2025 कविता मराठी मार्च

सतीश सोळांकूरकर यांच्या कविता

सा हि त्या क्ष र 

परिचय :सतीश सोळांकूरकर

पत्ता : निसर्ग को-ऑप. गृहनिर्माण संस्था,

इमारत क्र. 11 , फ्लॅट क्र.101, मनीषानगर,

तरण तलावाजवळ,कळवा (प.) 400605,जि. ठाणे

मोबा. 9324363934

satishsolankurkar@gmail.com

मुंबई विद्यापीठाची मानसशास्त्र या विषयामध्ये पदवी

भाभा अणुसंशोध केंद्र मुंबई सुपर कंप्यूटर विभाग येथे वरिष्ठ सचिव म्हणून कार्यरत. अणुऊर्जा आयोग, भारत सरकार द्वारा मेरिटोरियस पुरस्काराने सन्मानित.

प्रकाशित साहित्य :

(१) पत्रास कारण की (कवितासंग्रह १९९३)

(२) एकांताचा दिवा (कविता संग्रह २००२)

(३) सावी… (ललित लेख संग्रह 2008)

(४) देणेघेणे जीवघेणे…(कवितासंग्रह 2014)

(५) सांगण्‍यासारखं…(कवितासंग्रह 2016)

(६) रूजवात…(दीर्घ कविता 2017)

(७) तिन्‍हीसांजेची भुलावण..(कवितासंग्रह 2018)

() सावलीचे घरटे…(ललितलेख संग्रह 2019)

(९) केशर दिव्‍यांची माळ… (ललितलेख संग्रह 2022)

(१0)  कवितारंग…(प्रातिनिधिक कवितासंग्रह)

(११) विजनातील अंधूक काळोख.. (कवितासंग्रह 2022)

(१२) प्रार्थनेची एक ओळ… (कवितासंग्रह 2023)

(१३)चंद्रसायीचा साजण… (ललितलेख संग्रह 2024)

(१४) शाळेमध्‍ये गाव… (बालकवितासंग्रह 2024)

(१५) बल्‍लू मॉनिटर… (बालकवितासंग्रह 2025)

ध्‍वनिमुद्रिका●शीर्षक गीत●

===================

(१) कवितारंगः भाग १ आणि २

(२) ग्रेसफुल ध्‍वनिमुद्रिका

(3) हिंदोळा.. भावगीत ध्‍वनिमुद्रिका

(४) भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई आणि  मराठी विज्ञान परिषद, मुंबईसाठी शीर्षक गीत लेखन.

संपादन :

  1. एकताच्‍या पाऊलखुणा – प्रातिनिधिक कवितासंग्रह
  2. अष्‍टावधानी कलामीमांसा – दीर्घ लेख संग्रह
  3. आजतागायत अशोक बागवे – प्रा.कविवर्य अशोक बागवे यांच्‍या कवितांचा रसास्‍वाद

उल्लेखनीय : ठाणे येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन.

कोकण मराठी साहित्य परिषद द्वारा आयोजित राष्ट्रीय कविसंमेलनाचे सूत्रसंचालन.

आकाशवाणी मुंबई, सांगली, कोल्हापूर आदी केंद्रांवर कविता सादरीकरण.

सह्याद्री, ई टीव्ही मराठी, टीव्ही-९, झी २४ तास इत्यादि वाहिन्यांवरून कवितांचे सादरीकरण.

अनुवाद कवितांचा हिंदी, इंग्रजी, मल्याळम, कन्नड इत्यादि भाषांमध्ये अनुवाद.

भारतीय भाषा आणि भारताबाहेरील भाषांतील महत्त्वाच्या कवितांचा मराठी अनुवाद.

निवडक पुरस्कार :

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. स. गोखले पुरस्कार, डॉ. स. ग. यादव प्रथम पुरस्कार, कोल्हापूर, कवि. रा. ना. पवार प्रथम पुरस्कार, सोलापूर, आपटे नगर वाचन मंदिर उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार इचलकरंजी, संजीवन खोजे पुरस्कार अहमदनगर, कोमसाप विशेष वाङ्मय निर्मिती पुरस्कार, रत्नागिरी, आशीर्वाद मुंबई उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, ज्ञानमाऊली पुरस्कार प्रयाग, पद्मगंधा प्रतिष्ठान उत्कृष्ट ललितलेखन पुरस्कार नागपूर, स्व. भाऊ भालेराव उत्कृष्ट ललितलेखन पुरस्कार चांदूर, अकोला, सुरभि प्रथम पुरस्कार पुणे, राधानगरी ग्रामीण साहित् संमेलन प्रथम पुरस्कार आदि.

**************************************************************

सतीश सोळांकूरकर यांच्या काही कविता

१. एकटा

एक आई सोडली

तर,

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे

कांहीही नाही आणि

भावंडामध्ये ही

मी एकटाच.

एकदा

थकल्या आवाजात आई म्हणाली होती

तुला एखादा भाऊ हवा होता म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता

बस्स इतकेच.

मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून.

त्याची आई कुठे दिसली नाही घरात

विचारले तर म्हणाला

दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी.

सहा महिन्यासाठी म्हणजे ?

म्हणजे काय ?

वडिल वारले तेव्हा गावाकडच्या घराची आणि शेतजमिणींची वाटणी

झाली होती दोघांमध्ये

तेव्हाच ठरले होते-आईलाही सहा-सहा महिने सांभाळायचे आणि

तसेच कांही झाले तर अर्धा अर्धा खर्चही वाटून घ्यायचा दोघांनी.

आईविना पोरक्या घराचा आणि मित्राचा मी निरोप घेतला.

घरी आलो तर आई

अगम्य स्वरात कसली तरी पोथी बडबडत असलेली

सुरुकतलेला चेहरा,डोळे भरतीच्या समुद्गासारखे अथांग,

देहाला जाणवणारा, न जाणवणारा हलकासा कंप,

घट्ट पदर लपेटून, उजव्या हाताने मांडीवर हलकासा ठेका

एक अपार करुणा समोर

मूर्तिमंत

मी जवळ बसलो तिच्या गळुन गेल्यासारखा.

तर म्हणाली –

का रे ? चेहरा का उतरलाय ? कोठे गेला होतास ?

बरे नाही का वाटत ?

कांही नाही गं असे म्हणून मी तिचा हात हातात घेतल

घट्ट धरुन ठेवला.  

तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजुनही नाळ न तुटलेला दृष्टांत.

उठलो, सावकाश गेलो आत

देवघरात…

मित्राची आई आठवत राहिलो

समईच्या मंद उजेडात

रात्र झाली असावी खूप आता

मध्येच जाग येते आहे आणि

मी सावकाश येतो आईजवळ तर

ती शांत झोपलेली –

माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा एक कवडसा

हलतो आहे तिच्या चेह-यावर अजुनही.

देवा,

मला कोणत्याही जन्मी

लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस

आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस.

मी सावकाश उठतो,

पाय न वाजवता,

सावध फिरत राहतो सगळया घरभर,

आईला स्मरुन देवाचे आभार डोळयांतून वाहत राहतात

माझे ओठ

रात्रभर कसलीतरी प्रार्थना गुणगुणत राहतात.

एक आई सोडली

तर,

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे

कांहीही नाही आणि

भावंडामध्ये ही

मी एकटाच. .

 ..

आईला भाकरी करत असताना..

आईला भाकरी करत असताना

मी पाहिलेलं आहे.

दोन्ही पायांच्या अंगठयांमध्ये परात घट्ट धरुन

ती ओल्या पिठाचा गोळा थापायची आणि

बघता बघता भाकर तव्यावर जायची.

मी समोरच्‌ असायचो बसून

दप्तर मांडून.

पिठाने बरबटलेल्या हाताने ती दिवा माझ्यासमोर ढकलायची

चुलीतली लाकडे सराइतपणे मागेपुढे करत रहायची.

आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे

झळा लागल्याशिवाय मळा फुलत नाही

असे कांहीबाही सांगत रहायची.

मी पहात रहायचो एकटक

चुलीतल्या जाळाचा उजेड हलत रहायचा तिच्या चेह-यावर.

तिची भाकरी कधीच करपायची नाही

पापुद्गा अलगद सुटुन यायचा वर.

आजकाल पिझ्झा बर्गर खाणा-या मुलांच्या नशीबात

भाकरीचे सुख नाही.

कधी कधी वाटतं,

कसं काय निभावेल यांना ?

जाळ कमीजास्त करुन कांही करपु न देणं,

आयुष्याच्या चढ-उतारावरुन भाकरीच्या पापुद्ग्यासारखं

अलगद मोकळं होत जाणं ?

आईला भाकरी करत असताना

मी पाहिलेलं आहे आणि

ती माझ्यासाठी एकमेव  अशी

महत्वाची गोष्ट आहे.

……………..

२. समज

समज आल्यापासून असंच

वागत आलोय,

तुम्ही घ्या आधी जेवून, आम्ही नंतर बसतो

-आई बाबा म्हणायचे,

घरात कांही शिल्लक नाही आपसूकच्‌ कळायचे

अर्धपोटी ताटावरुन तसेच उठायचो जेवून

ताटात कोर-चतकोर बाजूला ठेवून.

परीक्षा जवळ यायच्या आमच्या.

परीक्षा फी चे सावट स्पष्ट दिसायचे त्यांच्या डोळ्यात.

रात्र-रात्र जागून गृहपाठाच्या वह्या लिहून द्यायचो

दोन फायदे व्हायचे

लिहिता लिहिता अभ्यास व्हायचा आणि

फी साठी चार-आठ आणेही सुटायचे.

दिवाळी सारख्या सणांत्‌ रंगीबेरंगी कपड्यांची फुलपाखरं

बागडत असायची आजुबाजूला.

शाळेचे पांढरे आणि खाकी कापड स्पष्ट दिसायचे आम्हाला स्वप्नात

शाळेचा पांढरा शर्ट काखेत उसवलेला असायचा

उत्तर येत असुनही हात वर व्हायचा नाही वर्गात.

खिसेफाटकी खाकी पँट कंबरेला नीट बसायची नाही

वाटायच्‌

वाढत्या वयाबरोबर कपडे का नाही मोठे होत ?

तीस-पस्तीस वर्ष झाली

आजही तसच्‌ हाय सगळं.

मुलगा रोज बदलतो कपडे शाळेत जाताना,

रोज करवून घेतो बुटाला पॉलीश

रोज हरवून येतो कांहीतरी, घेऊन जातो नवीन दूस-या दिवशी

आई त्याला कांहीही बोलत नाही.

आम्हाला तरी ती कोठे बोलत होती तेव्हा ?

 …………………

३. फोटो

दरवाजा उघडला

 तो आत आला

 थरथरत्या हातानं पाणी प्यायला

 अनोळखीसा तो

 थोड्या वेळानं म्हणाला

 साहेब,

 माझा एक फोटो काढाल का ?

 कॅमेरा आहे ना तुमच्याकडे ?

 फोटो ?

 तुमचा ?

 हो . काढीन की

 पण मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही काही

 असे म्हणून मी कॅमेरा फोकस केला.

