चिंतनशील कवितेचे आकाश’- गीतेश शिंदे
’चिंतनशील कवितेचे आकाश’
१९८२ मध्ये ‘प्राक्तनाचे संदर्भ’ आणि २००१ सालातील ‘बरेच काही उगवून आलेले’ या दोन संग्रहांनंतर मौज प्रकाशनाकडूनच ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्करांचा २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘भरून आलेले आकाश’ हा तिसरा कवितासंग्रह. निसर्गातील प्रतिमांच्या, प्रतिकांच्या सहाय्याने संग्रहातील ७६ कवितांतून भेटत राहतं ते धामणस्करांनी चितारलेलं व्यापक आकाश. ह्या कवितांचा तोंडावळा प्रामुख्याने मुक्तछंदाचा असला तरी त्यातील संवादी शैलीमुळे त्याला आपसूकच एक आंतरिक लय प्राप्त झालीये. झाडं, फुलं, पानं, माती, पाखरं ही प्रतिमासृष्टी द.भां.च्या या पूर्वीच्या कवितासंग्रहातून जशी भेटते तशीच ती इथेही जरी सापडत असली तरी आशयातील वैविध्यपूर्णतेमुळे पुनरावृत्ती मात्र टळते. रोज सकाळी देवाला वाहण्यासाठी फुलं तोडली जातात तेव्हा एकदा झाड अशाच एका भक्ताला कधी देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का हा प्रश्न विचारतो. त्यावर भक्त उत्तर देऊन उलटपक्षी प्रश्न विचारत झाडाला डिवचण्याचा प्रयत्न करतो. ह्या सर्व प्रसंगातून चराचरसृष्टीत वास करणा-या देवाबद्दल आणि त्याच्या सूक्ष्मतम रुपाबद्दल निर्देश करताना ‘फुलांचं जिणं’ (पृ. क्र. १) या कवितेत धामणस्कर असं लिहितात,
तेव्हा देव आयुष्यात प्रथम भेटला.
म्हणाला, ‘रडू नकोस, झाडा,
परत रात्री येईन, नवी फुलं देऊन जाईन’
’पाणी’ (पृ. क्र. ३) या कवितेत मातीला ते ’निर्मोही’ असं संबोधतात कारण माती भिजण्यापुरती जितकं लागतं तितकंच पाणी स्वत:पाशी ठेवते आणि बाकीचं चराचराच्या तहानेसाठी पुढे देते जणू ती कोणताही मोह नसलेली या सृष्टीची आईच असते. आईच्या अशा औदार्य भावनेनेच निसर्ग बहरत असतो. फुलांचं आयुष्य हे केवळ चार-दोन दिवसांचं पण सूर्यफूलांच्या तांड्यातील परतीचा प्रवास सुरु झाल्याने हिरमुसलेल्या फुलाची ’सूर्यफूल’ (पृ. क्र. २) या कवितेतून ’जिथे उमलायचं तिथेच मातीला परत करायची एकएक पाकळी’ अशी शहाणी समजूतही घालतात. तसेच बहराच्या उत्सवी अलंकारासारख्या दिवसांमध्ये जीव अडकू द्यायचा नाही व दुस-यांचे उत्फुल्ल बहर पाहून कासावीसही व्हायचे नाही कारण सृष्टीतील प्रत्येकाचाच जन्म मातीतलाच आणि शेवटी मिसळणंही त्यातच.
निसर्गाच्या परिघाभोवती फिरणा-या धामणस्करांच्या कवितेत थेटपणे सामाजिक भाष्य नसले तरी रूपकांच्या, प्रतिमांच्या वा उदाहरणांच्या योजनांनी समाजातील विसंगतींवर, त्यातील असमतोलावर ती अचूक बोट ठेवते. ’रेश्मा’ (पृ. क्र. १७) कवितेतून ते पहिल्या भारतीय स्टंट गर्ल रेश्मा पठाणचा चित्तथरारक प्रवास कागदावर उतरवतात. शोले आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून रेश्मा पठाण यांनी हिरोईनची डुप्लिकेट म्हणून काम केले आहे. हिरोईनला साधं खरचटू नये म्हणून प्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावली. तेव्हा फक्त काही रूपयांच्या मोबदल्यात मिळणा-या जखमा आणि तुझी गरीब कातडी सोलून काढणारी ही व्यवस्था यांना तू कोणते प्रश्न विचारतेस. किंबहुना तुझं श्रेय तुला कधीच मिळू दिलं जात नाही म्हणूनच तू या चित्रपटसृष्टीतील एक दलित आहेस असं थेटपणे धामणस्कर म्हणताना एक भीषण वास्तव उभं करतात. इथे दलित हा शब्द कोण्या समाजाला दर्शवत नसून शोषित, उपेक्षित या अर्थाने वापरण्यात आला आहे.
पाटीवर लिहून ठेवलेला इतिहास
प्रयत्न करूनही उतरत नाही
माझ्या डोळ्यांत संपूर्ण विनासायास, जसे हे
निळे आकाश पुढे-मागे-वर पसरलेले आणि
ढगांच्या सावल्या सहलीला निघाल्यासारख्या रेंगाळत
खालच्या माळावरून पुढे सरकणा-या
’पन्हाळा’ (पृ. क्र. २०) कवितेतील या ओळींतून धामणस्कर म्हणतात, गड किल्ले हे कधी न कधी तरी ढासळणारच आहेत पण हे निळं आकाश आणि जमिनीवर रेंगाळणा-या ढगांच्या सावल्यांचं चित्र मात्र शतकानुशतकं असंच रंगत राहिल. भले इसवीसनापासून गडाचे कितीही राजे झाले असोत घाणेरीच्या फुलांनी मांडलेला हा उत्सव प्रत्येक वसंतात सुरुच राहणार आहे. त्यामुळे काही शाश्वत असेल तर आभाळाचं निळेपण आणि मातीचं फुलून येणं.
कर्त्या पुरुषाची नोकरी गेल्याने अचानक आलेली गरीबी आणि हरवलेली उभारी दिसते ती ’उदास घरकुलासाठी’ (पृ. क्र. २३) कवितेत. यात घर जरी केंद्रस्थानी असले तरी घराच्या उदासीचं कारण त्यात वावरणा-या व्यक्ती असून त्यांच्यावर अकाली आलेल्या संकटाने ही हतबलता घरालाही आली असून घरालाही इथे व्यक्तीरूप प्राप्त झाले आहे. ही उदासी झटकण्यासाठी कुणी तरी झाडा रे हे घर लख्ख वा कुणी तरी लावा रे दिवा असे उपायही इथे कवीने सुचवले आहेत. पण त्याहीपेक्षा घराला घरपण देण्यासाठी जरी सध्या इथे लहान मूल नसले तरी फुगे वा खेळणी आणून ठेवायला हरकत नाही कारण खेळणी आहेत म्हटलं तर मुलेही नक्कीच येतील आणि हे निराशेचं वातावरणही बदलून जाईल असा आशावाद शेवटाकडे कवितेतून दिलाय.
गाव उद्ध्वस्त झाल्यावर
पायवाटेचे नष्टचर्य संपले
व एका पावसातच ती
नव्या हिरव्या गोष्टी करू लागली
मोठ्या झाडाखाली लहान झाडाची वाढ होत नाही कारण त्याच्या वाटणीच्या अनेक गोष्टी आधीच मोठ्याने बळकावलेल्या असतात. अशावेळी दूर्लक्षीत राहण्यावाचून पर्याय उरत नाही. जीवनाच्या धकाधकीत अशा अनेक लहानसहान गोष्टी आपल्या आजूबाजूस असतात पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही. भयाण दुष्काळ पडलेला असताना भेगाळलेल्या जमिनीतून ढुशा देत एखादी हिरवी पालवी फुटते तेव्हा कुठे त्या सृजनाकडे आपलं लक्ष जातं. तसंच एखाद्याच्या उद्ध्वस्त होण्याने दुस-याचे नष्टचर्य संपू शकते आणि डावलेला अधिकार परत मिळू शकतो याचं चित्रण केलंय ’पायवाटेवरचे फूल’ (पृ. क्र. ३३) या कवितेत. अशाच एका पुसलेल्या पायवाटेवरील फूलाचा गंध आता सर्वदूर पसरत आहे. यापूर्वी ते फूल कधी तिथे उगवले नव्हते असे नाही परंतु सतत वाट तुडवणा-या भद्र लोकांमुळे त्याचे अस्तित्व जाणवले नाही. पण हे झालं रानफुलाबद्दल, ‘निष्पाप रोपटेही’ (पृ. क्र. ४४) या कवितेत बंगल्याच्या अंगणात लावलेले देखणे रोपटे अगदी काळजीपूर्वक योग्य ती मशागत करूनही वाढू नये, हट्टाला पेटल्यासारखे मरणाच्या स्वाधीन व्हावे यामुळे कवीचं मन खट्टू झालंय आणि अगदी ठरवून ते एखाद्या दावेदारासारखे वागतेय असं त्यास वाटतंय. तर ‘दु:स्वप्ने’ (पृ. क्र. ५१) या कवितेत आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करण्या-या आपल्याच माणसांची विनाशकारी प्रवृत्ती पाहून अपराधी भावनेने झाडांसमोरून मान वर करून चालणेही अवघड असल्याचे सांगतात.
पाडगांवकर, विंदांना समकालीन धामणस्कर आज नव्वदीच्या घरात आहेत. पण तरीही इतकी वर्ष तटस्थपणे कवितालेखन करत प्रसिध्दीच्या हव्यासापासून दूर राहिलेले मराठी कवितेतील ते व्रतस्थ ऋषीतुल्यच. आपल्या काव्यप्रतिभेने सभोवतालच्या निसर्गचित्रांना आपल्या काळजाच्या अवकाशात साठवत आजही ते तितक्याच ताकदीने कागदावर उतरवत आहेत. वयानुसार त्यांची कविता चिंतनाकडे झुकली असून काही कवितांमध्ये डोकावणारा निरोपाचा सूर चटका लावणारा आहे. ’रस्ता ओलांडताना’ (पृ. क्र. ६३) या कवितेत ते असं लिहितात,
’माझ्या मागनं या म्हणजे काही अवघड नाही.
पैलतीरी पोहोचवायची जबाबदारी माझी.’
मी बरोबर आहे ना, महाराज?
– गीतेश गजानन शिंदे,१९ बी विंग, मालकंस सोसायटी,
डॉ. लाजरस मार्ग, मॉडेल बॅंकेशेजारी,चरई, ठाणे (प), ४००६०२ संपर्क : ९८२०२७२६४६
भरून आलेले आकाश
कवी : द.भा. धामणस्कर
प्रकाशक : मौज
पृष्ठे : ७८
मूल्य : १२५