2020 मे

डाकीण : हिंदू व बौद्ध – डॉ. अशोक राणा, यवतमाळ

सा हि त्या क्ष र 

डाकीण : हिंदू व बौद्ध
           ________________________

           डॉ.अशोक राणा,यवतमाळ.

मोठाले डोळे व त्यांची बाहेर आलेली बुबुळं, विस्फारलेले केस व फेंदारलेलं नाक, दाताचे टोकदार सुळे व अणकुचीदार वाढलेली लांब नखं, अशी काळाकुट्ट चेहरा असलेली डाकीण झाडावर राहाते व झाडाखाली गेलेल्या लहान मुलांना खाऊन टाकते, अशी खेड्यापाड्यांतून राहाणाऱ्या लोकांमध्ये समजूत आहे. जनमानसात भय, अद्भुत व कुतूहलामुळे ठाण मांडून बसलेली अशी डाकीण तिरस्काराचा विषय झालेली आहे. ती जादूटोणा करुन लोकांना मारते, असाही एक समज आहे. आईचं म्हणणं न ऐकणाऱ्या मुलांना घाबरवण्याकरिताही काही आया डाकिणीची भिती दाखवतात. त्यामुळे वर्षानुवर्षे एका अनामिक भयगंडाचं वलय डाकीण या शब्दाभोवती निर्माण झालंय.

डाकीणचं हिंदी भाषेतील रूप डायन असं आहे. हिंदी भाषिक राज्यांमध्ये डायन ठरवून वयस्क स्त्रियांना मारून टाकल्याच्या कितीतरी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे डायन या शब्दाने एका सामाजिक समस्येचं रूप धारण केलेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये एकट्या झारखंड राज्यात चारशेपेक्षा अधिक महिलांना डायन ठरवून मारून टाकण्यात आलं आहे. तेथे ‘ डायन उत्पीडन विरोधी कायदा ’ तयार झाल्यावरही इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या हत्या झाल्यात. तसंच हजारो महिलांना याच कारणासाठी अमानुष यातनांच्या बळी ठरून जित्याजागत्या प्रेतासारखं जीवन कंठावं लागत आहे.

प्रशांत शरण यांनी ‘सहारा समय’ (१७ डिसेंबर २००५) या दैनिकात लिहिलेल्या लेखामध्ये पन्नास वर्षांच्या छुटनी महतो या महिलेची कर्मकहाणी सांगितली आहे. शेजारच्या बालकाचा निमोनियाने मृत्यू झाला होता. पण गावातील काही लोकांनी, शेजारच्या महिलेने जादूटोणा केल्यामुळे त्याला मरण आलं, असा आरोप करून छूटनीला नांगराला बांधून जोतलं. नंतर तिला जीवानिशी मारण्यात आलं.

गावातील मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार, अनेक निरपराध महिलांना डायन ठरवण्यात येते व नंतर तिची जाहीरपणे विटंबना करण्यात येते. गावातील प्रस्थापित लोक दुर्बल, असहाय किंवा विधवा महिलांना डायन ठरवून प्रताडित करतात. तिला विवस्त्र करून गावभर फिरवणं, मनुष्याची विष्ठा खाऊ घालणं व सर्वांनी मिळून तिच्यावर पाशवी अत्याचार करणं, या बाबी आता सामान्य झालेल्या आहेत. अशा डायन ठरवून छळलेल्या महिलांमधील ९५ टक्के महिलांचे हुंडा, जमिनीचे तंटे तसेच लैंगिक शोषणाच्या हेतूने हाल केले जातात. या कारस्थानात बहुतांश ठिकाणी पीडित स्त्रीच्या घरातील लोक तसंच नातेवाईकही सहभागी असतात.

या वस्तुस्थितीची जाण असणारे ‘फलैक’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक अजयकुमार यांच्या मते,  ‘ याप्रकारच्या अधिकांश घटनांची माहिती पोलिसांना नसते. तसंच काहींना कौटुंबिक कलह ठरवून त्यांची नोंदही घेतली जात नाही. लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन मांत्रिक लोक आपल्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी कुणाही असहाय महिलेला डायन ठरवून टाकतात. समाजातील तथाकथित प्रतिष्ठित लोक महिलाचं लैंगिक शोषण करण्याकरिता त्यांना तसं करायला लावतात.

या संस्थेची एक सदस्या पूनम टोप्पो ही डायन ठरवली गेलेली अशी अत्याचारपिडित परिवारातील आहे. तिने डायन या कुप्रथेच्या निर्मूलनाचा वसा घेतलेला आहे. ती म्हणते, ‘ डायन घोषित स्त्रीला ज्या व्यथा-वेदनेला सामोरं जावं लागतं, त्याची जाण केवळ त्या स्त्रीलाच होते. डायन घोषित महिलेच्या परिवाराचं भवितव्य धोक्यात असतं. संपत्ती हडपण्याकरिता एखाद्या महिलेला डायन बनवण्यात येतं.’

खातूना या ७० वर्षाच्या महिलेच्या मते, ती एक जिवंत कबर आहे. २५ डिसेंबर १९९६ रोजी कपासी गावातील तिच्या घरात आसपासचे लोक घुसले आणि तिला व तिच्या मुलीला जोराजोराने मारू लागले.   ‘ तुम्ही डायन आहात, तुम्हाला कापून टाकू ‘ अशा धमक्याही त्यांनी दिल्यात. यामागे कारण होतं ते समोरील घरातील एक महिन्याच्या बालिकेला ताप आला याचं. त्याचा दोष खातूनाच्या माथी मारून तिला गाव सोडण्यास भाग पाडण्यात आलं.
याप्रमाणे पूर्वी सिंहभूमच्या गांइताडीह गावच्या ४० वर्षीय मानी कुई परिवाराचीही वाताहत झाली. तिला डायन ठरवून गावकऱ्यांनी तिचा पती व मुलगा या दोघांचीही हत्या केली. गावातील सूरज बेसरा हा दारुड्या टी. बी. होऊन मेला. पण त्याच्या मृत्यूमागे मानी कुई आहे, सा आरोप ठेवून तिला विष्ठा चारण्यात आली आणि मारपीट करून जखमी करण्यात आलं. झारखंडमधील ७५ टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. अशिक्षित व अंधश्रद्धाळू असल्यामुळे त्यांची स्थिती दयनीय झालेली आहे. त्याचा फायदा घेऊन स्त्रियांचं शोषण करण्याकरिता तिला डायन ठरवणं काही समाजकंटकांना सोयीचं झालं आहे. अशा या डायन संकल्पनेचंच मराठी रूप ‘डाकीण’ हे आहे. महाराष्ट्रात सातत्याने समाजप्रबोधन होत आलेलं आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड येथील सामाजिक पर्यावरणाप्रमाणे येथील भूमी कमी दूषित झाली आहे.

राजस्थानमधील अत्याचारपीडित तथाकथित डायन महिलांनी आपल्या संरक्षणाकरिता संघटना बांधली आहे. या संघटनेद्वारे प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन संघर्ष करण्यासाठी त्यांनी आपली शक्ती एकवटली आहे. पण या डायन संघटनेतील महिला तंत्र-मंत्रांच्या आधीन जाऊन पुरुषी वर्चस्वाला बळी पडत आहेत. ‘नॅशनल जिओग्राफिक’ या वैज्ञानिक तथ्यांचा शोध घेणाऱ्या वाहिनीने त्यांच्यामधील लैंगिक स्वैराचाराचं तसंच किळसवाण्या तांत्रिक विधींचं चित्रण दर्शकांना घडवलं होतं. यावरून आजही प्राचीन काळातील तंत्रमार्गाचे अवशेष शिल्लक आहेत, हे दिसून येते. त्यामागील तात्त्विक अधिष्ठान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच डायन या शब्दाचं तसंच संकल्पनेचं मूळ पाहू या.

डाकीण हीच यक्षिणी

डॉ.रामबली पाण्डेय यांनी आपल्या हिंदू धर्मकोशात पृ.२८९ वर डाकिणीविषयी माहिती दिलेली आहे. त्यानुसार त्या कालीमातेच्या गणातील देव्या होत. ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृति खंडामध्ये ‘ सार्द्धश्च डाकिनीनाश्च विकटानां त्रिकोटिभि: ‘ या शब्दामध्ये डाकिणीचं वर्णन केलेलं आहे. ‘ड’ या शब्दापासून भयकारक असा डाकिणी शब्द तयार झालेला आहे. तिची गती वाकडी असते, असं म्हणतात. भागवतपुराणामध्ये डाकिणीविषयी म्हटलंय –

डाकिन्यो यातुधान्यश्च कूष्माण्डा ये ऽ र्भकग्रहा: |
भूतप्रेतपिशाचाश्च यक्षरक्षोविनायका: ||
कोटरा रेवती ज्येष्ठा पूतनामातृकादय: |
उन्मादा ये ह्यपस्मारा देहप्राणेन्द्रियद्रुय: ||
स्वप्नदृष्टा महोत्पाता वृद्धबालगृहाश्च ये |
सर्व नश्यन्तु ते विष्णोर्नामग्रहणभीरव: || (भाग १०.६.२७.२९)

अर्थ : डाकिणी, राक्षसी, कूष्मांड इत्यादी जे मुलांना छळणारे, तसंच भूत, प्रेत, पिशाच, यक्ष राक्षस, विनायक, त्याचप्रमाणे कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना इत्यादी मातृका, प्राण-इंद्रिय-देह यांच्याविषयी भ्रम पडणारे उन्माद, अपस्मार, फेफरे इत्यादी आणि स्वप्नात दिसून मोठी संकटं उत्पन्न करणारे नि मुलांना झपाटणारे जे भयंकर ग्रह आहेत, ते विष्णूच्या नामश्रवणाला घाबरणारे सर्वजण नष्ट होवोत.