 तसं नव्हे साहेब,

 तुम्ही त्या रघुचा फोटो काढलात्‌ आणि

 तो दोन दिवसातच्‌ गेला असं म्हणालं कोणी तरी

 म्हणून…..

 मोठ्या आशेने..

 मी थरारलो अंर्तबाह्य

 कॅमे-याच्या छिद्गातून पाहिले आरपार

 माझ्या समोर

 साक्षात रघुच बसला होता

 पोझ घेऊन.

………….

४. घोडे

घोड्यांची काळजी

 घ्यावी लागते खूप निगुतीनं

 अगदी लहान बाळांची घेतात तशी

 घोडे कांहीच बोलत नाहीत

 त्यांच्या मनावरचे ओरखडे मात्र जाणवत राहतात

 खूप दिवस.

कळपातील मादीच्या नादी

 लागू शकतात अनेक घोडे एकाच वेळेला

 पण,

 मादीच्या मनातला नेमका नर समजल्यावर

 एकेक करुन बाजुला होतात हळुहळु.

कितीही उन्माद असला आणि इच्छा

 तरीही,

 मोहिमेच्यावेळी घोडे कसोशीने जपतात एकटेपणा

 व्रतस्थ फकिरासारखा.

 जीवाच्या आकांताने चौखूर उधळणा-या घोड्यांना

 नामुष्की पसंत नसते.

पायातून काढून टाकलेल्या झिजलेल्या नालांकडे

 पाहणे कसोशीने टाळतात घोडे

 ते डोळे बंद करुन घेतात

 तरुणपणानंतरच्या आयुष्याचे चित्र दिसत असते त्यांना

 झिजलेल्या नालेत बहुदा.

टांग्याला जुंपलेल्या जोडीपैकी

 एक मादी आणि एक नर असेल तर

 मादी जोरात ओढत राहते टांगा आपल्याबाजुने

 नराकडचा भार जरा कमी करता येईल

 या विचाराने.

ब-याचवेळा टांगा ओढताना

 अडखळत असते मादी

 आपल्या आणि जोडीदार नराच्या

 वाटेतले खड्डे एकाचवेळी चुकवायचे असतात तिला

 बहुदा.

घोडे उभे असतात आयुष्यभर

 ते बसत नाहीत कधीच

 ते जर कधी बसले तर

 परत कधीच उठत नाहीत वर.

मोहिमेवर निघताना

 एक तर धडधाकटसे विजयी होऊन परत येता येऊ दे

 नाहीतर मरण येऊ दे

 अशा शुभेच्छा देत असतात घोडे एकमेकांना

 निकामी, जखमी राहून जगणे त्यांना पसंत नसते

 आणि

 मुद्दाम गोळी घालुन दिलेला केविलवाणा

 मृत्यु ही त्यांना नकोसा असतो.

युध्दामध्ये कामी आलेल्या

 घोड्यांचा अभिमान बाळगून असतो आख्खा कळप.

घोड्यांची काळजी

 घ्यावी लागते खूप निगुतीनं

 अगदी लहान बाळांची घेतात तशी

 घोडे कांहीच बोलत नाहीत

 त्यांच्या मनावरचे ओरखडे मात्र जाणवत राहतात

 खूप दिवस.

……………..

५. गुलमोहराची कथा 

या रस्त्यावर

 आधीही धूळ उडायची जशी आजही उडते, उडत राहते.

जरा पुढच्या वळणावर उभा असलेला

 गुलमोहर पसरत रहायचा केशरमाया आसमंतात

 आजही उभा असतो

 रणरणत्या वैशाखवणव्याचा

 अंगाखांद्यावर झूला असतो.

तिन्हीसांजेला बगळयांचा एक थवा

 भर्रकन उडून जायचा

 जवळच्या झाडापाशी रेंगाळून रहायचा

 आजही तसाच्‌ निमूट बसतो

 झाडाच्या फांद्यां-फांद्यात  उदासीचा कल्लोळ दाटतो.

शाळा सुटल्यावर,

 छातीला दप्तर कवटाळून

 इथेच एक मुलगी उभी असायची

 कोणाची तरी वाट पाहत

 वेण्यांशी चाळा करत.

ती मुलगी आता मोठी

 झाली आहे.

 तिच्या केशरहळव्या स्वप्नांची दुनिया छोटी

 झाली आहे.

 कधी कधी ती

 याच रस्त्यावर येते

 गुलमोहराच्या झाडाजवळ थबकते

 थकलेली दिसते 

 तिच्या दोन्ही हातात पिशव्या असतात

 एकीमध्ये वर्तमानकाळ

 आणि दूसरीमध्ये भविष्यकाळ.

ती हेलकावत राहते दोन्हीमधून

 आत्ता,एवढयात पाऊस घेऊन येतो बघ

 असे म्हणून परागंदा झालेला भूतकाळ

 पाझरत  राहतो  तिच्या डोळ्यातून.

या रस्त्यावर

 आधीही धूळ उडायची जशी आजही उडते, उडत राहते

 छातीला दप्तर कवटाळून

 वेण्यांशी चाळा करणारी,

 वाट पाहणारी

 एक मुलगी

 सूनसान रात्री

 गुलमोहराची कथा सांगत राहते.

 …..

६. ही इथली शेवटची रात्र …..

निघताना मी,

तुला तुझ्यासोबत सोडून आलो आहे

तुझ्या भरवंशावर

या अनोळखी प्रदेशात

एक समुद्र सोडला तर

कोणाचाच भरवंसा देता येत नाही

मी स्‍वत:ला आवरायला सुरुवात केली आहे

बाहेर फक्‍त एक मेणबत्‍ती आणि

काही पांढरी फुलं ठेवून दिली आहेत

आजची संध्‍याकाळ जरा अधिक जड वाटते आहे

बारीकसा पाऊस आहे समुद्रावर

अंगात ताप असल्‍यासारखा वाटतो आहे समुद्र

अशावेळी संगळे दिवे बंद करुन

एकटेच बसावे असे वाटते

पण तसे करता येत नाही

आणि आतल्‍या अंधाराला बाहेरच्‍या उजेडाच्‍या

स्‍वाधीनही करता येत नाही

हॉटेलच्‍या जरा दूर मागे

ग्रेव्‍हयार्ड आहे

मी संध्‍याकाळी एकटाच जाऊन आलो

बाहेर ठेवलेली फुलं आणि मेणबत्‍ती तिकडूनच आणली आहे

तुझ्याकडे आत्‍ता कोणता प्रहर आहे …. ?

रात्र असेल तर

तुझी संध्‍याकाळची प्रार्थना झाली असेल

तुझ्याकडे असंख्‍य प्रार्थना आहेत

आणि मेणबत्‍तींचे तुकडेही

माझ्याकडे फक्‍त एकच आहे मेणबत्‍तीचा तुकडा जो मी बाहेर ठेवला आहे

आणि प्रार्थनाही एकच आहे

तू सोबत म्‍हणून दिलेली

ही इथली शेवटची रात्र

…..

७. तुझे जाणे…

तुझे जाणे अवघ्यांचे जाणे

एकेक करुन गळणारी आयुष्याची पाने.

तुझे जाणे म्हणजे

दुष्काळात उठून गेलेला गाव

नदीच्या मध्यभागी बुडालेली शाळकरी पोरांची नाव.

तुझे जाणे म्हणजे

पाऊस ऐन पेरणीच्या हंगामात निघून गेलेला

बाभळीचा काटा कोकीळेच्या कंठात अडकलेला.

तुझे जाणे म्हणजे

पारध्याने जखमी केलेली पंख तुटकी घार

तापाने फणफणणा-या मुलाच्या हाती, ऐन मध्यराती पडलेली आईच्या मृत्युची तार.

तुझे जाणे म्हणजे

जमिणीला भेगा उन्हाच्या झळा

तुझे जाणे म्हणजे

पंख्याला फास मापाचा गळा

तुझे जाणे अवघ्यांचे जाणे

एकेक करुन गळणारी आयुष्याची पाने.

… ..

८. आधी हाताला चटके..

भाताची  लावणी  करणा-या बायका

 गाणे गात आहेत.

त्या गात आहेत गाणे बरकतीचे,

 जे पेरले जाते आहे त्याला नशीब व्हावा

 एक जबदरदस्त सुगीचा हंगाम,

 ओच्यात घेतले आहेत जे दाणे पेरण्यासाठी ते पुरुन उरावेत

 आख्ख्या शिवाराला आणि

 एकेका दाण्यातून सळसळत रहावं

 लोंब्यांनी लगडलेलं  हिरवंकंच रान.

तालात पडताहेत त्यांचे शब्द,

 सराव केल्याप्रमाणे.

 त्या सरकत जातातहेत मागे मागे जराही वळून न बघता

 अडखळत नाही त्यांचं गाणं जराही

 इतक्या सगळ्या बायका एकाचवेळी

 पेरत असतात सुगीचे स्वप्न

 पसरत असतात माती हलक्या हाताने

 जसे कुरर्वाळावे जावळ तान्ह्या बाळाचे.

गाणे आणि दाणे एकाचवेळी

 होत जाते  आहे चिरंजीवी.

दुपारी विसावतात बायका

 आंब्याच्या झाडाखाली

 खातात कोर-चतकोर,

 पितात घटाघटा पाणी

 मनातल्या गाठी अलगद मोकळया होत जातात त्यांच्या.

लेकीचं लग्न

 पोराचं शिक्षण

 सावकाराचं देणं

 घरधन्याला पैरण

 गोठ्याला वैरण

 बायका रंगवू लागतात स्वप्नं

 शिवाराकडं  पाहून

 शहारतात

 हात जोडतात

 लगबगीनं उठतात

 राहिलेली पात पुन्हा धरतात

 गाण्याच्या ओळी  आपसूकच्‌ ओठावर येतात.

तिन्हीसांजी बायका

 गुमान परतात घराकडं

 शिवाराचा निरोप घेणं जिवावर येतं त्यांच्या

 मागे मागे पाहतात वळून

 दिवसभराच्या शेतघरोब्यानं डोळे येतात भरुन

 पाय जड जड होतात

 दिवसभराची मजूरी आणि

 घरातल्या संपलेल्या सामानाची यादी

 याची सांगड घालता घालता

 बायका मूकपणे गाणे गातात

 आधी हाताला चटके..

 …..

९. घोडे

गृहित धरलं जातयं

 कळपातील घोड्यांना आजकाल.

भूक असो वा नसो

 ठरल्या वेळीच घ्यावा लागतो दाणागोटा

 आणि पाणी समोर ठेवण्याच्या वेळेनुसारच

 सांभाळून घ्यावी लागते तहान.

भल्या पहाटे रपेटवर जाताना

 मनाप्रमाणेच पडताहेत पाय ठेक्यात

 असे दाखवावे लागते.

 टाच मारली की उधळायचे

 लगाम खेचला की थांबायचे

 देहाला आणि मनालाही

 वळण लावून घ्यावे लागते.

विस्तार व्हावा कळपाचा

 असा विचार असतो

 तेव्हा उभे केले जाते कळपातील कोणत्याही मादीसमोर.

 इथे कोणाच्याही इच्छेचा प्रश्न असत नाही.

 डोळ्याला डोळा भिडवण्याचीही परवानगी नसते

 घुसळून टाकावे अंगाला अंग,

 जिरवून टाकावी सगळी रग

 घडून यावा एक मनाजोगता संग

 असे स्वप्न मनातच विरुन जाते.

