बदलत्या गावाचा वेध घेणारी गझल : शंकर घोरसे, नागपूर
गाव
गावात गाव माझे आता मला दिसेना
माझेच गाव आहे विश्वास हा बसेना
आपापल्या जगी हे सारेच कैद झाले
कोणी कुशल कुणाचे कोणासही पुसेना
हाकीत लोक होते जेथून गावगाडा
पारावरी सुन्या त्या कोणी कसे जमेना
जातीत वाटलेला नव्हता समाज तेंव्हा
जातीनिहाय आता झाल्यात येथ सेना
शोधावयास चारा पिल्ले उडून गेली
घरटे उदास झाले त्याला कुणी बघेना
कोणाकडेच कोणी का येत जात नाही ?
नात्यातला जिव्हाळा गेला कुठे कळेना
सारेच पोक्त झाले नाही उनाड कोणी
कोणी कसे हसेना? कोणी कसे रुसेना ?
कोणीच ओळखीचे येथे मला दिसेना ?
कोणास हाक मारू काही मला सुचेना ?
@ प्रा. जयसिंग गाडेकर,आळे
ता- जुन्नर, जि- पुणे
मा. प्रा. जयसिंग गाडेकर हे साहित्याचे गाढे अभ्यासक असून उत्तम समीक्षक आहेत. त्यांच्या गझलेवर माझ्या सारख्या नवोदिताने काही लिहिणे म्हणजे काजव्याने सुर्याला प्रकाश देण्याचाच प्रकार ठरेल म्हणून मला त्यांची समजलेली कवीता व त्याचे हे रसग्रहण माझ्या अल्पशा आकलन शक्तीनुसार आपल्या सर्वांच्या पुढ्यात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
“गाव आता गावात राहिलं नाही. धड खेडंही म्हणता येत नाही किंवा त्याला शहाराचं लेबलही लावता येत नाही” या माझ्या “बा स्वातंत्र्या !” या कवीता संग्रहातील “विकास आणि प्रगती” या कवीतेतील ओळीप्रमाणेच ..अश्याच काहीश्या द्विधा परिस्थितीत हे गाव येऊन ठेपलं आहे. हे माझं स्वतःचं बालपणी मी बघितलेलं गाव आहे किंवा नाही यावर आता विश्वासच बसत नाही एवढं गाव आता बदलेलं आहे. तथाकथित विकासाच्या शर्यतीत त्यानेही आता कात टाकली आहे.
बदलत्या काळानुसार भौतिक सुखात सारेच रममाण होऊन आपापल्या वेगळ्याच दुनियेत प्रत्येकाने स्वतःला कैद करुन घेतले आहे. ते त्यांच्या भावविश्वात तल्लीन आसतांना नातीगोती पार विसरुन गेलेत परस्परांशी असलेला जिव्हाळा आटवून स्वार्थाची तेव्हढी बासुंदी चाखतांना कुणाला कुणाचेही कुशल मंगल जाणून घ्याला अजिबात वेळही शिल्लक नाहित आणि जाणून घ्यायची इच्छाशक्ती तर मुळीच उरलेली दिसत नाही.
पुर्वी ज्या पारावर गप्पागोष्टीचे फड रंगायचे व जेथून गावाचा पुरा गावगाडा चालत असे तो गावातील पार आता कालबाह्य होऊन सुना पडलेला दिसतोय .आत्या त्या पाराकडे कुणी ढुंकूनही पाहत नाहीत .
आधी गावात कमालीचा एकोपा असायचा, जातीपातीचा तेव्हा लवलेश सुध्दा कुणाच्याही मनाला शिवत नसे. परंतू कालांतराने आता मात्र आम्ही स्वतःला तथाकथित साक्षरतेचं लेबल लावून गावावातून जाती-पातीच्या तेवढ्या संघटना उभ्या केल्या आहेत.आणि गावातील तत्कालीन एकोपा मोडीत काढून त्याला मात्र आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे भावपुर्ण श्रध्दांजली वाहिलेली आहे.
गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या शोधात येथल्या नवीन पिढीने मोठ्या शहराकडे धाव घेऊन देशविदेशात जाऊन स्थिरावले आहेत. आणि आपल्याच गावातील आपल्या वडिलोपार्जीत राहत्या घराशी नाळ तोडली आहे. त्याकडे बघायला सुध्दा कुणाकडेच आता वेळ नसल्याने ते घय मात्र उदास झाले आहे,
गावातील जुनी संस्कृती लोप पावलेली असून सगळीकडे घरोदारी शहरी संस्कृतीने अतिक्रमण करीत असतांना दारबंद संस्कृती रुजत असल्यामुळे हल्ली सहसा कुणीच कुणाकडे जात नाहीत. सगळ्यांनी जणू एकलकोंडेपणाच जोपासलेला दिसतोय नात्यातला जिव्हाळा सुध्दा या तथाकथित विकासाच्या दृतगती महामार्गात केव्हा गाडप झाला काही कळलेच नाही. आमच्या अतिरेकी दैनंदिन वागणूकीमुळेच दिवसागणिक वाढत चाललेल्या वैश्विक तापमानात आमच्या नात्यातील ओलावा सुध्दा कृत्रिम बाष्पीभवनाने उडून गेला की काय हे कळायला मार्ग नाही ,
इथे आता सारेच पोक्त झाले आहेत .उनाड म्हणून कुणीच शिल्लक राहिलेलं दिसून येत नाही.
या धकाधकिच्या तथा स्पर्धेच्या युगात शर्यत जिंकण्याच्या नादात शर्यतीतल्या घोड्यांप्रमाणे धावतांना आता आमच्या चेहऱ्यावर कधी हसू येतच नाही किंवा रुसाण्याचा आमचा गुणधर्म सुध्दा आम्ही पार विसरुन गेलो आहोत.
मी माझ्याच वेगळ्याच नादात वर्तमानातील या कार्पोरेट दुनीयेत अगदी व्यवहारिक जीवन जगत आसतांना येथे मला आता कुणीच माझ्या ओळखीचे दिसून येत नाही. स्वार्थी जीवन जगतांना मी कुणाशी फारसे संबंध ठेवालेच नाहीत म्हणून अगदी माझ्या अडीअडचीच्या वेळेस तरी किमान कुणाला हक्काने हाक मारु मला काहिच कळत नाही.
प्रा.जयसिंग गाडेकर सर यांची वरवर साधी दिसणारी गाव हि गझल खूप आशयधन आहे. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी हि गझाल आहे. या गझलेतील प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कवीताच आहे. त्यांच्या पुढील साहित्य लिखणास माझ्या भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा आहेतच.
– शंकर घोरसे, खापरखेडा,जि. नागपूर,+91 94236 02435
(मृदगंध व्हाटसअप समुहातर्फे आयोजित एक दिवस , एक कवी, एक कवीता व त्यावर चर्चा ,भाष्य, रसग्रहण,परीक्षण इत्यादी उपक्रमातील अतिथी कवी प्रा. जयसिंग गाडेकर , आळे. ता.जुन्नर ,जिल्हा- पुणे यांच्या गाव या गझलेचे मी केलेले रसग्रहण.. )
प्रा. जयसिंग गाडेकर परिचय
शिक्षण- M.Sc. (Organic Chemistry) B.Ed.SET.
# *व्यवसाय- Head,* *Department of Chemistry,*
*Hon. Balasaheb Jadhav* *Arts,Commerce and* *Science College, Ale*
#. *सासवड, पिंपरी चिंचवड, डोंबिवली, बडोदे, यवतमाळ आणि उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कवीकट्टा या काव्यमंचावर सलग सहा वर्षे कविता सादर केली आहे.*
# *प्रकाशित साहित्य-*
*भोपाळ(म.प्र.) विश्वकोश शृंखला शब्दकोश या १५ भाग असलेल्या विश्वकोशाचे मुख्य संपादक म्हणुन काम केले.*
*(ई.स.२००८)*
*रसायनशास्त्र शब्दकोश या मराठी भाषेतील पहिला इंग्रजी मराठी शब्दकोशाचे लेखन व प्रकाशन. .(ई.स.२००८)*
# *”आयुष्य चालताना” हा कवितासंग्रह प्रकाशित*
*(इ.स.२०१३)*