अपमानाचे परिणाम – चांदबीबी प्रकरण ४ थे
एका अपमानाचे परिणाम
मूदगलच्या या दोन पुजाऱ्यांच्या प्रगतीतील फरक सांगण्याची आपणास काय गरज? एक हिंसक, उद्दाम, बेईमान तर दुसरा हळवा, शांत , स्थितप्रज्ञ, धमक्या आणि छळाला न घाबरणारा. त्याने वेळोवेळी त्याच्या सहकाऱ्याचे मंडळी प्रती असलेले हिंसक वर्तन, पुन्हा पुन्हा घडणारी अनैतिकता , अनियमितता उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो व्यर्थ होता. गोव्याच्या आर्च बिशपशी डॉम डिएगोचे चांगले संबंध होते. चौकशी करणारे सुद्धा त्याचे मित्र होते. त्याला त्याच्या सहकारी फ्रान्सिस्कन तपस्वीच्या तक्रारीची फिकिर नव्हती. त्याने मेंढपाळांचा एक गटही तयार केला होता. त्यात काही उनाड तरुणसुद्धा होते जे तपस्वीच्या भक्तीची थट्टा करत, त्याचा सल्ला आणि भक्तीच्या आदेशांचा विरोध करत. आपल्या सहकाऱ्यापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या दिशेने डॉम डिएगोचे हे पहिले पाऊल होते. त्याला त्याच्या स्वतःच्या कामामध्ये ढवळाढवळ केल्याबद्दल चौकशीत दोषी ठरवणे यापेक्षा सोपे ते काय?
ज्या अध्यात्मिक बाबी सोडवण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते त्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्याला दोषी ठरवणे यापेक्षा दुसरे काय यशस्वी होऊ शकते? हेही पुरेसे नसेल तर चर्च चे शत्रू असलेल्या मुसलमानांशी जवळीक केल्याबद्दल, तो आणि त्याची बहीण डोना मारियाने मुदगलच्या नवाबाला सारख्या भेटी दिल्या बद्दल त्याला दोषी ठरवता येऊ शकते. आह! तो त्यांना वेगळे करु शकतो का, त्या सुंदर मुलीला कोण वाचवू शकेल? तिला पहिल्यांदा पाहिल्या पासून इतक्या सुंदर, इतक्या तरुण मुलीला मिळवण्याच्या दुष्ट विचाराने त्याच्या इतर भावनांवर मात केली होती.तिच्या ताब्यासाठी काहीही करण्यास कोणतीही जोखीम फार मोठी असू शकत नाही आणि तरीही अशी कृती करणे- तिला बळजबरीने दूर नेणे – म्हणजे त्याचा स्वतःचा नाश आणि कदाचित मृत्यू सुनिश्चित करणे असेल. नाही सगळं कसं हळू हळू व्हायला पाहिजे. एकदा का तिचा भाऊ चौकशीसाठी गोव्याला गेला की काही महिने नाही काही वर्षे तरी त्याला काही बातमी किंवा मदत मिळण्याची शक्यता नाही.हा एक भयंकर कट होता, आणि दिवसेंदिवस त्याला स्वतःला रोखणे अधिकाधिक कठीण होत गेले, कारण तिच्या अतीव सौंदर्याच्या सतत दिसण्याने त्याला जळजळ होत होती. चर्चच्या सेवेत तो सतत तिच्याशी जवळीक साधत होता.
त्याने आपला अहवाल गोव्याला लिहिला. त्यात फ्रान्सीस डी’आल्मेडा याचे वर्णन केवळ एक पुस्तकी किडा, चर्चच्या सन्मान आणि शिस्तीकडे दुर्लक्ष करून, विधर्मी पुस्तकांच्या अभ्यासात गढून गेलेला असे केले होते यात पुढे तो लिहितो- त्याचे सर्वात जिवलग मित्र ब्राह्मण पुरोहित आणि मुस्लिम आहेत. चर्चमधील मेंढपाळांना दिलेली त्यांची व्याख्याने विधर्मी शिकवणीचे केवळ रूपांतरं आहेत, ज्यामध्ये त्याने स्वत: काही चूक केली नसेल तर बरे, तशी तो कोणत्याही क्षणी करू शकतो आणि अशा प्रकारे विश्वासू मिशनऱ्यांनी परदेशात मोठ्या परिश्रमाने उभे केलेले चर्च गमावले जाऊ शकते आणि पुन्हा विधर्मीवादात पडू शकते, ख्रिश्चन धर्माची निंदा करण्याचे हे एक षडयंत्र आहे. त्याची बहीण, डोना मारिया, जरी तिने उघडपणे धर्माचा प्रसार केला असला तरीही ती प्रत्यक्षात तिच्या भावापेक्षा अधिक भ्रष्ट आहे. तिच्या सततच्या आश्रय स्थाना पैकी एक नवाबाचे घर आहे, जिथे तिचे सौंदर्य आणि कर्तृत्वासाठी तिचे कौतुक केले जाते. नवाब खूप श्रीमंत आहे, आणि त्याला एक मुलगा आहे, जो आता युद्धांमध्ये गुंतलेला आहे, परंतु तो परत आल्यावर डोना मारियाशी लग्न करेल अशी बातमी आहे. शेवटी, डॉम डिएगोने सल्ला दिला की फ्रान्सिस डी’आल्मेडाला ताबडतोब एकटे पाठवले जावे, त्याला ताकीद दिली जावी आणि गरज पडल्यास त्याच्या हलगर्जीपणाबद्दल खटला चालवावा; आणि त्याची बहीण भावाच्या परत येण्याची वाट पाहण्यासाठी इथेचं ठेवावी किंवा परिषदेच्या हुकुमाप्रमाणे तिला गोव्याला पाठवावे.
या अहवालातून दुष्ट हेतूचा कुठलाही संशय येत नव्हता की हिंसा व्यक्त होत नव्हती. यातून असा निष्कर्ष निघाला की एक पात्र अणि अती अभ्यासू व्यक्तिमत्त्व हळू हळू हलगर्जी बनत गेले, ज्याची भरपाई केवळ वरिष्ठांच्या आज्ञेनेच होऊ शकते. त्या पुजाऱ्याला शक्य तितक्या लवकर परिषदे समोर हजर राहण्याचा आदेश चर्च च्या अधिकाऱ्यांनी दिला. गोव्या पासून मुदगलला संदेश पाठवणे सोपे काम नव्हते. काही विशेष संदेशवाहकच हे काम करु शकत. जोखीम घेणाऱ्या व्यक्तीच देशातून मार्गक्रमण करून संदेश घेऊन मागे येऊ शकत. काहीवेळा मुदगलच्या कापूस आणि लोकरीच्या बदल्यात आपली किनारपट्टीवरील उत्पादने घेऊन जाणारे व्यापारी आणि वाहक ही पत्रे पोचवत. अशाच एका गटाकडून डॉम डिएगोला तो वाट पाहत असलेले परिषदेचे पत्र मिळाले होते.
त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही झाले होते. त्याच्या सहकाऱ्याला चर्चच्या कारभारातून निलंबित करण्याचे अणि लवकरात लवकर गोव्याला पाठवण्याचे अधिकार डॉम डिएगोला मिळाले होते. पत्रात त्याला चौकशी साठी हजर राहण्याचाही उल्लेख होता. पत्रात डॉम डिएगोच्या सतर्कतेची आणि चर्चच्या कल्याणासाठी काम करण्याच्या उत्साहाची प्रशंसा केली होती.डोना मारिया बद्दलच्या त्याच्या प्रस्तावाची दखल घेण्यात येऊन आवश्यकता असेल तो पर्यंत तिला चर्चच्या परिसरात ठेऊन लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले.
डॉम डिएगोला दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास फार वेळ नव्हता. त्याला पत्र मिळाल्याबरोबर सकाळच्या सभेनंतर शब्बथच्यावेळी त्याने त्याच्या सहकाऱ्याला निलंबित केल्याचे जाहीर केले आणि परिषदेकडून मिळालेला आदेश त्याने फ्रान्सिस डी अल्मिडाला दिला. त्याने तो आदराने स्वीकारला. कानडी भाषा जाणणारा दुसरा पुजारी लवकरच पोचेल असे त्याने दुभाषाच्या माध्यमातून जाहीर केले.
डोना मारियाने ती घोषणा जड अंतःकरणाने ऐकली ज्याचे वर्णन करता येणार नाही. तिचा भाऊ वेदीवर काम करत होता आणि ती थोड्या अंतरावर तिच्या वर्गातील मुलांना घेऊन बसली होती. तिने तिच्या भावाला नेहमी पेक्षा लवकर जाताना पाहिले. त्याने नेहमी सारखे मुलांना तपासण्याचे टाळले. त्यामुळे तिने मुलांना सोडून दिले अणि ती घरी गेली. तिथे तिचा भाऊ तिला वध स्तंभा समोर गुडघे टेकून बसलेला दिसला. त्याचा आदेश त्याचा पायाजवळच. पडलेला होता. तो प्रार्थना करत होता घामाचे थेंब त्याच्या भुवयांवर दिसत होते. त्याच्या देवाने जशी क्रॉस वर जाताना वेदना आणि लाज सहन केली होती तसे.डोना मारियाने त्यात व्यत्यय आणला नाही आणि प्रार्थनेचे फक्त शेवटचे शब्द ऐकून ती दरवाजाच्या मागे सरकली.
“आणि आता, हे माझ्या प्रभू, जर तुझी इच्छा असेल तर या धोक्यापासून माझे रक्षण कर. जर मला लाज, यातना किंवा मृत्यू सहन करावा लागला, तर तू मला दयाळूपणे साथ दे. तुझ्या कार्याकडे दुर्लक्ष केल्याची मला जाणीव नाही, परंतु मी केलेल्या अनेक चुका आणि उणिवा, अनेक नकळत झालेल्या पापांची जाणीव आहे, तर, हे माझ्या तारणहारा, मला तुझ्या दयाळू हातांची आणि काळजीची गरजआहे शंका घेऊ नकोस, घाबरू नकोस, परंतु माझ्या पूर्ण विश्वासाने हे प्रभु, तुझी इच्छा पूर्ण होईल.”
मग त्याने आपले डोके वधस्तंभाच्या पायावर टेकवले, आणि काही क्षण तो उत्कटतेने रडला आणि शांतपणे उठला आणि सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार झाला. त्याची बहीण त्याला चेंबरच्या दारात भेटली आणि त्याच्या गळ्यात पडली . त्याच्या नम्र प्रार्थनेने तिला हलवले तरी तिला रडू येत नव्हते; तिचे मन निराशेने ग्रासले होते, ज्यात आशेचा कोणताही किरण शिल्लक नव्हता. ” भाऊ! भाऊ!” ती सतत ओरडत होती, “तू हे कसं सहन करणार? त्याने तुझ्यावर केलेल्या आरोपा सारखे तू काय केलेस?”
“मी सहन करीन, मारिया,” तो तिच्या कपाळाला ओठांनी स्पर्श करत हळूवारपणे म्हणाला. “त्याने, आमच्या प्रभुने , विजय मिळावा यासाठी लाज सहन केली, आणि मला भीती वाटत नाही, आणि तुही घाबरू नकोस ख्रिस्त आणि चर्चचे सैनिक कधीही संकटात डगमगत नाहीत. मी तुला सांगतो, घाबरू नकोस.”
“मी फक्त एक कमकुवत स्त्री आहे,” ती म्हणाली, “आणि स्त्रियांमध्ये पुरुषांची शक्ती नाही; पण प्रभूची इच्छा काय आहे ते मी सहन करू शकेन. डॉम डिएगोच्या विरोधात मी बंड केले पाहिजे. तो आदेश बरोबर आणि कायदेशीर आहे का?”
“हे दोन्ही आहे,” तिच्या भावाने उत्तर दिले, तो कागदपत्र घेऊन परत आला जो त्याने ठेवला होता. “हे दोन्ही आहे; नाही, बहिणाबाई, तू ते स्वतःच वाच. मी आता पवित्र परिषदेच्या सूचना आणि आदेश घेण्यासाठी जातो, आणि त्यांना वाटते की मला त्यांची गरज आहे. चर्चच्या मुलाला त्याच्या पूर्वजांना भेटण्यासाठी नक्कीच घाबरण्याची गरज नाही.”
मला माहित नाही,” तिने थरथरत्या आवाजाने उत्तर दिले. “मला माहीत नाही. मी गोव्यात असताना अनेकांना भयंकर मृत्यूला सामोरे जावे लागले, आणि
“नाही, पण माझ्या प्रिय बहिणी, कारण ते मृत्यूस पात्र होते. अयोग्य पापी आणि धर्मत्यागी यांच्याशी चर्च कठोरपणे वागते, जसे की त्याला परधर्मीय देशात आवश्यक आहे, परंतु मला भीती वाटत नाही, आणि आमचा प्रिय समाज माझ्यासाठी साक्ष देईल आणि होमिलिचे जे भाषांतर माझ्याशिवाय कोणीही निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, चर्चच्या हितासाठी माझ्या कामाची साक्ष देईल. नाही, मारिया घाबरू नकोस, उलट मला हे सांगण्याची संधी मिळाली आहे की मी खूप विनम्रपणे काम केले आहे. तू मात्र आपल्या घरी शांततेने राहशील आणि आता पर्यंत जसे काम केले तसे निर्भयपणे करशील. प्रभूच्या मार्गदर्शनाखाली मी लवकरच सुरक्षितपणे परत येईन.”
“अरे, असं बोलू नकोस,” ती घाबरून त्याला बिलगून ओरडली. “त्या दुष्ट पुजाऱ्या बरोबर मला एकटे सोडू नकोस. अरे, मदर मेरीच्या प्रेमासाठी, मला एकटे सोडू नकोस, माझी हिंमत नाही.
“तुलाही बोलावले असते तर,” तो परत आला, “आपण एकत्र जाऊ शकलो असतो, पण आता भयंकर उष्मा आणि येणारा पाऊस आणि वारा यांचा विचार करतो, ज्यात तुला नेण्याची माझी हिंमत नाही. नाही, बहिणी. , ते जसे आहे तसेच आहे, नवाब आणि आमच्या लोकांमध्ये तुला पुरेसे संरक्षक आहेत.
“कदाचित ही निरुपयोगी भीती आहे,” ती रडत म्हणाली, “आणि मी एकटेपणा आणि चिंता सहन करणारी एक कमकुवत स्त्री आहे, परंतु जर तुला हे माझे कर्तव्य वाटत असेल तर मी परमेश्वराच्या इच्छेला आणि तुझ्या इच्छेला नतमस्तक आहे, आणि नक्कीच करेल. हेच माझ्या साठी सर्वोत्तम.”
“आह!” तो परत आला, अभिमानाने हसत,” माझ्या
शूर बहिणीचा आत्मा पुन्हा बोलला; आणि मी तुला सांगतो, मारिया, जर त्याने किंवा कोणी तुला धमकावले तर आमच्या मेंढपाळांच्या कळपात अनेक तलवारी आहेत ज्या तुझ्यासाठी उपसल्या जातील, एरवी शांत असले तरी ते एका माणसाचे सैनिक आहेत, आणि त्याला घाबरू नकोस, तो तुला दुखावणार नाही!”
मारिया शांत झाली, पण समाधानी नाही. तिला पुजाऱ्याची भीती वाटत होती. ती स्वत:पासून लपवू शकली नाही की तिच्याबद्दलची वाईट, कामुक प्रशंसा कधीकधी त्याच्या विवेकावर मात करते आणि त्याचे स्वरूप आणि वागणूक पुजाऱ्यासारखे नव्हते तर एका दुष्ट सैनिकाचे होते. तरीही, त्याने बोलण्यात तिला कधीही अडवले नाही.चर्चच्या व्यवहारांशिवाय, तिने त्याच्याशी काहीही संभाषण केले नाही. जेव्हा तो घरात आला तेव्हा ती तिच्या नेहमीच्या खोलीत माघारी गेली. तिने तिचा भाऊ आणि डॉम डिएगोला एकत्र सल्लामसलत करण्यासाठी सोडले. परंतु त्या जळत्या डोळ्यांच्या अभिव्यक्तीबद्दल कोणती सद्गुणी स्त्री शंका घेऊ शकते? परंतु या अनामिक भीतींसाठी, केवळ स्वत: ला आणि देवाला ज्ञात असलेल्या भीतीसाठी, तिने तिच्या भावाच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना केली. त्याच्या पवित्र उपयुक्त श्रमांची खरोखर प्रशंसा करू शकणाऱ्या लोकांना ज्ञात होण्याच्या आशेने ती आनंदित झाली.