कळपातील आवडत्या घोडीच्या बरोबरीने चालतानाही

 अडखळत राहतात पाय.

 चाबकाच्या धाकावर उरकला जातो कार्यभाग

 आपण नेमक्या कोणत्या शिंगराचे धनी

 याचाही मागमूस उरत नाही मग.

पायाला जखम म्हणून

 लंगडत चालावे तर

 तीच ठरते दुडकी चाल

 दुख-या पायावरच बसवून घ्यावी लागते नाल

 आयुष्यभरासाठी.

हव्या त्या स्वाराला घ्यावे बसवून पाठीवर

 हे तर नसतेच घोडयाचे प्राक्तन कधी

 आणि

 जीवाच्या आकांताने धावत जाऊन

 मोहिम फत्ते करणा-या

 जखमी घोड्याकडे

 पाहिलेही जात नाही वळुन.

गृहित धरलं जातयं

 कळपातील घोड्यांना आजकाल

 आणि

 मलाही­.

 … ..

 १०. रान पेटलं भर्रारा..

रान पेटलं भर्रारा

आग नभाला भिडली

प्राणपाचोळावा जसा

तुझी याद ग नडली.

तुझी याद ग नडली

जीवा कापरं कापरं

देवा म्होरं घुमणारं

जसं करणीचं वारं

जसं करणीचं वारं

फेर धरुन नाचतं

तुझ्या भरल्या देहाचा

त्याला देव्हारा मागतं

देह देव्हारा देव्हारा

तुझ्यासाठी ग मांडला

तुझ्या एका हाकेसाठी

जीव आगीत सांडला

असा उसळला डोंब

आता नाही विझायाचा

बाकी सा-या जलमाचा

त्याला घास घालायाचा.

….

११. पारतंत्र्य

भावाने बहिणीला विचारले

 पारतंत्र्य म्हणजे काय ?

 तुला पुढे शिकता यावे म्हणून

 बाबांनी माझी शाळा बंद केली

 यालाच पारतंत्र्य असे म्हणतात

 ती म्हणाली.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारले

 पारतंत्र्य म्हणजे काय ?

 विद्यार्थ्यांना आम्ही कसे शिकवायचे

 हे सरकार आम्हाला शिकविते

 यालाच पारतंत्र्य असे म्हणतात

 शिक्षक म्हणाले.

कार्यकर्त्याने नेत्याला विचारले

 पारंतंत्र्य म्हणजे काय ?

 इतके पक्ष बदलून ही

 आजवर, साधे मंत्रीपद सुध्दा मिळाले नाही

 यालाच पारंतत्र्य असे म्हणतात

 नेता म्हणाला.

मुलांनी आईला विचारले

 पारंतंत्र्य म्हणजे काय ?

 ज्या वयामध्ये भातुकली मांडताना तुम्हां मुलांना  पहायचे

 त्या वयामध्ये तुम्हाला

  आत्महत्या-आत्महत्या असे खेळताना पहावे लागते

 यालाच पारंतंत्र्य असे म्हणतात

 आई म्हणाली.

 उदास

नेहमीपेक्षा ती सकाळी लौकर उठेल

 खूप वेळ आंघोळ करत राहिल

 केस तसेच ओले ठेवून

 सावकाशीने चहाचा एकेक घोट

 घेत राहिल

 खिडकीच्या काचेवर दव साचले असावे असे म्हणून

 पदराने खिडकीची काच पुसत राहिल.

निगुतिनं आवरेल स्वयंपाकघर

 डबे भरुन ठेवेल मुलांचे, नव-याचे

 त्यांची पुस्तके, बूट

 घरभर अस्ताव्यस्त पसरलेले कपडे

 आवरुन ठेवेल नीट.

चहा-नाष्टा तयार ठेवेल

 सर्वांच्या आवडीचा.

 पुजा उरकून घेईल.

मुलं, नवरा उठेपर्यंत,

 त्यांचे आवरेपर्यंत

 अजुन एकदा चहा घेईल

 पेपरवरुन उभ्या उभ्या नजर फिरवेल

 टिव्ही लावेल, बंद करेल लगेच.

मोबाईल घेईल हातात

 कोणाचा तरी मेसेज यावा,

 कोणाशी तरी बोलत रहावे असे वाटेल तिला

 पण ठेवून देईल ती मोबाईल तसाच

 घरामध्ये जेथे नेटवर्क मिळत नाही त्या टेबलवर

 चुकुन ठेवल्यासारखा.

चांगली साडी नेसेल,

 नव-याला जबरदस्ती घेऊन जाईल स्टेशनपर्यंत

 वाटेत थांबून वेणी घेईल हट्टाने

 तशीच माळेल ती गाडीवर बसता बसता.

दिवसभर भिरभिरत राहिल

 या फायलीमधून त्या फायलीमध्ये जराही उसंत न घेता.

चहाच्या टेबलवर तो भेटेल तिला

 विचारेल आज काय झाले परत, काय बिनसले ? अशी उदास का ?

 ती काही बोलणार नाही

 चहाचा एकेक घोट सावकाश घेत राहिल

 त्याची नजर चुकवत राहिल .

संध्याकाळची  उदास वाट

 तिला पुन्हा घराकडे ढकलत नेईल

 वाट चुकलेला एक ढग मात्र

 खिडकीपाशी कोसळत राहिल.

….

१२. प्रार्थना

इथे सगळे कोट घालतात उबदार

 या दिवसात.

 डोक्याला मफलर किंवा कानटोपी घालतात आणि

 कोटाच्या खिशामध्ये हात घालून बोलतात.

खिडक्यांवर किंवा दरवाजांवर साचलेले बर्फ साफ करणारी

 खास मुलं असतात इथं छोटी छोटी

 त्यांचे पाय बहुधा अनवाणी असतात आणि हातमोजे

 घालायची त्यांना जणू सवयच्‌ नसते.

त्याचे कोणाला काही वाटत नाही

 त्या मुलांनाही.

खिडक्यांच्या जाड काचांतून

 ती मुलं आत डोकावतात

 तेव्हा आतली मंडळी मोठाल्या कपातून कॉफी पीत असतात,

 सिगारेट ओढत असतात

 त्यांच्या तोंडातून गरम गरम वाफा बाहेर पडत असतात

 तेवढी उष्णताही पुरते

 बाहेरुन काच साफ करणा-या  इवल्या हातांना.

मिळालेले पैसे मुठीत पकडून,

 बर्फाच्या रस्त्यावरुन मुलं हळुहळु वस्तीकडे परतात

 हा मौसम जरा अजून लांबू दे

 अशा प्रार्थना

 त्यांच्या थंडगारडोळ्यातून सावकाशीनं पाझरत असतात.

……………

१३. भाताची लावणी करणारी बाई …

भाताची लावणी करणारी बाई

फक्‍त एक बाईच् असत नाही तर ती असते एक उत्‍तर

सगळ्या विश्‍वाच्‍या भूकेचे.

तिच्‍या ओच्‍यातून जे पेरले जाणार असते बीज ते देत असते

ग्‍वाही उद्याच्‍या हजारो भूकेल्‍या पोटांना घास देण्‍याची.

ती गाणे गाते पेरणीचे,

तिच्‍या डोळ्यात उद्याच्‍या सुजलाम् सुफलाम

दिवसांचे स्‍वप्‍न आकार घेत असते.

भर पावसात,

आपल्‍या दूरच्‍या शेतात,

बाई जेव्‍हा पेरत असते भविष्‍य आपल्‍या तान्‍ह्या लेकरांचे

तेव्‍हा तिला दिसत राहतात 

उपवर मुलीच्‍या मांडवातील जेवणावळी,

मधल्‍याच्‍या कमरेला चड्डी आणि कडदोरा

धाकल्‍याच्‍या डोक्‍यावर टोपडं आणि ताईत

घरधन्‍याला पैरण आणि

गोठ्याला वैरण.

बाई पेरते

बाई गाते

बाई होते शेताच्‍या इच्‍छेचाच एक भाग.

निगुतीनं काळजी घेत राहते बाई शेताची

दिसामासांनी  तर्रारुन येणा-या पिकाकडे बाई पहात असते

नुकत्‍याच वयात आलेल्‍या मुलीला पहावे तशी.

बांधावरच्‍या उंबराखालच्‍या देवाला न चुकता

ती जोडत असते हात

अमावस्‍येला न चुकता

ठेवत असते तीन शिरांचा लिंबू आणि दहीभात

बाईला धास्‍ती असते

शेताला बाधा होण्‍याची

भरल्‍या शिवाराला

नजर लागण्‍याची.

बाई हात जोडते तिन्‍हीसांजेला

तेव्‍हा ती ओंजळीत घेत असते

आख्‍खे शिवार

रात्री कुशीत घेऊन झोपते लेकरांना

तेव्‍हा ती झालेली असते

अवघ्‍या रानाची राखणदार.

तिच्‍या ध्‍यानि-मनी स्‍वप्‍नी दिसत असते फक्‍त शेत

कारण

ती फक्‍त एक बाईच् असत नाही तर ती एक उत्‍तर असते

सगळ्या विश्‍वाच्‍या भुकेचे.

….

१४ . शाळेतल्या दिवसांचा पाऊस..

शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा

केविलवाणा होऊन कधी वळचणीला दडायचा.

डोकं भिजू नये म्हणून पाटी  वर धरलेली

 रात्रीची उजळणी सगळी ओघळून गेलेली

 गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा

 केविलवाणा होऊन कधी

 वळचणीला दडायचा.

शाळेमध्ये मधली सुट्टी होऊ नये असे वाटायचे

 उपाशी पोटी ढेकर देऊन आतडे गोळा व्हायचे

 वर्गातल्या डब्यांभोवती पाऊस लाळ होऊन सांडायचा

 केविलवाणा होऊन कधी

 वळचणीला दडायचा.

तिन्हींसांजी कधी कधी घरी चूल विझलेली

 उसनं-पासनं करुन आई दमून निजलेली

 तिच्या कुशीत शिरताना पाऊस हुंदके देऊन रडायचा

 केविलवाणा होऊन कधी

 वळचणीला दडायचा.

शहराच्या खिडकीतून पाऊस

 आता बघवत नाही

 ओथंबून येतो  तरी

 काही रुजवत नाही

 शाळेभोवती तळं साचून.. असं

 त्याला सांगवत नाही

रानातल्या चाफ्याखाली पाऊस तेव्हा

 समजूतीनं झुरायचा

 उदासवाणा होऊन कधी

 वळचणीला दडायचा.

शाळेतल्या दिवसांचा पाऊस मनासारखा पडायचा

 उदासवाणा होऊन कधी वळचणीला दडायचा.

 …..

१५. माझा भारत महान आहे..

ते म्‍हणाले

तुम्‍ही फक्‍त जमिनी द्या

आम्‍ही जमिनी दिल्‍या विश्‍वासाने

त्‍यांनी इमारतींचे पीक घेतले तरारलेले.

त्‍यांनी हिरवेगार डोंगर मागितले

भुयारी रस्‍ता केला

नदीच्‍या पोटात फाळ घुसवून 

तिचा तळ ढवळून काढला.

गावभर सगळे डांबर पसरले

पायवाटा परागंदा केल्‍या

विहिरींना कुलुपे लावली

मिनरल वॉटरच्‍या बाटल्‍या आणल्‍या.

चावडीच्‍या जागी हॉल सजला

शाळेच्‍या जागी मॉल आला

देवाचा गाभारा चकचकीत रंगवून

कळसाच्‍या जागी टॉवर बांधला.

बाळाच्‍या पाळण्‍यावरही

स्‍क्रीनटच मोबाइल झुलु लागले

मीस्डकॉल देऊन सारे

एकमेकांशी बोलु लागले.

भाकरी-भाजीच्‍या जागी

आता पिझ्झा-बर्गर आले

गावातल्‍या भजनांचे

थिरकणारे डीजे झाले.

अशी विकासाची गंगा

पार तळापर्यंत गेली

गावाबाहेरची विलायती

थेट नळापर्यंत आली.

घर संसार, जमीनजुमला

सगळे इथे गहाण आहे

तरीही, अभिमानाने म्‍हणा

माझा भारत महान आहे.

…………….

१६ . भाषा

भाषा उदास आहे

दु:खी आहे भाषा

ती पाहते आहे

विचारांचा आणि स्‍वप्‍नांचा मृत्‍यु एक सलग

तिच्‍या समोर

तिला वापरुन घेतले जात आहे हवे तसे

तिच्‍या मनातला अर्थ

उतरूच दिला जात नाही लिहिण्‍यात – बोलण्‍यात

ती तगमगते आहे

पाहते आहे निमूट तिची मोडतोड होताना

ती पाहते आहे

चा मा होताना खुलेआम

ती धपापते आहे

गुदमरतो आहे तिचा श्‍वास

कोणालाच ऐकु येत नाही

तिचा दबलेला उसासा

तिला आठवत राहतात

अलंकाराने सजलेले, जुने अदबीचे, आपुलकिचे दिवस

थोरामोठ्यांच्‍या जिव्‍हेवर बागडतानाचा लडिवाळपणा

मोत्‍यांची माळ अलगद घरंगळत जावी

तसे शब्‍दांचे उतरत जाणे कागदावर

आपल्‍या अंतर्भूत अर्थाच्‍या नजाकतीसह

आणि त्‍यातून उठणारा नाद अनाहत

तिला आठवत राहतो तिचा बिनधास्‍त वावर

कथा, कादंबरी आणि कवितांच्‍या पाना-पानातून साकारलेला

तिला आठवतो तिचा आवाज

गोड गळ्यांच्‍या बंदीशीतून झंकारलेला

भाषा उदास आहे

दु:खी आहे भाषा

वाट पाहते आहे ती

अमृताते पैजा जिंकी… असे सांगून गेलेल्‍या

कोणा एका अवलियाची 

…. .

१७. आम्‍हालाही वाटायचे तेव्‍हा…

इथून असे पुढे या

इथे  आमच्‍या  चपला आहेत

चूपचाप चालत रहायचे आणि

काहीही झाले तरी आवाज करायचा नाही

याची सवय  लावून घेतली आहे चपलांनी स्‍वत:ला, सुरुवातीपासून

बाबांच्‍या सुरुकुतलेल्‍या देहासारखे

दिसताहेत त्‍यांचे तळवे

इथे

कपडे अडकवून ठेवले आहेत खिळयांना

वर्षानुवर्षे टिकून रहायचे

उसवलेला एखादा धागा किंवा

अचानक तुटलेले बटन चारचौघात दाखवायचे नाही

झिजलेल्‍या पट्टयानेही,नीट सावरून धरायची पोटावर दुमडलेली पँट

आयुष्‍य  सावरून धरावे तशी

या सगळ्या गोष्‍टी अंगवळणी पडल्‍या आहेत कपड्यांच्‍या

आधीपासूनच

इथे  गोधड्या आणि  घोंगडी आहेत

आईच्‍या  जुन्‍या लुगड्यांची ठिगळं पसरली आहेत

त्‍यांच्‍या सर्वांगावर

इतक्‍या सगळ्या लुगड्यांचा उबदारपणा आणि

आईच्‍या हाताची हळुवार शीवण

मायेने कुशीत घेते 

बकरीच्‍या  दुधाचा वास येत राहतो

घोंगड्यांना

भूक उभी राहते दूर अंगचोरुन

पाय दुमडून घेतलेल्‍या पोटापाशी

इथे चूल  आहे या कोप-यात 

ब-याचदा ती उदास असते

तिन्‍हींसांजी आईची वाट पहात असते

आपण एक सलग  उजळत रहावे या घरात

असे स्‍वप्‍न असते चुलीचे आणि

आईचेही

चूल  जेव्‍हा पेटते तेव्‍हा आईचा चेहरा उजळलेला असतो

एकवेळ दिवा लागला नाही तरी चालेल अंगणात

पण तू मात्र कधीही विझलेली राहू नकोस, कोणाच्‍याही घरात

असेच काहीतरी पुटपुटत असते आई  चुलीजवळच्‍या अंधारात

तेव्‍हा तिचे डोळे

खूप दिवसांच्‍या उपाशी गाईसारखे दिसतात

हे सगळे पाहून तुम्‍हाला आश्‍चर्य वाटत असेल ना ?

आम्‍हालाही वाटायचे

तेव्‍हा….

