हारून फ्रेम वर्क्स : समूह मनाचे हिंसक वर्तन
शोधनिबंध : संशोधक विद्यार्थी : रचना
हारून फ्रेम वर्क्स : समुह मनाचे हिंसक वर्तन
प्रास्तविक :
भाऊ पाध्ये जयंत पवार चित्र्य खानोलकर, जयवंत दळवी मधु मंगेश कर्णिक, महेश केळुसकर यांच्या लेखनामध्ये महानगरी जाणिवा आणि संवेदन आढळते. मानसशास्त्रीय संकल्पना व अवधारणा तमेच अधोविश्वाचे दर्शनही घडते या परंपरेत समकालीन लेखकांमध्ये किरण येले यांचे नाव आघाडीवर आहे. ‘हारून फ्रेम वर्क्स’ ही त्यांची एक गाजलेली कथा आहे दंगलीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत एक गरीब मुस्लिम कथानायकाचे कुटुंब आणि त्याच्या जगण्याच्या प्रश्रांचे तीव्र दर्शन घडते . समूह मनाची विचार करण्याची पद्धत आणि त्याआडून निर्माण होणारी हिंसा हा या कथेचा मुख्य विषय आहे.
उद्देश :
ग्रामीण समाजशास्त्र व शहरी समाजशास्त्र या समाजशास्त्राच्या दोन महत्वाच्या शाखा आहेत . दोन्ही शाखांमध्ये समुह किंवा समाज यांच्या अंगाने अभ्यास केला जातो . समुहाचे वर्तन ही एक महत्त्वाची बाब आहे. त्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी समूह मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र उपयोगी ठरते.किरण येले यांच्या प्रस्तुत कथेतील समूहमन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या हिंसेचा मानसशास्त्रीय अंगाने अभ्यास करणे, हा या शोधनिबंधाचा उद्देश आहे .
व्याप्ती व मर्यादा :
सदर शोधनिबंधाची व्याप्ती किरण येले यांच्या वरीत कथेपुरतीच असून, या कथेची समूह तथा सामाजिक मानस शास्त्रीय चिकित्सा करणे ही या शोधनिबंधाची मर्यादा आहे .
कथानक व कथेचे आशयसूत्र :
कथा सुरू होते तेव्हा लक्ष्मीनगरमध्ये तसेच पूर्ण शहरात दंग्यामुळे कर्फ्यू लागलेला . चार दिवस होऊन गेले तरी तो चालूच होता दुकानाचे शटर ओढून चार पोरासकट हारून आणि शहिदाबी विमनस्क अवस्थेत बसलेले. घरात थोडे धान्य सोडून काहीच नव्हते . मुलांना कळत नव्हते ,’आपल्याला बाहेर खेळायला किंवा शेजारी टी . व्ही . पाहायला का जाऊ देत नाहीत ते . फ्रेमच्या काचा किंवा पट्ट्या खेळून ते कंटाळले होते. शिवाय पोटात भूक भडकलेली.
सकाळी चमनसेठच्या दुकानातून उधारीवर काहीतरी आणण्याच्या निमित्ताने हारुन दुकानावर जातो . तेव्हा तिथे प्रचंड गर्दी आणि लोक हातात नोटा घेऊन उभे असतात . आपल्याला उधारीवर माल घ्यायचा म्हणून तो गर्दी कमी व्हायची वाट पाहतो . हारून दुकानासमोर जायला बाणि चमनसेठने दुकानाचे शटर ओढायला एकच वेळ होतो . भवतीची गर्दी कमी झाल्याची जाणीव हारूनला होते. जवळच दंगा सुरू झाला म्हणून लोक घाईने पळाले हे ही त्याला समजते . तेव्हा तोही घाईने घरी परततो त्याच्या चेहऱ्यावरूनच शहिदाबीला काय समजायचे ते समजते. त्यानंतर ती उरलेल्या थोड्याशा धान्याची पेज करून मुलांना खाऊ घालते .
दुसऱ्या दिवशी शहिदाबी मुलांना काय खाऊ घालायचे याचा विचार करत असताना तिला आसिफ आणि आबीद लपून काहीतरी खाताना, चावताना दिसतात ती त्यांच्या तोंडातून तो पदार्थ बाहेर काढते तेव्हा तिला प्रचंड धक्का बसतो कारण ती दोघे चक्क फेविकॉलचा गोळा चघळत असतान . ती त्यांना मारण्याच्या विचारात असते पण भुकेपायी त्यांनी हे कृत्य केल्याने तिला भडभडून येते आणि ती त्यांच्या केसांतून हात फिरवते. प्रेमाने जवळ घेते .
पुढच्या दिवशी पोलिस दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रित करतील अशी नमाजच्या वेळी मशिदीत झालेली चर्चा हारून सांगतो बाहेरच्या बाजूला बायका बोलत असल्याचा आवाज आल्याने शहिदाबी खिडकी उघडते. ४० रुपये रोजाने कामाला जाणाऱ्या रमेशच्या आईला खायला असेल तर द्या म्हणून विणवते. थोड्या वेळाने ती भातावर डाळ घातलेला टोप शटरखालून सरकवते, मुले खातात पण नवरा बायको नुसतेच पाणी पिऊन राहतात . सबाहला छोट्या अश्रफला उठवायला सांगते . पण तो हालत नाही शहिदाबी घाबरते त्याच्या छातीला हात लाऊन पाहते तेवढयात हारून पुटपुटतो . ‘ अल्ला हो अकबर ‘ तेव्हा शहिदाबी देवाला शिव्याशाप देते . ते पाहून हारून तिला शिव्या देतो . तेव्हा ती भयानक सत्य सांगते, ” तो क्या करू? दो साल के बच्चेकू टरपेटायन पिलाना पडता मेरेकू , रातको उसकी हलखसे आवाज निकलके किसी को पता नै चले करके . “
हादरलेला हारून बाहेर परत दंगा भडकल्याचे सांगतो . त्यावर शहिदाबी घाबरते आणि अल्लाहची माफी मागते . तेवढयात टरपेटायन पिलेला अश्रफही कूस बदलतो . त्यामुळे ती परत अल्लाहचे आभार मानते
जमाव शेजारच्या रशीदच्या दुकानाला जाळून टाकतात . त्यावेळी अश्रफ रडतो म्हणून शहिदाबी त्यांचे तोंड दाबून धरते . त्यामुळे तो गुदमरतो नंतर दंगेखोर हारूनच्या दुकानाकडे मोर्चा वळवतात पण शेजारचे हिंदू हारून सुलतानपुऱ्यात गेल्याचे सांगतात . तेव्हा ते दुकान जाळून टाकायचे ठरवतात पण त्यामुळे अख्खी चाळ पेटेल आणि हिंदूची घरेही जळतील हे लक्षात आल्याने ते थांबतात . दरम्यान हे सारे असहाय्य झालेला हारून वरुन गणपती, शंकर आणि हनुमानाची फर्म काढून दोन पोरांच्या हातात देतो व एक स्वतः घेतो . बाहेर येताच हातातल्या फ्रेम पाहून हिंदू जमाव त्यांना सोडतो पण आमच्याच हिंदू देवतांच्या तसबीरी घेऊन उभे आहात म्हणून त्याला टोचून बोलतात आणि ‘ सकाळी इथून निघून जायचे व दंगा शांत झाल्यावर जागेची कागदपत्रे घेऊन यायचे आणि आमच्या हवाली करायचे ‘ असे सुनावतात.
हिंदू जमाव निघून जाताच दुसऱ्या मोहल्यात राहणारा रशीद मुस्लिम जमाव घेऊन येतो . त्याला आपले दुकान जाळून टाकल्याचे समजलेले असते . हारून व मुलांना हिंदू देवताच्या तसबीरी घेऊन उभे असल्याचे पाहताच भडकतो आणि त्या फेकून द्यायला सांगतो पण ऐकत नाही म्हणून हारुनच्या डोक्यात लोखंडी शीग मारतो आणि त्याचे दुकान जळून टाकतात . दुकानाला लागून असणाऱ्या हिंदू चाळीत आग भडकत जाते . दरम्यान टरपेटायनच्या अतिरेकाने अश्रफची मानही कलंडते .
इथे कथा संपते आणि वाचकांच्या डोक्यात ती सुरु होते.
कथेतील समूह मानसशाख व सामाजिक मानसशास्त्र:
कथेत दोन समूह आहेत आणि ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत . धार्मिक मुद्यावर सुरू झालेल्या दंगलीत हे दोन्ही समूह एकमेकांच्या विरोधात आक्रमक झालेले दिसतात. मानसिक पातळीवर दोन्ही समूहाचे मानसशास्त्र सारखेच आहे एकमेकांची घरे, दुकाने जाळणे आणि एकमेकांचे जीव घेणे या दोन्ही बाबतीत दोन्ही समूह आग्रही आहेत . दंगा बाहेर जेवढा आहे तेवढा तो प्रत्येकाच्याच मनातही आहे .
उद्योग करत असतात. राजकारण, पैसा आणि बिल्डर्स यांच्याभोवती महानगरीय वर्तमान फिरत असते . यातूनच गुन्हेगारी फोफावत जाते ‘Money & muscle are not independent forces shaping India’s electoral politics but are deeply intertwined ‘ या एम आर माधवन यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा ५ मार्च २०१२ च्या वॉशिंग्टन पोस्टच्या अंकातील सायमन डेनीवर यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘Criminals Flourish in Indian Elections आपल्या भोवतालचे वास्तव दिसून येते .
निष्कर्ष:
१. महानगरीय जीवनाचे भयावह दर्शन या कथेतून घडते .
२. हारूनची जागा बळकावण्यासाठी हिंदू जमावातील धेंडे प्रयत्नशील असतात. यातून दंगलीमागचे एक प्रखर कारण कळते . दंगल का घडवून आणली जाते? हेही उमगू लागते .
३. मुस्लिम जमाव हिंदूच्या एरियात राहणाऱ्या हारूनने हिंदू देवतांच्या फ्रेमम् बनवू नये आणि दंगलीच्या वेळी मुस्लिमांच्या बाजूने राहावे, भाईचारा सोडून द्यावा अशा मताचा आहे . अन्यथा त्याला काफिर ठरवण्याचा मक्ता त्यांच्याकडे असल्यासारखे ते वागतात
४. यातून धर्म हिंसेसाठी कसा वापरला जातो, ते दिसून येते .
५. उन्माद चढलेले समूहमन हे दुबळ्या व निरपराध माणसांच्या अस्तित्वाचे निर्णय स्वतः घेते.
६. सामान्य माणसांना हातावर पोट असणाऱ्या माणसांनाच दंग्याची झळ जास्त बसते.
समारोप :
किरण येले यांच्या प्रस्तुत कथेच्या अनुषंगाने दंगल आणि तिच्या आडून सामाजिक मानसशास्त्र आणि समूह मानसशास्त्र याची कल्पना येते. उन्माद चढलेला समूह हिंसेचे समर्थन करतो आणि आपल्यापेक्षा दुबळ्या लोकांवर आपला धाक जमवतो धर्म हा हिंसेसाठी कसा वापरला जातो, ते ही या कथेतून दिसून येते. धर्माचे ठेकेदार हाती शस्त्र घेऊन अनीतीपूर्ण व्यवहार करतात. मात्र त्यामागचे उद्देश वेगळे असू शकतात. जसे की प्रस्तुत कथेत हिंदू जमाव त्याच्या जागेची कागदपत्रे मागतो. शेजारधर्म पाळणाऱ्या अन्य जातीच्या लोकांचा चांगुलपणा आणि हारूनप्रति असलेली आस्थाही येले चितारतात, त्यामुळे कथेचा आशय एकांगी न राहता सर्वसमावेशक होतो .
****
- संदर्भसूची :
- १.येले किरण, तिसरा डुळा, ग्रंथाली प्रकाशन, २०२०
- २. चवरे रा. गो. मराठी कथा उगम आणि विकास, यशोदीप प्रकाशन, २०१०
- ३. डॉ बोरुडे संजय, नव्वदोत्तरी मराठी कथेतील संक्रमण, द.म. सा. पत्रिका जून, २०१९
- ४. सिग्मंड फ्रॉइड, अनु वसू भारद्वाज, मनोविश्लेषण परिचय, रिया पब्लिकेशन्स, २०१६
.५. Vaishnav Milan,When Crime Pays Money,Muscle In Indian Politics , Harpers Collins Publisher , 2018
मुक्तविहारी
खूप छान लिहिले आहे मॅडम.
मेघा पाटील
रचना मॅडम, खूप छान कथेचे विवेचन