नेट मजनू
(हा एक वस्तुस्थितीला धरून लिहिलेला उपहासात्मक लेख आहे. कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही)
आजकाल व्हाॅटस् अॅप, फेस बुक यांच्या सारखे तथाकथित सोशल मीडिया इतके पॉप्युलर आहेत की, निदान शहरात तरी ‘साक्षर’ क्वचितच सापडेल, जो ह्यांच्या पैकी काहीच वापरत नाही. एकतरी काही तरी वापरत असतोच. असे सोशल मीडिया वापरणं आजकाल एक स्टेटस सिम्बल आहे. तुम्ही जर काहीच वापरत नसाल तर तुम्हाला तुच्छ लेखण्यात येते. तुमच्याकडे समस्त नेटकरी तुमच्याकडे एका तिरस्कारणीय नजरेने बघतात.
नेटकरी लोकांमधून काही ‘अति उत्साही, प्रेमळ, काळजीवाहू’ लोकांनी, नेटमजनू हा एक नवीन धर्म स्थापन केला आहे. हा धर्म स्विकारायला वयाचं बंधन नाही. ह्यात धर्माचरणाचे काही नियम आहेत. त्यातला एक महत्वाचा नियम म्हणजे मुली/स्त्रीयांचे मॅरीटल स्टेटस बघणे अणि जिथे सिंगल असे लिहिले असेल तिथे तुटून पडणे. जिथे मॅरीड असे असेल तिथे ‘आदरपूर्वक’ तुटून पडणे!
व्हाॅटस् अॅप वर तुम्हाला सिंगल आहे का मॅरीड आहे हे कळत नाही. पण फेस बुक वर मात्र हे कळतं. त्यातून एखाद्या मुली/स्त्रीने सिंगल, अनमॅरीड असे लिहिले असेल तर ह्या जमातीचे लोक लगेच तिकडे धाव घेतात. अहो! गैरसमज नको बरं का! अशा एकट्या मुली/स्त्रीला आधार द्यायच्या उदात्त हेतूने नेटमजनू तिकडे धावतात. अणि तुम्ही! उगीचच त्यांच्या हेतूबद्दल शंका घेता! अरे ओळख नसताना कुणी एव्हढं आस्थेने चौकशी करतं का! ही लोकं करतात तर तुम्ही त्यांची कदर करत नाही! सो बॅड अँड सो सॅड!!
अणि तुम्ही कदर करत नाही म्हणून ह्या नेटमजनू लोकांना पुरुष असण्याची लाज वाटत आहे. म्हणून बरेच जणं मुलींची नावे ठेवून, अत्यंत सोज्वळ डीपी लावून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. केव्हढा मोठा हा त्याग! अणि तुम्ही स्त्रीया!! सारखं त्या बिचाऱ्यांना निराश करता.
ह्या नेटमजनू लोकांकडे सगळया प्रश्नांची उत्तरे अणि कारणांना प्रति कारण असतं. म्हणजे तुम्ही म्हणालात की मी अनोळखी लोकांशी नाही बोलत. तर नेटमजनू म्हणतील, पहिल्यांदा सगळेच अनोळखी असतात, पण हळूहळू ओळख वाढत जाते! कसलं माइंड ब्लोइंग उत्तर आहे हे. तुम्ही जर म्हणालात, अहो नेटमजनू तुम्ही मॅरीड आहात. तर ते म्हणतील, अग्नीचे फेरे घेतले म्हणून त्याला लग्न म्हणायचं पण ते प्रेम नाही हों! हे टाळ्यांचं वाक्य आहे.
फेस बुक कंपनीच्या बाहेर एका शिळेवर अशी वाक्य सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवणार आहेत.
बघा ना! तुम्ही मॅरीड असा वा सिंगल हे लोक तुमची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सदोदित काळजी घेत असतात. ते सुद्धा आपल्या लग्नाच्या बायकोकडे दुर्लक्ष करून! केव्हढा मोठा त्याग आहे हा! अणि नेटमजनू सिंगल असतिल (लग्न न झालेले) तर काही विचारूच नका. तुम्ही नुसतं म्हणा मला आता बाहेर जायचं आहे की लगेच मेसेज येईल ‘लवकर ये/या, वाट बघतोय’. असे लोक फेस बुक वर रहायच्या दृष्टीने अंथरुण पांघरुण घेवून आलेले असतात.
सकाळची प्रसन्न सुरवात गुड मॉर्निंगने केली जाते. मग ब्रेकफास्ट झाला का, आजचे काय प्लॅन असे प्रेमळ प्रश्न विचारले जातात. आता असं ऐकण्यात आहे की सकाळी उठल्यापासून ब्रेकफास्ट पर्यंत ज्या गोष्टी केल्या जातात त्यांची हे नेटमजनू चौकशी करत नाहीत म्हणुन (उदाहरणार्थ : ब्रश कुठल्या कंपनीचा, पेस्ट कुठली, आंघोळीला गार का गरम पाणी, साबण कुठला वगैरे मौलिक माहिती) विशेषतः सर्व सिंगल, कलेक्टर ऑफिस वर मोर्चा काढणार आहेत. अणि त्यांना एक निवेदन देऊन ह्या होणार्या घोर अन्यायाविरुद्ध लढा लढणार आहेत.
(उल्लेखनीय वाक्य : तू नक्की ग्रीन टी पीत असणार. त्याशिवाय का तू एव्हढी स्लिम अणि ट्रीम आहेस इति नेटमजनू)
बरं! दुपारी एक ते दोनच्या दरम्यान, जेवण झालं का, व्यवस्थित जेवलात/जेवलीस ना, वगैरे गोष्टींची अत्यंत आस्थेने चौकशी केली जाते. ह्या सगळ्या आस्थेमागची तळमळ लक्षात यावी म्हणून अशा सर्व सिंगलच एक बौद्धिक घेतलं जाणार आहे. गवर्नमेंटकडून लवकरच ह्या बाबतीत एक सर्क्युलर निघणार आहे अणि ह्या नेटमजनू लोकांच्या भावनेची कदर करायला तिथे शिकवणार आहेत. ह्याशिवाय आणखीन एक महत्वपूर्ण माहिती तिथे दिली जाईल. ती अशी की ह्या नेटमजनू लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट अनेक दिवस/महिने तशाच लटकावून ठेवल्याने समस्त नेटमजनू ज्या मानसिक दडपणाचे बळी ठरत आहेत त्याबद्दल स्त्री वर्गाची जागृती. सर्व स्त्रीयांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट सेंसेटिव्ह’ बनवण्याबद्दल काही एनजीओ सुद्धा आता कार्यरत झाले आहेत.
अणि रात्री तर हे नेटमजनू तुमची ‘चॅट बडदास्त’ अशी ठेवतात की सिंगलना वाटेल आपलं उद्या लग्न झालं तर नवराही हे करू शकणार नाही. मॅरीड असाल अणि तुमच्या ‘अहों’नी ‘हि’ बडदास्त जर पहिली/वाचली तर ते उशीत तोंड घालून हमसून हमसून रडतील तरी किंवा अरे मी हे का नाही केलं ह्याचा पश्चाताप होऊन हिमालयात निघून जातील.
म्हणजे बघा ना! जेवण झालं का पासून गुड नाईट पर्यंत. जरा चार दिवसांची ओळख असेल तर नको ना जाऊ एव्हढ्या लवकर ह्या लाडिक हट्टापासून मिस यू पर्यंतच्या हृदयद्रावक करुणाष्टकापर्यंत सर्व ऐकून तुमचे कान अगदी तृप्त होतील.
हे नेटमजनू तुम्ही नेसलेल्या साडीचे, ड्रेसचे, ओढणीचे, तुमच्या स्टाइलचे मस्तं तोंड भरून कौतुक करत असतात. परवा एक जण सांगत होती की जे माझ्या मैत्रिणींना दिसत नाही ते माझं सौंदर्य, साडी/ड्रेसचा रंग, मॅचिंग टिकली अणि लीपस्टिक, उजव्या हातातल्या चार बांगड्या अणि डाव्या हातातल्या दोन, माझ्या डाव्या गालावरचा ‘क़ातिल’ तीळ ह्या सगळया गोष्टी नेटमजनू लोकांना दिसतात. हे ऐकून गवर्नमेंटने ह्या नेटमजनू लोकांना ‘दिव्य दृष्टि’ पुरस्काराने सन्मानित करायचं ठरवलंय.
नेटमजनू लोकांचे अथक प्रयत्न अणि चिकाटी बघून आता फेस बुक पण नवीन पुरस्कारांची घोषणा करणार आहे. जसे की, नेटमजनू शिरोमणि. अशा पुरस्कार विजेत्यांना जास्तीचा डेटा देणार आहेत. अणि ज्याला नेटमजनू जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल त्याच्या पुढच्या पिढीतील एकाला आयुष्यभर फ्री डेटा देणार आहे.
मधे एकदा ह्या नेटमजनू लोकांचं शिष्टमंडळ आयटी मिनिस्टरना भेटायला गेलं होतं. त्यांनी आपल्या मागण्यांचे एक निवेदन दिलं. त्यातल्या काही मागण्या मला मिनिस्ट्रीच्या ‘आतल्या सोर्स’ कडून कळल्या आहेत. साधारण अशा आहेत की, ‘आम्ही दिवस रात्र एव्हढी काळजी घेऊन/करून सुद्धा आम्हाला मिळावे तसे क्रेडीट मिळत नाही’, ‘आमचा वेळ अणि डेटा खर्च करून सुद्धा आम्हाला नीट वागणूक मिळत नाही’, ‘आमच्या फ्रेंड रिक्वेस्ट बर्याच जणींकडून स्विकारल्या जात नाहीत ते सुद्धा विनवण्या करून’ वगैरे. खूप रास्त अपेक्षा आहेत हां!
थोडक्यात काय! नेटमजनू लोकांच्या ‘कथा’ अणि ‘व्यथा’ सांगाव्यात तेव्हढ्या थोड्या आहेत हो!
महत्त्वाची तळटीप : अशाच प्रकारे काही नेट-लैला सुद्धा सक्रिय भूमिका पार पाडत आहेत बरंका!!
विक्रम इंगळे : 27 जून 2020
(व्हाटसपवरुन साभार… यात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक, साहित्याक्षर सहमत असतीलच असे नाही.)