2021 संप्टेंबर

बाबू बिरादार:मोठ्या प्रतिभेचा लेखक

सा हि त्या क्ष र 

बाबू बिरादार हे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत हे उशिरा का होईना मराठी जाणकारांना जाणवले ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. अंबाजोगाई येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बैठकीत पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा ठराव आला. त्यासाठी काही नावं पुढे आली.परंतु दगडू लोमटे,शेषराव मोहिते,आसाराम लोमटे आणि मी अशा चौघाजणांनी बाबू बिरादार यांच्या नावाचा आग्रह धरला.हे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य आहे ते पटवून दिले. अखेरीस या नावावर शिक्कामोर्तब झाला. काही वर्षांपूर्वी उंडणगावच्या साहित्य संमेलनात बाबू बिरादार यांची मुलाखत घेतली गेली होती.त्यासाठीही आम्ही विशेष आग्रही होतो.खरे तर बिरादारांना यापैकी कशाचेही आकर्षण नव्हते.आपण सभासंमेलनातून मिरवावे ही गोष्ट त्यांच्या मनाला कधीच शिवली नाही. देगलूर सारख्या सिमावर्ती भागात राहून व्रतस्थपणे लेखन करणारा हा मोठ्या प्रतिभेचा लेखक आहे.काठेवाडी हे या प्रतिभाशाली लेखकाचे मूळ गाव आहे.या गावाचा परिसर,शेती माती,कष्टणारी माणसे,घरे,वाडे,ओढे,वड,पिंपळ अशी वृक्षवल्ली आणि अख्खा निसर्ग या लेखकाच्या कादंब-यांतून येतो. आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलनात फारसा निमंत्रित म्हणून सहभागी न झालेला परंतु हे संमेलन कधीच न चुकवणारा हा नेक लेखक आहे.पदरमोड करून प्रत्येक साहित्य संमेलनाला हजेरी लावणं,सामान्य श्रोत्यात बसून सहभागी होणं,चर्चा, परिसंवाद गंभीरपणे ऐकणं,नवीन उत्तम पुस्तकं विकत घेणं ही वहिवाट त्यांनी आजवर अबाधित ठेवलेली आहे.आपणाला आवडलेल्या पुस्तकावर तासनतास चर्चा करणं,त्यातील कच्च्या, पक्क्या जागा नेमकेपणानं हेरणं ह्या बाबुरावांच्या विशेष आवडीच्या जागा.आजवर या जागा ते जीवापाड जपत आले.शरफोद्दीन आणि नागोराव उतकर हे खास आत्मीय मित्र बाकी लक्ष्मण मलगीरवार,ऋषीकेश देशमुख, पांडुरंग पुठ्ठेवाड अशा देगलूरातील आपल्या गणगोताशी वाड़मयीन घडामोडींवर, नव्या जुन्या पुस्तकांवर चर्चा करणे ही बाबूरावांची विश्रांतीची जागा.जिल्हा सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा करून निवृत्ती.

बाबू बिरादार हे प्रसिद्धी पासून स्वतःला खूप अलिप्त ठेवतात.आपण मराठीतील एक मान्यवर कादंबरीकार आहोत ही गोष्ट त्यांनी कधीच मनाला शिवू दिली नाही.लेखनाच्या संदर्भात स्वतःला आजमावत राहणं आणि हात लिहिता ठेवणं ही त्यांची लेखननिष्ठा आहे.आपण जे लिहीत आहोत ते साधे,वरवरचे न राहता जगण्याणे अंतस्तर पिंजून काढणे ही लेखक म्हणून आपली जबाबदारी आहे,अशी त्यांची धारणा आहे.

बाबू बिरादार यांनी मातीखालचे पाय,कावड,गोसावी,अग्निकाष्ठ,अंत:पुरूष, संभूती अशा सहा कादंब-या आजवर लिहिलेल्या आहेत.कादंब-यांचे शीर्षक पाहिले तरी त्यातील कथाद्रव्याची आपणास कल्पना येते.या कादंब-यांचे कथानक ग्रामीण पार्श्वभूमीवरचे असले तरी केवळ ग्रामीण कादंबरी या संज्ञापरिघामध्ये त्या मावणा-या नाहीत. माणसाच्या मनाचा शोध घेणे ही लेखकाची लेखनामागील प्रबल प्रेरणा आहे,हे सतत जाणवत रहाते. माणसाचे मन अतर्क्य, गूढ,गमतीदार आणि अस्थिर असते.या अस्थिर मनाचा शोध घेणे आणि माणसाच्या कृतिप्रणवतेमागील कारणे हुडकत जाणे ही या लेखनाची मूलभूत वृत्ती आहे,असे वाटत रहाते.

खरे तर अत्यंत मोकळाढाकळा स्वभाव असलेला, गप्पांच्या मैफलीत मनापासून बोलणारा,बोलताना आपला देगलुरी ढाचा किंचितही बिघडू न देणारा

बाबू बिरादार हा कादंबरीकार लेखक म्हणून आम्ही गंभीरपणे समजून घेतलेला आहे,असे वाटत नाही. या लेखकाच्या सहा कादंब-यांचा स्वतंत्रपणे विचार केला तर त्याचे सामर्थ्य लक्षात येते.

‘मातीखालचे पाय’ ही बाबू बिरादार यांची पहिली कादंबरी.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेद्वारे ही कादंबरी प्रकाशित झाली. ज्येष्ठ कवी आणि अनुवादक भगवंत क्षीरसागर आणि विख्यात चित्रकार भ.मा.परसवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगाती प्रकाशनाकडून १९८२ मध्ये ही कादंबरी आली.आंध्र,कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सिमारेषेवरील वाडी या छोट्याशा गावातील संभाच्या कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी या कादंबरीत आलेली आहे.या कादंबरीतील रघू हे पात्र दीर्घकाळ मनात रेंगाळत रहाते.रघूचा या कादंबरीतून आलेला मनोव्यापार हा विलक्षण आहे.तो कादंबरीला गतिमान करतो.वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने गावात निर्माण झालेले ताणतणाव लेखक नेमकेपणाने उभे करतो.जातीयतेचे दोर घट्ट असलेल्या काळात माणसाचे जगणे कसे पशूवत होते याचे बोलके चित्र रेखाटतो.रघू आणि माणिक महाराज यांचा या कादंबरीतील संवाद मूळातून वाचला पाहिजे इतका जिवंत आणि प्रत्ययकारी आहे.परंपरा,नियती आणि जगण्यातील धोपटपणा याचे कादंबरीतून आलेले संदर्भ सूचन विलक्षण आहे.

बाबू बिरादार यांच्या ‘कावड’ या कादंबरीतून वारकरी संप्रदायातील भक्तांच्या व्यक्तीविशेषांची उकल होत जाते. ही कादंबरी पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.पंढरपूर परिसराचे वर्णन आणि टाळमृदंगात रंगून गेलेल्या व्यक्तीरेखा रेखाटताना लेखकाची लेखनउर्मी झाकून राहत नाही. कादंबरीतील गोरख मास्तर ही कमालीच्या ताकदीची व्यक्तीरेखा आहे.वारकरी मास्तरांचे आपल्या मृदंगावर जेवढे प्रेम आहे तेवढेच रूक्मिणीवर आहे.कमळीचे आकर्षणही तेवढेच आहे.संसार आणि परमार्थ अशा पारड्यांच्या कावडीत मास्तरांचे मन सतत हिंदकळत असते.या कादंबरीतील मास्तरांचा शेवट वाचकाला अस्वस्थ करणारा आहे.भाषेच्या अंगाने या कादंबरीचे वेगळेपण नजरेत भरणारे आहे.

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाकडून आलेली’गोसावी’ ही कादंबरी एखादी रूपककथा वाटावी इतकी टाळसार आहे.मानवी देहाची मागणी आणि भावकल्लोळांची घुसमट या कादंबरीतून कमालीच्या सामर्थ्याने आलेली आहे. माणसाच्या मनातील अंत:प्रवाह अनेकदा खूप कोरडे आणि शुष्क होतात. मैथुन भावनेचा जेव्हा कोंडमारा व्हायला लागतो तेव्हा वागण्या-बोलण्यातील त-हेवाईकपणा लगटून येतो.गोसावी कादंबरीतील देवकीच्या मनातील अतृप्त इच्छा जेव्हा चेकाळून येतात तेव्हा’देवकीस नवल वाटे.बाहेर झाडापाल्यात देह थंड करणारे पुरूष मठात विंचवासारखे लपून रहातात… तिला आठवे, पहिल्या पहिल्यांदा श्रीपती घाबराघुबरा होऊन अंगामांड्यांना हुंगत राही,नंतर नंतर पांढऱ्या मातीसारखा अंगभर गरम होऊन थंड होता होत नसे.’असे वर्णन केवळ बाबू बिरादार हाच लेखक करू शकतो. कादंबरीकाराने उभी केलेली देवकी ही जिवंत आणि जातीवंय वाटते.तिच्या देहीक गरजा स्री मनाच्या झाकून ठेवलेल्या कोपऱ्यांना उजेडीत करतात. या कादंबरीतील प्रतिमा आणि प्रतिके समजून घेतली तर कथानकाची खोली लक्षात येते.

पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेली ‘अग्निकाष्ठ’ ही कादंबरी बाबू बिरादार या लेखकाच्या लेखनकक्षा कशा रूंदावत चाललेल्या आहेत आणि मानवी मनाचा तळशोध घेताना लेखक किती समरसून जातो याची साक्ष पटवणारी आहे.वाडीतील भुईराजच्या ब-यावाईट जीवनाची ही कथा आहे.आपल्या पत्नीचा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी पाहणारा भुईराज बायकोच्या व्यभिचाराला तिच्या इतकाच तिचा नवराही जबाबदार असतो,असे मनोगत व्यक्त करतो,तेव्हा त्याचे दुबळेपण उघडे पडते.परिस्थिती, नियती,स्वभावातील वैगुण्य यामुळे मानवी जीवनात कसकसे ताणतणाव निर्माण होतात,याचे चित्रण ‘अग्निकाष्ठ’ या कादंबरीतून आलेले आहे.निळकंठ वाणी हा या कादंबरीतील खलपुरूष असून त्याच्या वागण्यातील विद्रुपता कथानकाला गती देते.खरे तर ‘अग्निकाष्ठ’ ही कादंबरी मराठी कादंबरीला वेगळे वळण देणारी आहे.भाषेच्या दृष्टीने जसे तिचे सामर्थ्य अधोरेखित करता येईल तसाच तिच्यातील सार्वकालीक वृत्ती विशेषांचा निर्देश करता येईल.

बाबू बिरादार यांची ‘अंत:पुरूष’ ही कादंबरी चालू शतकाच्या आरंभी आलेली आहे.एकेकाळी वतनदारी असलेल्या देशमुखवाडीच्या गोपाळराव देशमुख ही या कादंबरीतील केंद्रवर्ती व्यक्तीरेखा.’गोपाळराव, धनाच्या रांजणावर पिठाची दोरी जरी वळून ठेवली तरी तिचा साप होतो.या देशमुखी वतनावर तुम्ही ही एक सर्प झाला आहात.’हे अम्माचे वाक्य देशमुखाचे पितळ उघडे करते.काळानुरूप बदल हा व्हायला हवा.जुन्या चालीरिती टाकून नव्या डोळ्यांनी जगाकडे पाहायला हवे.पारंपरिकतेतील फोलपणा लक्षात घेऊन वर्तमानाशी जुळवून घेणे यातच पुरूषार्थ असतो अशा प्रकारचे सूचन या कादंबरीतून येते.एकेकाळी चालणारे जमीनदारांचे अधिराज्य, त्यांचे डावपेच,त्यांच्या कडून होणारे गोरगरीबांचे शोषण या सगळ्यांवर कादंबरीतून झगझगीत प्रकाश टाकलेला आहे.मानवी स्वभावाचे बारीकसारीक कंगोरे लेखकाने या कादंबरीतून अचूकपणे टिपलेले आहेत.खरे तर या कादंबरीचा कालावकाश खूप मोठा आहे.एका महाकादंबरीत मावेल एवढे आशयद्रव्ये आहे.गतकाल आणि समकाल याची सांगड घालताना कादंबरीकाराची समाज निरीक्षण आणि आकलनाची शक्ती विस्मीत करणारी आहे.

‘संभूती’ कादंबरीतील तानी ही व्यक्तीरेखा अत्यंत ठसठशीत असून तिच्या भोवतीच कथासूत्र फीरत रहाते.गावगाड्यातील ब-यावाईट प्रसंगांना सामोरे जाताना स्री म्हणून तिची होणारी तिची फरफट लेखकाने मोठ्या संवेदनशीलतेने कादंबरीतून उभी केलेली आहे.या कादंबरीचा कालपट हा दळणवळणाची पुरेशी साधने नव्हती तेव्हाचा आहे.तानीच्या सोयरिकीचा प्रसंग आणि तिचे वाघजीशी झालेले लग्न यातून तत्कालीन परिस्थितीचे आणि लोकरीतीचे दर्शन घडते.’अधिवास’ही लेखकाची अलीकडेच आलेली कादंबरी आहे.देगलूर येथील गणगोत प्रकाशनाचे पांडुरंग पुठ्ठेवाड यांनी बिरादार यांच्या सर्व कादंब-या नव्याने प्रकाशित केलेल्या आहेत.ही फार मोठी उपलब्धी आहे.

बाबू बिरादार यांच्या कादंब-यांमधून मानवी स्वभावातील गुंतागुंत येते,समाजातील प्रथा,परंपरा येतात,नात्यातील पक्के-सैल धागेदोरे येतात, कधी काळ तर कधी नियतीच्या माध्यमातून खलपुरूष येतो,देहीक असोशी आणि पिडा येतात,कसल्याही प्रकारची कसरत न करता प्रांजळपणे केलेले शारीर वर्णन येते आणि स्वाभाविक बोलली जाणारी पात्रगत भाषा येते.निसर्ग चित्रण करताना लेखक जेव्हा मानवी भावारोपण करतो तेव्हा कादंबरीची भाषा चित्रमयी बनते.त्यांच्या कादंबरीत काहीशी गुढता जरूर आहे.कथानकाच्या प्रवाहात गुढतेचं कवाड हळूहळू उघडत जाते आणि आपण कादंबरीच्या कथाशयाशी एकरूप होऊन जातो.

  • डॉ. जगदीश कदम

नांदेड


(औरंगाबाद येथे दि.२५ आणि २६ या तारखांना ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने बिरादार यांच्या वाड़मयीन वाटचालीचा हा आढावा.)

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment