जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : : डॉ.प्रतिभा जाधव
जगाच्या पोशिंद्याची आर्त हाक : ‘काळ्या आईची तहान
———————–
(काव्यसंग्रह- “काळ्या आईची तहान” द्वारा- गाव प्रकाशन,औरंगाबाद)*कवी – राजेंद्र दिघे ,मालेगाव)
अवघ्या जगाला संजीवनी देणारा बळीराजा स्वतःच बळी ठरत असलेला हा आजचा कडू काळ. ह्या कडू काळात जगाच्या पोशिंद्याची व्यथा-वेदना, अस्वस्थता कवी राजेंद्र दिघे यांनी काव्यसंग्रहात जोरकसपणे मांडली आहे. जगासमोर शेतकऱ्याच्या यातना, ससेहोलपट अगदी प्रामाणिकपणे ‘काळ्या आईची तहान’ मधुन मांडलेली दिसते.
‘काळ्या आईची तहान’ (प्रथम आवृत्ती) हा काव्यसंग्रह गाव प्रकाशन, औरंगाबाद यांनी सन २००९ मध्ये प्रकाशित केला आणि ह्याच काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती दि.२४ डिसेंबर २०१३ रोजी प्रकाशित झाली आहे. या द्वितीय आवृत्तीच्या अवलोकनानंतर या काव्यसंग्रहाबद्दल काही लिहावे असे मनापासून वाटत होतेच.
शिक्षक असणाऱ्या कार्यकर्त्या कवीची थेट काळजातून आलेली ठसठस म्हणजे ‘काळ्या आईची तहान’ मधील कविता असे प्रथमदर्शनी मला जाणवले. या काव्यसंग्रहात एकूण ६० कविता असून बहुतेक कविता ह्या शेतीमाती, शेतकऱ्याची करूण कहाणी, दुष्काळ, पाण्याची प्रतीक्षा, पिकांना मिळणारा बेभाव अशा आशयाच्या आहेत. कवी शिक्षकी पेशातील असला तरी त्याची पाळंमुळं ही शेतकरी कुटुंबाशी, मातीशी अतूटपणे जोडलेली आहेत. शेतकऱ्याच्या आयुष्यातील सारे उन्हाळे-पाणकळे राजेंद्र दिघे यांनी बालवयापासून जवळून सोसले, अनुभवलेले आहेत त्यामुळे त्यांच्या कवितांमधून ते प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. जातीय सामाजिक भेदाभेद, अन्याय,भ्रष्टाचार हेही त्यांच्या कवितांचे विषय आहेत.
या काव्यसंग्रहास ज्येष्ठ कवी आदरणीय कमलाकर देसले म्हणजेच आम्हा लिहित्या लोकांचे ‘आबा’ यांची अत्यंत अभ्यासकपूर्ण,बोलकी अशी प्रस्तावना लाभलेली आहे. त्यात पहिल्याच परिच्छेदात त्यांनी लिहिलेले “बहुजन समाजाच्या हाती कर्माच्या साधनांबरोबर ज्ञानाचे, साहित्याचे साधन आले,लेखणी हातात आली” त्याचप्रमाणे “काव्यसंग्रहाच्या शिर्षकावरूनच कवीच्या चिंतेचा आणि चिंतनाचा पैस लक्षात येतो. या कार्यकर्त्या कवीची कविता स्वतःचा चेहरा घेऊन साहित्य रसिकांशी या संग्रहातून हितगुज सांगते.”(पृ.१०) ही प्रस्तावनेतील विधानं कवी व कवितेविषयी महत्वपूर्ण वाटतात.
काव्यसंग्रहाच्या प्रारंभी असलेल्या कवीच्या मनोगतातून कवीची लेखनामागील प्रेरणा, प्रांजल भूमिका अनुभवास येते. त्यात कवी राजेंद्र दिघे यांनी लिहिलेली “मातीतूनच नाती जोपासली जातात, त्या मातीचं देणं लागतो ही भावना संवेदनशील मनाला स्वस्थ बसू देत नाही, अस्वस्थतेच्या वेदनांतून शब्द फुटतात त्या अनुभवांचे गुज उमलणारी काव्यभावना या काव्यसंग्रहातून व्यक्त झाली आहे.” ही वाक्ये एका पद्धतीने त्यांचे कवी म्हणून अंतरंगच उलगडून दाखवते.(पृ.५)
काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ विलक्षण बोलके आहे.
या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता कवीच्या अहिराणी मायबोलीतील असून अर्थात ‘शेतकरी’ असे तिचे शीर्षक आहे. ऊनवाऱ्यातील, जीवाला शीण आणणाऱ्या कष्टाला सामोरे जाणारा शेतकरी ते पिकाला जीवापाड जपत घरातील धान्याची भरलेली कणगी पाहणारा शेतकरी हा प्रवास अवघ्या १४ ओळीत मांडताना ते लिहितात की,
*’ऊन वाराना या दिन*
*शेतकरीना जीवले सिन*
*घाम नितरस अंगभर*
*तवय लागस नांगर*
कवितेच्या अखेरच्या भागात ते म्हणतात,
*दिसंस डोयाले वानगी*
*जवयं भरी धान्यानी कणगी*
*काया मायना ह्या लेकरं*
*तवय व्हतस बिनघोर* (पृ.१५)
याच अहिराणी बोलीतील ‘हुंडा’ (पृ.४३) ही कविता या संग्रहात वाचायला मिळते.या काव्यसंग्रहात छंदोबद्ध काव्य आहे तसेच मुक्तछंदातील काव्यही आहे. इथल्या व्यवस्थेवर, लोकशाहीतही सत्तेतून नांदणाऱ्या हुकूमशाहीबद्दलचा रागही ते आपल्या ‘सत्ता’ (पृ.१८), ‘सारे काही इथलेच’ (पृ.२०) यांसारख्या कवितांतून व्यक्त करताना लिहितात की,
*’पारतंत्र्य गेलं स्वातंत्र्य आलं*
*हुकूमशाहीशिवाय कुणीच बोलेना*
*माजलेत गुंड झाले सारे दांड*
*सत्तेपुढे शहाणपण कधीच चालेना* (पृ.१८)
*’इथलेच जिणे इथलेच बहाणे*
*लोकशाहीमध्ये उरले थोडे शहाणे* (पृ.२०)
अस्मानी-सुलतानी संकटाचा जगात पहिला बळी जर कुणी असेल तर तो शेतकरी असतो. पूर येवो वा दुष्काळ-अवर्षण त्याची पहिली झळ बसते ती बळीराजाला म्हणून कवी आपल्या ‘पूर’ या कवितेत म्हणतो की,
*सारं रान भिजलं*
*माळरान भिजलं*
*तुह्या या येण्याने*
*सारं आभाळ फाटलं*
*कसं बसला हा बाप?*
*दुःख घेऊन उरात*
*नाही उरलं सरलं*
*मह्या बापाच्या घरात…* (पृ.२६)
‘ओला पाऊस’ या कवितेतून कोरड्या आषाढातील आपली इवली प्रामाणिक इच्छा कवी मांडताना लिहितो की,
*’आषाढ श्रावणात*
*भरल्या नभाला*
*थेंब थेंब पाण्याचा*
*पाझर फुटावा…*
*जसं नवसानं आलेला*
*नक्षत्राने दिलेला*
*ओल्या पावसानं*
*भिजलेला समुद्र दिसावा…* (पृ. ३३)
पिकाला भाव नसताना साधं भांडवलही जेव्हा सुटत नाही तेव्हा शेतकऱ्याची जी तगमग होते ती कुणीच समजून घेऊ शकत नाही ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ या म्हणीप्रमाणे भाव नसताना अभावच वाट्याला आलेला शेतकरी वर्षं कसं काढावं? चूल कशी पेटावी? या प्रश्नांनी बेजार होतो. हीच भावना ‘भूक’ या कवितेत मांडताना कवी लिहितो की,
*’दिसं रातीच्या कष्टामधी*
*हरपली भूक*
*उन्हामंधी तापलेल्या*
*विस्तवाची झालीया राख*
*भुईच्या मातीला*
*पिकली रताळी*
*भावावीण व्हईल*
*कशी ही दिवाळी*
*दिव्याच्या वातीला*
*नव्हतं तेल*
*कशी ही धावेल*
*जीवनाची मेल?* (पृ.३५)
निसर्गाने, व्यवस्थेने त्रस्त शेतकऱ्याची हिच हतबल भावना आपल्या ‘व्यथा बळीराजाची’ या कवितेत कवी चितारतो की,
*’बाप मह्या हा आसवं गाळत*
*बसला बांधाला…*
*कोपीमंधी उरलं नाही*
*दाणं कणगीला*
*पोर झाली ती जवान*
*उद्या लग्नाला,*
*रान इकावं पैशासाठी*
*तिच्या हुंड्याला…* (पृ.३६)
ह्याच वेदनेचा धागा पुढे नेत शेतकऱ्यास कापूस पिकवताना ,कष्टताना, अतोनात राबताना आलेलं मरण कवी ‘मातीतलं मरण’ या कवितेतून व्यक्त करताना लिहितो की,
*गेलं दिसामागून दिसं*
*बाप बसला साहत*
*पंधरा तीन त्या वारात*
*तोल मापाच्या नादानं*
*उरली कोरकी भाकर*
*गेली भात्यात सरून*
*थंडीच्या लाटेत*
*आलं अंग हे भरून*
*कष्ट करत करत*
*जसं पेटलं सरण*
*दिलं अंगाला झोकून*
*आलं कापसातच मरण* (पृ.५२)
शेतकऱ्याची ही वाताहत वाचकास विषण्ण करून जाते. कवीच्या लेखणीत वेदना मांडण्याचे सामर्थ्य या कवितेतून स्पष्टपणे जाणवते.
मोलमजुरी करणाऱ्या सतत अन्यायाचे बळी ठरणाऱ्या उपेक्षित जीवांबद्दलची तळमळ आपल्या ‘जीवन’ या कवितेत व्यक्त करताना ते म्हणतात की,
*’तहान भूक भागवण्यासाठी*
*जीवाचे रान करणाऱ्या*
*कष्टकऱ्याना घामाचा*
*दाम तरी मिळेल का?*
*सतत अन्यायाच्या छत्राखाली*
*वावरणाऱ्या निरपराध*
*निष्पाप जणांना*
*न्याय कुणी देईल का?* (पृ. ३९)
पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याची पावसाची आस आणि पावसाचाच ध्यास ‘काळ्या आईची तहान’ या शीर्षक कवितेतून व्यक्त करताना कवी राजेंद्र दिघे म्हणतात की,
*’वाळत चाललं*
*काया मातीतलं उभं ताट*
*कवा वाहिलं वाहिलं*
*पाऊस पाण्याचा ह्यो पाट*
*भेगाळली काळी आई*
*तिची तहान कधी जाई*
*कवा वाहिलं वाहिलं*
*पाऊस पाण्याचा ह्यो पाट’* (पृ.५४)
मालाला मिळणारा कवडीमोल भाव, किमान गुंतवलेले भांडवलही हातात पडू नये इतकी संतापदायी तेवढीच हतबल परिस्थिती, पतपेढ्या- सावकाराकडून घेतलेले कर्ज, नात्यागोत्याकडून घेतलेली उसनवारी,मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, वर्षभराच्या अन्नपाण्याची तजवीज, पुढील लावणीसाठी हाती असणारी शून्य रक्कम ही सारी संकटे एकदाच शेतकऱ्यावर कोसळतात. सारे प्रश्नच भोवताली दिसू लागतात, भूकतहान उडवतात तेव्हा जगण्यापरिस या शेतकऱ्यास मरणे सोपे वाटू लागते आणि गळफास खुणावू लागतो हेच भयावह , विचारशील करणारे चित्र कवी आपल्या ‘गळफास’ या कवितेतून मांडतो की,
*’लई झालंय वझं*
*सावकाराचा त्रास*
*अन मह्या बाच्या गळ्यात*
*गळफास…*
*काया मातीला नाही ठावं*
*आभाळ भरल्या थेंबाचा घास*
*तवा जाईल कसा ह्यो*
*बाच्या अंतरीच्या जखमेचा वास*
*अन मह्या बाच्या गळ्यात*
*गळफास…* (पृ.५६)
पावसाला आळवत कवी आपल्या ‘पावसा’ या कवितेत म्हणतो की,
*’अरे पावसा पावसा*
*व्हऊ दे रे थोडी माया*
*चिडी-मुंगी, पाखराचे*
*डोये लागले आभाया’* (पृ.६७)
पाणी बरसावं म्हणून नवस करून थकलेल्या शेतकऱ्याचे दुःख मांडताना ‘तू यावं म्हणून’ या कवितेतून कवी म्हणतो की,
*’तू यावं म्हणून*
*लई नवस केले*
*तुही वाट पाहण्यात*
*लई दिस गेले* (पृ.६८)
‘पाऊस’ (पृ.७३) या कवितेतून पावसाची नानाविध रूपे कवीने मांडलेली आहेत. तशीच आर्त भावना ‘घास’ या कवितेतही मांडलेली आहे.
*’उदास राने ओसाड वाटे*
*दुभंगली मने आसवं दाटे*
*वाळली पाने भकास झाडे*
*उपाशी जिणे गळा घास आडे’* (पृ.७४)
उल्हसित करणाऱ्या श्रावणात बळीराजाही आनंदून उठतो, हिरव्यागार पृथ्वीची स्वप्न त्यास पडू लागतात. या श्रावणाबद्दल ‘श्रावणातला पाऊस’ या कवितेत कवी म्हणतो की,
*’श्रावणातल्या पावसानं…*
*कसा सडा शिंपडावा*
*झाडाझाडाच्या फांदीत*
*हिरवा चुडाच भरावा!’*(पृ.४६)
यातील हिरव्या चुड्याची प्रतिमा वाचकाच्या डोळ्यासमोरही श्रावण उभा करते. तसेच वसंतात शेतकरी कवीच्या मनातील भाव ‘आला वसंत’ या कवितेत वाचायला मिळतात ते असे,
*’आला वसंत वसंत*
*ऋतुराजाची पसंत*
*धुराळती नवे रंग*
*लाल पिवळ्यात दंग’* (पृ.५५)
ऋतू बदलतो , दिवस पालटतात, कपाळाच्या आठ्या पावसाबरोबर मावळतात. घन बरसू लागले की शेतकऱ्याच्या वाळवंटी जगण्याला कुठेतरी हिरवी पालवी फुटू लागते. हिच भावना आपल्या ‘धरणीमाय’ या कवितेतून कवी पुढीलप्रमाणे मांडतो,
*’चिंब भिजल्या सरीत*
*माय रानात हसली*
*कोंब उगल्या मातीत*
*पानं हरित दिसली*
*आला मिरूगाचा पाणी*
*धन्यानं कंबर कसली*
*गाऊ रानावर गाणी*
*माय धरणीची ओटी भरली’* (पृ.६४)
मृग बरसताच कवीला आपल्या मायबापाच्या डोळ्यात अमाप हासू,आनंद दिसू लागतो.तो आनंद टिपताना कवी लिहितो की,
*’माय म्हणे कशी*
*रानामंधी मोर नाचला*
*शेतशेतात या…*
*मृग बरसला*
*मह्या बाच्या डोयांत*
*आनंद दिसला*
*वादळात या…*
*मृग बरसला*(पृ. ६५)
ही कविता वाचताना वाचकाच्या मनातही मृग बरसल्याशिवाय राहात नाही हे या कवितेचे वेगळेपण आहे.
शेतीमातीच्या कविता ‘काळ्या आईची तहान’ या काव्यसंग्रहात आहेत त्याचप्रमाणे मानवी जीवनाशी निगडित विविध विषय या कवितांतून पाहायला मिळतात. आईविषयीची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविताही यात आहेत. त्यापैकी ‘आईविना’ ह्या कवितेतील
*’जळणाऱ्या चितेत जेव्हा*
*माझी आई….*
*लख्ख कोळसा होतेय तेव्हा*
*शरीर सुन्न होतं अन मनही’* (पृ. ७१)
या ओळी वाचून अंगावर रोमांच उभे राहतात आणि मन कमालीचे हळवे होते.
कवीचे आईवरील नितांत प्रेम या काव्यसंग्रहातील अनेक कवितांतून ठळक दिसते. ‘आईचे प्रेम’ या कवितेत कवी म्हणतो की,
*’किती सोसले दुःख तू*
*माया तुझी आम्हावरी*
*कष्ट केलेस दिस राती*
*आई तूच या जगता खरी* (पृ. ६९)
आईचं ‘नसणं’ किती वेदनादायी असतं याची कल्पना ‘आई’ या कवितेतून आपणास येते. त्यात कवी म्हणतो की,
*’गाय गोठ्यात पाहुनी*
*मनी दाटे भावना*
*माझ्या प्रेमाची आई*
*कधी फिटे गं कामना’*(पृ.५१)
आज जगरहाटीस सरावलेल्या मुलाला आईच्या त्यागाचे श्रमाचे चटके समजू लागले आहेत. तिची दुःख किती मोठी आभाळाएवढी होती, तरीही तिने कधी तक्रार केली नाही की ती कधी खचली नाही. तिच्या त्यागमय मूर्तीविषयी कवी लिहितो की,
*’वेदना सोसताना*
*आठवतात आजही ते दिवस*
*आईला झालेल्या जखमांचे*
*अनवाणी चालताना*
*आठवतात आजही ते दिवस*
*आईला टोचलेल्या*
*विषारी काट्यांचे* (पृ.२८)
राजकारण, सत्ता, विविध मानवी प्रवृत्ती यांवर भाष्य करणाऱ्या इतर कविताही यात आहेत. विविध प्रसंगानुरूप शिक्षक,सहकारी,महापुरुष यांच्याविषयी लिहिलेल्या कविताही या संग्रहात आहेत. उदा. निरोप देताना (पृ.७६), नाना (पृ.६६), मैत्री (पृ. ६२), तू जाताना (पृ.६०), माझ्या कवितेत (पृ.६१), शिस्तीचा स्तंभ तूच खरा (पृ.५०), स्मरा रे स्मरा (पृ.४९), इथे जन्मली व्यथा (पृ.४७) इत्यादी.
कवी राजेंद्र दिघे यांच्या काव्यसंग्रहातील शेवटची कविता मात्र मला सार्वकालिक वाटते. सांप्रतकाळात तर ती चपखल बसते. सत्तेसाठी ‘काहीही’ ही वृत्ती जोवर इथल्या विविध पक्षांत व नेत्यात आहे तोवर घटनेची पायमल्ली करण्याचा गुन्हा येथील सत्ताधारी करत राहतील. संविधानातील मार्गदर्शक तत्वांनाचा हरताळ फासून आपणच सच्चे देशभक्त हा दांभिकपणा सुरूच राहील. गोरे राज्यकर्ते गेले ,काळे आले आणि जनतेचस आणखीच दैन्य आले. धर्मनरपेक्षता, बंधुभाव या संविधानिक मुल्यांना सुरुंग लावणारी विघातक प्रवृत्ती आज बोकाळतेय म्हणून इथल्या नेत्यांना, राज्यकर्त्यांना कवी जाब विचारतो की,
*’एवढ्याचसाठी काय?*
*बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनं तुम्हाआम्हास स्वातंत्र्य दिले?*
*समता,स्वातंत्र्याच्या नावाखाली*
*एकताच सारी आटवली*
*धर्मनिरपेक्षतेचा आव आणून*
*बंधुभावाची सर्वधर्मसहिष्णूता बाटवली* (पृ. ७९)
एकंदर कवी राजेंद्र दिघे यांची कविता ही वर्तमानकाळाशी प्रामाणिक अशी कविता आहे. किरकोळ व्याकरणीक त्रुटी या संग्रहात आहेत परंतु त्यांचा कवितेवरील आशयावर विशेष प्रभाव पडत नाही. तसेच कवितांचा क्रम आशय-विषय अनुरूप सुयोग्य पद्धतीने लावता आला असता असे कविता वाचताना लक्षात आले. पुढील काव्यसंग्रह करताना कवी या लहानसहान बाबींकडे सजगतेने बघेल ही खात्री आहे. या कविता नवीन विचार देणाऱ्या आणि विचार-भावना यांच्याशी प्रामाणिक आहेत. त्यात कुठेही शब्दांची जुळवाजुळव वा कृत्रिमता नाही. प्रामाणिक व पारदर्शी अशा ह्या कविता आहेत. उत्तरोत्तर अधिक सकस व सभोवतालास सजग करणाऱ्या कविता कवी राजेंद्र दिघे यांच्या लेखणीतून निपजो हिच मनापासून सदिच्छा देते आणि थांबते!
———————-
— *प्रा.डॉ.प्रतिभा जाधव*
*(समीक्षक,वक्ता,साहित्यिक,एकपात्री कलाकार)*
*नाशिक*
pratibhajadhav279@gmail.com