विश्वाचे मूळ : सौ. सुरेखा बोऱ्हाडे,नाशिक
विश्वाचे मूळ
गप्पा सुरु झाल्या की मग हळूहळू त्या प्रवाहात बोलण्याच्या विषयाला धरुन किंवा मग त्या विषयाच्या अनुषंगाने , दुस-या अनेक मनातल्या गोष्टी प्रवाहीत होतात.कौटुंबिक गप्पात त्यातही बहिणी आणि मैत्रिणीमध्ये तर मी कायम हसत म्हणत असते ,”मी जन्मापासून वीस वर्षे आईला आणि लग्नानंतर नव-याला सोडून एक दिवसही कुठे राहिले नाही. अगदी दिवाळीला एक दिवस माहेरासाठी असतो.”गप्पा म्हणून सहज जरी बोलले तरी खरंच आई आणि नवरा या दोघांचे माझ्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. ही दोघं माझे गुरु,मार्गदर्शक आहेत.सुख – दु:खात ह्या भक्कम व्रुक्षाच्या आधारानेच मी तगून आहे. अर्थात हे दोन पदर प्रत्येकाच्याच जीवनात महत्त्वाचे असतात.आई जन्म देते ,लालन -पालन करते तर जोडीदार जीवन भर साथ देतो.
आईने जन्म दिला .या जगातला प्रकाश दाखवला.देव कुणी पाहिला आहे?पण आईचआपला परमेश्वर!बाळ जन्माच्या वेळच्या तिच्या कष्टदायक परंतु तरीही सुखावह प्रसुती वेदनातून तिचा नवा जन्म आई या रुपात होतो. ह्या तिच्या कष्टदायी वेदना,त्यानंतरचे बाळाचे कठोर संगोपनाचे कार्य आपल्याला आठवत नाही. परंतु आई झाल्यावर माझ्या आईच्या वेदना , कष्ट मला कळाले. पण खरं प्रामाणिकपणे सांगयचं तर मी आई झाल्यानंतर मी माझ्या आईपणातच गुंतून गेले. स्वतः च्या आईला आपण किती जाणून घेतो?माझ्या जन्मानंतर आई खूप आजारी होऊन चार महिने तिचा दवाखाना चालू होता ,त्यामुळे मला तिचे अंगावरचे दूध मिळाले नाहीअसे मोठे झाल्यावर कळाले. मोठं एकत्र कुटुंब होते. काकूला बाळ होते. तिनेच मलाही दूध पाजले.दोन आईचे दूध पिले म्हणून मी सर्व भावंडांत प्रेमळ आहे असे घरात सर्व म्हणतात.
वडिल शिक्षक असल्याने कुटुंबातील आम्ही दहा-बारा भावंडे नोकरीच्या गावी शिक्षणासाठी एकत्र होतो.माझ्या आईने आम्हा सर्व भावंडांचे संगोपन एका मायेच्या नजरेतून केले.कोण सख्खा आणि कोण चुलत भावंडं आहे हे कधीही लक्षात येऊ दिले नाही. आम्हा बहिणींना कामाची सवय लागावी म्हणून छोटी छोटी कामे ती आम्हाला वाटून देई.पण काम केलेच पाहिजे असा कडक दंडक तिचा कधी नसायचा.या तिच्या प्रेमळपणाचा मीच अधिक फायदा घेतला असे आता वाटते.मी कायमच अंगणात मैत्रिणींबरोबर खेळणण्यात मग्न असायची. एवढ्या कुटुंबाचा गाडा ओढायचा तर आई कायम कामात व्यस्त असायची. तिला रिकामे बसलेले किंवा शेजारणीशी शांत बसून गप्पा मारतांना मी कधी पाहिले नाही. दिवाळीच्या सणाला दिवसभर काम करुन रात्री बारा बारा पर्यंत फराळाचे बनवायची. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढतांना एवढी ढोरमेहनत तिला करायला लागत होती पण कधी याबद्दल तिचा तक्रारीचा स्वर ऐकला आला की चेहऱ्यावर नाराजीचे भाव .तिच्या हातच्या स्वयंपाकाला अम्रुताची चव आहे. जेवणात मला थोडे जरी तिखट लागले तरी तिचा जीव कासावीस होतो. दुधपोळी,गुळपोळी क्षणात पुढे हजर होई.
लहानपणाचा म्हणजे मी दहा वर्षाची असेल तेव्हाचा एक प्रसंग आजही लख्ख आठवतो.
हिवाळ्यात कडक थंडी असे. रात्री मुलांच्या झोपण्याची सर्व व्यवस्था करुन दिल्यावर भल्या मोठ्या भांड्याचा ढिग ती घासायला घेई.आम्ही सख्या चुलत एकूण सहा बहिणी असतांना पोरींना भांडी घासता धुता थंड पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून ती मदतीला घेत नसे.पण ती एकटी भांडी घासणार म्हणून मी हट्टाने मदतीला जायची. तेव्हा ती म्हणायची “अगं,मुलींना सासरी काम करायचीच आहे. आता आराम करा.”
पण मी काही ऐकायची नाही ,भांडी धुणार म्हणजे धुणार. थंड पाण्याने माझे हात काकडू नये म्हणून गरम पाणी ती करून देई आणि मग मी भांडी धुवत असे. त्यावेळी ती कौतुकाने म्हणे, “फक्त माझ्या माईला माझी कीव आली.”मला घरात सर्व माई म्हणतात.माझ्या चेह-यावर तिला मदत केल्याचे समाधान पसरे.पण गरम पाणी करुन तिचे काम मी वाढवायचे हे आता लक्षात येते. सख्याबरोबर खेळणे,हुंदडणे आणि इतर वेळात वाचन करणे यामुळे मी घरकामात तशी कमीच मदत करत असे.एवढे मात्र खरे तिने कधी काही काम सांगितले आणि मी केले नाही असे आजपर्यंत कधी झाले नाही. दुकानातून काही आणायचे असेल तर इतर भावंडे तिच्या मिणतवारीला ऐकत नसे मी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच तिचे काम करत असे.माहेरचे माडीचे मोठे घर आहे.मोठ्या बैठकीला झाडू मारणे आणि आवरणे मोठे काम. ते काम मी अगदी छान करत असे. त्याचेही ती आजही विषय निघाल्यावर खूप कौतुक करते.आपल्या छोट्या कामाचे भरभरून कौतुक करणारी,आपल्या चुका पोटात घालणारी आईच असते. आईला सोडून मी सुट्टीत कितीही मोठे अमीश मिळाले तरी मामाच्या गावाला जायचे नाही.आईच्या आसपासच्या वावराने मला कायमच सुरक्षित वाटायचे. शाळेतून आल्यावर आई दिसली की पोट भरत असे.मग खेळायला मोकळे वाटे.संध्याकाळी ती देवाला दिवा लावायची तेव्हा निरांजनाच्या प्रकाशात ती देव्हाऱ्यातल्या लक्ष्मीपेक्षा मला सुंदर, मंगल भासे.सात्त्विकता, सुंदरता ,मंजूळ बोलणे तिच्यात ओतप्रोत भरलेले आहे. तिने मुलांना रागवल्याचा चढा आवाज आजपर्यंत ऐकवात नाही. आमच्या मुलांना आम्ही रागवतो तेव्हा ती सांगते ,”प्रेमाने बोलले म्हणजे मुलं ऐकतात .”न बोलताही कितीतरी गोष्टी तिने क्रुतीतून शिकवल्या. आताही खरं तर,जेव्हा तिची सेवा करायची मी परंतु मलाच कुठल्याही प्रसंगी गरज लागली तर ती तत्पर असते.
याबदल्यात तिला काहीही नको असते. तिला हवे असते आपल्या लेकराचे सख .मुलं सुखी आहे तर ती सुखी आहे.हे आज मीही आई आहे म्हणून कळतेय.जीवनात आई आजपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाने हात पसरुन मला सहाय्य करायला, आधार द्यायला, प्रेमाची उबदार सावली द्यायला कायम तयार असते.त्यामुळे आजही मला सुरक्षित, संपन्न वाटते.ह्या सावलीचा अखंड सुखानुभव घेत जीवन जगण्यातच सा-या विश्वाचे मूळ आहे हे नक्की!
–
– सौ.सुरेखा अशोक बो-हाडे,
नासिक,मोबा.9158774244