History

कृष्णेचा जलप्रपात :फिलिप मेडोज टेलर

सा हि त्या क्ष र 

(फिलिप मिडोज टेलर या ब्रिटिश लेखकाने सुलताना चाँदबीबी या नगरच्या राणीवर तीन भागात ‘अ नोबल क्वीन’ नावाची कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद करायची परवानगी ‘साहित्याक्षर‘ प्रकाशनाला मिळाली असून ‘साहित्याक्षर’च्या वतीने कामार्गावचे इतिहास अभ्यासक श्री. सतीश सोनवणे करत आहेत. त्या कादंबरीचा हा पहिला भाग. वाचक आणि रसिकांनी वाचून सूचना कराव्यात.)

फिलिप मेडोज टेलर : CSI (२५ सप्टेंबर १८०८ – १३ मे १८७६ ), ब्रिटिश भारतातील प्रशासक आणि कादंबरीकार यांनी दक्षिण भारताच्या सार्वजनिक ज्ञानात उल्लेखनीय योगदान दिले. जरी मोठ्या प्रमाणावर स्वयं-शिक्षित असले तरी, तो एक बहुपयोगी होता, न्यायाधीश, अभियंता, कलाकार आणि विद्वान म्हणून काम करत होता.

     १५९०  च्या मे महिन्यातील तो एक ज्वलंत दिवस होता. लांबच्या प्रवासानं थकून भागून आलेला घोडे स्वारांचा एक जत्था कृष्णेच्या उत्तरेकडील मैदानातून जात होता. गावं आणि हमरस्ते टाळून त्यांचा हा प्रवास पूर्वेकडे चालू होता. या भूभागाची त्यांना माहिती होती. गावाजवळचा भाग सोडला तर सगळा प्रदेश उजाड होता. मध्येच कुठं तरी  गावच्या किंवा वस्ती च्या भोवताली, कुठं मंदिर किंवा मशिदी भोवताली थोडीफार हिरवळ दिसायची.

यापेक्षा उजाड ते काय असू शकते?  सगळी हिरवळ जळून गेली होती. भेगाळलेल्या काळ्या रानातून हे थकलेले घोडे अडखळत प्रवास करत होते.कृष्णेच्या पल्याड काही मैलांवर टेकड्यांचा एक समूह, त्यांच्या समोर आणखी एक डोंगराची तुटक रांग दिसत होती. या टेकड्या उष्ण वारा आणि मृगजळामुळे विकृत दिसत होत्या.

     अचानक झाडी दिसू लागली. जत्था जवळ येऊ लागला तशी त्यांची खुरटी झुडपं झाली. पांढऱ्या चुन्याने रंगवलेल्या भिंती आणि छतांच्या गावांचे सुर्यप्रकाशात चकाकणारे महाल होऊन गुडूप झाले. पाण्याची तळी एकत्र आल्या सारखी वाटली ,  ती धुळीने माखलेल्या उष्ण वाऱ्यांच्या स्फोटात नाहीशी झाली. क्षणभर माणसं आणि बैल नांगरताना दिसले. मग ते थरथर कापत हवेत उडाले आणि वाढलेल्या स्फोटात नाहीसे झाले.

     मध्येच वाऱ्याच्या झोताबरोबर नांगरटीची गाणी ऐकू येत आणि नाहीशी होत. जमिनीवर पळणाऱ्या व्याकूळ लाल प्लवरची शिट्टी, नाकतोड्यांचे कर्कश ओरडणे किंवा त्रासलेल्या टिटविचा आवाज याशिवाय कोणताही आवाज कानी येत नव्हता. जत्था जसा जवळून जाई तसे कधी तरी लाल कंठाचे मोठाले सरडे डोकी वर काढत, दगडावर किंवा मातीच्या ढिगऱ्यावर बसलेली लहान निळ्या कंठाची ही प्रजाती  हे कधी न दिसणारे दृश्य पाहून आपला निळा कंठ फुगवत विरोधी स्वरात शीळ घाली आणि ती रहात असलेल्या बिळात लपून बसे.

     नांगरलेल्या शेतात कावळ्यांचे , पांढऱ्या करकोच्यांचे थवे आपल्या उघड्या चोचीने पालटलेल्या जमिनितील किडे वेचत कर्कश ओरडत मृगजळा समोर दिसेनासे होत किंवा उष्ण हवेत घिरट्या घालत पुन्हा जमिनीवर येत. इकडे तिकडे नदीपात्राने किंवा नाल्याने   सुचवलेल्या पाण्याच्या प्रवाहाने ही घोडी आणि माणसं आपली तहान भागवत पण ते तेथेच थांबले नाहीत तर त्यांच्या घोड्यांच्या पूर्ण ताकदीने पुढे जात राहिले.      खरं तर हे सहन करणे निःसंशय पणे वेदनादायक होते, हा उष्ण वारा आणि मृगजळ त्यांना तारणारे ठरले. काळ भयंकर अनागोंदीचा होता. दख्खनच्या राज्यात गृहयुद्ध सुरू झाले होते दोन्ही गट एकमेकांबद्दल दया दाखवत नव्हते.

त्या दिवशी भल्या सकाळीच विजापूरच्या राजाच्या घोडदळाची एक तुकडी शाही सैन्याला मिळण्या साठी निघाली.राजाचा धाकटा भाऊ युवराज इस्माईलचा उठाव दडपण्यासाठी. पण हा उठाव माजी प्रधान ऐन-उल-मुल् कचा होता. त्याने युवराजाला त्याची स्वतःची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या हेतूने पुढे केले होते. यामध्ये अशक्य असे काहीच नव्हते. कारण अहमदनगरच्या राजाची आणि त्याच्या शक्तिशाली सैन्याची आपल्या विजापूरच्या भावाची परतफेड करण्यासाठी मदत मिळण्याची त्याला खात्री होती.

      अशा परिस्थितीत विजापूरला बेळगाव पासून सुरू झालेले हे बंड मोडण्यासाठी आपले सर्व सैन्य पाठवणे गरजेचे होते.शिखरापासून मैदानावरील भाल्यांची चकाकी त्यांनी पाहिली.

     ते क्वचितच एकमेकांशी बोलत. त्यांची डोकी सुती कापडाच्या पागोट्यानी झाकली होती.  आग ओकणाऱ्या सूर्यापासून बचावसाठी खोगीरिवरच सुती कापड सुद्धा त्यांनीं पांघरलं होत. त्यांच्यापैकी दोघे जखमी झाले होते, उष्णतेने आणि रक्तस्त्रावाने त्यांना घोड्यावर नीट बसताही येत नव्हते. त्यांच्यातलाच एक तरुण नेता अब्बास खान अशक्त पणामुळे बेशुद्ध झाल्यासारखा वाटत होता. आपल्या सहकाऱ्या जवळच्या चामड्याच्या बाटलीतले पाणी पिऊन तो पुन्हा ताजा तवाना झाला. मोठया धैर्याने त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. पूर्वीप्रमाणेच.

     अब्बास खान हा हमीद खान चा पुतण्या आणि दत्तक मुलगा अवघा पंचवीस किंवा त्यापेक्षा कमी वयाचा. त्याचा पोशाख  जेनोआच्या मखमलीचा , सोन्याचे विणकाम केलेला, उंची आणि देखणा परंतु अति वापराने जीर्ण झालेला. तसचं खोगिरी वरच किरमिजी मखमली कापड. त्याने डोक्यावर अणकुचीदार टोक असलेला पोलादी टोप घातला होता. त्याचा काही भाग मखमली झडपांनी झाकलेला जे त्याच्या कानावर आणि मानेवर लोंबत होते. टोप पोलादी तारांच्या जाळीने सुरक्षित केलेला कपाळा पर्यन्त आलेला. मऊ पर्शियन चामड्याचे , रंगीत रेशमाचे जरीकाम केलेले लांबलचक बूट,  पोलादी पट्टी आणि मखमलीने मजबूत केलेले, त्याच्या मांड्या झाकत होते. सोन्याचा मुलामा दिलेले पोलादी हातमोजे त्याचे मनगट आणि  बाहू झाकत होते. उंची हिरव्या मलमली स्कार्फ चा कमर पट्टा , त्याची जरीकाम केलेली टोके त्याने उजव्या बाजूला बांधली होती  त्याच्या तलवारीला आधार देत होते. जी त्याने सोनेरी पट्ट्यात अडकवली होती.

      त्या काळातील दख्खनी घोडेस्वाराचा तो देखणा पोशाख होता. तरुण अब्बास खान इतका शूर म्हणावा असा दुसरा कोणी नव्हता. तो काळच कठीण होता. बंड आणि उठाव हे राजधानीसाठी सामान्य झाले होते. उत्तरेला अहमदनगर, पूर्वेला बिदर आणि गोवळकोंड्याच्या सीमा असुरक्षित होत्या. हे सार्वभौम प्रतिस्पर्धी कधी कधी आघाड्या करत आणि मैदानावर मोठे सैन्य पाठवत,  धुमश्चक्री नंतर कत्तली होत. अब्बास खान ची नेमणूक ही नेहमी सीमावर्ती भागात असे, त्याची धाडसी वृत्ती आणि दणकट शरीरयष्टीच्या जोरावर तो धोकादायक मोहिमांमध्ये भाग घेत असे. परिणामांची फिकीर तो करत नसे उलट शत्रुची दाणादाण उडवत असे. त्याच्या अविवेकी स्वभावामुळे तो.लष्करी परिणामांशी तडजोड करेल असे वाटून त्याच्या काकांनी त्याला स्वताहाच्या सैन्यात घेतले नव्हते. त्याला  अनुभव यावा म्हणून त्याला वेळोवेळी महत्त्वाची पदे देण्यात येत.

     कोरल्याच्या चकमकीतून जे वाचले होते ते त्याचे राखणदार होते, थकवा आल्याने ते मागे राहिले होते, आडवाटेने भटकत त्यांनी गावाचा आश्रय घेतला होता. त्याच्या पैकी तिघेच बचावले पहिला -जुमाल जो आपल्या तरुण नेत्या सारखाच जखमी झाला होता, कसाबसा घोडयावर बसला होता. तो खानाचा निशाण धारक होता आणि त्याच्या हातात लढवून वाचवलेले ते  हिरवे त्रिकोणी निशाण अजूनही शाबूत होते. दुसरा यासीन त्याचा स्वतःचा सेवक , तिसरा रंगा राज्याच्या पूर्व भागातील बेरडांचा प्रमुख, उंचापुरा राकट हिंदू जो वाटाड्या चे काम करत होता. सगळे चांगले स्वार परंतु बेरडाचा घोडा मात्र सर्वात ताजा आणि सक्रिय दिसत होता.

     दिवस मावळतीला चालला होता. सोसाट्याचा वारा आता थांबला होता परंतु अधून मधून जोराची झुळूक धुळीचे लोट घेऊन येई. जखमी माणसं कशी बशी तग धरून होती. खानाच्या छाती वरील आणि डाव्या हातावरील जखमेच्या पट्ट्या मधून रक्त टपकत होत. त्याचा रक्ताने माखलेला मखमली कोट जखमेला चिकटल्याने वेदना अधिकच तीव्र होत होत्या.

     बेरडाने हे पाहिलं त्याच्या तरुण नेत्याला हुरूप यावा म्हणुन तो कानडी भाषेत ओरडला , ” घाबरु नको अब्बास खान एक तास फक्त आपण सुरक्षित किल्ल्यात असू नालुटवर ची झाडी कधीच मागं गेलीय आणि या धुक्यात ही माझ्या डोंगर दऱ्या स्पष्ट दिसत आहेत. खऱ्या सैनिका सारखं दात घट्ट आवळून बसा, एक कोस भर फक्त मग माझी माणसं येतील तुमच्या जखमा भरायला. आणि तू जमाल तुझी पण काळजी घेऊ आम्ही. धीर सोडू नकोस गड्या “

     ” हे वादळ असं अचानक थांबलेल मला आवडणार नाही,” यासीन खान म्हणाला. ”  बंडखोरांनी आपल्याला पाहिलं तर आपली काही खैर नाही.”

     ” आपल्याला सैनिकासारख मरण तरी येईल” खानाने उत्तर दिलं. ” ही माझीच चूक होती ज्याचा परिणाम माझ्या गरीब सहकाऱ्यांना भोगावा लागला! देव मला माफ करो कारण माझे काका मला कधीच माफ करणार नाहीत. तुमच्या निष्ठे पुढे माझी जिंदगी कुर्बान. अल्ला तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देईल,  रक्तस्त्राव थांबला तर मी नकीच  वाचेल पण आता मला ही जमीन सुद्धा  तरंगताना दिसत आहे. मला थोड पाणी द्या, तहान लागलीय. ”  दीर्घ काळानंतर कातडी पिशवीतल पाणी पिऊन  तो तरुण खोगिरीवर सावरून बसला आणि त्याने मोठ्या हुरूपाने  घोड्याला टाच मारली.

     ते मैलभर गेले असतील तोच काही माणसं झाडीतून बाहेर आली आणि बेरडाच्या नाईकाकडे झेपावली. त्याच्या पाया पडली त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ” तुमी जित्त हाईत, तुमी जित्त हाईत.” त्यांच्या तोंडातून एवढेच शब्द फुटले. ” आमी आईकल तूमी गेलाय आन कोरल्याच्या मैदानात पडलाइत , काही माणसं तिकड गेलीय तुमाला हुडकाया.”

   ” शांत ऱ्हा पोरांनू, मला काही नाही झालं.” नाईक हसून बोलला.

     ” इथ धोका हाय,” काहीजण ओरडले. ” बंडखोरांचा एक जत्था तुमच्या मागावर हाय आन इथ पोचल इतक्यात. आपण जोरात चालवाया पायजे,  खिंड वलांडली की आपण सुखरूप . तुमी व्हा म्होरं आमी आलोच.”

    ” तुमच्या जोखमीवर,” नाईक उत्तरला. ” त्यांना इथच थोपुन धरा, तुम्ही झाडीत लपून बसा, ते जवळ आलं की गोळीबार करा. त्यांचे घोडे पण थकल्याल हाइत काही करणार न्हाईत  ते छाया भगवती च्या तोंडकून वार करतील ते जास असतील तर त्यांना डोंगरात चकवा द्या.”

      ” छाया भगवती जवळ ते काय करत्याल? त्यास्नी म्हाईत न्हाई का कृष्णा माई वसंडून व्हातिय आन त्यास्नी किल्ल्यात पण थारा मिळणार नाही.”

     “हा ” नाईक ओरडला”असं हाय तर, पण हे कवा व्हईल ? कृष्णा माईचा आवाज पण येईना.”

     ” दुपार पर्यंत,” कोणीतरी पुटपुटलं  ” ती वेळेपूर्वीच आलीय ऐका!”

     असं कोणी तरी बोलल  आणि एका खोल आवाज त्यांच्या कानी पडला. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी हा आवाज थोपवून ठेवला होता. थोडे अंतर गेल्यानंतर त्यांना दुथडी भरून वाहणारी , अक्राळ विक्राळ रूप घेतलेली कृष्णामाई दिसली.  त्यांच्या समोर दोन टेकड्या मध्ये धुक्याचा एक स्तंभ दिसला. वारा शांत झाला तसा तो आणखीनच वाढला पुन्हा वारा सुटला तसा गायब झाला.

       ” वेळ असेल तर,” घोड्यांपाशी धावत असलेल्या आपल्या माणसांना नवीन पक्षाचा नेता म्हणाला, “तुम्ही वरच्या रस्त्याने वळून कोरीकुलला जावे, पण आता खूप उशीर झाला आहे आणि कसे? तुम्ही नदी कशी पार करणार ?”

     ” आधी नारायणपूरला पोचू, मग पुढच बघू, ” रंगा शांतपणे म्हणाला.” ” निघा, काहीजण नारायणपूला जा आन त्या कोळ्यांना सांगा बोटी घ्या आन खालच्या फेरीला जा , उशीर झाला, खानाला काही झालं तर जीवाशी गाठ हाय. मी रंगा हे जाहीर करतो. कृष्णा न्हाव्याला सांगा सुया तयार ठीव खानाच्या घावाला पट्टी करावं लागल, ध्यानात असू द्या पोरांनो त्याच्या तलवारीनं त्यानं बिबळ्याला कसं गार केलत, समद्द्यानी कसं त्याचं कवतिक केलं. निघा, आपल्याला त्याचा जीव वाचवायचा हाय, पूर कित्ती बी असू दे, आपण डरपोक असू जर दीस मावळायच्या आदी त्याला किल्ल्यात न्हाई पोचिवला तर.”

     तो ज्यांना हे सांगत होता ते त्यांच्यासारखेच बेरड होते. रंगा हा काही फक्त नाईकांचा प्रमुख नव्हता तर त्याच्या कुळातल्या राजाचा नातेवाईकही होता, इतका शक्तीशाली की तो वीस हजार माणसं मैदानात आणू शकत होता. रंगा  नाईकाची नेमणूक पश्चिम सरहद्दीच्या खालच्या भागात घोडे आणि पायदलासह होती, त्याची दीर्घ सेवा पाहून त्याला खानाच्या सैन्यात सामील होण्यास सांगितले होते. फक्त सेवाच नाही तर खानाबद्दल त्याची निष्ठाही तितकीच होती,  सगळया लोकांना हे माहित होतं. अब्बास खान आणि त्याच्या माणसांना काही झालं तर त्याच्या इतकं लाजिरवाण काय असेल, नायकाच्या या आवाहनानंतर लगेच काही जण त्या पोकळ आवाजाच्या आणि धुक्याच्या ढगाच्या दिशेने पुढे सरसावले.

     ती पायी चालणारी एक तुकडी होती आणि सीमा भागात खडतर सेवा देण्यास सुसज्ज होती. त्यांच्या डोक्यावर कातडी शंकवाकृती टोप्या घातल्या होत्या. त्या एका दोरीनं कपाळ आणि कानशीला पर्यंत वळल्या होत्या. प्रत्येकाने गुडघ्यपर्यंत येतील असे कातडी झगे घातले होते. मजबूत असा लाल कमरपट्टा, लवचिक कातडी चपला असा त्यांचा पोशाख होता. काहिंकडे तलवारी आणि ढाली होत्या. कमरेला सुरी होती. इतरांकडे लांब तोड्याची बंदूक, दारूने भरलेली शिंगे आणि गोळ्यांच्या पिशव्या कमरेभोवती लटकत होत्या. डोंगरात आणि खुरट्या झुडपात ते दिसेनासे होत,  भूभाग अचानक बदलला होता ग्रेनाईट चे खडक आणि त्यांच्या सारख्या अनेकांना लपून बसण्यास् पुरेशी काटेरी झाडी लागली.” आपल्यापैकी काही  हीत थांबाया पायजे,”  तुकडी एका लहान खिंडी जवळ येताच तुकडीचा म्होरक्या ओरडला, ” आन ते बंडखोर कुत्रे येई पर्यंत वाट बघू.”

     ” असच करा पोरांनो, ” नाईक उत्तरला” ते तुम्हाला वलांडूस्तोवर गोळीबार करू नका. आणि आता खान,” तो त्या तरुणाला एका  हिरव्या भात शेतीने वेढलेल्या गावाकडे बोट दाखवून म्हणाला.” ते बगा नारायणपूर, आन मी छाया भगवतीला नवस करतो की आमाला पल्याड जाऊदे . खुश व्हा आता समदा धोका टळलाय.”

     त्यांचा आश्रय जवळ होता हे खरेच होते, अब्बास खानसाठी तो भूतकाळ होता. तो अशक्त आणि आजारी होता, त्याच्या शाही घोड्याच्या खोगीरीवर तो प्रत्येक ठेचेला हेलकावत होता. अनेकदा तो त्याची मान थोपटत आणि आवाज देऊन त्याला प्रोत्साहन देत होता,  आणि हलक्या आवाजात मान हलवून घोड्याने त्याला प्रतिसाद दिला होता. आता घोडा आणि स्वार दोघेही सारखेच थकले होते. तरुण खानाला कशाचीही जाणीव नव्हती फक्त वाऱ्याचा भरभर आवाज जो प्रत्येक क्षणी वाढत होता,  त्याच्या कानात घुमत होता, तरीही तो खोगिरीला सहजतेने चिकटून होता, त्याच्या निशाण धारकाच्या ताकदवान बाहुंनी मागच्या काही मैलापासून त्याला पडण्या पासून वाचवले होते.

बेरडाच्या भाषणाचा अर्थ काय हे त्याने मंद जाणिवेने ऐकले होते, परंतु तो हलकेच हसला आणि त्याच्या जखमेकडे कोरड्या पडलेल्या तोंडाकडे, सुजलेल्या चेहऱ्याकडे त्याने  निर्देश केला. रंगा नाईक पुढे सरसावला, काही माणसं आणि एक बाज घेऊन आला, तरुण खानाला त्यावर झोपवले आणि गावात आणले गेले आणि त्याच्या घोड्याला त्यांनी रस्त्याच्या कडेने भाताची हिरवी पानं पोटभर खाऊ दिली.

     ” बग भिमाजी मी कोणाला घेऊन आलोय” नाईक म्हणाला  “हा अब्बास खान, आपला तरुण नेता, शूर शिपाई  त्याला मदत करा, जखमी हाय, एवढा जखमी हाय पण जरा सुद्धा कुरकुर नाही केली, खरा सैनिक, पण आता  बेहोश झालाय. कृष्णा न्हावी कुठाय? त्याला जखम बगाया सांगा.”

     ” मी हीत हाय महाराज,” तो कार्यकर्ता पुढे येऊन म्हणाला. ” मला दाकवा जखम, मी बगतो”

     तो बेशुद्ध पडला होता, त्यांनीं त्याचे कपडे हळुवारपणे काढले, कडक झालेला मखमली अंगरखा काळजीपूर्वक काढण्यात आला. तसाच जड पोलादी टोपही काढण्यात आला. त्याला थंड पाण्याने आंघोळ घालण्यात आली. तो उठून बसला आणि त्याने आजूबाजूला रानटीपणे पाहिले.

     ” अल हमदूलिल्ला” निशाण धारक धार्मिकपणे उदगारला. ” तो त्याच्या समाधीतून बाहेर आलाय, आणि जगेल, परंतु मला वाटले की तो मेला असेल.”

     “यावेळेस नाही मित्रा,” खान हलकेच, पण आनंदी हसत म्हणाला. “आम्हाला अजून किती दूर जायचे आहे? मला स्वार होऊ द्या, आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, मला आता अधिक बरे वाटतेय.”

     ” तुमी  आता माझ्या माणसात आहात,” रंगा नाईक आनंदाने ओरडला.” आता आणखी स्वारी नाही,किल्ला आता जवळ आहे  , तिथं तुम्ही दीर्घ विश्रांती साठी सुरक्षित असाल. त्यामुळं घाबरु नका , वृद्ध कृष्णाजी तुमच्या जखमेवर मलमपट्टी करेल, ते तुमच्या साठी खिचडी शिजवत आहेत , देवाचे आभार माना, तुम्ही सुरक्षित आहात मालक!”

     मग न्हाव्याने आपले कर्तव्य कुशलतेने आणि कोमलतेने पार पाडले. जखम लांब होती,  छातीच्यां डाव्या बाजूपासून डाव्या हातापर्यंत पसरलेली होती, खूप रक्तस्त्राव झाला होता, पण फार खोल नव्हता. ओठ एकत्र ठेवण्यासाठी त्यात काही टाके घालण्यात आले, हिरव्या औषधी वनस्पतींचे काळजीपूर्वक एकत्र केलेले एक पोटीस त्यावर ठेवले गेले आणि काही पट्टीने त्याची मलमपट्टी करण्यात आली. अत्यंत वेदनादायक असूनही ते त्याने सहन केले कोणतीही तक्रार न करता.

     दुसर्‍या जखमी माणसावरही असेच उपचार केले गेले, परंतु तो कमकुवत होता आणि त्याची जखम अधिक खोल होती. तेथे उपस्थित असलेल्या एका मुस्लिम फकिराने त्याची काळजी घेतली.

      तरुण खानाचा हा प्रवास थक्क करणारा होता. परंतु त्याची मजबूत शरीरयष्टी आणि जोमाने त्याने अशक्तपणावर मात केली होती. थोड्याशा पण कृतज्ञता पूर्ण जेवणानंतर त्याने पुढे जाण्यास तयार असल्याचे सांगितले.

     वृद्ध पाटलाने हस्तक्षेप केला. ” कृष्णा माई ने रौद्र रूप धारण केले आहे” तो ओरडला .” तुम्हाला ऐकू येत नाही का? अणि खरच वारा शांत झाला तसा प्रवाहाचा गडगडाट अधिकच वाढला आहे. प्रवाहाला ओलांडणारा कोणीही जिवंत वाचू शकत नाही. मुलांनो वेडे होऊ नका! देवाने तुम्हाला जीवदान दिले तुम्ही आमच्या बरोबर इथे सुरक्षित रहा.  मृत्यूच्या दाढेत जाऊ नका!”

     ” शांत, भिमाजी!” रंगा नाईक थोड्याशा तिरस्कारानेच बोलला.” जेव्हा नदी जोरात वाहत होती तेव्हा मी ती पार केली .आईने मला काहीच धक्का पोचवला नाही. मी सांगतो जास्त उशीर करू नये. ह्या! तुम्हाला ऐकू येतंय का? शत्रू खिंडी जवळ येऊन पोहोचला आहे आणि त्यांना रोखायला फक्त बारा माणसं आहेत.  बरमा त्यांना पुढे जाऊ देणार नाही, पण ते जास्त असतील तर तो फसेल आणि आपण मारले जाऊ. पोरांनो! ” तो जवळच्या लोकांना ओरडला, ” माझ्या बरोबर कोण नदी पार करल? तुम्हाला भीती वाटतेय?”

     सगळे एकदम ओरडले अशा आवाजात जो फक्त बेरडच करू शकतात. काही तरुण तडफदार पोरांनी आवाहनाला प्रतिसाद दिला अणि त्यांनी भोपळे उचलले ” आमी तुमची लेकरं हाय,” त्यांच्या गुरूच्या अणि खानाच्या पायाला स्पर्श करून बोलले. “आमी तुमाला नदी पार करून दिऊ, घाबरु नका, चला निगू, आजुन तास भर उजेड आसल आपण जलदुर्ग मदी असू आन खालच्या फेरीनं नदी पार करू. चला!’

     आता वेळ आली होती. खिंडीतून काही गोळ्या झाडल्याचे आवाज येत होते नंतर थोड्या वेळाने पुन्हा आवाज आला. बेरडांचे ओरडणे आणि किंकाळ्या चे आवाज आता अगदी जवळून येत होते. ” चला पांगा”, रंगा नाईक त्याच्या बरोबर असलेल्या माणसांवर ओरडला” बरमाला सांगा अर्धा तास खिंड लढीव आन तसाच छाया भगवती पर्यंत मागार गी, तशी गरजच पडली तर जीव गेला तरी बेहत्तर.” जशी लोकं गेली तसा खानाचा पलंग उचलण्यात आला, काही स्वार पुढे गेले, हा छोटासा ताफा खडतर रस्त्यावरून जलद गतीने गाव सोडून पुढे निघाला.

     ” जर खिंडीत पाडाव झाला, ” रंगा पाटलांना म्हणाला, ” जखमी लोकांना सुरक्षित ठिकाणी ठीवा, त्यांचे जेवढेबी लोकं असतील समद्यास्नी छाया भगवतीच्या दारात आणा आणि तुमि समद्यांनी लढाई करा. बरमा आन त्याची माणसं सुखरूप अस्त्याल तर नदीच्या दिशेनं दोन बार करा, आमी समजून घिऊ काय ते.”

     ” हे देवा, माई यांना मार्ग दाखवो, ” तो वृद्ध धार्मिकपणे म्हणाला. ” मी छाया मातेला नवस करतो की तुम्हाला पल्याड जाऊ दे.”

    ग्रेनाईट च्या मोठ मोठ्या खडकातून जाणारा रस्ता अरुंद आणि अडचणीचा होता,  काही ठिकाणी तर बंदच होता. यातून प्रवास करणे अशक्य होते. रंगा नाईक अचानक थांबला. ” तुमाला अपसरेला रागावलेली पाहायचं का,” तो म्हणाला ”  हे पाहण्यासाठी तूमाला जास चालायची बी गरज न्हाय, या कोपऱ्यात या ” खानाचे सामान वाहणाऱ्याना तो म्हणाला. ” ते माथ्यावर ठिवा. “

त्यांनीही तसचं केलं  समोरचं भव्य आणि सुंदर दृश्य पाहून अब्बास खानाला आश्चर्याचा धक्काच बसला.

     खडकाचा माथा सपाट होता अणि त्याचा पलंग अगदी कडेला ठेवला होता. सुरवातीला तर त्याने डोळेच झाकले. खालच्या पाण्याचा हा क्षोभ पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही. उंचापुरा रंगा नाईक न डगमगता उसळणाऱ्या पाण्याच्या अगदी जवळ उभा होता. ” थोडा धीर धरा खान साहेब ” त्याच्या रांगड्या आवाजात तो म्हणाला. ” आंधळं करणारं हे धुकं वाऱ्यनी बाजूला होऊ द्या. मग समद दिसल.” त्यानें अस म्हटल्या बरोबर धुके दरीच्या दुसऱ्या बाजूला सरकले. हळू हळू जल प्रपाताचा तो शाही थाट त्यांना उंचावरून दिसू लागला. जिथं नदीचं पाणी वरून तळा पर्यंत खाली पडत होतं तिथे अजूनही धुक्याची चादर पसरली होती. नदी काठोकाठ भरून वाहत होती अंदाजे पाव मैल किंवा त्यापेक्षाही जास्त रुंदीचे पात्र असेल अणि पाणी चारशे फूट उंचीवरून धडकी भरवणारा आवाज करत कोसळत होते. तिच्या पात्रात कोठेही याच्या ईतका लंब खडक नव्हता परंतु तो बऱ्याच ठिकाणी तुटलेला होता इतका की काही ठिकाणी खडकाची फक्त टोकेच दिसत होती. पात्राचा उतार हा असा अनियमित होता त्याने प्रवाहात अडथळा आल्याने प्रवाह अधिकच भव्य दिसत होता. प्रवाहाने पात्रात खळगे केले होते.जे आता पाण्याने भरले होते. यातील पाण्याचे तुषार गर्जना करत उंच उडत होते.ते सगळे दृष्य पाहून तो चकित झाला होता. तो जणू बेहोश होण्याच्या मार्गावर होता. पण तो सरळ पुढे निघाला आणि नाईक पुन्हा बोलला.

     “डोह स्वच्छ आहे मिया” तो म्हणाला ” ते असे आहे की, जगातले सगळे घोडे माना फेकतात आणि लढतात.”

     खरंच ते ठिकाण पाहणे खूपच भीतीदायक होते. त्याच्या पायथ्याच्या डोहात जलप्रपाताचे प्रचंड पाणी त्याच ताकदीच्या प्रवाहात आणि भोवऱ्यात मिसळत होते. त्याच्या मोठ मोठ्या लाटा तयार होत. पाण्याचे तुषार हवेत उंच उडत. गरगरणारे, फेसाळणारे , तुकडे करणारे, अकल्पनीय हिंसक आणि इतके भव्य की उघड्या डोळ्यांनी ते पाहणे मुश्किलच. बेरडला हे दृश्य नेहमीचे होते तरीही तो शांत चित्ताने पाहत होता.

     ” ही अप्सरा रागावलेली आहे, ” तो म्हणाला, ” आम्ही तिची पूजा करतो, तिला शांत करण्यासाठी प्रसाद आणि फुले तिच्या कुशीत टाकतो. हे सगळं संपलं की आपण या उघड्या खडकांवरून चालू शकतो आणि या पाण्याचे मोठाले स्तंभ तयार करणाऱ्या खळग्यांवर प्रसाद ठेऊ शकतो. हा डोह आता जितका भयानक दिसत आहे तसा नसतो एखाद्या शांत तळ्याप्रमाणे असतो. चला, तुम्ही खूप पाहिलंय.”

     खान हे सगळं पाहून मोहित झाला होता.” थोडा वेळ अजून, आणि मी तयार असेल., तो म्हणाला.” या दृश्याचा पहिला धक्का माझ्यासाठी खूप होता, आता मी शांत झालोय आणि मला हे आणखी थोडा वेळ पहायचंय.”

     सूर्याचे तेज आता कमी झाले होते त्याची तिरपी किरणं त्या उसळणाऱ्या पाण्याशी खेळत एक नितांत विलोभनीय परिणाम साधत होती.  जलप्रपाताचे भय आता संपले होते आणि फक्त त्याची सुंदरता बाकी होती. पाणी जरी पिवळे अणि गढूळ असले तरी गुलाबी किरणांनी त्याच्या प्रवाहात ठिकठिकाणी इंद्रधनुष्य तयार व्हायचे, नाहीसे व्हायचे अन् पुन्हा दिसायचे. कोणीही ते मोजू शकत नव्हता .काही थोडा वेळ स्थिर दिसायचे, काही फक्त अदृश्य होताना. त्याखाली पाण्याचे विस्मयकारक झरे, सतत वाढणारे आणि या सुंदर हारांनी सुशोभित केलेले. दरीच्या काठावर झाडा झुडपानी वेढेलेले ग्रेनाइटच्या खडकांचे ढिगारे या ठिकाणच्या अलौकिक बुद्धिमत्तेला वाकून वंदन करणारे. हे सर्व गुलाबी रंगात न्हाऊन निघालेले. खोल सावल्या दरीचे सौंदर्य अधिकच खुलवत होत्या.

     ” खूप झालं, “काही मिनिटांच्या शांततेनंतर तरुण खान ओरडला. ” माझा आत्मा भरून पावला आहे, अशा शक्ती ही देवाची करणीच , तरीही मला या सुंदर दृश्याबद्दल कधीच कोणी बोललं नाही. पुढे जा मित्रा. मी जे पाहिले आहे ते कधीच विसरू शकत नाही. खरोखरच हा आश्चर्याचा देश आहे. आणि आपल्याला तो गर्जना करणारा प्रवाह ओलांडायचा आहे का?”

“तरीही ” त्याचा वाटाड्या म्हणाला.”आम्ही शूर असलो आणि तिच्यावर विश्वास ठेवला तर पवित्र माता आपले रक्षण करेल. फेरीत पाणी वेगवान असले तरी ते गुळगुळीत आहे, आणि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. मी शंभर वेळा एकट्याने पार केले आहे, फक्त काही भोपळे पाठीशी बांधून; पण माझे स्वामी मौल्यवान आहेत आणि आम्ही सर्व तयारी केली आहे.”

     मग पलंग उचलण्यात आला आणि दरीच्या काठाच्या सम पातळीत नेण्यात आला, आता रस्ता अवघड अणि गुंतागुंतीचा होत चालला होता. सध्या त्यांच्या मागून खडकांचा एक पुंजका दिसू लागला जणूकाही कोणी ते दगड हाताने एकावर एक ठेवले आहेत, जलदुर्गचा शाही किल्ला दिसू लागला. सुरवातीला खानाला ते त्याच पर्वत रांगेतील दगड वाटत होते परंतु ताफा जसा पुढे जाऊ लागला तसे ते वेगळे आणि तुटक असल्याचे त्याच्या लक्षात आले.  त्या पर्वत रांगेतील ग्रेनाइट च्या खडकांनी बनलेली ती एक उंच टेकडी होती, तिच्या नैसर्गिक अवस्थेत चढाई करण्यास कठीण. बुरुज अणि भिंतींनी भक्कम केलेला त्याचा एक अभेद्य किल्ला बनला होता. सर्वात वर नायकाचा महाल होता ज्यावर विजापूरचे शाही निशाण फडकत होते. सूर्यकिरणांनी खडक, झाडीझुडपे, भव्य तटबंदी सारे उजळून निघाले होते.  अणि ते खडकाळ भागाशी मेळ घालत होते. तरुण खान आपल्या आश्रय स्थानाकडे  उत्सुकतेने  आणि आपल्या चुलत भावाच्या समाजाकडे त्रासिकपणे पाहत होता. जो त्याच्या जखमेचा आणि थकवणाऱ्या दिवसाचा परिणाम होता.

      निशाण धारक आता एका अरूंद खिंडीतून खाली उतरत होते अशा अडचणीच्या मार्गातून जो पुरुषांनाही चालण्यास कठीण होता.. त्याला उचलणारे लोक  मात्र धीर गंभीर पावलांनी यशस्वी रित्या चालत होते. पायथ्याशी काही लोक  वाळलेले भोपळे बांधलेल्या हिरव्या पलंगावर पहुडले होते.जो खानाच्या पलंगापेक्षा छोटा होता.

     इथून किल्ल्याचे दृश्य वरून दिसणाऱ्या दृष्यापेक्षा अधिक  मनमोहक दिसत होते. जणू पाचशे फूट किंवा त्यापेक्षा उंच उठणाऱ्या शंकू सारखे. ग्रेनाईटच्या खडकांचा ढीग रत्नांनी बांधलेला परंतु पर्णसंभाराणे आणि खुरट्या झुडपांनी मऊ केल्यासारखा भासत होता. वरून जो बुरुज किल्ल्याचा भाग वाटत होता तो आता खडकातून आरक्त आकाशात ठळकपणे प्रक्षेपित झाल्या सारखा वाटत होता. मावळणाऱ्या सूर्याच्या  प्रकाशाने नदी सुध्दा लाल झाली होती. या प्रकाशाचा सुंदर आणि समृद्ध प्रभाव किल्ल्यावर आणि डोंगरावर दिसत होता. त्यांना जो प्रवाह पार करायचा होता तो धनुष्य बाण पोहोचेल इतक्या अंतरावर होता. प्रवाह जरी गुळगुळीत वाटत होता तरी तो वेगवान होता. पात्रातील खडकांमुळे किंवा त्याच्या स्वतःच्या अंतर्भूत शक्ती मुळे पाणी हेलकावत होते. हे हेलकावे नियमित होते कोणत्याही विश्रांती शिवाय. त्यांना आता किनारा अणि त्यांची वाट पाहणारे. लोक दिसू लागले होते.  बेरडांच्या नाईकाचा दमदार आवाजही ऐकू येत नव्हता , त्याने एककडून पितळी शिंग घेऊन जोरदार  आवाज केला. त्याला किल्ल्यावरून एकदा प्रतिसाद मिळाला.

     ” आह! त्यांना माझा इशारा माहित आहे, बघ खान आता तुझा चुलत भाऊ आपले स्वागत करायला तयार असेल. चला,तराफा तयार आहे, बिस्मिल्ला!’

     रंगा नाईकाने त्याचा पोशाख आणि शस्त्र बाजूला केली आणि फक्त तलवारच त्या नाजूक तराफ्यावर ठेवली जिथे खानाने आपली शस्त्रे आणि पोशाख ठेवला होता. घोडे आणि खानाचे सेवक वरच्या मार्गाने जर्नलपुरला पाठवले गेले . पूर ओसरे पर्यन्त ते तेथेच थांबणार होते. आता सगळे तयार होते.

     “राहा” बेरड ओरडला, ” माझे लोक सुरक्षित आहेत हे ऐकुन मला आनंदच होईल आणि मी इशाऱ्याची व्यवस्था सुध्दा केलीय . ऐका!”

      असे म्हणतो न म्हणतो तोच वरच्या खिंडीतून दोन बार ऐकू आले त्याने ओळखले की शत्रूचा हल्ला परतवला गेलाय

” बिस्मिल्ला” तो उद्गारला. घोड्याच्या घेराने बांधलेल्या भोपळ्याच्या ढीगा दरम्यान पाय टाकून तो बसला. “असं कोण बुडल का,  पोरांनू आता खानाला हळूच उचला आणि पलंग पाण्यात ठीवा -थांबा , माझ्या इशाऱ्याची वाट बगा फुडची लाट यीऊ द्या.आत्ता” एक लाट किनाऱ्यावर धडकताच तो ओरडला. ” आता, तुझ्या जीवा साठी, जय माता! ‘  “जय माता! ” फेरी वाल्यांनी पुनरावृत्ती केली आणि जलतरणपटुंनी छोटा तराफा  जोराने वल्हवत प्रवाहात ढकलला.

    मार्गात धोका नव्हता असे नव्हते. प्रवाहाचा वेग प्रचंड होता आणि त्यांना प्रवाहाने खूप दूरवर वाहून नेले. जसे किनारा त्याच्या पासून लांब जात होता, तराफा गोल गोल फिरत होता तसे तरुण खानाने जगण्याची इच्छाच सोडली.परंतु बेरड त्याला ओरडला घाबरु नको आता सर्व धोका टळलाय. कोणत्याही परिस्थितीत एका सच्च्या मुसलमानाला ज्याने अंत पाहिलाय हे शोभत नाही. तरफा संथ पाण्यात खेचला गेला काठावरील लोकांनी त्यांच्या कडे दोर फेकले त्याच्या मदतीने ते किनाऱ्यावर आले.

     ” शाब्बास! शाब्बास! ” सैनिकांच्या गर्दीतून एक मर्दानी आवाज आला.” मी म्हणतो,  शाब्बास, रंगा नाईक, तुझ्यासारखा धाडसाचा पराक्रम करायचा आहे; पण तुझ्याकडे कोण आहे? देवदूत, पण मला त्याचा चेहरा कळला पाहिजे. अब्बास खान! भावा ! तू इथे कसा आलास? इतकी भीषण दुर्दशा आणि जखमी सुद्धा?” 

 “महाराज, त्याला प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही.” बेरड म्हणाला.” तोही माझ्या सारखाच मजबूत आणि टवटवीत असता पण ही कुरुप जखम. तो दिवसभर ही भळभळणारी जखम घेउन उन्हातान्हात फिरतोय. काही वेळा बेशुद्ध सुध्दा झाला आणि आता सुद्धा होईल असं वाटतंय. कुठे तरी आडोशाला घेउन चला आणि एखाद्या हकिमाला बोलवा.”

     “अरेरे! तो मुदगलला गेलाय ”  किल्लेदार उस्मान बेग म्हणाला ज्याला सामान्यपणे नवाब म्हटलं जातं. ” मी एक करू शकतो त्याला मागे बोलावू शकतो पण कोणी खाडी ओलांडून पल्याड जाऊ शकला तर, परंतु हे काही दिवस तरी शक्य नाही. एक दरवेश आहे ज्याच्याकडे दुर्मिळ कौशल्य आहे, याला एकदा तिकडे नेण्यास काय हरकत आहे.”

   ” चांगले, महाराज त्याला घेउन जाऊ या.  जर त्याच्यबरोबर एका सेवकाला पाठवले तर तो पवित्र सय्यद आंधळा असला  तरी नक्की त्याला मदत करेल.”

     ” मी स्वतः जाईन,”नवाब म्हणाला, “आणि त्याची काळजी घेईल.”

     नंतर त्याचा पलंग अलगद तिथे नेण्यात आला. एका छोट्या मशिदीतील राहण्याच्या जागेत.  सुरवातीला तो म्हातारा दरवेश इतका अस्वस्थ का झाला कुणास ठाऊक पण जसे त्याला कळले की एका जखमी माणसाला मदत पाहिजे तो तयार झाला. दरवेशाने त्याला तपासले आणि तेथेच ठेवण्यास सांगीतले. त्याच्या चुलत भावाची वाट पाहण्याचे काम दिलेल्या सेवकालाही त्याच्या दिमतीला ठेवण्यात आले.

      तरुण खानाला आंघोळ घालण्यात आली. कोरडे कपडे घालण्यात आले आणि आरामदायक बिछान्यावर झोपवण्यात आले. न्हाव्याने घातलेले टाके व्यवस्थित बसले होते आणि रक्त येणे थांबले होते. तो आता ताजातवना झाला होता. पण त्याला  म्हातारा शेख  आणि त्याच्या जवळ बसलेल्या त्याच्या पुतण्या बरोबर काय झाले हे सांगता आले नाही. त्याच्या वेदना वाढू लागल्या आणि त्याची मानसिक स्थिती ढासळली.

     ” मी तुम्हाला पाहू शकलो असतो,” तो म्हणाला, ” पण मी आंधळा आहे! झोरा, पोरी त्याच्यासाठी झाडपाल्याचे पोटीस बनव आणि त्याच्या माणसांना सांग ते कसे लावायचे. आपण दोघं आज रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेऊ, ताप जास्त आहे; परंतु, इनशाल्ला, तो लवकरच बरा होईल. विश्वास ठेवा नवाब साहेब, तुमचा गरीब सेवक प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.”

     ” मी माझ्या चुलत भावाला तुमच्या कडे सोपवतो, हजरत, त्याला पाहण्यासाठी मी लवकरच परत येईल.” असं म्हणत त्याने दरवेशाला आदरपूर्वक नमस्कार केला आणि त्याची रजा घेतली.

(अपूर्ण )

प्रतिक्रिया पुढील मेलवर द्याव्यात. sahityakshar@gmail.com किंवा sahityakshar@yahoo.com किंवा इथेही द्याव्यात.

अनुवादकाचा परिचय :

श्री.सतीश भीमराव सोनवणे
वरिष्ठ सहायक, भारतीय स्टेट बँक, शाखा चास
एम ए इंग्लिश
छंद : इतिहास, पुरातत्व आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास
नवनवीन ऐतिहासिक ठिकाणांचा शोध व अभ्यास त्यानुषंगाने लेखन.

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment