2020 ऑगस्ट

जेफ्री आर्चर : एक सुबोध लेखक

सा हि त्या क्ष र 

 आपल्याला इंग्रजी पुस्तक वाचण्याच्या आनंदात रंजकतेसोबत काहीसं अंतर्मुख व्हायचं असेल आणि माणूस नावाच्या प्राण्याचं मनोविश्लेषण करायची खुमखुमी असेल तर ‘ जेफ्री आर्चर ‘ सारखा लेखक जरूर वाचायला घ्यावा. 

अत्यंत गुंतागुंतीची बाल्यावस्था जगायला लागली असेल तर पुढे जाऊन ती व्यक्ती एक माणूस म्हणून कसा घडू शकतो याचं एक चमत्कारिक उदाहरण म्हणून जेफ्रीच्या आयुष्याकडे पाहता येईल.

सर्व बालसवंगड्यांना ‘ माझे बाबा मिलीटरीत सर्व्हिसला आहेत ‘ असं छाती फुगवून सांगणाऱ्या लहानग्या जेफ्रीचा बाप हा प्रत्यक्षात एक महालबाड,धूर्त आणि सोंगाड्या आसामी होता. आई बिचारी पत्रकार म्हणून राबून संसार ओढायचा प्रयत्न करत असताना बाप कुणाकुणाला टोप्या घालून, आपल्याच नावाशी साधर्म्य असणाऱ्या एका मिलिटरीतल्या माणसाची कागदपत्रे बनावट पद्धतीने स्वतःच्या नावे वापरून आर्थिक घोटाळे करत असे. हे सर्व बारीक नजरेने टिपत असता जेफ्रीही शाळा-कॉलेजच्या दिवसात मित्राना, शिक्षकांना लोणकढ्या थापा मारून खोटी प्रमाणपत्रं आणि क्रीडाक्षेत्रातली बनावट प्रशस्तीपत्रं बनवायचा असा दावा अनेक टीकाकार करतात.असो.

कुठल्याच क्षेत्रात ठाम भविष्य नसलेल्या जेफ्रीनं युक्तीनं राजकारण क्षेत्रात शिरकाव करून घेतला आणि वयाच्या २९ व्या वर्षापासून पुढली पाच वर्षे ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य म्हणून मानमरातब मिरवला. यानंतर मात्र पुन्हा निवडणुकीच्या भानगडीत न पडता त्याने पूर्णवेळ लेखन करायचा निर्णय घेतला. गेल्या पंचेचाळीस वर्षात १२ कादंबऱ्या , ५ कथासंग्रह, ३ नाटके आणि २००० ते २००४ दरम्यान लिहिलेल्या ‘ प्रिझन डायरी ‘ चे तीन खंड अशा साहित्यनिर्मितीच्या जोरावर या लोकप्रिय आणि गोष्टीवेल्हाळ माणसाने ‘ सर्वोत्तम स्टोरी टेलर ‘ हा मान पटकावला.

दुःखद, उदास, खूप स्पष्ट आणि अस्वस्थ करणारं वास्तवचित्रण हा आर्चरच्या लेखनाचा गुणविशेष. ‘ नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस ‘ या पहिल्याच कादंबरीने मोठा वाचकवर्ग काबीज करणाऱ्या जेफ्री आर्चरला एका कथेची दुसऱ्या लेखिकेकडून उचलेगिरी केल्याच्या वादात अडकावं लागलं होतं. त्याच्या आयुष्यातली सर्वात गंभीर घटना म्हणजे राजकारण कारकिर्दीत झालेल्या एका आर्थिक घोटाळ्याचा खटला पंचवीस वर्षांनंतर चालला आणि त्याच्या अगदी नजीकच्या व्यक्तीच्याच साक्षीमुळे न्यायालयाची दिशाभूल करणे, खोटा तपशील सादर करणे(perjury of court)या गुन्ह्याखाली जेफ्रीला चार वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला. ‘ ए प्रिझन डायरी- खंड I , II आणि III ‘ ही निर्मिती याच कालखंडातली.

जेलमधे या लेखकाला जवळपास सर्वजणच ओळखत होते त्यामुळे तुरुंग अधिक्षकापासून ते खुनी,बलात्कारी असे निर्ढावलेले गुन्हेगारही जेफ्रीचा ऑटोग्राफ मिळवणे, त्याच्याकडून पत्र लिहून घेणे, कायदेशीर अर्ज करणे या कामात मदत मिळावी म्हणून त्याच्या मागे मागे असत. 

जेफ्री आर्चरच्या इतर साहित्याचा परामर्ष अनेक अंगांनी अनेकप्रकारे घेतला गेला असला तरी या जेलमधल्या रोजनिश्यांच्या पारदर्शी आणि सविस्तर लेखनासाठी कोणाही वाचकाला,या थोर माणसाला पूर्ण गुण द्यावेसे वाटतील.

कोठडीत बसून दर दोन तीन तासाला मजकूर लिहून सकारात्मक मनोबल शाबूत ठेवणे,दिवसाला कमीतकमी ९००० शब्द या गतीने काही लाख शब्द लिहिणे आणि हे सातत्य १९ जुलै २००१ पासून ते १८ ऑक्टोबर २००२ पर्यंत पूर्ण ४५७ दिवस अथकपणे कायम राखणे ही काही सामान्य गोष्ट निश्चित नाही. 

युवकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयाच्या चाहत्यांचं पाठबळ लाभलेल्या या लेखकाच्या साहित्यश्रेणीबद्दल मतमतांतरे असली तरी आधुनिक मानवाच्या जगण्याच्या व्यामिश्रतेचा लेखाजोखा अनुभवायचा असेल तर जेफ्री आर्चरच्या प्रिझन डायरीचे खंड नक्की नजरेखालून घालावेत.

जाता जाता इंग्रजी भाषेतील साहित्याच्या नवख्या वाचकांसाठी एक दिलासा म्हणून – ‘ जेफ्री वाचताना इंग्रजी डिक्शनरी किंवा गुगलची मदत घ्यावी लागत नाही ‘ इतका हा लेखक सुबोध भाषेत लिहितो !

सौजन्य @Prahlad Deshpande

(व्हाटसप वरुन साभार )

*टीप* : सौजन्यकर्ते देशपांडे यांचा नंबर मिळवायचा प्रयत्न केला. परंतु मिळाला नाही. कुणाला ठाऊक असेल तर संपर्क साधावा

*** 

थोडंसं मनातलं :

मी लेखक म्हणून धडपडत असताना पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे यांचा परिचय झाला. ते नव्याने प्रकाशन क्षेत्रात उतरलेले आणि अनुवाद छापत होते. त्यांनी मला जेफ्री आर्चर यांचा ‘ अ ट्विस्ट इन द टेल ‘ हा कथासंग्रह अनुवादित करायला सांगितला. परवानगी चे ते पाहणार  होते. मी दिड महिन्याात अनुवाद करून दिलाा.

दरम्यान जेफ्री आर्चर चेक बाऊन्सप्रकरणी जेलमध्ये पोचले होते. त्यामुळे हे पुस्तक स्वैर अनुवाद म्हणून आले. एरवी सस्पेन्स कथा लिहिणाऱ्या जेफ्री यांनी यात काही विनोदी, सामाजिक कथाही लिहिल्या आहेत. त्या पुस्तकानंतर माझ्या स्वतःचे दोन कथासंग्रह प्राजक्त प्रकाशना कडून आले.

माझ्या या पहिल्या अनुवादाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ : 

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment