छत्रपती संभाजी राजांचे स्वैरवर्तन (?) : डॉ. अशोक राणा
छत्रपती संभाजी राजांचे स्वैरवर्तन (?)
___________________________________________
डॉ.अशोक राणा,यवतमाळ.
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात सर्वात बदनाम व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर कुणाच्याही तोंडून एकच नाव येईल व ते म्हणजे संभाजी राजांचे. त्यांच्या या बदनामीमागे कारणे दिली जातात, ती त्यांच्या तथाकथित उच्छृंखल वृत्तीची. तसेच, चर्चा चवीने चघळली जाते, ती त्यांच्या तथाकथित स्वैरवर्तनाची. पण खरोखरच ते उच्छृंखल वा स्वैरवर्तनी होते काय? त्यांना राज्यबुडव्या, घरभेदी, स्त्रीलंपट इ. लांछने लावली जातात त्यात कितपत तथ्य आहे ? कथा, कादंबऱ्या, काव्ये, नाटके, चित्रपट इ. ललित साहित्य व कला माध्यमांद्वारा रंगविले गेलेले संभाजी राजांचे चरित्रचित्रण ऐतिहासिक सत्यावर खरोखरच आधारलेले आहे काय ? या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न केल्यास आपल्या हाती काय येते ; तर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाने काठोकाठ भरलेल्या शब्दबंबाळ साहित्याचा ढिसाळ ढिगारा. त्यावर उभारलेल्या संभाजीचरित्राचे मूर्तिशिल्पही तसेच द्वेष व तिरस्काराने काळवंडलेले. या मूर्तिशिल्पावरील द्वेष-मत्सरांची जळमटे काढून त्यावरील काजळी स्वच्छ करण्यासाठी, ज्याच्या आधारावर तो उभा आहे; त्या पूर्वग्रहदूषित साहित्याचा ढिसाळ ढिगारा उपसण्याची नितांत आवश्यकता आहे. अर्थात, हे कार्य यापूर्वीच काही इतिहास संशोधकांनी प्रामाणिकपणे केले आहे. पण ते ज्या प्रमाणात जनसामान्यांपर्यत पोहोचायला हवे होते, त्या प्रमाणात पोहोचले नाही. म्हणून त्याचा या ठिकाणी थोडक्यात परिचय करून घेऊया.
संभाजींचा बदफैलीपणा (?)
संभाजी चरित्राला विकृत वळण देण्यास कारणीभूत ठरली ती मल्हार रामराव चिटणीसाची बखर. संभाजींच्या दुर्दैवी शेवटानंतर तब्बल १२२ वर्षांनी म्हणजे उत्तरपेशवाईत इ.स. १८११ मध्ये ती रचली गेली. त्याही पूर्वी जिंजीच्या मुक्कामात राजाराम महाराजांच्या आश्रयाखाली असलेल्या कृष्णाजी अनंत सभासदाने आपल्या शिवप्रभू चरित्रात संभाजी राजांच्या बदनामीचा पाया रचला होता. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल, आदिलशाही दरबाराच्या हेरांनी आपापल्या मालकाची मर्जी राखण्याकरिता जे अहवाल पाठविले होते, त्यातही तिचे पडसाद उमटले आहेत. समकालीन व नंतरच्याही कागदपत्रांमध्ये अशा रीतीने संभाजींची बदनामी करणारी वर्णने आली आहेत. ती का आलीत या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्या समोर उभी राहते ती शिवपरिवारातील महत्त्वाकांक्षी सोयराबाईच्या कटकारस्थानांची मालिका. त्यांना या कृष्णकारस्थानात मदत करणारे सरकारकून मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो सुरनीस, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी इ. शिवरायांच्या विश्वासू सहकाऱ्यांची रांगच रांग. त्यांनी स्वराज्यात पिकविलेल्या कंड्या व त्यांचा आधार घेऊन परकीय हेरांनी आपल्या राजकर्त्यांकडे पाठविलेले अहवाल तसेच त्यावर आधारलेल्या बखरी ह्याच संभाजी राजांच्या बदनामीस करणीभूत ठरल्यात. या सर्व ऐतिहासिक कागदपत्रांची छानणी करून आयुष्याची चाळीस वर्षे खपून इतिहास संशोधक वा.सी.बेन्द्रे यांनी शोधग्रंथ तयार केला. ‘छत्रपती संभाजी महाराज’ या शीर्षकाखाली १९६० मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यानंतर कमल गोखले यांनी याच विषयावर पी.एच.डी. करिता संशोधन केले. त्यांचा ‘शिवपुत्र संभाजी’ या शीर्षकाचा त्यावर आधारित ग्रंथ १९७१ साली प्रसिद्ध झाला. हे दोन ग्रंथ प्रकाशित झाल्यावर संभाजी चरित्राकडे पाहण्याची अभ्यासकांची दृष्टी बदलली. अनेक इतिहास संशोधक व कथा कादंबरीकार एक महानायक म्हणून संभाजी राजांकडे पाहायला लागलेत. शिवाजी सावंतांची ‘छावा’ सारखी कादंबरी याच प्रेरणेतून जन्माला आली. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’ १९९० मध्ये संपादित केला. या ग्रंथातील विविध अभ्यासकांच्या लेखांनी छत्रपती संभाजी राजांविषयीचे अपसमज दूर होण्यात खूप मोठी कामगिरी बजावली आहे. विशेषकरून संभाजींचा बदफैलीपणा ही त्यांच्या विरोधकांनी मारलेली मोठी थाप आहे हे तथ्य त्यामधून बाहेर आले.
गोदावरी, कमळा व तुळसा
सभासदाच्या बखरीत संभाजी राजांच्या तथाकथित दुर्वर्तनाबद्दल मात्र काहीही माहिती नाही. चिटणीसानी आपल्या बखरीत त्याविषयी कपोलकल्पित माहिती देऊन संभाजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत. अण्णाजी दत्तो सुरनीसाच्या मुलीवर हळदीकुंकू समारंभाच्यावेळी महालात नेऊन संभाजीने बलात्कार केल्याची माहिती तो रंगवून सांगतो. शिवाजी महाराजांनी श्रेष्ठ वर्णाच्या मुलीशी ‘अगम्यागमन’ केल्याबद्दल सभाजींना शिक्षा करण्याचा हुकूम दिला असेही तो लिहितो. चिटणीसाच्या बखरीवर विसंबून लिखाण करणाऱ्या साऱ्यांनीच या कथेवर विश्वास ठेवला. महंमद झुबेरी या लेखकाने १९ व्या शतकात १८२४ साली ‘बुसातिन-उस-सलातीन’ हा आदिशाहीचा इतिहास लिहिला. चिटणीसाच्या बखरीनंतर १४-१५ वर्षांनी लिहिलेल्या या ग्रंथाचा आधारही चिटणीसाची बखरच होती. त्यामुळे त्यातही वरील कथा आली आहे. याचवर्षी साताऱ्याचा पोलिटीकल एजंट असलेल्या ग्रॅन्ट डफ याने ‘ हिस्टरी ऑफ मराठाज् ‘ हा ग्रंथ लिहिला. १८२६ मध्ये प्रकाशित झालेल्या या पहिल्या-वहिल्या मराठ्यांच्या इतिहास ग्रंथातही ही कथा आली. पुढील सारे इतिहास लेखन त्याच्या आधारे झाल्यामुळे संभाजींच्या स्वैरवर्तनाची थाप प्रतिष्ठित झाली. वा. सी. बेन्द्रे यांच्या शोधग्रंथानंतर वसंत कानेटकरांनी संभाजी चरित्रावर ‘ रायगडाला जेव्हा जाग येते ‘ हे नाटक लिहिले. पण त्यात बेन्द्रेंच्या संशोधनाचा वापर न करता चिटणीसाच्या बखरीवर आधारित कथा देऊन कथेतील मुलीस ‘गोदावरी’ हे नावही कानेटकरांनी देऊन टाकले. आपल्या एका लेखात कानेटकरांनी ‘ गोदावरी श्रेष्ठ वर्णाची, ब्राह्मण वर्णाची असल्यामुळे शिवाजी महाराज नाराज झाले ‘ असे म्हटले आहे. त्यावर ‘कानेटकरांची ही वर्णश्रेष्ठत्वाची कल्पना पेशवाईतील आहे, शिवशाहीतील नव्हे’ असे डॉ. जयसिंगराव पवारांनी भाष्य केले.
पुराकथांचे थोर अभ्यासक व कलासमीक्षक दिवं. द. ग. गोडसे यांनी केसरीच्या १९८४ च्या दिवाळी अंकात ‘ संभाजी राजा आणि गोदावरीची लोककथा ‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्यात रायगडच्या खूब लढा बुरूजाकडून खाली येताना दिसलेल्या तथाकथित गोदावरीच्या समाधी विषयीचे संशोधन प्रसिद्ध केले. त्यानुसार ही समाधी उत्तर पेशवाईतील सवाई माधवरावांच्या पत्नीची यशोदाबाईची आहे. कारण तिचे बांधकाम शिवकाळातले नसून पेशवाईतील आहे. पेशव्यांचे वास्तव्य काही दिवस रायगडावर होते. ‘ यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या धुमश्चक्रीत दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत कुटुंब कबिल्याबरोबर, यशोदाबाईचीही पुण्याहून रायगडावर रवानगी करण्यात आली होती. रागडावरच ती मृत्यू पावली व तिचे दहन गडाखाली किल्लेवाडीच्या वाटेवरच झाले असण्याची शक्यता आहे,’ असे गोडसे म्हणतात. कालांतराने या समाधीविषयीची माहिती विसरून ती गोदावरीची आहे व तिची कथा ही अशी आहे, हे लोक सांगू लागले असावेत. मुळात अण्णाजी दत्तो सुरनीस याला गोदावरी नावाची मुलगी होती काय हाच एक प्रश्न आहे. गुजरातमधील चंद्रगुजरीच्या कथेवर आधारलेली ही गोदावरीची कथा असून ‘ शिवकालाच्या आधीची ही कथा गुजरातेतून कोकणात उतरणाऱ्या उत्तर दक्षिण प्राचीन व्यापारी महामार्गाने व्यापाऱ्यांद्वारे रायगडच्या परिसरात आली असावी. तिला येथील संदर्भ मिळून गुजराती चंद्रगुजरी कोकणात आल्यावर ‘मराठी’ गोदावरी झाली असावी,’ असे गोडसे यांनी म्हटले आहे.
थोरातांची कमळा
गोदावरीची लोककथा जशी संभाजींच्या चारित्र्यावर कलंक ठरली व तिचा वास्तवाशी काहीही संबध नाही. तसेच थोरातांच्या कमळेचेही झाले. नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ‘बी’ कवींनी ‘कमळा’ नावाचे काव्य लिहून तिला साहित्यात अमर करून ठेवले आहे. ‘ थोरांताची कमळा ‘ हा चित्रपट त्यावरच आधारलेला. चित्रपट या प्रभावी दृश्य माध्यमाने सामान्य जनतेपर्यंत ‘ कमळा ‘ तसेच तिचे युवराज संभाजींशी असलेले प्रेमसंबंध या विषयीची खोटी माहिती पोचविली. मोठ्याने बोललेलं खोटं किती मोठं होतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोल्हापूर जवळच्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका समाधी मंदिराला ‘ थोरातांच्या कमळे ‘ चे मंदिर म्हणून संबोधले जाते. या स्मारकाने तथाकथित कमळेला पुढील अनेक पिढ्यांना संभाजींच्या प्रेमपत्राची आठवण राहण्याची व्यवस्था केली आहे. पण खरंच ते ‘थोरातांच्या कमळे’ चे स्मारक आहे काय ? पन्हाळा येथील रहिवासी व इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी ‘ छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमळा ‘ या शोधनिबंधात कमळेच्या कथेवर व समाधीवर प्रकाश टाकला आहे. ऐतिहासिक साधनांद्वारे सिद्ध होऊ न शकणारी व केवळ आख्यायिकेव्दारे जनमानसात ठाण मांडून बसलेली कमळा खरोखरच होऊन गेली की नाही हा प्रश्नच आहे. मग तिचे स्मारक म्हणून जे थडगे दाखविले जाते ते कुणाचे आहे ? सज्जाकोठीच्या खाली असलेल्या आपटी या गावातील हे थडगे दुसऱ्या संभाजी राजांच्या (राजारामपुत्र) काळातील करवीर दरबारचे सरदार यशवंतराव थोरात व त्यांची पत्नी गोडाबाईचे समाधी मंदिर आहे. तहसील कचेरीत त्यांची नोंद ‘सर्व्हे नंबर १९७, क्षेत्र १ एकर १५ गुंठे, खराब ३ गुंठे, आकार तीन रूपये चार आणे. जमिनीचे वहिवाटदार श्री. आप्पा धोंडी कदम’ अशी असून ३ गुंठे खराब जमिनीतील या ऐतिहासिक वास्तुला ‘ थोरातांचे थडगे ‘ असे कागदोपत्री नोंदविलेले आहे. कमळेचा कुठेही कागदोपत्री उल्लेख नसतानाही मात्र या परिसरात या स्थानाला कमळेचे मंदिर म्हटले जाते. गुळवणी यांनी यावर सखोल संशोधन करून वि.का.राजवाडे यांनी संपादित केलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खं.3’ या साधन ग्रंथाद्वारे ‘थोरातांच्या थडग्या’ चा उलगडा केला. जिवाजी बिन शिदाजी थोरात याच्या करिन्यात त्यांना यशवंतराव थोरातांचा इतिहास सापडला. करवीर दरबारात ‘सेनाखासखील’ या किताबाबरोबरच नवा लक्षांची विजापूर प्रांतीची दौलत यशवंतराव थोरातांना मिळाली होती. ‘पन्हाळ्याच्या पायथ्याशी बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या फौजेशी लढत असताना छातीत भाला लागून यशवंतराव थोरात जिथे धारातीर्थी पडला, तिथेच त्याची बायको गोडाबाई समस्त भाऊबंदांच्या समोर सती गेली. ही घटना पन्हाळ्याच्या पायथ्याशी जिथे घडली, तिथे थोरात घराण्यातील लोकांनी वीर यशवंतराव व सती गोडाबाई यांचे संयुक्त समाधी मंदिर उभारले, आणि गाभाऱ्यात या पती-पत्नीचे स्मारक म्हणून एक स्त्री-पुरुषाची पाषाण मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती ढाल, तलवार आदी शस्त्रांनी सज्ज दाखविली आहे.’ गुळवणी यांच्या संशोधनावरून थोरातांच्या थडग्याशी कमळेचा संबंध का जोडला गेला हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात ‘कमळा’ होऊन गेली की नाही हा ही प्रश्नच आहे.
गडकऱ्यांची ‘तुळसा’
कानेटकरांनी गोदावरी, बी कवींनी कमळा तशीच रा.ग.गडकऱ्यांनी ‘तुळसा’ या काल्पनिक संभाजी प्रेयसीला लोकप्रिय केले. मुळात नसलेल्या या तुळसेला इ. स. १८९१ साली आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी आपल्या ‘संगीत श्री छत्रपती संभाजी’ नाटकात जन्म दिला. त्यांच्या या निर्मितीला त्यानंतरच्या अनेक नाटककार व कादंबरीकारांनी खूप प्रसिद्धी दिली. गोदावरी किंवा कमळेप्रमाणे तिच्याविषयीच्या कोणत्याही लोककथा व आख्यायिका प्रचलित नाहीत. किंवा कोणतेही थडगे वा स्मारक उपलब्ध नाही. पण गडकऱ्यांनी ‘राजसंन्यास’ या संभाजींवरील नाटकात तिला महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे ती मात्र जनमानसात स्थिरावली. इ.स. १८९१ मध्ये पाठारे यांनी निर्माण केलेल्या या संभाजींच्या तथाकथित काल्पनिक प्रेयसीला १९२२ मध्ये गडकऱ्यांनी पुनरूज्जीवन दिले. वि.वा.हडप यांनी १९२३ मध्ये लिहिलेल्या ‘राजसंसार’ या नाटकात राजसंन्यासचेच अनुकरण केले. आजवर एकंदर साठच्या वर संभाजींवर नाटके लिहिली गेलीत. त्यात गोदावरी, कमळा, तुळसा या काल्पनिक पात्रांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. १९५१ साली मा. के. सोनसुखार यांनी ‘थोरातांची कमळा’ व इ. स. १९६७ मध्ये शं. ब. चव्हाण यांनी ‘सती गोदावरी’ हे नाटक लिहून त्यांना मध्यवर्ती स्थान मिळवून दिले. इ. स. १९४१ मध्ये बी कवींनी ‘कमळा’ हे दीर्घकाव्य लिहिले. त्यावर ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट भालजी पेंढारकरांनी निर्माण केला. पुढे त्यांनी १९६३ साली याच शीर्षकाचा दुसरा चित्रपट काढला. कवी राजा बढे यांनी १९५५ साली ‘रायगडचा राजबंदी’ चित्रपट काढून गोदावरीला मध्यवर्ती स्थान दिले. या सर्व कलाप्रकारांनी खमंग मसाला म्हणून या पात्रांचा वापर केला व त्यामुळे संभाजींची प्रतिमा एक ‘रंगीला नायक’ म्हणून तयार झाली.
व्यसनासक्त संभाजी
प्रत्यक्षात कोणताही आधार नसलेल्या कथांना खरे मानून एक स्त्रीलंपट पुरूष म्हणून संभाजींची प्रतिमा मलीन करण्यात आली. त्याचप्रमाणे व्यसनांच्या आधीन झालेला राजा म्हणूनही त्यांना रंगविले गेले. ग्रॅन्ट डफ याने ‘मराठ्यांच्या इतिहासात’ तसेच रियासतकार सरदेसाईच्या ‘उग्र प्रकृती संभाजी’ मध्ये तर त्यावर विशेष भर दिला गेला आहे. १९०० मध्ये न्या. म. गो. रानडे यांनी ‘ राईज ऑफ मराठा पॉवर ‘ या ग्रंथातही याबद्दल संभाजींना दोष दिला आहे. नरहर कुरुंदकरांनी यावर आपले मत दिले आहे. ते म्हणतात की, ‘अकरावे वर्षी संभाजीला व्यसने लागली. तरीही तो १६८७ पर्यंत नीट वागत होता, असे काही तरी चमत्कारिक व विसंगत चित्र सरदेसायांना अभिप्रेत होते… १६८० ते १६८९ पर्यंतचा संभाजींचा काळ सारखा लढण्यात गेला. चैन, भोग, विलास करण्यास त्याला फुरसत नव्हती.’ अशा स्थितीत मात्र असा आरोप का व्हावा हे एक कोडेच वाटते. त्यांचे मूळ मोगल तवारिखकार काफीखान यांच्या ‘मुन्तखबुल लुबबाए महंमदशाही’ या ग्रंथात सापडते. इ.स.१७३४ मध्ये महंमद हाशिम काफीखान याने लिहिलेल्या या ग्रंथात ‘सत्तामदाचा कैफ’ या अर्थाने शब्द वापरले. त्याचे चुकीने इंग्रजी भाषांतर करताना ग्रॅन्ड डफने ‘ इन्टॉक्सिकेटेड वुईथ द वाईन ऑफ फुल्ली ऍ़न्ड प्राईड ‘ असे वाक्य लिहिले. त्याचा सरसकटपणे मद्यपी असा अर्थ लावण्यात आला. चुकीच्या भाषांतराने मात्र संभाजींना व्यसनाधीन ठरविले गेले.
संभाजीविषयी अनेक गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरलेली चिटणिसी बखर लिहिणारा मल्हार रामराव चिटणीस हा बाळाजी आवजीचा खापरपणतू होता. संभाजींवर विषप्रयोग करण्याच्या कटात बाळाजी आवजी सामील होता. त्यामुळे संभाजींनी त्याला हत्तीच्या पायदळी तुडविले. आपल्या खापरपणजोबाच्या मृत्यूचा सूड घेण्याच्या भावनेतून चिटणीसाने संभाजी महाराजांना चरित्रहीन व स्वैरवर्तनी ठरविले. त्यावर आधारित ग्रंथांमध्ये त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे मात्र एक खलपुरूष म्हणून संभाजींची प्रतिमा तयार झाली. ज्याच्या हाती लेखणी असते ते तलवार बहाद्दरांनाही कसे पायचीत करतात तसेच खोट्यांचे खरे कसे होते हे यावरून आपल्या ध्यानात येईल.
___________________________________________________________________
ashokrana.2811@gmail.com 9325514277
(‘असत्याची सत्यकथा’ या आगामी पुस्तकामधून )