्हणण्यापेक्षा परिस्थितीला शरण जातो .अगतिक होतो .समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकदही नसते आपल्याजवळ .आपण आर्थिक दृष्ट्या कमकुवत तर असतोच पण सामाजिक दृष्ट्या ही भीषण अनुभव घेतो .आपण नेमकं कसं वागायला हवं होतं हे आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो”
“जगात कोणतीच वस्तू वाईट नसते रव्या .आपण त्या वस्तू आणि व्यक्तीचा सुद्धा चुकीचा वापर करतो .नको तितका करतो आणि मग कंटाळा आला की त्या वस्तूला आणि व्यक्तीला वाईट असं लेबल लावून मोकळे होतो”.
“किती साध्या गोष्टीत समाधान असतं ना आपल्या आई-बाबांना. आपण उगाचच प्रेमबिम करण्याचा तेही उदात्त वगैरे करण्याचा मुर्खपणा करतो.”
“लग्नपत्रिका धगधगत्या विस्तवा सारखी मला दिसू लागली .त्या विस्तवा खाली माझं काळंठिक्कर झालेलं प्रेम .शेवटी प्रेम आणि व्यवहार यात व्यवहार जिंकला .”
“आपलं अपयश चुका आपण आपल्या नशिबाच्या नावापुढे टाकतो आणि कर्जबाजारी होतो. आयुष्यभर आठवणींचे हप्ते भरत असतो. या कर्जातून सुटका ही होत नाही”.
कादंबरीतील कारुण्यपूर्ण प्रसंग वर्णन अत्यंत समर्पक आहे . विशेषतःप्रवीणच्या बहिणीला सासरच्यांनी जाळून मारण्याचा प्रसंग . हा प्रसंग अगदी जिवंतपणे लेखकाने साकारला आहे . याखेरीज रावशाचा होणारा अकाली मृत्यू हादेखील कारुण्य पूर्ण प्रसंग कादंबरीत चांगला रेखाटला आहे .
संपूर्ण कादंबरीत युवकांचे भावविश्व साकारले आहे .त्यात भोवतालची सामाजिक वास्तवता प्रकटली आहे .कादंबरीत दोन गोष्टी प्रामुख्याने पुढे येताना दिसतात त्यातील एक म्हणजे मध्यमवर्गीय असल्याची खंत आणि आणि जात वर्गीय जाणिवा . मध्यमवर्गीयांना असलेल्या चौकटी ज्याला लेखकाने मध्यमवर्गीय गांडूपणा असे म्हटले आहे ही एक आणि प्रेम असलेल्या मुलीशी केवळ जातीय विषमतेमुळे लग्न करता न येणे या दोन गोष्टी कादंबरीत प्रामुख्याने दिसून येतात .
कादंबरीकार संजय जाधव यांनी व्यक्तीवर्णनेही बहारदार केली आहेत . प्रत्येक पात्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते . विशेषतः रावश्या आणि प्रवीण, वंदना या व्यक्तिरेखा जिवंत साकारल्या आहेत .
या कादंबरीत काही दोष स्थळेही आहेत .उदाहरणार्थ येथील प्रेम कहाणी सामान्य म्हणून ठोकळेबाज आहे .काही प्रसंग अत्यंत कृत्रिम वाटतात . कादंबरीतला मालमसाला यापलीकडे त्यांचे महत्त्व नाही .चिकन आणि पंचामृत अशी केलेली जातद्वेषमूलक उपमा अयोग्य होईल .तरुण मुलीस तरुण मुला सोबत फिरायला पाठवणे ही घटना देखील पस्तीस वर्षांपूर्वीच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक वाटते .
लेखकाची ही पहिलीच कादंबरी असल्याने काही त्रूटी कादंबरीत येणे स्वाभाविक आहे .अर्थात या त्रुटींमुळे कादंबरीची महत्ता कुठेही कमी होत नाही . तीन दशकांपूर्वीची समाजाची, युवकांची .,शैक्षणिक परिस्थितीची, जातीय विषमतेची, असफल प्रेम कहाण्यांच्या कारणांची मीमांसा करणारी विलक्षण भाषिक प्रयोग असलेली ही कादंबरी एक विलक्षण कादंबरी आहे . . . .. . .
डॉक्टर फुला बागुल
हे वयच असं असतं लेखक संजय जाधव
मैफल प्रकाशन भुसावळ
पृष्ठ संख्या 164 किंमत दोनशे वीस रुपये