रात्र, दुःख आणि कविता : प्रा.मीनल येवले
पोळत्या जीवनानुभवांची अनुभूती– वणवा
पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात सहभागी कवींना पुष्पगुच्छासह एकेक पुस्तक देण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतरच्या भेटीगाठीत एका मैत्रिणीच्या हाती “ रात्र, दुःख आणि कविता ” हा संग्रह दिसला. कवयित्रीचं नाव वाचून अस्वस्थ झाले कारण तो मला हवा होता ना ! मी तशी मैत्रिणीकडे इच्छा व्यक्त केली नि माझे काव्यवेड ठाऊक असल्याने की काय, तिने तो सहज मला दिला. कविता वाचून त्यांच्या प्रेमातच पडले सोबत कवयित्रीच्याही !
अंजली कुलकर्णी या पुण्यातील सुप्रसिद्ध, जेष्ठ कवयित्रीचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. आपल्या आगळ्या-वेगळ्या काव्यशैलीने, समृद्ध अनुभवविश्वातून संपन्न झालेल्या काव्यकृतीमुळे त्यांच्या कविता रसिक प्रिय असून या कवितांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. आजवर त्यांच्या कविता विविध अनियतकालिकातून, दिवाळी अंकातून वाचून होते. लॉकडाऊनच्या काळात अंजलीताई ऑन लाईन कविसंमेलनातून, कधी संवादातून भेटू लागल्या. या निगर्वी, सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाशी आता तर छान स्नेहबंध जुळून आले.
त्यांच्या “ रात्र, दुःख आणि कविता ” या संग्रहात “रात्र” या विषयावरील 32 , “दुःख ” विषयाला धरून 33 तर “कविता” विषय घेऊन 18 कविता आहेत. या सर्व कविता एकत्र वाचताना रसिक काव्यानंदाच्या झुल्यावर झुलत राहतो. मीही तो अनुभव घेतला. या कवितेतून भेटणारी जादूगरीन, बहुरागिनी, बहुरूपिणी, कधी मादक, कधी भयभीत करणारी, कधी ध्यानस्थ बसवणारी अशी रात्रीची विविध रूपं आपल्याही मनात कुतूहल निर्माण करतात. या कवितांमधून रात्रीच्या अंधारात स्वतःच्या आतला उजेड शोधणाऱ्या सृजनशील काव्यमनासारखाच उघड्या, मोकळ्या, निखळ, माणसांविरहितच्या निसर्गाशी रसिकांनाही संवाद साधता येतो. या कविता वाचताना मलाही निसर्गाचा एक अंश झाल्याची प्रचिती अनुभवता आली.
संग्रहातील कविता रात्र, दुःख या संदर्भाभोवती फिरत असताना दुःखाचे आणि रात्रीचे अनेक कंगोरे कवितेतून उलगडत जातात. बऱ्याचशा कवितांमधून हृदयाच्या अंतर्हृदयाशी साचलेलं दुःख पृष्ठावर येतं, बऱ्याच कवितांमधून उसवलेल्या काळजाच्या व्यथा रसिकांनाही उसवून काढतात. सर्व पुढ्यात असून कसलं हे अपुरेपण ? कसली ही अतृप्ती ? ज्ञाताच्या पल्याडची… अज्ञाताच्या शोधाची तर ही धडपड नाही ना ! कदाचित त्यासाठीचंच हे खदखदणं असावं. अनेक कवितांमधून प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ते उजागर होताना दिसते.
रात्र म्हणजे इतरांच्या दृष्टीने संपणं, आनंदाचा- आशेचा- कृतिशीलतेचा शेवट क्वचित मृत्यूही ! पण कवयित्रीला रात्र या साऱ्यांची सुरुवात वाटते. ती संजीवक पेय वाटते.
थकून झोपून जाते रात्र चंद्राच्या ढोलीत
हर एक नशा लाट बनून ओसरते
काळ वाहत राहतो वाऱ्याबरोबर चेहऱ्या शिवाय
हर एक फूल गंधाळल्याविना कोमेजते…
“ हिवाळ्यातल्या चंद्ररात्री ” कवितेत हिवाळ्यातल्या चंद्ररात्रीचं संयमी, सृजनक्षम मनाने अनुभवलेलं, टिपलेलं एक क्षणचित्र आहे. ते सुखदुःखाच्या कल्लोळासह, भवतालच्या निसर्ग घटकांसह, कवयित्रीच्या भावभावनांच्या आंदोलनासह साकारलं गेलंय. प्रतिभकल्पनेच्या कुंचल्यातून साकारलेलं ते चित्र मग फक्तच हिवाळ्यातल्या चंद्ररात्रीचं राहत नाही तर त्या चांदणरात्रीच्या शांत, एकांत प्रहरात कवयित्रीच्या वाहत्या इच्छांचे, स्वप्नांचे तलम पापुद्रेही उलगडू लागतात, जे काळानं ओरबाडून घेतले आहेत.ऐन बहरत्या वळणावरची आपल्या कैफात जगण्याची नशा वाहत्या काळासह ओसरत गेली. आणि मग कवयित्रीच्या इच्छा-अपेक्षांचं फूल गंधाळल्याविनाच कोमेजून गेलं.
या कवितांमधून रात्र वेगवेगळ्या रूपात येते. सकाळच्या उन्हात कोवळेपणानं हसणारी शहाणीसुरती झाडं रात्री अचानक वेडी बनतात, असा अनुभव कवयित्रीला येतो नि मग प्रश्न पडतो-
काय होत असतं रात्री
दोन वाजताच्या अवकाशात
जे भयही घालतं
अन् खेचूनही नेतं घरापाठीमागच्या वावरात ?
तर “ गुंफन ” कवितेतील रात्र तिच्या आत उलगडत जाणारी.
तुकड्या-तुकड्यातून अंधारगुहेत
झिरपत नेणारी…..
निजलेल्या बाळाने निर्व्याजपणे अंथरूणावर लोळत राहावे तशी एका रात्रीतून दुसऱ्या रात्रीत कवितेतील ती घरंगळत राहते रात्रभर.
रात्रीच्या विभ्रमावर दुःखाची झिलई चढलेली आहे. शिशिररात्र तर आपल्या काळ्या आवरणाखाली अवघा भवतालच गुरफटून घेते.
एका एका पानाचे तर्पण करत
साऱ्याच इच्छा वासनांना
तिलांजली देत….
जगण्याचे सारे हिरवे कोवळे क्षण
निबर होऊन कोळपून चाललेले….
रात्रीच्या काळोखातच जगण्याची उर्मी, बळ, उद्याची आशा लपलेली आहे हेही ही कविता मान्य करते आणि मग कवयित्रीला काळोखाच्या मद्याचं व्यसनच जडतं. अंजली कुलकर्णीच्या कविता वाचून खात्री पटते की, कविता अबोध मनाचे नैसर्गिक अविष्कार मनाच्या पृष्ठभागावर आणते आणि मनाच्या पातळीवरील सृजनोत्सवातून कविता जन्म घेते.
कवितासंग्रहातील सर्व कविता सुरुवातीला अधाशासारख्या वाचून झाल्या पण अशाने ही कविता कळणारी नाहीच. मग एकेकीला हळुवारपणे आस्वादण्यासाठी संग्रह हाती घेतला. नकळत संग्रहातील कवितांमधून “ वणवा ” नावाच्या कवितेपाशी येऊन थांबले. सद्यस्थितीत भयाच्या काळ्या वणव्यानं, कोरोना नावाच्या विषाणूनं आपलं जगणंच होरपळून निघत आहे. आपल्या मनातले सगळे ऋतूच करपून गेले.
“ चहूकडून सुसाटल्यात ज्वाळा, भडकलंय रान” याप्रमाणे चिंतीत भविष्य अनेक प्रश्न घेऊन आपल्या पुढ्यात उभं आहे. कदाचित सद्यस्थितीतल्या या भयग्रस्त वर्तमानाचे प्रतिबिंब या कवितेत माझ्या मनाने शोधले असावे. मात्र संग्रहात एकाहून एक सरस कविता असतानाही मन इथेच येऊन थबकले.
रात्रीचं अरण्य, काळा धूर, भडकलेलं रान, घुसमटणारा श्वास, मुका वणवा, गळणारे डोळे अशा अनेक शब्दप्रतिमांमधून पेटलेल्या ह्या वणव्याची धग माझ्याही मनापर्यंत येऊन पोहोचली नि मला व्यक्त होण्यास भाग पाडले. काळोख्या रात्री अरण्याला चहूबाजूंनी घेरल्यावर झाडं, पानं, लता, वेली होरपळून निघतील, जीवाला आच पोहोचू लागल्यावर प्राणी जीवाच्या आकांतानं सैरावैरा धावू लागतील या लाक्षणिक अर्थाच्या पल्याड ही कविता आपल्याला अंतर्मनाला लागलेल्या न दिसू शकणाऱ्या वणव्यापाशी घेऊन जाते.
किती किती स्वप्न रंगवतं मन शांत, स्वस्थ जगण्याची, आपल्या अवकाशात मुक्तपणे उंच उंच उडण्याची ! फुलण्यासाठी, बहरण्यासाठी, दरवळण्यासाठी किती धडपड चाललेली असते आयुष्याची ! सारे ऋतू पणाला लावतो आपण आनंद आणि सुखाच्या प्राप्तीसाठी पण नियती नावाची गुढ शक्ती काय काय लीळा करेल आपल्या जगण्यासोबत सांगता येत नाही. सारे फासेच उलटे पडावेत आजवर टाकलेले… काहीच घडू नये मनासारखं… अशावेळी संवेदनशील मनाची किती तगमग होत असेल ? प्रतिभकल्पनेला पोळणाऱ्या धगीतूनच “ वणवा ” साकारली गेली असावी कदाचित. ऐन उमेदीचे दिवस या धगीत पोळून निघालेले. न्यूनतेच्या दुःख ज्वाळात धगधगत राहिल्या इच्छा-आकांक्षा. बदलवता आले नाहीत दिवस, थोपवता आला नाही नकोनकोसा असह्य वर्तमान की शांतवता आलं नाही अंगावर चालून आलेल्या पोळत्या ज्वाळांना.
चहूबाजूंनी घेरलंय काळ्या वनव्यानं
रात्रीच्या अरण्याला
होरपळून गेलीयेत झाडं पानं लता वेली
होरपळून निघालेत हरणं ससे गवे हत्ती
कवितेची सुरुवातच अशी जीव पोळून काढणारी आहे. वरवर सुखी दिसणारं आयुष्य तर आलेलं वाट्याला पण कशी ही घुसमट ? स्वस्थपणे जगताही येत नाही की, दुःख मोकळही करता येत नाही.
काळ्या आगीनं होतोय सर्वांगाचा दाह
काळ्या धुरानं घूसमटतोय श्वासांचा मार्ग
दोनच ओळींचा हा पुढला बंध. आयुष्याकडून केलेल्या अपेक्षा अपूर्णच राहिल्या. जगणं पोळून काढणाऱ्या घटीतांच्या काळ्या धुरानं श्वास घुसमटतोय. “ आपुले मरण पाहिले म्या डोळा ” संत तुकारामाच्या अभंगाप्रमाणे आतल्या आत चाललेला हा इच्छा- भावनांचा- अपेक्षांचा मरण सोहळा स्वतःचा स्वतःच अनुभवायचा. सांगणार तरी कुणाला ?
चहूकडून सुसाटल्यात ज्वाळा
भडकलंय रान
हे पेटतंय तडतड गवत
ठिणग्यांतून बेभान
मुक्तछंदातील ही अल्पाक्षरी रचना. अल्प शब्दातून मोठा आशय पेलत शेवटाकडे सरकत जाते हळुहळू. आता तर अवघं रानच भडकलंय. तडतड करत पेटलेल्या गवतातून बेभानपणे ठिणग्या उडायला लागल्या आहेत. आता विझण्याची शक्यता नाहीच.
कवयित्रीला निर्मितीच्या वेणा इतक्या अनिवार झालेल्या की, कवितेशी संग केल्याशिवाय स्वस्थता नाहीच. आतले सारे कल्लोळ तिच्या पायाशी वाहिल्या शिवाय शांती नाहीच लाभायची. हा दुःखाचा, कुढण्याचा, जळण्याचा आगळा-वेगळा खेळ समजून घेते फक्त कविता. ती जळत्या क्षणांनाही कवेत घेते. अंतरंगात पेटलेल्या वणव्यालाही निवविण्याचं सामर्थ्य असतं फक्त कवितेत.
साऱ्या आयुष्याचंच अरण्य झालेलं, इच्छांनाच वणवा लागलेला, मुक्यानं अश्रू गाळता गाळता आयुष्याची कितीतरी पाने उलटून गेली. कायम एक सल सोबत घेऊन जगतांनाची ठस ठस शेवटच्या कडव्यात येते.
रात्रभर धुमसत राहिल अरण्य
मुक्या वणव्यानं
रात्रभर शिंपत राहिल रान
गळणाऱ्या डोळ्यातनं…
मनाविरुद्धच्या घटनांनी होरपळून निघालेल्या जगण्यातील दाहकता, तीव्र अनुभवांची टोकं “ वणवा ” या प्रतिमेतून आलेली आहेत. हा वणवा रात्रीच्याच अरण्याला का लागलेला आहे ? मनोगतातून कवयित्रीने या रात्रीच्या अंधाराची, धगधगण्याची ससंदर्भ स्पष्टीकरणे दिलेली आहेत. “ दिवसभर स्वतःशी सोडून इतर सर्वांशी जोडून घ्यावं लागतं, तेव्हा मनाला ही मोकळीक नसते. रात्र तशी मोकळीक देते, अवकाश प्राप्त करून देते म्हणून रात्र तशी जवळची वाटते. तिच्याजवळ सगळ्या गोष्टी मोकळ्या करता येतात. आशा-निराशेचे प्रहर, सुखदुःखाचा झमेला, अनुभव, घटना, प्रसंगातून निर्माण झालेली सहकंपनं, विचार, भावना, संवेदना- रात्र सारंच आपल्या कवेत घेते आणि कवितेच्या ओळींतून सारं ओघळू देते.”
रात्रभर शिंपत राहिल रान
गळणाऱ्या डोळ्यांतनं…
या ओळींमधून ते प्रभावीपणे सूचित होते. रात्र म्हणजे भयान भेसूराची भयभीती, रात्र म्हणजे गुढरम्यता, आकर्षकता तसेच रात्र म्हणजे एकट्यानं स्वतःमध्ये शिरण्याची वेळ. दुथडी भरून वाहणाऱ्या मनाची ही रिकामी वेळ. ती व्यावहारीक जगाचा सांधा निखळून एका आदिम निसर्ग भावनांशी मनाला घसट करू देते. कवयित्रीने “ एकाएकी ” नावाच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे –
अंधाराचेच डोळे घेऊन मी
अंधारातच झिरपत राहिले,
झिरपत राहिले….
कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे “रात्र आई झाली आणि तिनं स्वतःचीच छोटी रूपं असावीत अशा कविता जन्माला घातल्या. म्हणजे जननीही तीच आणि अपत्यही तीच… कवितेच्या एका अपरिहार्य काळ्या गर्तेत स्वतःला झोकून दिलं अन् चक्क असीम आनंदाचा समुद्र उचंबळून आला ” असा या कविता निर्मितीमागील अनुभव अचाट, अलौकिक, जीव उसवून काढणारा तितकाच मखमलीही आहे.
निसर्ग, समाज आणि संवेदनशील मन या तीन पातळ्यांवरून एकसंघपणे जगत असताना अनुभूतीचे जे तरंग, लहरी, घाव, जखमा, जे चरे, ओरखाडे कवयित्रीच्या मनावर उमटले त्यांना शब्द मिळाल्याने हे तरंग, लहरी, घाव, जखमा, चरे, ओरखाडे या कवितेतून सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी झाले आहेत.
*****************
कवितासंग्रह – “ रात्र,दुःख आणि कविता ”
अंजली कुलकर्णी , पुणे.
प्रकाशन – पद्मगंधा प्रकाशन , पुणे.
प्रा. मीनल येवले
42 , विज्ञान नगर,मानेवाडा,नागपूर-34
मो. नं. 7774003877