विष्णूच्या नामस्मरणाला घाबरणाऱ्या दुष्ट शक्तींमध्ये सर्वप्रथम डाकिणीचा सामावेश भागवताने केला. तसाच पूतनेचाही केला आहे. त्याविषयी आश्चर्य व्यक्त करून डॉ.रा.चिं.ढेरे (लोकसंस्कृतीची क्षितिजे, पृ.१४) म्हणतात – ‘ कृष्णाने मारलेली स्त्री पूतना आहे, हे गोपींना माहित असताना त्यांनी कृष्णभय निवारण्यासाठी म्हटलेल्या रक्षामंत्रात पूतनेचा समावेश असावा, ही बाब महत्त्वाची आहे. ‘ डाकिणीप्रमाणेच पूतनासुद्धा लहान मुलांना होणाऱ्या पीडांमागील कारण ठरवून प्राचीन ग्रंथांनी तिचा निषेध केलेला आहे. दा. ध.कोसंबी यांच्या ‘पुराणकथा आणि वास्तवता’ या ग्रंथाच्या आधारे (पृ.८५) डॉ.ढेरे म्हणतात,’ महाभारताच्या एका टीकाकाराने याच संदर्भात मथुरा प्रदेशाला पौतन नाव असल्याचं म्हटलं आहे. यावरून असं दिसतं की, पूतना ही मथुरा प्रदेशाची प्रभावी स्थानीय देवता होता.’

पूतना ज्याप्रमाणे एका प्रदेशाची स्थानीय देवता होती, तशीच मुळात डाकीणसुद्धा असावी. कारण, पूततेसोबतच प्रारंभी डाकिणीचा उल्लेख झालेला आहे. मुळातील या मातृदेवता तिरस्काराच्या विषय होण्यामागे त्यांच्या अनुयायांचे विरोधक प्रबळ होणं, हे प्रमुख कारण असावं, असं वाटतं. कवी कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ या ऐतिहासिक काव्यग्रंथाचे संपादक रघुनाथ सिंह यांनी परिशिष्ट ‘ठ’ – यक्षविषयक टिपणात एका महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश टाकला आहे. येथील पृ.९४ वर ते म्हणतात,

‘वाराणसी क्षेत्र में नगर से दस मील दूर जक्खिनी ग्राम है | मैने उसपर पहले ध्यान नहीं दिया | कुछ चलनेपर एक मन्दिर मिला | उसमें दक्खिनी देवी स्थापित थी | जक्खिनी शब्द यक्षिणी का अपभ्रंश है | कालान्तर में यक्ष लोगों के मूल स्वरूप को लोक भूलकर उन्हें गाथाकालीन देवता मानने लगे |’
या अवतरणावरून ‘डाकीण’ या शब्दावरून दक्षिण हा शब्द बनला असून जक्खिनी किंवा यक्षिणीचं ते एक रूप आहे, हे स्पष्ट होतं. यावरून यक्षिणीलाच पूर्वी तसंच आताही डाकीण म्हटलं जात आहे, असा निष्कर्ष निघतो. म्हणून यक्षिणीचं मूळ शोधणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने भाषावैज्ञानिक पुरावे, व्युत्पत्तिशास्त्र, पुरातात्त्विक आधार तसंच ग्रांथिक संदर्भ शोधू या.

यक्षिणीची व्युत्पत्ती

डॉ.कृ.पां.कुलकर्णी यांच्या ‘मराठी व्युत्पत्तिकोश’मध्ये (पृ. ६५२) यक्षांना ‘देवयोनिविशेष’ या शब्दाने संबोधून त्याचा पूजणे हा अर्थ सांगितला आहे. यक्ष हा शब्द वेदांमध्ये वापरलेला आढळतो. तेथे त्याचा अर्थ गूढ शक्ती, रहस्य वगैरे असा आहे. दहाव्या मंडलात ‘अचाट, अद्भुत सामर्थ्यवान’ असा अर्थ आहे. इतर ठिकाणी प्रज्ञानघन, विज्ञानधन ह्या अर्थाने वापरला आहे. पाली वाङ्मयातील ‘यक्ख’ ह्या शब्दाच्या मुळाशी हेच प्राचीन अर्थ आहेत, असं या ठिकाणी म्हटलं आहे. याच व्युत्पत्ती कोशमध्ये (पृ. ३२६) जक्ख हा संस्कृत यक्षाचा समानार्थी शब्द असल्याचं सुचवून संस्कृतमधील जीर्ण शब्दाशी त्याचा काही संबंध नाही,असे. मूळ अर्थ सुंदर देवयोनी असा असून सध्या मराठीत म्हातारा, विद्रूप, जर्जर, खप्पड असा झाला आहे. अर्थातच, या शब्दाचं मूळ हे द्रविडी भाषांमध्ये शोधणं आवश्यक आहे. जख्खीण या शब्दाचा – यक्षस्त्री, पिशाचिका A female goblin असा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. दक्षिण या शब्दाची व्युत्पत्ती देताना (पृ.४३६) हिंदीमधील दखिन तसंच सिंधी भाषेतील डखिणु ही रूपं डाखीणशी जवळीक साधणारी आहेत, असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे. खानदेशात वडदखीण नावाची एक ग्रामदेवता आहे. वडाखालील किंवा वडावरील यक्षीण असा त्याचा अर्थ होतो. डॉ.ढेरे यांनी ‘सकाम गूढसाधनेच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली वटयक्षिणी ही वटवृक्ष निवासिनीच आहे,’ (लोकसंस्कृतीची क्षितिजे, पृ. ४) असं म्हटलं आहे.

यक्ष कोण होते ?

यक्ष हे आर्यपूर्व भारतातील एका मूलनिवासी जमातीचं नाव आहे. त्यांचा उल्लेख नेहमी गंधर्व व किन्नरांसोबत तसेच ‘यक्षरक्षांसि’ असा राक्षसांसोबत येतो. त्यांच्या उत्पत्तीविषयीच्या ज्या कथा प्राचीन साहित्यात येतात, त्यावरून वैदिकांचा त्यांच्याकडे पाहाण्याचा दूषित दृष्टिकोन दिसून येतो. उदा.१) ब्रह्मदेवाच्या शिंकेतून यक्षांची उत्पत्ती झाली. २) कश्यप व विश्‍वा यांच्यापासून झाली. ३) यक्ष हे प्रचेत्याचे पुत्र होत. ४) प्रजापतीने जल आणि प्राणी निर्माण केले. जन्मताच ते तहान-भूक म्हणून ओरडू लागल. ब्रह्मदेवाला वाटलं, की हे आता आपण निर्मिलेल्या प्राणीसृष्टीला खातील. म्हणून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला रक्षध्वम् = रक्षण करा. पण त्यांच्यापैकी काही जणांनी रक्ष् या धातूचा रोखणे, अवरोध करणे, बलात्काराने बळकावणे असा धात्वर्थ घेऊन, ठीक आहे असं म्हटलं. ते झाले राक्षस. काही लोक म्हणाले, यक्षाम: = आम्ही खाऊन टाकू. ते झाले यक्ष (वा.रा.उ. ४).
पं.महादेवशास्त्री जोशी (भारतीय संस्कृतीकोश, खंड ७, पृ. ५९२) यक्षाविषयी माहिती देऊन म्हणतात की, ‘अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ असे मानू लागले आहेत, की यक्ष शब्द हा मूळ संस्कृत नसून ते कोणत्या तरी निषाद भाषेतल्या शब्दाचं संस्कृतीकरण असावे. यक्षांना निरनिराळ्या लोकभाषेत यख्ख, जख्ख, जाख, यक, यस्क असं म्हणतात.’

यक्ष कसे दिसत?

यक्षांच्या स्वरूपासंबंधीची माहिती महाभारताच्या वनपर्वात आहे, ती अशी –

विरूपाक्षं महाकायं यक्षं तालसमुच्छ्रयम् |
ज्वलनार्कप्रतीकाशमधृष्यं पर्वतोपमस् ||

– अर्थात,बटबटीत डोळ्यांचा,आडमाप देहाचा,ताडमाड उंचीचा,अग्नी किंवा सूर्य यांच्यासारखा, अजिंक्य आणि पर्वतासारखा (धर्म राजाला भेटलेला यक्ष) होता.

ब्रह्मवैवर्तपुराणात आलेलं यक्षाचं वर्णन असं –
आजग्मुर्यक्षनिकरा: कुबेरवरकिङ्करा: |
शैलजप्रस्तराकारा अञ्ञनाकारमूर्तय: ||
विवृताकारवदना: पिङ्गलाक्षा महोदरा: |
स्फटिकारक्तवेषाश्च दीर्घस्कन्धाश्च केचन: ||

– अर्थात, कुबेराचे श्रेष्ठ असे सेवक असलेले, पर्वतावरील पाषाणांच्या आकारांचे, काजळासारखे काळेकुट्ट शरीर असलेले, तोंड रुंद उघडलेले, पिंगट डोळ्यांचे, स्थूल व मोठ्या पोटाचे, स्फटिकासारखा आरक्त म्हणजे लाल वेष धारण केलेले, मोठ्या बाहूंचे असे यक्षसमुदाय त्या ठिकाणी प्राप्त झाले.
या वर्णनात नानाविध प्रकारच्या यक्षांचा उल्लेख आढळतो. ते कुबेराचे आवडते होते ही माहिती महत्त्वाची आहे. कुबेर हा यक्षांचा राजा मानला जातो. तो रावणाचा भाऊ होता. म्हणजे रावणाशी यक्षांचं नातं जुळलं होतं, हे यावरून स्पष्ट होतं.

यक्षांचे राहाणीमान

राक्षसांप्रमाणेच यक्षही मांसाहारी होते. ते स्मशानात किंवा जलाशयाजवळ राहात असत. अशाच एका जलाशयाजवळ युधिष्ठिराला भेटलेल्या यक्षाने कूटप्रश्न विचारले होते. यावरून यक्षांचं चातुर्य व बुद्धिमत्ता यांचा परिचय आपणास होतो. पण त्यांच्याविषयी ज्या समजुती प्रचलित होत्या, त्यानुसार ते आपल्या निवासस्थळाजवळ येणाऱ्या लोकांना मारीत असत. ते वाटमारीही करीत असत. व्यापारी तांडे जंगलातून जाऊ लागले की, त्या तांड्यावर ते हल्ला करुन माणसांना व जनावरांना खाऊन टाकत, असा समज प्रचलित होता. बंदिस्त घरातूनही यक्ष माणसांना उचलून घेऊन जातात. ते विलासी, कामुक, चंचल व दुष्ट असतात. ते गुप्त संपत्तीचं रक्षण करतात तसंच ते नेमून दिल्यास नगर रक्षणाचंही काम करतात, अशी यक्षांविषयी परस्परविरोधी वर्णनं प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. महाभारताच्या वनपर्वामध्ये नल-दमयंतीची कथा आहे. स्वयंवरात जमलेल्या स्त्रिया नलराजाला पाहून, ‘ हा कोणी देव, गंधर्व किंवा यक्ष असावा,’ असं म्हणतात. (म.भा.वन.५२.१६). यावरून यक्ष हे पुरुषी सौंदर्याचे प्रतीक असावेत. सुंदर पुरुषाला यक्ष किंवा गंधर्व म्हणण्याची परंपरा प्राचीन काळात होती.

यक्षविषयक लोकसमजुती

यक्ष हे शक्तिमान असतात तसंच त्यांच्यामधील अलौकिक शक्तीने पाऊस पडतो, आपणास मिळणारं अन्न व फळं तसंच वनस्पती त्यांच्यामुळेच निर्माण होतात; गावाचं तसंच गायीचं रक्षण त्यांच्यामुळेच होतं. रोग, भूतबाधा व वांझपणा घालवण्याची शक्ती त्यांच्यात असते. देवस्थानाचे ते द्वाररक्षक असतात. पाणवठ्याजवळ येणाऱ्या तहानलेल्या वाटसरूला ते कूटप्रश्न विचारतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर न मिळाल्यास त्याला ते मारून टाकतात. ते विनायकाप्रमाणे विघ्नकर्ते असतात. तसंच विघ्नहर्तेही असतात. यक्ष हे उत्तम कलावंत व चित्रकार असतात. भव्य मंदिर निर्माण करण्यातही त्यांना कौशल्य प्राप्त आहे. या लोकसमजुतीवरून यक्षसंस्कृती किती समृद्ध होती याचा अंदाज आपणास येतो.

वीरब्रह्म

यक्षांचा राजा कुबेर असून त्यानंतर मणिभद्र या यक्षाचं स्थान होतं. जैन व्यापारी मणिभद्र यक्षाला आपला संरक्षक मानतात. जैनमंदिरात त्याची पूजा केली जाते. गणपती, हनुमान, नरसिंह या देवताही यक्षसंस्कृतीतूनच आल्यात. यावरून यक्षोपासना अजूनही सुरूच आहे, हे दिसून येतं. यक्षांची धनद, विशालक, हरिकेश, शेवल, सुपरी, वरूण, अर्यमा, भंडीर, गर्दभ, पूर्णभद्र, समुद्रभद्र, सर्वतोभद्र, सुमन इ. नावं प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात.
बौद्धवाङ्मयातील महामायुरी हा तंत्रग्रंथ इ.स.च्या तिसऱ्या शतकात तयार झाला. त्यात यक्षांची मोठी यादी दिलेली आहे. कालांतराने ती बावन्न संख्येपर्यंत निश्चित झाली. त्यांनाच बावन्नवीर असं म्हणतात. वीर व ब्रह्म या संकल्पना यक्षसंस्कृतीमधून उदयाला आल्यात. आजही वीरब्रह्म या नावाच्या एका देवतेची पूजा भारतभर होते. प्राचीन वीरपूजेचा तो एक अवशेष आहे. महाराष्ट्रातील वीर मारुती व दास मारुती यांपैकी वीर मारुती हा सदैव युद्धासाठी सज्ज असतो व त्याचं मुख दक्षिणेकडे असतं. वीरयक्षाचं ते रूप आहे.

वैदिकांनी ब्रह्मसंकल्पना स्वीकारली, पण यक्षपूजा मात्र नाकारली. ऋग्वेदातील (४.३.१३) एका ऋचेनुसार ‘ जर कोणी मार्ग चुकलेला शेजारी यक्षसदनात जात असेल तर, हे अग्ने, तू लपत छपत त्याच्या घरी जाऊ नकोस, ‘ असं सांगून वैदिकांनी यक्षांचा निषेध केलेला आहे. पं.महादेवशास्त्री जोशी म्हणतात – ‘ इथे शेजारी शब्दाने यक्षपूजक आर्येतर लोक समजायचे. अग्निपूजकांनी त्यांच्याशी संपर्क करू नये, असा याचा भावार्थ आहे. वैदिकांच्या मते, यक्षासारख्या अद्भूत देवांवर विश्‍वास ठेवणारे लोक हे अविकसित बुद्धीचे आहेत (ऋ. ७.६१.५).

केनोपनिषदामध्ये ब्रह्माला यक्ष म्हटलेलं आहे. अग्नी, वायू, इंद्र इ. देवतांपेक्षा त्याचं सामर्थ्य मोठं आहे, हे मत ठसवणारी एक कथा रुपकात्मकरीतीने (खंड ३) तेथे आलेली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात (पृ.१६०) हा उल्लेख अथर्ववेदावरून (१०/२/३२/; १०/७/३८; १०/८/४३) घेतला आहे, हे तुलनात्मक अभ्यासाने निश्चित होते,’ असे म्हटलं आहे.

बौद्धवाङ्मयातील ‘हारिती’

‘गौतमबुद्धाच्या शाक्यकुलाचा कुलदेव शाक्यवर्धन नावाचा एक यक्षच होता, स्वत: बुद्धाला यक्ष म्हटलं जाई,’ असे म.श्री.माटे मराठी विश्‍वकोशातील (खंड १४, पृ. ४२) नोंदीत म्हणतात. ‘ आलवक व गर्दभ या यक्षांना आणि हारिती यक्षीला बुद्धाने नरभक्षणापासून परावृत्त केलं, महायान संप्रदायात यक्षपूजा चालत होती इ. निर्देशावरून बौद्धयक्षांचं स्थान स्पष्ट होतं.’
यक्षांचे लोहेय, भारतेय, कृशांगेय व विशालेय असे चार मुख्य गण यक्षांमधील लोकांच्या प्रकाराचे सूचक आहेत. यक्षिणींची विद्युन्माला, चंद्रलेखा, सुलोचना, आलीका, बेंदा, मघा, इमिसीका ही नावंही त्यांच्या गुणविशेषांचं दर्शन घडवतात. यक्षिणींविषयी एक समजूत अशी होती की, त्यांच्या शरीरांतून सुगंध बाहेर पडतो व त्याचा वास घेतल्याने पुरुषांची शुद्ध हरपते. यक्षिणी क्रूर असतात व मुलांना पळवून नेऊन खाणे हा त्यांचा आवडता छंद असतो, असा समज आहे. याविषयीची एक कथा महाभारतात आहे. ती मुलांना खाणारी व मारणारी होती. पुराणांमध्ये तिला जरा म्हटलेलं आहे. बौद्धवाङ्मयात ती हारिती यक्षिणी म्हणून येते.

हारितीला कुबेरपत्नी म्हणून सन्मान दिला जात असे. ती प्रारंभी लोकांची मुलं पळवून मारीत असे, अशी कथा आहे. तिच्या या उच्छादामुळे लोक घाबरले व बुद्धाला आपलं गाऱ्हाणं सांगू लागले. बुद्धाने तिला या दुष्कर्मापासून परावृत्त करण्यासाठी एक युक्ती योजली. त्याने हारितीचं एक मूल लपवून ठेवलं. त्यामुळे अस्वस्थ झालेली हारिती आपल्या मुलाला शोधू लागली. तिच्यातील मातृत्वाने तिला कासावीस केलं. अशा अवस्थेत ती बुद्धाकडे आली. तेव्हा बुद्धाने तिला उपदेश केला की, ‘ तुझे मूल दिसेनासे झाल्यावर तुझी जशी अवस्था झाली, तशीच ज्यांची मुले नाहीशी होतात अशा आयांची अवस्था होते. यावरून इतरांचे दु:ख जाणून घे आणि बालकांना मारण्याचे कृत्य करू नकोस.’ बुद्धाच्या या वचनाचा परिणाम होऊन हारितीने लहान बालकांच्या रक्षणाचं कार्य हाती घेतलं.

हारिती म्हणजे हरण करणारी. बौद्ध साहित्यात हारिती ही देवी रोगाच्याद्वारे मुलांचं हरण करीत असे, असा उल्लेख येतो. भारतीय संस्कृतीकोश,खंड १० (पृ.३२७) मध्ये तिच्याविषयी माहिती देऊन महाभारतातील जरा या यक्षिणीने उकिरड्यावर टाकलेल्या टाकलेल्या बाल जरासंधाच्या शरीराचे तुकडे जोडून त्याला जिवंत केल्याची कथा सांगितली आहे. जरासंधाचा पिता बृहद्रथ याने मगधाच्या रहिवाशांनी घराघरांत तिची पूजा करण्याचा आदेश दिला. तिच्या सन्मानार्थ दरवर्षी एक महोत्सव करावा, असंही त्याने सांगितलं. त्यानुसार लोक गृहदेवीच्या रुपात तिची पूजा करू लागले तसेच अनेक पुत्रांनी घेरलेली अशी, असं तिचं चित्र भिंतीवर काढू लागले. महाराष्ट्रात जीवती अमावास्या साजरी करतात, तेव्हा अशीच चित्रं काढतात. यावरून महाभारतातील जरा व बौद्धवाङ्मयातील हारिती हीच आजची जीवती म्हणजे जिवंत ठेवणारी होय, हे स्पष्ट होतं.

हारिती हीच डाकीण

बौद्धकालीन बालरक्षक हारिती या देवतेची उपासना भारतात व भारताबाहेरही प्रचलित होती. मगध हे तिचं मुख्य केंद्र असावं. तेथून ती मध्य आशिया आणि गंधारपासून अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्यापर्यंत मूर्ती व चित्रांच्या रुपात पसरली. युवान श्‍वांग याने आपल्या प्रवासवर्णनात विशेषत: गंधारमध्ये तिच्या पूजेचा प्रचार होता, असं लिहून ठेवलं आहे. सम्राट अशोकाने तिच्या नावाने एक स्तूप बांधला होता, तो पेशावर जिल्ह्यात सापडला आहे. गांधारशैलीतील शिल्पांमध्ये काही ठिकाणी तिचा पती कुबेर हा तिच्यासोबत दाखवलेला आहे. सामान्यत: तिच्या मूर्तिशिल्पात मुलांचा घोळका तिच्याभोवती दाखवतात. त्यातलं एखादं मूल तिच्या कडेवर असतं; तर कधी तिच्या खांद्यावर मुलं बसलेली दाखवतात. काही मुलं तिच्या पायाभोवती खेळताना दिसतात. तिची मुख्य खूण म्हणजे तिची वस्त्रं वाऱ्यावर उडताना दाखवतात. हिंदू धर्मकोशात ‘डाकिणी’ या कालीमातेच्या देव्या असल्याचा संदर्भ आपण पाहिला आहे. देवीच्या रोगाशी जरा व हारितीचा जो संबंध जोडण्यात आला आहे, त्यावरुन हारिती हीच डाकिणी, हे स्पष्ट होतं.

डाकिणी : एक तांत्रिक देवता

हारितीची कथा महायान पंथाच्या वाङ्मयात येते. हा तंत्रमार्गावर आधारित बौद्धसंप्रदाय होता. तंत्रसंप्रदायात डाकिणी या देवतेचा उल्लेख आढळतो. हिंदू व बौद्ध या दोन्ही तंत्रपरंपरांमध्ये ती पूजनीय आहे. श्रीविद्यार्णवतंत्रात तिच्या स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे.

वज्रयान योगिनींच्या वर्गात डाकिणीचा समावेश होतो. तिबेटी भाषेत डाक (ग्डाक Gdak) या शब्दाचा अर्थ प्रज्ञा किंवा ज्ञान असा होतो. भारतीय संस्कृतीकोश (खंड ३ पृ. ७७१) तिच्याविषयी म्हणतो – जिने तांत्रिक योग साधनेच्या द्वारा सहज ज्ञानाची प्राप्ती केली जाते, अशा योगिनीला वज्रयात पंथात डाकिणी म्हणत. पुढे तांत्रिक बीजाक्षरांच्या आधारे लाकिनी, शाकिनी, राकिनी, हाकिनी इ. शब्द बनलेले गेले.

वज्रयानी सिद्धांच्या दोह्यात डाकिणीला अनेकवार देवी म्हणून संबोधलं आहे.

त्यासंबंधी वज्रतंत्रात एक दोहा आहे, तो असा –
खिति जल पवण हुताशन सुण्ण डाइणि देवि |
सुण हु पंचमु तत्तु कहु जो ण जाणइ केवि ||

अर्थ : हे डाकिणी देवी ! पृथ्वी, जल, वायू, अग्नी व शून्य ही पाच तत्त्वं कोणी जाणत नाही ; त्यांचं रहस्य मी सांगतो.

या डाकिणी स्त्रिया वज्रयानी तंत्रसाधनेत महामुद्रांच्या रूपाने वावरत असत. त्यांच्या या गुह्याचारामुळे आणि स्मशानसाधनेमुळे लोकांत त्यांच्याविषयी अपसमज पसरले आणि डाकिणी म्हणजेच चेटकिणी होत, अशी समजूत रूढ झाली.

‘डाकिणी’ या शब्दाचं प्राकृत रूप ‘डाइणि’ व त्याचं हिंदीकरण ‘डायन’ असं झालं. मुळातील मातृदेवता असलेली ‘डाकीण’ म्हणजे तिबेटी भाषेतील प्रज्ञावान स्त्री, ही केवळ अपप्रचारामुळे हीनपदाला पोचली. बिहार व झारखंडमध्ये तिचं विकृत स्वरूप स्त्रियांच्या शोषणाचं प्रतीक बनलं. सत्य असत्यात परिवर्तित होण्यामागे सांप्रदायिक अभिनिवेश व दूषित दृष्टिकोन कसा प्रभावी ठरतो, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
__________________________________________
(‘ दैवतांची गोष्ट’ या आगामी ग्रंथामधून)

( या लेखातील मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. -संपादक )

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2025 Hindi kavita कविता जून लेख/ आलेख हिंदी

जड़ों में खोजता पानी और जीवन का स्पंदन~सुरेन्द्र प्रजापति, बोधगया

मैं इन दिनों एक कोमल, हरित तल, नरम, नाजुक मुलायम पर्ण का सहयात्री हूँ । चौंकिए मत; दरअसल बात कर रहा हूँ, मराठी भाषा के चर्चित कवि, लेखक, संजय बोरुडे की; जो हिंदी भाषा के अच्छे जानकार हैं ।

प्रत्यक्षतः उनका हिंदी में पहला कविता संग्रह ‘पर्णसूक्त’ न्यू वर्ल्ड पब्लिकेशन से प्रकाशित होकर आया है । संग्रह की कविताओं से गुजरते हुए मुझे महसूस हुआ कि एक मराठी भाषी संजय बोरुडे साधिकार हिंदी में भी विलक्षण साहित्य रच सकते हैं ।

सा हि त्या क्ष र 
2025 कविता मराठी मार्च

राजाराम बनासकर यांच्या कविता

संक्षिप्त परिचय_________________________प्रा.राजाराम बनसकर.महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी.जि.हिंगोली.निवृत्त:२०१२,_विविध स्तरावरील ‘ मराठी साहित्य संमेलनांत सहभाग…_आकाशवाणी, औरंगाबाद परभणी केंद्रावरील कार्यक्रमात सहभाग.._प्रथित यश.. दिवाळी अंक,मासिक, नियतकालिक, दैनिकातून कविता प्रसिद्ध…__’रडका कांदा ‘बालकविता’संग्रह, प्रसिद्ध….पत्ता:प्रा.राजाराम बनसकर.‘घरोटा’ जैन गल्ली.कळमनुरी.जि.हिंगोली.४३१७०२,(९४२१३९१२३०) ************************************************************** राजाराम बनासकर यांच्या काही कविता   १) ‘ ऑल वेल ‘ आता … कांहीच चुकत नाही कुणाचेसगळेच ..कसे..’ऑल वेल’..!जायज…ना जायज…ठरवायचं कुणी…?विनाकारण,काढायची..उणी ..दुणी..? […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment