धर्मवीर पाटील यांच्या कविता
धर्मवीर पाटील यांच्या कविता
ट्रीटमेंट
१ .
असंबद्ध प्रश्नांनी
आणि चित्रविचित्र सोल्युशनांनी घेरलेला काळ.
अंथरुणावर पडलेलं
निरागस परंतु जिवंत शव
कोणत्या जगात आहोत याचं कसलंही भान नसलेलं
ढळढळीत प्रखर वास्तव!
नियतीच्या हातातले बाहुले बनणे
याच्याइतकी मोठी शिक्षा नसते जगात कोणतीच
आणि हतबलतेच्या कसोटीवर
उतरताना होणारी दमछाक पिळवटून काढते तुम्हाला
आतून-बाहेरून
तेव्हा
तुमच्या वेदनांना नसतो कसलाही हिशोब
वरून खालपर्यंत स्कॅन होत राहाता तुम्ही मशिनरीमध्ये
कागदावर दिसणाऱ्या ठिपक्यांवर आणि उमटणाऱ्या अंकावर ठरत राहाते तुमची ट्रीटमेंट.
मेंदूत चाललेला घोळ या कशावरच येत नाही, उमटत नाही…
मागच्या बाजूला बरंच काही ढासळतं, कोसळत राहातं,
जे कालांतराने आपलं आपणालाच निस्तरायचं असतं,नंतरच्या बराच काळ ..
सावल्या
२
अजून किती काळ निरंतर बोचत राहणार आहेत
या काळ्याशार सावल्या
दीर्घ बोचरेपणाच्या प्रतलांवर
वर-खाली वर-खाली होत-होत
आता माझ्या देहाचे लक्तर
अदृश्य होण्याच्या वाटेवर असताना
अजून तरी दिलासेचा स्वर येईल कुठूनही
म्हणून मी स्वतःतच झिरपत ठेवलाय
माझ्यावरचाच करूणेचा पाझर!
हे दीर्घ बोचरेपण मनाच्या खोल कुपीत लसत, टोचत, दुखत
राहणाराय किती काळ
याचा कसलाच अंदाज नसताना
हा करूणेचा पाझर
किती काळ अजून झिरपत ठेवू शकणाराय मी?
माझ्याच अस्मितेचे माप
मोजू शकलेलो नाहीये मी अजून एकदाही
अशात कोणत्या काळाचे संदर्भ दुखत, खूपत, सलत राहतायत मला सतत
याचा कसलाही अंदाज येत नाहीये अजूनपर्यंत!
तुझ्या कोणत्या दुखण्याशी करू
मी माझ्या दुखण्याची तुलना
म्हणजे माझे मला थोडेसे का होईना
मिळून जाईल समाधान
असे कोणतेच कसे संदर्भ
मी जपून ठेवू शकलेलो नाहीये माझ्याजवळ?
की जे काही आहे माझ्याकडे, त्यापेक्षाही मोठे काहीतरी बाळगून आहेस तू तुझ्याजवळ?
मला काहीच कसे
माझ्यापर्यंत पोहोचल्याचे ज्ञात होत नाहीये
दूर गेल्याचे, दुरावत गेल्याचे आणि दुरावल्याचे
सगळे संदर्भ तर जसेच्या तसे पाठ आहेत,
लक्षात आहेत सगळ्या नोंदी अगदी जशाच्या तशा
मग असा कोणता शाप उरात बाळगलाय मी माझ्या,
की इथेही स्वार्थाचे डोहाळे खाऊन, फस्त करून जातायत गपगुमान माझ्यापासूनच!
अनवट, अनाहत, ऋद्गत, संवेदनशीलतेच्या पलीकडे जाऊन
हे खपणे थांबवायचेय मला
माझ्या जगण्याच्या स्वार्थी व्याख्येत मीच कसा अजून बसत नाही?
याविषयी साशंक आहे मी की,
ही स्वार्थाची भाषा माझी माझ्यासाठीच आहे,
की त्याग आहे इतर कोणासाठीचा?
तुझ्या गळ्यातून बाहेर पडणारे मधुर आलाप,
हातातल्या काकणाची किणकीण आणि डोळ्यांच्या उघडझापेची हालचाल
हृदयातून काढून टाकण्याची सल मला पोहोचू देत नाहीये माझ्या अंतिम ध्येयापर्यंत…
तोपर्यंत मला झुंजतच राहावे लागणार आहे, तुझ्यासोबत!
निरंतर बोचत राहणाऱ्या काळ्याशार सावल्या
मला हव्यायत कडक उन्हाच्या झळा सोसण्यासाठी
तेवढाच काय तो उपयोग हवाय मला त्यांचा,
नैसर्गिक !
प्रमेय
३
तुझ्या सुखाच्या व्याख्या जरा
बोचऱ्याच होत्या माझ्यासाठी
म्हणून की काय
बोचरेपण अगदी जवळचं झालं…
आणि
सुखाने
कायमचीच
हुलकावणी
दिली….
कुणाला कसे कवटाळावे
आणि कुणाला कसे पदरात पाडून घ्यावे
याचे कसलेच आडाखे
बांधण्याआधीच
माझी गणिते
विस्कटलेली असतात
आणि मी प्रवाहाच्याही बाहेर
फेकला गेलेला असतो…
आयुष्याचे न सुटलेले
प्रमेय
किती काळ
अजून माझ्या
आवाक्याच्या बाहेर
राहणार आहे
याचा कसलाही अंदाज
नसताना
मी आणखी एक प्रश्न घेऊन
बसलो आहे
सोडवायला
आणि तिथेही आडवे येऊ लागले आहे
सुख,
तुझ्या-माझ्या नात्यातले
माध्यम बनून!
नदी
४
ही नदी…
कशी उगम पावली असेल
…माझ्या आत
जिच्या थांबण्याचा कोणताही थांग नाही
सागराच्याही पार पलीकडे
जिला आपलेपणाचा भाग नाही!
मी माझ्यात, ती तिच्यात
नदीचे असणे पार प्रवाही;
अगदी छोटासाच
माझ्यापासून माझ्यापर्यंतचा हा
प्रवासही…
ही नदी
दूरपर्यंत वाहात जाणारी…
असा कोणता काठ असेल
जिथे योगायोगाने का होईना
तू येशील
आणि क्षणासाठी का होईना,
मला संथ होता येईल !
कविते तू नसतीस…
५
सवय होत जाईल तसं दुःखही होत चाललंय गुळगुळीत
आजूबाजूचे लोक आदमास घेऊन दुःखासही करू लागले आहेत बदनाम
अदमास घेऊ लागलेत आणि रेटू लागले आहेत माझ्या दुःखाच्या विरोधातला त्यांचाच मतलबी विचार
माहित नाही माझ्या आयुष्यात हे आधीपासूनच ठरलेलं होतं;
की आता नव्याने झालीय मांडणी माझ्या उरल्या आयुष्याची
कसे झाले हे सगळे? की होत्येय काहीबाही विसंगत, याची काही जाणीवही नव्हती कसलीच
तेव्हा खूप काही घडत होत्या गोष्टी
मी आपला बसलेल्या नावेत वल्हवत राहिलो माझे दुःख
पाण्यावर किती परिणाम होतोय माझ्या वल्हवण्याचा कळतच नव्हतं काही
जाणीव-नेणीवेच्या आरपार जाऊन काहीतरी वाचवू पाहत होतो
जगण्याच्या रहाटगाड्यातले पारंपारिक निकषात बसणारे काही क्षण
फाटक्या हाताने वाचवू शकलो नाही माझ्या भावनांचा होत चाललेला बाजार
नेमका कशात होतो गर्क?
आजही कळत नाहीये नेमके चुकले काय?
नेमके हरवले काय?
आणि या मधल्या प्रवासात नेमके मिळवले काय?
हा सगळा हिशोब लिहायला बसेन तेव्हा हाती काही लागेल असे वाटत नाही!
म्हणून हिशोबाच्या नादाला लागणे मनालाच पटत नाही…
मला माहित नाही जे घडले किंवा जे ठेवले आहे वाढून माझ्या आयुष्यात
त्यात मीच केंद्रीभूत घटक आहे
की माझ्या दुःखाने केले आहे माझ्यावर गारुड?
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा
असा एखादा मार्ग मिळणार आहे का मला?
याचा माझा मलाच पत्ता नाही.
कोणते हिशोब करू?
आणि हाती आलेल्या उत्तराचं काय करू?
कविते तू नसतीस माझ्यासोबत…
तर मी या तात्पुरत्या वेळा
कशा परतावून लावल्या असत्या?
घुसमटीचे संदर्भ
६
घुसमटीच्या संदर्भांनाही असतात कैक बाजू
बाजूंशी कुणालाही नसते देणेघेणे कसलेही.
वेळा मारून, निघून गेल्या की
बदलतात पुन्हा त्या बाजूंचेही संदर्भ
जसे बदलावेत रंग
अगदी नैसर्गिकरित्या!
संदर्भ सत्य असले तरी
उजेडात येतात फक्त घुसमटी.
वेळा ठरवत असतात तुमच्या क्षमतांची कसोटी
आणि आपणाला वेळेवर होता येत नाही स्वार
तेव्हा
सोडून द्यावंसं वाटतं सगळं जिथल्या तिथं!
आत्महत्या करणारा माणूस
शेवटी काय करतो?
एकटेपणाच्या रात्री…
७
मध्यरात्री, पहाटे किंवा केव्हाही
गाढ झोपेतून अचानक जाग येते आणि
तेव्हा तुम्ही एकटेच
असता
बेडवर
तेव्हा
खूप भयंकर जाणीव हिते
म्हातारपणातल्या
येऊ घातलेल्या एकांताची.
दोघांची रात्र एकच असली तरी
जगणे पोकळ झाल्याचा फील
अस्वस्थ करून जातो
काही क्षणांसाठी का होईना
हे जग नकोसे वाटू लागते
बिचारी रात्र काही केल्या जवळ घेत नाही
आणि खरंतर
तुम्हाला तुमच्याशिवाय
कुणी उरलेलंही नसतं
विचारणारं.
अशावेळी
रात्री सोबत साधावी मैत्री
म्हणजे
एकांत सुखकर होतो
भयानक वाटणाऱ्या स्वप्नांच्या प्रवासात
सोबत मिळते
आणि तात्पुरतं का होईना
पण दिलासाही देऊन जाते रात्र..!
मी वाट पाहतो आहे
मला सवय होण्याची,
एकटेपणाच्या रात्रीची…
स्टोरी संपत नाही, सुरू होते !
८
आयुष्य कसं बदलत जातं…
मनाच्या खोल कप्प्यात
कल्पनातीत व्याख्यांच्या बदल्यात
जगण्याचे कल्पित संदर्भ काळजात घेऊन
भविष्याच्या सुखद विचारांनी
एकेक दिवस ढकलत जातो आपण
अनाहूतपणे
काळ त्याच्या गतीने सरकत जातो
सराईत
कल्पनांचा वेग काळाच्या वेगाशी जुळत नाही;
आपण मात्र तिथेच राहतो.
म्हटलं तर स्तब्ध. म्हटलं तर अस्थिर!
आपल्यावर अवलंबून असलेल्यांच्या उध्वस्ततेला जबाबदार कोण
ही भीतीदायक कल्पनाच घेरून राहते.
सुखाच्या-दुःखाच्या कल्पनांमध्ये घेरून राहतो आपला जीव
ही घुसमट जगू देत नाही, मरू देत नाही
मरण्याची ताकदच नसते राहिलेली शिल्लक.
कोवळ्या क्षणांचे सुखद धुमारे
येऊन निघूनही जातात
त्याचाही वेग पकडता येत नाही.
आलेले निसटून जाते वेगाने
काहीच आपल्या नशिबात नसल्याचे शल्य
पुन्हा-पुन्हा टोचत राहते.
सुखाची एक लकेर,
दुःखाच्या अनेक छटा!
अंधारच स्वार उजेडावर!!
सामाजिक संदर्भाने गुन्ह्यात अडकलेले आपण
स्वतःच्या काळजातील निर्दोषत्व कसे सिद्ध करणार?
कुठे मांडणार बाजू?
घुसमटीच्या या संदर्भात
एकटेपण नेहमीच ताकदीने घुसखोरी करते तुमच्या आयुष्यात
ही हतबलता दिसत नाही कुणालाच.
लोक काहीबाही बोलून मोकळे होतात
एखाद्याची स्टोरी बनवून विषय संपवून टाकतात.
खरंतर, स्टोरी इथं संपत नसते,
सुरू झालेली असते
त्याच्या आयुष्याची नवी कथा.
त्याच्याबरोबरच पुढे
कुठेतरी जाऊन थांबणारी… संपणारी!
वयात आलेल्या मुलीचा बाप म्हणून!
९
तुझ्या स्तनांवर
रेलून अवघे आभाळ
इतस्ततः वावरत असतेस तू
मुक्तपणे, तेव्हा
अनाहूत शक्यतांच्या काळजीने
मीच काळजीग्रस्त, विवंचनेने
घायाळ होत असतो.
कसनुशा काळजांनी घेरलेले
माझ्या मनातील काहूर
एखाद्या वादळापेक्षाही असते भयंकर
तुझ्यापर्यंत पोहोचतच कसे नाही
माझ्यातली आर्त तळमळ?
तू उनमुक्त असावंस, मला दुःख नाही
तुझ्या मुक्तीला नजर लागू नये कुणाची म्हणून
दुःखाच्या घेऱ्यात जाताना
माझा मी स्वतःलाच सांभाळून घेण्याच्या
प्रयत्नात असताना
एखादे फुलपाखरू जाते नजरेसमोरून
आणि
निसर्गाचे अवघे रंग दाटून येतात
काळजात…
मी विसरून जातो
भरून आलेलं आभाळ!
तू उन्मुक्तपणे वावरताना
मी मात्र स्वतःला सावध करत राहतो!
हे मला
काही केल्या टाळताच येत नाही…
एका वयात आलेल्या मुलीचा बाप म्हणून!
सगळ्याच वेळा सारख्या नसतात गं!
१०
खूप काही जगणं
वाढून ठेवलंय समोर
तरीही
अशांत, अस्थिर राहतो आपण
तेव्हा
आपल्याच वाटेत काटे पेरतो आपण.
आपल्या वाटा बदनाम झालेल्या असताना आधीच
आपण अजून आकसून राहायला हवंय
या प्रवृत्तीला देत राहातो बळ
तेव्हा
आपसूकच आपण आपल्याच पायावर
मारून घेत असतो
दगड!
हा दगड परत भिरकवण्यापूर्वी
मला वाटतं आता थोडा वेळ वाट पाहून
विचार करण्याची वेळ आलीय.
तोच तोच प्रसंग
सिनेमॅटिकली घडत नसतो
सगळ्यांच्याच आयुष्यात!
एखादा दगड
आपल्याच दिशेने येण्याची शक्यतादेखील
गृहीत धरावी लागते या माजलेल्या जगात,
तेव्हा कुठेतरी
आपल्या स्वभावाचे गणित जुळू शकते
कुठल्या तरी मोगम जगणाऱ्या;
परंतु तरीही अस्सल असणाऱ्या माणसाच्या आयुष्याशी!
आपल्याच धुंदीत जगताना
आपली धुंदी, इतरांसाठी नशा ठरणार नाही ना?
याचा विचार केव्हा करणार आहेस तू
प्रिय…सगळ्याच वेळा सारख्या नसतात गं!
प्रिय, एन्जोलीना…
११
हमसफर हवेच असतात
आपल्याला दुःखाच्या प्रवासात
जरी एकमेकांचं दुःख वाटून घेऊ शकत नसलो तरी!
आणि आयुष्यावर काहीही फरक पडणार नसला तरीही…
जगण्याच्या तऱ्हा कुठे वेगळ्या असतात
प्राण्यांच्या आणि माणसांच्या?
आपण शोधत राहातोच समदुखी
आपल्या नेमलेल्या वाटांवर…
वाटा कुठल्याही असोत,
थोडे थांबणे,आणि आपल्या विचारांचा माणूस
शोधणे येतेच प्रत्येकाच्या आयुष्यात!
मोटिव्हेशन जगवते खरंय;
पण दुःख तुम्हाला तारते…
हेही समजून घ्यायला हवंय या वाटांवर भेटणाऱ्या
सहप्रवाशांच्या सान्निध्यात!
मला माहिती नाहीये
कवितेत कुठले प्रसंग, अनुभव, दुःखे आणि तुटणे, फुटणे, कोसळणे
एकत्र येत राहातात…
मला इतकंच कळतं,
मी जोडत राहातो माझ्या दुखऱ्या भावना…
आणि वाटून घेत राहतो
सुखाच्या लकेरी
माझं ज्यांना बरं वाटतं अशा माणसांच्या सोबत…
प्रिय,
एन्जोलीना…
(The bone collector)
तुझे पाणीदार डोळे
पुरेसे असतात मला
माझे दुःख सावरायला!
भीती !
१२ .
जी भीती
घर करून राहिली होती
वर्षानुवर्षे हृदयात
आता त्याच भीतीने मांडलाय संसार आपल्यासोबत.
भ्रम आणि गंड
सोडून देऊन
कुठेतरी दोन पावलांची माघार घेऊन
पुढे झालो असतो आपण,
तर
नक्कीच
भीतीने गिळून टाकले नसते!
नाती सहज बनत नाहीत.
तुटतात मात्र तितक्याच सहज.
त्याची किंमत समजायला
हवा असणारा अवकाश मात्र सगळ्यांनाच प्राप्त होतो, असे नाही
जगत राहावे लागते…
१३
खरंतर काहीच बदलत नाही, पण…
गोष्टी चुकत गेलेल्या असतात
त्या आणखी फाटत फाटत जातात
कधीही न सांधता येण्याइतक्या
सुखद क्षणांचे शिडकावे
तात्कालिक आनंदाच्या लहरी
आयुष्याला उभारी देताना
भूतकाळ विसरल्याच्या
भ्रमाच्या फुग्यात तशाच राहू द्याव्यात तर ठीक,
अन्यथा दुःखाचे वाट्याला येणे निश्चितच असते काळाच्या ओघात…
काळ कुणाच्या वाटेला कसा
येईल हे सांगता येत नाही
तसा कुणाचा बदलेल हेही नसते सांगता येत!
वेळ बदलते
आपण बदलतो.
भूतकाळ बदलत नाही,
हीच एक सल उरात घेऊन
जगत राहावे लागते कितीही आणि काहीही बदलले तरी!
कस्पट
१४
तळाचा शोध लागलेला नाही अजून
उगाचच वरवर ओकूनबोकून
ओसंडत राहतो आपण आपल्या दुःखाच्या नावाने
अजून गाठता येत नाही कसलाही आणि कशाचाही तळ.
दुःख किती सहज व्हायला लागलंय आज-काल
कोणत्याही गोष्टीचं.
सोसलेपणाच्या कित्येक व्याख्यांनी
अजरामर झालेल्या कहाण्या कधी समजून घेणार आहोत आपण?
दुःख… चिमटीत पकडून
मला सांगायचंय त्याला….माझ्यासाठी तू कस्पट आहेस म्हणून!
पणाला लागलेली समज
१५
प्रश्नांचे बेलगाम घोडे
सतत दौडत राहतात आसपास.
कधीच कशी दमछाक होत नसेल
न संपणाऱ्या, सतत डसणाऱ्या
आणि
अव्याहत चालत राहणाऱ्या,
प्रथमदर्शनी गाफील वाटणाऱ्या, परंतु तितक्याच
खोलवर टोचत, सलत राहणाऱ्या
प्रश्नांची?
उत्तरांची सवय तशी लावून घेण्यावर राहते
असे मानायलाही किंचितसा वाव
कुठेतरी स्वभावात असावा लागतो
मानण्या-न मानण्याच्या खेळात
पणाला लागलेले असतात
कित्येक स्वभाव.
सगळेच डाव आपले कुठे असतात
रोज पलटत राहते बाजी ज्या-त्या वेळच्या परिस्थितीवर.
आपण नियतीच्या हातातले बाहुले बनून किती काळ अजून झुलतच राहाणार आहोत?
समजेच्या पलीकडे जातात जेव्हा हे प्रश्न
तेव्हा ते तिथल्या तिथे टाकून
आपण नवीन प्रश्न जन्माला घालत राहतो, सतत!
हा जीवघेणा पाठलाग सुरूच राहतो…
तुमची समज प्रगल्भ बनत जाईपर्यंत.
ही प्रगल्भता अंगी यायला ..
आयुष्याची किंमत तर पणाला लागणार नाही ना?
परिचय :
परिचय
नाव : धर्मवीर भूपाल पाटील
पत्ता : प्रतिभा बुक्स, काळा मारुती चौक, इस्लामपूर. ता. वाळवा, जिल्हा सांगली. पिन 415 409.
■जन्म दिनांक : १५ मार्च १९८३.
■व्यवसाय : पत्रकारिता (दैनिक सकाळ).
■लेखनप्रकार : कथा, कविता, ललित, लेख, रिपोर्ताज.
■प्रकाशित पुस्तके : संभ्रमाच्या तळाशी (कवितासंग्रह) २०१९.
■पत्रकारितेबरोबरच ‘प्रतिभा’ दिवाळी अंकाचे संपादन
■प्रतिभा बुक्स संचालक.
■इतर कार्य :
•विविध सामाजिक कार्यात सहभाग,
•अंधश्रद्धा निर्मुलन समिती कार्यकर्ता
•वाचन चळवळीत सक्रिय सहभाग
•व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना, वाळवा तालुका अध्यक्ष.
•वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार संघ सदस्य
•महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. शाखा इस्लामपूर, कार्यकारिणी सदस्य
•वाळवा-शिराळा तालुका लेखक – कवी संघटना कार्याध्यक्ष.
•इस्लामपूर बिझनेस फोरम संस्थापक सदस्य.
•इस्लामपूर फिल्म सोसायटी संचालक
•जागतिकीकरण आणि वर्तमान आव्हाने या विश्वास सायनाकर गौरव ग्रंथ संपादक मंडळात सदस्य.
•प्रतिभा पब्लिकेशन, प्रकाशक.
■संपर्क नंबर : 7588586676, 7498924566.
सन्मान :
■विवेक ग्रंथालय, तांदुळवाडी यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार (२००७)
■जायंट्स ग्रुप ऑफ आष्टा यांच्यातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार (२००८)
■सांगली जिल्हा नेहरू युवा फेडरेशन यांच्यातर्फे गौरव पुरस्कार (२००९)
■जायंट्स फेडरेशन २ क यांच्यातर्फे आदर्श पत्रकारिता पुरस्कार (२०१३)
■धर्मनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र बांबवडे यांच्यावतीने आदर्श पत्रकार पुरस्कार (२०१७)
■इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था इस्लामपूर यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार (२०१८)
■राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांच्या वतीने ‘प्रबोधनयात्री पुरस्कार’ (२०१९)
***
साहित्याक्षरचा लोकसाहित्यावरचा नवा ग्रंथ
धर्मवीर पाटील
मनःपूर्वक धन्यवाद!
Chandrakant babar
दुखऱ्या-बोचऱ्या अस्वस्थ मनाची घालमेल कवितेत प्रतिबिंबित झाली आहे.