कियू बीच हाऊ यांच्या कविता
व्हिएतनाम येथील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री
एकूण १५ पुस्तके पैकी ११ कथासंग्रह. ‘द लास्ट साँग ‘
या कवितासंग्रहाचा इटालियन व इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध.
व्हिएतनाम लेखक संघाच्या उपाध्यक्षा.
१.माझ्या आत्म्या,साठी
हे माझ्या आत्म्या
मी तुझ्याशी
शरीराने जोडले आहे
किती उबदार,
किती रोमांचकारी
मी तुझ्याशी जोडले आहे
अशा विचारांनी
आणि अजूनही आपण
एकमेकात विरघळतो आहोत
हजारो मैलांची दूरी
हजारो शब्दांचे मौन
तरीही आपण
विणले आहे एक जाळे
आपल्या विचारांनी
तू हसतोस आणि
माझे हृदय धडधडते आहे
हे माझ्या आत्म्या,
माझ्या प्रत्येक जाणिवेत
तू आहेस…. !
***
२. दयाळूपणाची शांतता
जेव्हा कोणीच लिहू इच्छित नाही
दयाळूपणा शांत राहतो
मला लिहिणे अवघड जाईल
जेव्हा शब्द मौन धारण करतील
आणि बाहेरचा मोठा आवाज
या मौनाला मारत आहे
आत्म्यामध्ये बुडणारे
शांत शब्द आणि
दयाळूपणा
शब्दांच्या पंखांनी उडत आहेत
योग्य शब्दांसाठीच
आणि तू त्या शांततेपासून
फार दूर…एकाकी..
एकटा कीबोर्ड
त्यातून साकारलेल्या ओळी
चमत्कार करताहेत
फक्त तू माझ्यात उपस्थित रहा…
***
३. बदल
सवयी, संस्कृती
चांगल्या वाईट असू शकतात…
पूरक असू शकतात किंवा नाही..
पूरक असणाऱ्या सवयी
वाईट नसतातच..
कारण त्या आपणाला
बदलाकडे नेतात..
आपल्या जुन्या सवयी
नव्या संस्कृतीला जन्म घालतात
आणि
जीवनातला रस वाढवतात.. !
***
४. दंश
पाप कीर्तीवर चिकटवलेले
दुःख आनंदावर डकवलेले
अशा दुहेरी जाणिवांचे
पेड असलेल्या
जिवंत लोकांना
मी काय दंश करणार??
***
५. मी एक राख
आठवणींमध्ये भटकताना
विपत्तींमध्ये विरघळताना
तांबडी नदी डॅन्यूबला
याद करते आहे
खेळकर लाटांनी वाहताना..
एकाकीपणा
विरहाला तीव्र बनवतो आहे..
रात्री वाट पाहताहेत
जळते काव्य साकारताना
माझी राख खाली
अवशिष्ट रूपात सांडताना…
***
६.स्त्रीच्या आत काय आहे??
हे स्त्रिये,
तुझ्यात काय आहे?
निरागस प्रेम की
अद्भुतता??
अमर्त्यता???
की खूप सारे गोड शब्द ??
आणि आणखी काही
उपहासात्मक प्रयत्न..
कृत्रिम संच
शुभ्र दंतपंक्ती दर्शवणारा
कृत्रिम उरोज??
पण तुला माहिती आहे
या सर्व गोष्टी
प्रेमात पुरेशा नाहीत
मूर्य माणसांसाठी..
तुझ्या कल्पनेतला प्रेमी
जो प्रत्यक्षात नाही..
तुझे सारे प्रयत्न,
अमर्यादित आशा
तुला शेवटी
शवपेटीकडे नेतील..
***
७.रहस्यमय
शब्द शब्दांना जन्म देतात
कविता गाणी गातात
प्रेम प्रेमाला हाकारत राहते.. !
***
८. राख सर्वत्र
जिथे कुठे मनुष्य आहे
तिथे राख आहे
पाईपमधून राख
जीवनातून राख
आकाशात उडणारी राख
सिगारेटची राख
रक्षापात्रता राख
टेबलवर राख
काचेवर राख
चर्चेतील राख
पेयातील राख
कारमध्ये राख
बारमध्ये राख
हवेत राख
स्त्रीच्या केसांवरील राख
अफेयरची राख
अवकाशातील राख
युद्धाच्या काळातील
आणि
युध्दानंतरची राख !!
***
९.दगड
माझे हृदय
एक दगड बनले आहे..
रात्रीच्या घनदाट काळोखात
किती थंडगार आणि कठीण..
कधी कधी मला समजतच नाही
घाम आहेत की अश्रू??
पण मला हा दगड
फोडला पाहिजे
आतला हिरा पाहण्यासाठी
जगण्याचे सुचिन्ह पाहण्यासाठी..
***
१०. प्रेमाच्या बियाi
लिया,लिया माझ्या प्रिय मोत्या,
तू सुंदर मुलगी आहेस..
एक छोटी पण थोर मुलगी
तू दिल्या आहेस
पंख असलेल्या
प्रेमाच्या बिया
सर्वत्र उडणाऱ्या
ज्या जागवतात आशा
आणि तजेला… !
***
अनुवाद :डॉ. संजय बोरुडे
+91 9405000280