आई समजून घेताना दोन पिढ्यांची होरपळ- डॉ.सुधाकर शेलार
उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक मराठी साहित्यातील एक वेगळा प्रयोग ठरावा असे आहे. यापूर्वीही असाच एक वेगळा प्रयोग डॉ.नरेंद्र जाधव यांनी ‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाच्या रूपाने केलेला होता. हे दोन्हीही प्रयोग दलित साहित्याशी निगडित अशा स्वरूपाचे आहेत, हे विशेष. या दोन पुस्तकांमुळे दलित आत्मकथनांमध्ये निर्माण झालेले आवर्त वर्तुळाबाहेर जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत असे म्हणता येईल.
या दोन्ही पुस्तकांचे कर्ते-करविते आज प्रतिष्ठेच्या उंच शिखरावर विराजमान झालेले असले; तरी आरंभी आर्थिकदृष्ट्या गरीब; व सामाजिकदृष्ट्या उपेक्षित अशा दलित वर्गातून आलेले आहेत. एकाचा बाप रेल्वेत नोकरीला; तर दुसर्याचा मिलिट्रीत. दोघेही तसे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. आपल्याकडे आजही ग्रामीण भागातून ( केवळ दलित कुटुंबांमधून नव्हे; तर इतरही जातीजमातींतूनही ) असे अनेक तरूण पहिल्यांदाच त्यांच्या आतापर्यंतच्या खानदानातून, परंपरागत व्यवसायातून बाहेर पडून सुस्थापितांच्या जगात प्रवेश करताना दिसतात. त्यांचा हा प्रवेश सहज साध्य झालेला नसतो. हालअपेष्टा, उपेक्षा, पराकाष्ठेचे कष्ट त्यामागे दडलेले असतात. सुस्थापितांच्या जगात प्रवेश झाल्यानंतरही सगळे प्रश्न मिटलेले नसतात. जुन्या प्रश्नांनी नवे रूप धारण केलेले असते; तर काही नवेच प्रश्न समोर उभे राहिलेले असतात. ते या समाजात वावरत असतात तो समाज; आणि ते ज्या समाजातून आले तो समाज यात महदंतर असते. ज्या समाजातून हे लोक आले त्या समाजाच्या व ज्या समाजात सध्या ते वावरत आहेत त्या समाजाच्या या लोकांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. या दोन प्रकारच्या अपेक्षांमध्ये या लोकांचे सॅण्डविच झालेले असते. एका बाजूने ‘आहे रे’ वर्ग पुढे ओढत असतो; तर दुसर्या बाजूला ‘नाही रे’ वर्गाचे दोर तोडता येत नाहीत. अशा द्बंद्बात सापडलेले हे तरूण समंजस व्यक्तिमत्त्वाचे असतील तर ठीक; अपरिपक्व असतील तर मात्र ते कोणत्या तरी एका पक्षाचे होऊन जातात; आणि दुसर्या पक्षाला कायमचे मुकतात. समंजस व्यक्तिमत्त्वाचे तरूण दोन्ही पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांची कसरत खरोखरी तारेवरची कसरत ठरते. उत्तम कांबळे अशीच कसरत पुस्तकभर करताना दिसतात.
उत्तम कांबळ्यांना आज प्रतिष्ठित मध्यवर्गात -काहीशा उच्च मध्यमवर्गातही- जगत असताना आईच्या संदर्भात अनेक प्रश्न पडताहेत. स्वत: कांबळ्यांनी सुखवस्तू मध्यमवर्गात कधीच प्रवेश केला आहे. आईनेही या वर्गात प्रवेश करावा यासाठी त्यांचा आटापिटा चालला आहे. सततच्या कष्टात आणि दु:खात आयुष्य गेलेल्या आईला चार सुखाचे क्षण अनुभवता यावेत असे कुणाही मुलाला वाटावे, तसे ते उत्तम कांबळ्यांनाही वाटते आहे. मात्र कांबळ्यांच्या सुखाच्या कल्पना; आणि आईच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. कांबळे याला सुख समजतात, ती सुखे आईच्या दृष्टीने ‘चैन’ आहे. त्यामुळेच प्रत्येक गोष्टीला ती देत असलेला नकार समजून घेता येऊ शकतो. कांबळ्यांच्या समोरचे आर्थिक, सामाजिक प्रश्न संपलेले आहेत. आईच्या समोर असणारे केवळ आर्थिक प्रश्न ( सामान्य व्यक्ती म्हणून तिला सामाजिक प्रश्नांचं फारसं भान नाही आणि घेणं देणंही नाही.) अजूनही संपलेले नाहीत. नोकरी लागलेल्या कुणाही मुलाच्या आईवडिलांचे हे प्रश्न कधीच संपत नसतात. उलट ते कधी कधी उग्र रूप धारण करू शकतात. या पुस्तकात असे काही प्रत्यक्ष घडत नसले; तरी सार्वजनिक अनुभव मात्र असाच आहे. प्रस्तुत पुस्तकातील आईच्या असमाधानिक वर्तनामागे असणार्या अनेक कारणांपैकी हे ही एक कारण कदाचित असू शकेल.
बहुजनांमधून शिकून-सवरून छोट्या-मोठ्या नोकरी-व्यवसायात प्रवेश केलेल्या पिढीचं आंतरिक दु:ख उत्तम कांबळे इथे मांडताहेत. जुन्या पिढीप्रमाणे या पिढीलाही सुखोपभोग सुखेनैव कुठे घेता येतात? त्यांना आईलाही ( जुन्यांना ) समजून घ्यावं लागतं; आणि मुलांनाही ( नव्यांना ) समजून घ्यावं लागतं. ह्या समजून घेण्यातच या पिढीचं अर्ध-अधिक आयुष्य खर्ची पडतं. एकदमच ‘नाही रे’ वर्गातून आले असल्यामुळे याच पिढीवर ‘शून्यातून विश्व निर्माण ’ करण्याची जबाबदारी असते. आणि त्याचबरोबर पुढच्यांसाठी ‘पायघड्या’ घालावयाच्या असतात. गावकडं घरही बांधायचं असतं; आणि मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी डोनेशनही द्यायचं असतं. अशा या गळचेपी अवस्थेतही ही मधली पिढी आजही सगळ्यांनाच समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. उत्तम कांबळे या पिढीचे उत्तम प्रतिनिधी ठरावेत. या पिढीची ही घालमेल ना मागच्या पिढीच्या लक्षात येत, ना पुढच्या.
उत्तम कांबळ्यांच्या आईत ‘आईपणा’ची सगळी वैशिष्ट्ये दडलेली आहेत. कोणत्याही आईचे कौटुंबिकविश्व आपल्या अपत्यांपैकी फक्त कोणा एकाच्या कुटुंबाशी कधीच निगडित नसते. तसे ते उत्तम कांबळे यांच्या आईचेही नाही. आपल्या सगळ्याच अपत्यांची तिला चिंता आहे. या चिंतेतूनच तिचा सुखाला नकार प्रकटतो आहे. आयुष्यभर खस्ता खालेल्या माणसाला एकूण जगाचाच उबग यावा असाही काहीसा प्रकार उत्तम कांबळ्यांच्या आईबाबत झालेला दिसतो. ऐन तारूण्यात नवरा दूरदेशी असताना मुलांना वाढविण्यात तिचा दिवस कसा जायचा ते सांगताना कांबळे एके ठिकाणी म्हणतात, ‘‘ पहाटे चार वाजता ती उठायची. सहापर्यंत स्वयंपाक करून रोजगाराला बाहेर पडायची. संध्याकाळी परतायची ती डोक्यावर जळणाचा भारा घेऊन. आली की लगेच वारी आणण्यासाठी दुकानात. ती निवडून झाली, की डोक्यावर हंडा आणि काखेत दळणाचा डबा घेऊन बाहेर पडायची. रात्रीचा स्वयंपाक झाला की, दुसर्या दिवशीची तयारी करून पाय पोटात घेऊन पोत्यावर झोपी जायची. ही रोजची लढाई इतकी तीव्र व्हायची की तिनं आम्हाला अन्य आयांप्रमाणे कधी कुशीत घेतल्याचं, आमचे पटापट मुके घेतल्याचं, तिच्या मांडीवर डोकं टेकवून झोपी गेल्याचं आठवत नाही. …..तिचा प्रत्येक श्वास आम्हाला भाकरी मिळावी यासाठीच्या लढाईनं हिरावून घेतलेला होता.’’ अशी ही ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बरबाद’ झालेली माणसं’ मध्यमवर्गीयांच्या जीवनाकडं कधी ( व कशी ) कौतुकाने पाहू शकतील? आयुष्यभर जे जीवन वाट्याला आलं, त्याचीही एक प्रकारची सवय माणसाला होत असावी. सुख कधीच वाट्याला आलं नसेल तर सुखाची चव तरी कशी कळावी? उत्तम कांबळ्यांच्या आईचं असंच झालं आहे.
उपेक्षित, दलित समाजात जन्मली, वाढलेली उत्तम कांबळ्यांची आई, त्यांच्या मध्यमवर्गीय घरात सर्वच बाबतीत अनफिट ठरत जाते. हे कोणाच्याही बाबतीत घडू शकणार ‘संसार वास्तव’ आहे. स्त्रीच्या बाबतीत तर अधिकच. काळाच्या आधुनिकीकरणाबरोबर उदयाला आलेली नवनवीन साधने, नवनवीन शिष्टाचार जुन्या माणसांना वापरताही येत नाही व अवगतही होत नाहीत. मुख्य म्हणजे त्यांना त्याची गरज वाटत नाही. सतत नॉस्टेल्जिक होणारी माणसं त्यांच्या काळातून बाहेर यायला तयार नसतात. मधल्या पिढीला त्यांचा हा नॉस्टेल्जिया ठाऊक तरी असतो, पुढच्या पिढीला त्याच्याशी काहीच देणंघेणं नसतं. जगण्याच्या लढाईत आयुष्यभर माणसांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर संबंध आल्याने बहिर्मुख वृत्तीची झालेली ही ग्रामीण माणसं मध्यमवर्गीय अंतर्मुखता एकाएकी कशी आत्मसात करणार? त्यामुळेच तर उत्तम कांबळ्यांच्या आईला गप्पा मारायला मोलकरीण, वॉचमन असली माणसं निषिद्ध वाटत नाहीत. आयुष्यभराच्या वाटचालीत काही स्वभाववैशिष्ट्ये, समजुती, श्रध्दा- अंधश्रध्दा पक्क्या झालेल्या असतात. त्या सगळ्या आपला शिकलेला मुलगा सांगतोय म्हणून बदलणे, या जुन्या पिढीला शक्य होत नाही. एकतर त्यांचे ज्ञानविश्व होते तिथेच असते, ते बदललेले नसते, श्रध्दा-समजुतींमध्ये त्यांची मानसिक गुंतवणूक झालेली असते. या लोकांच्या जगण्याविषयीच्या कल्पना, अपेक्षा, जीवनात मिळवावयाच्या गोष्टी, ध्येय-उद्दिष्टे म्हणजेच जीवनातील श्रेय आणि प्रेय फार मोठी कधीच नसतात. आपल्या आहे त्या वर्तुळातील आशा-आकांक्षांची पूर्ती झाली की ही माणसे सुखी होतात. छोट्या अवकाशातल्या छोट्या छोट्या गोष्टीत या माणसांचे सुख दडलेले असते. आणि याच गोष्टींची पूर्तता झाली नाही की मग ही माणसं त्रागा करायला लागतात. हा त्रागा लक्षात घेता उत्तम कांबळ्यांच्या आईच्या वरवर विसंगत वाटणार्या वर्तनाची कारणमीमांसा काहीशी ध्यानी येऊ लागते.
उत्तम कांबळ्यांच्या आईत ‘आईपण’ पुरतं भिनलेलं आहे; पण हे आईपण मध्यमवर्गीय आईपेक्षा वेगळं आहे. व्यवहारातून आलेलं एक शहाणपण या आईजवळ आहे.जगण्याच्या अनुभवातून ती बरंच काही शिकली आहे, त्याचप्रमाणे तिची काहीएक मानसिकताही घडत गेलीये. याच मानसिकतेतून ती ‘मुली लहान असताना’च त्यांची लग्नं उरकून टाकते. ‘मुलींची लग्नं करण्यात तू इतकी घाई का केलीस?’ या लेखकाच्या प्रश्नावर ती उत्तरते ,‘‘पोरीच्या जातीला फार दिवस घरात ठेऊन चालत नाही. आपल्या समाजात सार्याच मुलींची लग्नं लहानपणी होतात. मुली निब्बार झाल्या की त्यांची लग्नं होत नाहीत. तू जे काही म्हणतोस ते मला पटत नाही, असं तुला नेहमीच वाटतं; पण समाजाबरोबर राहायला पाहिजे. तुझं काय? तू आता समाजाबाहेर पडलास! तुझ्या आणि आमच्या चालण्यात खूप अंतर आहे. कधीतरी समाजालाही समजून घे! तो सावकाश का चालतो? याचाही विचार कर.’’ तिचं समाजाला धरून राहणं समजण्यासारखं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना समाजाची पदोपदी गरज लागते. त्यामुळे त्यांना समाजाला धरून राहण्याशिवाय पर्यायच नसतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला माणूस समाजाबाहेर पडू शकतो, हे समाजिक वास्तवच आईच्या या उद्गारातून अधोरेखित होतं आहे. ‘जेवढे अंथरूण तेवढाच पाय पसरावा.’ हे तिचं जगण्याचं सूत्र. अर्थात त्या काळातील सगळ्याच माणसांचं हेच सूत्र असायचं. काळाची म्हणूनही काही मानसिकता असते, त्या मानसिकतेतच त्या त्या काळातील माणसे जगत असतात; म्हणून तर उत्तमची आई कधीही चैन करीत नाही. ‘‘नव्या बांगड्या भरायच्या नाहीत. डोक्याला महिन्यातून एकदाच तेल लावायचं. कपडे धुण्यासाठी घेतलेला पाचशे एक नावाचा साबणच आंघोळीसाठी वापरायचा. कपड्यासाठी साबण ही कल्पनाही तिला चंगळवादी वाटायची …. दहा बारा किलोमीटरवर असलेल्या माहेरीही बसवर पैसे खर्च न करता, ती पायीच जायची. बसचे पैसे शिल्लक ठेवायची.’’ ग्रामीण माणसांच्या ठायी असलेलं हे व्यवहारज्ञान परिस्थितीनेच त्यांना शिकवलेलं असतं. उत्तमची आई परिस्थितीने गांजलेली, त्यामुळे तिच्या ठायी हे व्यवहारज्ञान आपसूकच निर्माण झालेलं आहे. स्वत:च्या आजारावर ती औषधोपचारासाठी खर्च करू देत नाही. स्वत:ला टी.बी. झालाय हे कळल्यानंतर ही मुला-नातवंडापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. ‘टी.बी. संसर्गजन्यच असतो’ हे तिचे ज्ञान डॉक्टरांनी सांगूनही पुसले जात नाही. या जुन्या पिढीतील माणसांच्या धारणा कशा पक्क्या असायच्या याचं हे उत्तम उदाहरण.
एक प्रश्न मनात असाही येऊन जातो की कांबळ्यांची आई कष्टकरी, दलित नसती; आणि मध्यमवर्गीय पांढरपेशी समाजातली असती तर ह्या पुस्तकातल्या मुलाला खरोखरी आई समजून घेण्याची गरज पडली असती? खरं तर अशी गरज प्रत्येक मुलाला कधी ना ना कधी पडलेली असते. पण ती इतक्या तीव्रतेने जाणवलेली नसते. वरती म्हटल्याप्रमाणे ‘नाही रे’ वर्गातून आलेल्या इथल्या आईने कौटुंबिक स्तरावरचे काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे उत्तमजवळ नाहीत. म्हणून तर त्याला आई समजून घेता येत नाहीये.
उत्तम कांबळ्यांप्रमाणेच अनेक ग्रामीण / दलित तरूणांना आई-वडिलांना समजून घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. – उत्तम कांबळे आईला समजून घेण्याचा प्रयत्न तरी करताहेत; इतर तोही करत नाहीत.- पुस्तकात नोंदवलेल्या प्रतिक्रियांवरून हेच लक्षात येते. का होते असे? अंतिमत: आईवडील ही ही माणसेच असतात. त्यांनाही भाव-भावना, षड्विकार असतात. या भाव-भावनांच्या आहारी गेलेली ही माणसे निखळ आई-वडील कधीच राहू शकत नाहीत. आणि म्हणूनच मग सुरू होतो दोन व्यक्तींमधला दोन पिढयांमधला झगडा. मुला-मुलींच्या संगोपनात मुलाकडे अधिक लक्ष देणारी ही मंडळी मुलामुलींच्या लग्नानंतर मात्र मुलीच्या प्रपंचाची अधिक काळजी वाहताना दिसतात. मुलगी जावयाच्या मागे मोटारसायकलवर बसून आली याचा या मंडळींना आनंद वाटतो; मात्र सून लेकाच्या मागे बसून गेली की हीच मंडळी खट्टू होतात. हे मानवी मनातलं नेमकं कोणतं रसायन आहे? या रसायनापायीच तर मग अनेक कौटुंबिक प्रश्न चव्हाट्यावर येतात. उत्तम कांबळ्यांची आई अशा माणसांमधली नाही; पण अशा माणसांच्यापासून ती फार लांब अंतरावरचीही नाही. हे ध्यानी घेतले म्हणजे ती अधिक समजायला लागते.
आईच्या वर्तनाची संगती लावता लावता उत्तम कांबळे अनेक वेळा अंतर्मुखही होतात. उत्तम कांबळ्यांची आई मुलांसाठी शेतातल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या चोर्याही करते. मुलाला मात्र चोरी करू देत नाही. उत्तम जेव्हा तिला विचारतो की, ‘तू मला चोरी का करू देत नाहीस?’ त्यावरचं तिचं उत्तर अतिशय मार्मिक आहे. ती म्हणते, ‘‘अरे! चोरी करताना तू पकडला गेलास तर तुला शिव्या बसतील. मार बसेल. त्याऐवजी मी चोरी केली तर सगळं मीच सहन करेन. तुला काय होऊ नये; म्हणून मीच जात असते चोरी करायला. आणि काय रे भाड्या! मला काय तुला चोर बनवायचंय? तू खूप शाळा शीक. तू कशाला या भानगडीत पडतोस.’’ याचा अर्थ चोरी करणं तिलाही आवडणारं नाही; पण अभावग्रस्ततेमुळं तिच्याकडून हे घडतं आहे. आपल्या मुलानं मात्र या भानगडीत पडू नये असं तिला वाटतं. आईचं हे हृदय समजून घेणं फारसं अवघड नसावं. हीच आई आपल्या अनुभवातनं तयार झालेली साधी साधी मतं परखडपणानं मांडून जाते. त्यामागचं तिचं साधं साधं तत्त्वज्ञानही दिसून येतं. ‘बाईचा जन्म अवघड’ म्हणून तिला मुलगी नको वाटते. नातू फाडफाड इंग्रजी बोलतो; पण तो आपल्या भाषेत का बोलत नाही? हा तिला पडलेला प्रश्न. ‘पोरं जन्माला आल्यावर त्यांला आईचं दूध आणि आईची भाषा, आईची ऊब मिळाली की ती लवकर बाळसं धरतात.’ ही तिची धारणा असल्याने ती प्रश्न निर्माण करते ‘‘ कसली बाबा असली परिस्थिती? जी आईची भाषाच बोलू देत नाही.’’ आज सगळ्याच मध्यमवर्गीयांना भेडसावणार्या भाषिक प्रश्नाचं आईनं तिच्यापरीनं दिलेलं हे उत्तर अनेकांना अंतर्मुख करणारं ठरावं असंच आहे. या अंतर्मुखतेतूनच मग आई थोडी थोडी कळायला लागते. हे ‘आई कळणं’ म्हणजे शब्दश: आई कळणं नाहीये; तर ‘जीवन कळणं’ आहे. आईला लेखकाचे मित्र साड्या देतात, तेव्हा ती नकार न देता साड्यांचा स्वीकार करते. साड्या गोळा करते. ‘पूर्वी तिला साड्या मिळत नव्हत्या, दंड घालून लुगडं नेसावं लागत होतं, कदाचित त्यामुळे तिला आता साड्यांचं आकर्षण वाटत असावं.’ तिच्या साड्या गोळा करण्यामागच्या कृतीचं सुशिक्षित लेखक मनानं केलेलं हे विश्लेषण आईच्या उत्तरानं एकदम खुजं ठरतं. ती म्हणते ‘‘ मला या साड्या मिळतात, त्या काही मी नेसत नाही; तर माझ्या गरीब मुलींना देते. सणावाराला आल्या की त्यांची आशा असतेच की. तू भेटत नाहीस, तू साड्या घेत नाहीस. पण मला तुझ्यासारखं वागून कसं चालंल ? मी आई आहे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी काही त्यांचं माहेर तोडणार नाही. मला मिळालेल्या साड्या जपून ठेवते. भारी साड्या असतात त्या. एवढ्या भारी साड्या पोरींना कुठून मिळणार? माझ्याकडं जमा होणार्या साड्या त्यांना देऊन टाकते; आणि हो तुझ्या दादानं घेऊन दिल्या असंच सांगते. माझ्या नावावर नाही खपवत. उद्या मी गेले मरून तरी तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी बरंच वाटंल.’’ आईचं हे उत्तर ऐकून लेखकाला गरगरायला होतं. तो अंतर्मुख होऊन विचार कारायला लागतो, तेव्हा त्याला स्वत:च्याच वर्तनाची लाज वाटायला लागते. स्वत:च्या करियरच्या, कामाच्या, धावपळीत, सामाजिक धडपडीत कुटुंबाकडं झालेलं दुर्लक्ष त्याला जाणवतं. तो म्हणतो,‘‘खरंच मी भेटलो नव्हतो ( पंधरा वर्षे ?) बहिणीला. न भेटण्याचं काही कारण नव्हतं. भांडण नव्हतं. छोटी बहीण येऊन गेली एकदोनदा नाशिकला; पण मधली कधीच आलीच नव्हती. ती सर्वात जास्त गरीब. तिनं कधी आयुष्यात माझ्याकडं कशाचाच आग्रह केला नव्हता. कधी हट्ट केला नाही. कधी येते म्हणाली नाही माझ्याकडं. कधी आपल्या दारिद्य्राचा पाढा वाचला नाही. कधी भेटले ओळखी पाळखीचे तर माझ्याविषयी चौकशी करायची. ‘दादाला डायबेटीस आहे. काळजी घे म्हणून सांग.’ असा निरोप धाडायची. माझ्या पोरांची चौकशी करायची. स्वत:च्या वेदना कधी निरोपातून नाही पाठवायची. पण तिचा विचार कसा नाही आला आपल्याला? आपलीच पोरं-बाळं, आपलाच संसार यात इतके का अडकून गेलो आम्ही?’’ उत्तमसारखे नोकरीच्या आणि स्वत:च्या संसाराच्या जंजाळात अडकत जाणारे अनेकजण आपण अवतीभवती पाहतो. आईचे (म्हणजेच पर्यायाने एकूण कुटुंबाचे) आणि त्यांचे झगडेही पाहतो. आपण स्वत: कसे बरोबर आहोत असे प्रत्येकाला वाटते. पण जरा संवेदना जागी असेल, दुसर्याला जाणून घेण्याची इच्छा आणि क्षमता असेल तर मग आत्मचिंतनातून अशा प्रश्नांची उत्तरं सहजी मिळू शकतात. आईला समजून घेता घेता अशा आत्मचिंतनातून लेखकाने जीवनालाच समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे या पुस्तकात पदोपदी दिसून येते.
आनंद यादवांनी ‘मायलेकरं’ या खंडकाव्यात्मक कवितेत मायलेकरांचा काव्यरूप संवाद मांडला आहे. एका ग्रामीण आईने आपल्या शिकणार्या व शिकून पुढे साहेब होणार्या मुलाकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. उत्तम कांबळ्यांच्या आईच्या अपेक्षाही फारशा वेगळ्या नाहीत. यादवांच्या या कवितेत फक्त आईच्या अपेक्षाच अधोरेखित होतात. पोरगा पुढे शिकून मोठा झाल्यानंतर या अपेक्षांचं काय होतं? त्यांची पूर्तता होते का? हा भाग त्या खंडकाव्यात नाही. (त्या खंडकाव्याकडून तशी अपेक्षाही नाही.) उत्तम कांबळ्यांच्या पुस्तकात असा भाग थोडा थोडा आला आहे. आईच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा प्रयत्न उत्तम करतो; पण तो अपुरा ठरतो. स्वत:च्या घड्याळाच्या काट्यावर बेतलेल्या चौकोनी जीवनात तो आईला, आपल्या बहिणीला सामावून घेऊ शकत नाही. हे सर्व वास्तव त्याला उमगते, समजते. म्हणून तर तो म्हणतो ‘‘ती सर्वव्यापी, मी स्वयंकेंद्री’ असं काहीतरी चित्र निर्माण व्हायचं.’’ आईच्या या व्यापकत्वामुळे लेखकाच्या मनात अपराधीपणाची, अपुरेपणाची भावना निर्माण होते; आणि या भावनेतून का होईना त्याला बहिणीबाळांची आठवण होते, हे ही नसे थोडके.
आई समजून घेतानाचा एक मार्मिक प्रसंग उत्तम कांबळ्यांनी पुस्तकाच्या अखेरी अखेरीस रेखाटला आहे. शाळेत गेलेला नातू पावसात अडकला आहे. उत्तम कांबळ्यांची बायको त्यांना मुलाला आणण्यासाठी पावसात जाण्याचा आग्रह करते. अशा वेळी आई मात्र म्हणते आहे, ‘‘अरं! येईल तो बसनं. पास आहे ना त्याच्याकडं. दोघेही कुठं अडकता? बघ किती गडगडायला लगलंय!’’ दुसरीकडं बायको म्हणते,‘‘अहो जा ना तुम्ही! कशाला टाइमपास करताय?’’ यावर उत्तम कांबळे म्हणतात, ‘‘किती आगळंवेगळं चित्र निर्माण झालं होतं घरात… दोन आयांचं चित्र….एका आईला मी घराबाहेर पडूच नये असं वाटत होतं, तर दुसर्या आईला तिच्या मुलाला घेण्यासाठी मी बाहेर पडलंच पाहिजे असं वाटत होतं….एकीला नातवापेक्षा मुलाची काळजी वाटत होती, तर दुसरीला नवर्यापेक्षा मुलाची काळजी वाटत होती. ….घरात दोन आयांचा असा टकराव होत होत होता; आणि त्यात दोन्ही आया जिंकत होत्या….आता मी एक नव्हे; तर दोन आया समजून घेण्याचा निर्धार करतोय….एक माझी जन्मदाती आई आणि दुसरी माझ्या बायकोतली आई….कुणी सांगावं यश येईल की नाही?…पण प्रयत्न करतोय….’’ उत्तम कांबळ्यांची ही द्बंद्बात्मक अवस्था सार्वत्रिक म्हणता येईल अशीच आहे.
साहित्यकृतीतील भावनांचं, अनुभवांचं जेव्हा साधारणीकरण होतं; तेव्हा ती साहित्यकृती जनमानसाला अधिक भावत असते. म्हणून तर फ.मु.शिंद्यांच्या आईत सगळ्यांना स्वत:चीच आई गवसते. उत्तम कांबळ्यांच्या ह्या पुस्तकातल्या अनेक भावनांचं आणि अनुभवांचं असंच साधारणीकरण झालेलं असल्यामुळं, त्यांच्या आईत प्रत्येक वाचकाला कळत नकळत स्वत:ची आई दिसायला लागते. हेच या कलाकृतीचं खरं यश आहे.
उत्तम कांबळ्यांनी मराठी साहित्यात केलेला हा लेखनप्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे. जुलै 2006 ते एप्रिल 2009 या तीन वर्षाच्या कालावधीत पुस्तकाच्या सात आवृत्त्या निघाल्या आहेत. पुस्तकाच्या या लोकप्रियेतेचे रहस्य काय? तर अनेकांच्या मनात खदखदत असणारा हा प्रश्न उत्तम कांबळ्यांनी शब्दबध्द केला आहे. पुस्तकात (आवृत्ती सातवी : एप्रिल 2009) नोंदवलेल्या प्रतिक्रियांवरून ते लक्षात येते. मुलांवर संस्कार करणारी ‘श्यामची आई’ वाचकांना माहीत आहे. त्या आईपेक्षा उत्तम कांबळ्यांची आई फार वेगळी आहे. दोन समाजातलं अंतर अधोरेखित करणारी आहे. लेखनाच आकृतिबंध म्हणूनही उत्तम कांबळ्यांनी केलेला हा प्रयोग आजवरच्या दलित आत्मकथनांपेक्षा काहीसा वेगळा आहे. व्यक्तिचित्र रेखाटणाच्या अंगाने जाणारा हा प्रयोग आहे. त्याला नेमकं काय संबोधायचं हा मराठी समीक्षेसमोर पडलेला प्रश्न आहे. आई समजून घेत असताना आईचं सविस्तर चरित्र लिहिण्याच्या फंदात लेखक पडलेला नाही. त्यामुळे ते आईचं चरित्र नाही. आईच्या जीवनाशी निगडित काही घटना-प्रसंग वगळता स्वत:च्या जीवनातील घटना-प्रसंग सविस्तर सांगण्याचा प्रयत्नही इथे झालेला नाही; त्यामुळे हे पुस्तक म्हणजे ‘आत्मकथन’ही नाही. रूढार्थाचे ‘व्यक्तिचित्र’ही नाही. ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे पुस्तक जसे रूढार्थाने कोणत्याच साहित्यप्रकारात बसणारे नाही; तद्वतच हे ही पुस्तक अशा ठरीव साचात बसणारे नाही. मात्र या पुस्तकाची व्यवस्था नेमकी लावायची कशी? उत्तम कांबळ्यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा अशा प्रकारे दीर्घशोध घ्यायचा प्रयत्न केला आहे; म्हणून सध्या तरी या लेखनप्रकाराला आपण ‘दीर्घ व्यक्तिशोध’ असं संबोधूयात. हा दीर्घशोध उत्तमराव आयुष्यभर घेताहेत, अजूनही हा शोध थांबलेला नाही. म्हणून तर तो ‘दीर्घ व्यक्तिशोध’.
………
–डॉ.सुधाकर शेलार,
मराठी संशोधन केंद्र प्रमुख,
अहमदनगर महाविद्यालय,अहमदनगर.
भ्रमणभाष -9890913236.