त्या दिवशी मंडळीतील पुष्कळ पुरुष आणि स्त्रिया त्यांच्याकडे आले आणि शब्बाथ दिवशी नेहमीप्रमाणे त्यांच्याशी प्रार्थना आणि संभाषण करण्यात वेळ गेला; आणि सर्वांनी त्यांची आपुलकीने आणि प्रामाणिकतेने विचारपूस केली आणि आवश्यक असल्यास मदत आणि संरक्षणाची हमी स्त्रिया तसेच पुरुषांनी दिल्याने दोघांनाही दिलासा मिळाला.
“आम्ही तीनशे धडाकेबाज सहकारी आहोत,” एक दिग्गज वृद्ध मेंढपाळ, ज्यांनी डिकॉनचे पद भूषवले होते, म्हणाले, “आणि आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या काळात युद्ध पाहिले आहे आणि आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे घाबरू नका, बाई, तीनशे चांगले सैनिक तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतात अगदी गोव्यात किंवा बीजापूरला सुद्धा. तुम्ही आमचे प्रिय मित्र आहात आणि जर महाराणी चांद तुम्हाला भेटू शकतील तर ते तुम्हाला तिच्याकडेसुद्धा घेऊन जातील. नवाबही तुझा रक्षक होईल!” म्हातारा पुढे म्हणाला, “या सर्वांसह तुझी आज्ञा पूर्ण करण्यासाठी तुला घाबरण्याची गरज नाही.”
अशा प्रकारे दिवस निघून गेला; आणि तिचा भाऊ दुपारची सेवा पार पाडू शकला नसला तरी, मारिया नेहमीप्रमाणे चर्चमध्ये सेवेसाठी गेली, जी प्रचंड उष्णतेमुळे संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती, तिने गिटार सोबत घेतली, कारण तिला मोठ्या मुलींना एक नवीन स्तोत्र शिकवायचे होते. आणि ते फक्त ऐकून शिकवले जाऊ शकत होते. वेदी पूर्णपणे प्रकाशित होती आणि बाकीच्या चर्चमध्ये इतस्ततः मंद दिव्यांचा प्रकाश होता.
डॉम डिएगोने नेहमीप्रमाणे सेवा केली, आणि तो निघून गेला. मारिया, दिवे लावणाऱ्या म्हाताऱ्याला वेदीवर दिवे लावण्याची विनंती करत, मुलींच्या छोट्या तुकडीला वेदीच्या पायऱ्यांकडे घेऊन गेली आणि तिथे बसून तिचे वाद्य वाजवले, आणि स्तोत्र सुरू केले. काय आवाज होता तो! पूर्ण, श्रीमंत आणि भेदक आणि त्या रिक्त चर्च मधून गोड अनुनादासह प्रतिध्वनीत होत होता. तो न ऐकता कोणीही पुढे जाऊ शकला नसता. ते म्हणजे चर्च मध्ये म्हटल्या जाणाऱ्या लॅटीन स्तोत्राचे कानडी भाषांतर होते आणि ते उत्तमरीत्या संगीतबद्ध केले होते . मध्यंतरा नंतर आणि मुलांना सूचना दिल्या नंतर तिने पुन्हा ओळीनुसार सूर लावायला सुरुवात केली. मुलींच्या चिरक्या आवाजाला सुधारण्यासाठी अतिशय सावध सूचनांची आवश्यकता होती. अखेर तिचे समाधान झाले आणि तिने मुलांना घरी जायला सांगितले. चर्च पासून तिचं घर काही पावलांवरच होतं म्हणून अंधार झाला तरी तिला भीती वाटत नव्हती.दिवस खूप उष्ण होता, आणि दुपारच्या आधीपासून तीव्र उष्ण वारा अखंड चालूच होता; आता तो बऱ्यापैकी कमी झाला होता, पण उष्णता कमी झाली नव्हती. चिंचेच्या मोठ्या झाडांमध्ये रात किड्यांची कर्कश किरकिर आणि लहान राखाडी घुबडांचा घुत्कार वगळता सर्व शांत होतं.
********************
- सतीश सोनवणे, कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर.संपर्क : ७७०९६८३३२३
साहित्याक्षरचे नवे पुस्तक.