……………

१८ . न लिहिलेल्‍या कवितांच्‍या ओळी… 

न लिहिलेल्‍या कवितांच्‍या ओळी

राहून राहून ठणकत राहतात

उसन्‍या  जगण्‍याला

अडथळा करत राहतात

शाळेजवळच्‍या गुलमोहराखाली

काही ओळी सांडून गेल्‍या होत्‍या

नदीकाठच्‍या उंबराच्‍या झाडाजवळ

काही रेघोट्या पुसटून गेल्‍या  होत्‍या

कापणीला आलेल्‍या गव्‍हाच्‍या शेतात

हातात हात घेऊन गुडुप झालो होतो

वासाच्‍या नादात काही ओळी

बांधाजवळ विसरून आलो होतो

अंगणातल्‍या केळीपाशी

एकदम तिन्‍हींसांजेचे झाले  होतो

केळीचा घड पदराखाली आला होता

विस्‍कटलेल्‍या ओळींचा हिंदोळा

परांगदा झाला होता

तापाने फणफणत होतो मध्‍यरात्री

पाण्‍याच्‍या घड्या बदलताना आईच्‍या डोळ्यात नदी भरून आली होती

पापण्‍यांवर त्‍याची उबदार साय झाली होती

हळूहळू ताप उतरून  गेला होता

ओळींचा छबीना चुरघळून गेला होता

आता रात्री अपरात्री डोळे भरून येतात

मोगरीच्‍या दंवाची झुंबरं  हलत राहतात

पापण्‍यांच्‍या पालख्‍या हेलकावत राहतात

न लिहिलेल्‍या कवितांच्‍या ओळी 

राहून राहून ठणकत राहतात

उसन्‍या  जगण्‍याला

अडथळा करत राहतात

……………

१९. प्रार्थना..

आता प्रार्थनेसाठी हात जोडले जातात आणि

अचानक संध्‍याकाळ दाटून येते 

कोणत्‍याही प्रहरी हे असेच सुरू राहते

मागच्‍या दाराकडून नदीची हाक ऐकु येते 

देह थरथरत राहतो‍ नि:शब्‍द

गालावरून ओघळत राहतात दिल्‍या-घेतल्‍याचे हिशेब

अंगणातला पाचोळा कोणतीतरी गोळा करत असल्‍यासारखा आवाज

पाखरांच्‍या परतण्‍याचा चुकलेला माग

दुरातल्‍या एकाकी डोहाकडून

घंटांचे नाद

फाटका पदर फडफडत राहतो सुनसान 

अंग भिजून जाते, निथळत राहते दमून

ओच्‍यातली फुले सांडून जातात

देहावर फुलांच्‍या वासाचे डाग पसरत जातात

आपले असणे-नसणे  जाणवत नाही कोणाला

हात – हातात घेते कोणीतरी, ओढत राहते

परतीच्‍या वाटेवरचा दिवा उजळत जातो

खुणेच्‍या झाडाजवळचा  घोडा  वाट पाहात राहतो

आपण निरोपाची प्रार्थना म्‍हटली

तेव्‍हाही संध्‍याकाळच होती

आत्‍ताही जेव्‍हा प्रार्थनेसाठी हात जोडले जातात

अचानक संध्‍याकाळ दाटून येते

मागच्‍या दाराकडून नदीची हाक ऐकु येते

प्रार्थना

प्रार्थनेसाठी

वाट पाहावी लागत नाही कोणाची

प्रार्थना

आपल्‍यासोबत संध्‍याकाळ..

घेऊन येतात

पाखरांना आपआपली घरटी

शोधून देतात

प्रार्थना उभ्‍या असतात

खिडकीच्‍या पलिकडे

दूर अंधारात

प्रार्थना

आपण एकटे होण्‍याची

वाट पाहात

राहतात

प्रार्थना

उशाशी येऊन बसतात

दंवाच्‍या डोळयांना

गोंजारत राहतात

पहाटे पहाटे

नदीच्‍या दिशेने

निघून जातात

प्रार्थना थांबत नाहीत

कोणासाठी

त्‍यांच्‍यासोबतच  चालावे

लागते

कितीही असला अंधार वाट दिसत

राहते

प्रार्थना एकटे पडू देत नाहीत

हात हातात

घेतात

डोळ्यांच्‍या काठावरचे  दंव

अलगद टिपून

घेतात

प्रार्थना जाणून असतात

शेवटच्‍या

मुक्‍कामाचे ठिकाण

निवडूंगबनाच्‍या दूर

पलिकडे

गुलाबाचे रान..

….

२०. घास

माझ्या समोर

आत्‍ता, या जेवणाच्‍या ताटामध्‍ये जी भाकरी आहे गरम गरम

मला माहित नाही तिच्‍या पिठाचे जोंधळे

नेमक्‍या कोणत्‍या शेतातून आले आहेत.

मला हे ही  माहित नाही की

कोणत्‍या कुणब्‍याच्‍या ओंजळीतून झाली असेल त्‍यांची पेरणी

आणि नेमक्‍या कोणत्‍या शिवारात

तर्रारून आले असतील त्‍यांचे कोंब.

कोणत्‍या शेतक-यांने केली असेल त्‍यांची निगराणी

कोणाच्‍या खळ्यामध्‍ये उमटली असतील सुगीची गाणी.

अर्थात हे मला माहित असणे किंवा नसणे

तसा काही फारसा फरक पडत नाही

त्‍यामूळे भाकरीची चव बदलत नाही.

पण,

कधी कधी जेवताना जोराचा ठसका लागतो

दूर शेतामध्‍ये राबणा-या कोणा शेतक-याच्‍या

उपाशी पोराचा चेहरा समोर येतो 

जीव कासावीस होतो

घास तोंडात तसाच

फिरत राहतो.

…………….

सतीश सोळांकूरकर / ९३२४३६३९३४

**************************************************************************************************************

नुकतीच प्रकाशित बालमानसशास्त्रावरील आधारित गूढ, प्रयोगक्षम एकांकिका

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment