आणि गूज मनीचे… : नितीन माधव, मुंबई
आणि गूज मनीचे…
ब्रेकींग न्यूज, एव्ही, एव्हीबी, डब्लुकेटी इत्यादी…दिवसभर बातम्यांच्या भडिमारात एखाद्या घटनेवर ‘मी’ म्हणून व्यक्त होणं राहून जातं. बातमीदाराऐवजी एक व्यक्ती म्हणून त्या घटनेविषयी काय वाटतं हे जरा मागे पडत जातं. हे केवळ माझ्या किवा कुणा एकाच्याच बाबातीत नव्हे तर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असावं कदाचित… मग एखाद्या निवांत क्षणी आपलेच आपल्याला प्रश्न पडू लागतात की…एखाद्या मंत्र्याला जगण्यासाठी 15 ते 20 प्रशस्त बंगले, 20 ते 30 आलिशान गाड्या, कोट्यवधीचे घोटाळे करून गोळा केलेला बँक बॅलेन्स आणि गोत्यात आल्यास इतरांच्या मदतीची पर्यायानं ‘बळा’ची गरज का पडावी ? हे झाल राजकारणी मंडळींचं.
तरुणाईचं म्हणाल तर…ही कोण मंडळी आहेत जी आधी प्रेम करतात. नंतर प्रेम नाकारणाऱ्या व्यक्तीवर अमानुष हल्ला करतात, अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्यात धन्यता मानतात ?
ज्या बालवयात मुलांना घडवण्याची गरज असते त्या वयात ती बिघडून एकमेकांना भोकसल्याच्या बातम्या य़ेऊन थडकतात.
टीव्हीवरील ‘क्राईम शो’ना मिळणारा टीआरपी, हिंसक आणि अश्लिल वेब सिरीजना वाढता प्रक्षकवर्ग हे सगळं कशाचं द्योतक आहे?
आपल्याकडेही ‘ही’ बातमी चालायलाच हवी या अट्टाहासापायी व्यभिचार, खून, बलात्कार, मोमो, कीकी, ब्लु व्हेल चॅलेंजच्या बातम्या दाखवून आपण नकळत त्यांचा प्रचार आणि प्रसार तर करत नाहीत ना ?
कारण बातम्यांमधूनच अशा गेम्स आणि घटनांबाबतची प्रेक्षकांची उत्सूकता चाळवली जाते आणि दर्शक त्याकडे आकृष्ट होतात.
ज्या तारे-तारकांना करिअरच्या अत्त्युच्च ‘पीक’ला असतांना मराठीचा विसर पडलेला असतो तीच मंडळी त्यांच्या पडत्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरत, त्यात पहीला-वहीला अभिनय करताना मराठीचा अभिमान, कळवळा असल्याचा आव आणतात. मराठीचं ‘माधुर्य’ अधोरेखित करत मराठीच्या वैशिष्टयांची ‘लीस्ट’ पुढे करतात.
(‘धक धक गर्ल’चा ‘बकेट लिस्ट’) हे सगळं बातमी म्हणून चालवतांना आणि बघताना अपण त्यांचा स्वार्थी हेतू नजरेआड करत त्यांना डोक्यावर तर घेत नाही ना ? असा प्रश्न पडतो.
फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडणारे नट, वन्य जीवांची शिकार करणाऱ्या नट-नट्या, भ्रष्ट राजकारणी, अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले तरीही निवडणूक जिंकणारे नेते, केवळ नावात ‘राम’ आणि रावणाची वृत्ती असलेले दादा, भाऊ, कार्यसम्राट वगैरे यांचं आपण आपल्या नकळत उदात्तीकरण तर नाही ना करत आहोत. कारण त्यांच्या सभांना, भाषणांना होणारी अलोट गर्दी पाहून हेच लक्षात येतं.
या सगळ्या नकारात्मक बातम्यांमध्ये काही सकारात्मक विचार देणाऱ्या बातम्याही असतात ज्यांमुळे थोडा दिलासा मिळतो. महाराष्ट्रातील अकोलेमधील ग्रामिण भागात राहून बियाण्यांची बँक जपणारी राहिबाई सोमा पोपेरे, रेल्वे स्टेशनवर आपला जीव धोक्यात घालून ईतर प्रवाशांचे प्राण वाचणारे आरपीएफ जवान, आपली सोन्याची अंगठी विकून शाळा उभी करणारे बीडचे मुख्याध्यापक, मरणोत्तर अवयवदान करून दुसऱ्याला जीवदान देणारे आसामी. अशा आदर्श बातम्यांमुळे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी चांगलही देतो आहोत हे समाधान त्यातून मिळतं.
असो…शेवटी ‘ब्युरो रिपोर्ट’ म्हणत निरोप घेण्याआधी एक सांगतो. खरं तर वृत्तवाहिनी, रेडिओ, वृत्तपत्र या माध्यमांची हीच खासियत आहे की अपल्याला एकाचवेळी अनेकांशी संवाद साधता येतो. कधी आहे तसं तर कधी मनीचं गूज सांगता येतं आणि काही अंशी का होईना…जनप्रबोधन करण्याची संधी मिळते.
– नितीन माधव, पत्रकार, मुंबई
पत्ता – पॅराडाईस हाइट सोसायटी, चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम), मुंबई
अल्पपरिचय – सुरुवातीला दैनिक लोकसत्ता मधून ‘अभयारण्ये’ मालिका लेखन. पुढे
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर अँकर तर टीव्ही 9 मराठी मध्ये बुलेटीन प्रोड्यूसर जबाबदारी.
शिवाय आकाशवाणी मुंबईच्या 107.1Mhz ‘एफएम रेनबो’ रेडिओ वाहिनीवर रेडियो जॉकी.
भावगीते, कवी कट्टा, राजकीय सभा अशा मंचीय कार्यक्रमांच सूत्रसंचालन.
कविता लेखन आणि कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्या कवितांच साभिनय सादरीकरण.