2021 मार्च

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम

सा हि त्या क्ष र 

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम 

नोबेल पुरस्कार विजेते ‘ज्यूझे सारामागु’ यांची ‘ब्लाईंडनेस’ ही जगप्रसिद्ध आणि गाजलेली कादंबरी आहे. जगातील अनेक भाषेत कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. मुळची पोर्तुगीज भाषेत असणारी ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन ती परत अनेक राष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. यावरूनच आपल्याला कादंबरीची उंची आणि पोहोच समजून येते. कादंबरीची उंची एवढी मोठी आहे की तिची समीक्षा देखील त्याच प्रतीची झाली पाहिजे. मी त्या प्रतीचं लिहू शकेल की नाही, हे माहिती नाही पण हा लिहिण्याचा प्रयत्न आहे.

    एवढी गाजलेली आणि सुप्रसिद्ध अशी कादंबरी एका चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. वाचकाला कादंबरी वाचत असताना आपण एखादी अदभूत कथा वाचत आहोत याचा प्रत्यय सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत होत राहतो किंवा एखादा चित्रपटच पाहिल्याचा अनुभव अनुभवयास मिळतो. नावाप्रमाणेच कादंबरीचं आशय, विषय आगळा-वेगळा आहे. विषय देखील फार किचकट, गुंतागुंतीचा नसून साधा आणि सरळ आहे. पण जेवढा सरळ विषय आहे तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी लेखकाने आपणासमोर आणलेल्या आहेत. अनेक अन्याय्य परिस्थितीत टिकाव धरण्याचे मानवी रूप असेल, माणसातील शारीरिक अभावांमुळे आलेले अधुरेपण असेल किंवा त्याचवेळी होणारा माणसावरील अन्याय, सरकारची चुकीची धोरणं असे बरेच पैलू कादंबरीने उलगडलेले आहेत. 

      खूपच रोमांचक आणि वेगळी अशी कथा आहे या कादंबरीची. मुख्य पात्र म्हणजे डॉक्टर आणि त्याची बायको हे दोघे असतात. एके दिवशी अचानक डॉक्टरकडे एक पेशंट येतो. पेशंट अचानक गाडी चालवताना अंध झालेला असतो. डॉक्टर अशा केसचा अभ्यास करत असताना रात्रभर जागतात. सकाळी उठल्यावर तेसुद्धा अंध झालेले असतात. ते ही बातमी मंत्रालयापर्यंत पोहोचवतात. मग त्यांना आणि त्यांच्यासारख्या अचानकपणे अंध झालेल्या सहा लोकांना एका वेड्यांच्या बंद पडलेल्या दवाखान्यात एकत्र जमावतात. बाहेर आर्मीची कडेकोट व्यवस्था केलेली असते. कोणी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर डायरेक्ट मारण्याच्या सूचना दिलेल्या असतात. ते त्या सूचना अमलात देखील आणतात. एक अंध जखमी झाल्यावर बाहेर मदतीसाठी जातो तरी त्याला आर्मीचे लोक मारतात. एकूणच शहरात ही अंधाची वाढणारी संख्या रोजच वाढत असते. रोज त्या दवाखान्यातले अंध लोक वाढत असतात. त्याचबरोबर जे लोक त्यांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांना देखील त्याच ठिकाणी ठेवलेले असते. असं त्यांचं बदललेलं आयुष्य सुरू झालेलं असत. अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडतात. पण त्यापेक्षा त्यातून लेखकाला काय सांगायचे आहे हे तेवढेच महत्त्वाचे आहे.

कादंबरीची एक अजून वेगळी ओळख आहे ती अशी की, कादंबरीत एकासुद्धा पात्राला नाव नाहीये. त्यांना नाव फक्त त्यांच्या अंधत्वावरून पडलेली आहेत. म्हणजे पहिला अंध माणूस, म्हातारा अंध माणूस, चकण्या डोळ्याचा अंध मुलगा अशी नावे पात्राला आहेत. संवादांमध्ये अवतरण चिन्ह, स्वल्पविराम असे काहीही नाही. सलग लिहिलेली ही कादंबरी आहे. याचा प्रत्यय आपल्याला कोसला’मध्ये सुद्धा दिसून येतो. ज्याअर्थी लेखकाने पात्रांची नवे सांगितली नाहीत त्याअर्थी यातून लेखकाने एक गोष्ट मांडलेली आहे ती म्हणजे लोक वेळेनुसार, काळानुसार बदलतात, गप्प राहतात, दृष्टी असून अंध असल्याचा दावा करतात. म्हणजे यात कोणतीही जात येत नाही, कोणताही धर्म येत नाही किंवा माणसाचा वर्ण येत नाही. यात येते ती फक्त माणसाची बदलत चाललेली माणसाप्रतिची भावना. यात लेखकाला दुसरा कसलाच आधार द्यायचा नाहीये वा कोणाचाही आधार घ्यायचा नाहीये. माणूस बदलतो तो फक्त त्याच्या नियतीमुळेच त्याची जात, धर्म याला कारणीभूत नसतो हेच यातून लेखकाला दाखवायचे आहे.

   या पुस्तकातून लेखकाने एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे, ‘जर तुम्ही पाहू शकता तर पहा, पाहू शकता तर निरीक्षण करा.’ हे वाक्य जेवढं साधं-सोपं दिसतंय तेवढं ते सोपं नाहीये. या वाक्यातून अनेक बोध लेखकाने आपणासमोर मांडलेले आहेत. म्हणजे आज अनेक लोक दृष्टी असूनसुद्धा लोक गप्प बसतात. खूप वेळा  लोक चुकीच्या गोष्टी पाहुनसुद्धा न पाहिल्यासारखे करतात. यातून माणसाचा बदलत चाललेला दृष्टिकोन चित्रित केलेला आहे. जागतिकीकरणानंतर जगात गुन्ह्याचे आणि ते पाहून गप्प राहण्याचे प्रमाण वाढले आहे.यासर्व बदलांमुळे माणसातील माणुसकी संपलेली आहे, याचा प्रत्यय कादंबरीत देखील आलेला आहे. या जागतिकीकरणानंतर, जग वेगवान झाल्यानंतर माणसातील भावना कशा बदलत गेल्या, गुन्हेगारीला कसे प्रोत्साहन मिळत गेले हे देखील कादंबरीत मांडलेले आहे. हा आशय कादंबरीत एका वाक्यात खूप छान पद्धतीने मांडलेला आहे.’ मला वाटत की आपण आंधळे नव्हतो झालो, तर आपण आंधळे आहोत; आंधळे पण दृष्टीसाहित.  हे खूप महत्त्वाचे वाक्य लेखकाने मांडलेले आहे. या वाक्यातून लेखकाने माणसाच्या काळानुसार बदलणाऱ्या वृत्तीवर कादंबरीच्या माध्यमातून बोट ठेवले आहे. वाचक कादंबरीचा प्रवास करत असताना यासारख्या अजून महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा ती करत राहते आणि वाचकाला सतत गुंतवून ठेवते.

 ‘या जगात अंध लोक नाहीत तर फक्त अंधत्व आहे’ अत्यंत महत्त्वाचं वाक्य आणि तेवढंच खोलवर रुजलेलं देखील आहे. कादंबरीतील एकूण एक वाक्य महत्त्वाची आहेत. यातून जशी लोक अंध असल्याचा दावा करतात तसेच सरकार देखील हेच करते. नकळतपणे सरकार हुकूमशाहीकडे वळत चाललेलं आहे हे आपल्याला दिसत असून आपण याच्याविरुद्ध आवाज उठवायला देखील कोणी तयार नाहीये. सारकरलासुद्धा हे कळत असून ते ही सिस्टीम बदलायला तयार नाहीत. कादंबरीतच बघायचं झालं तर त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना एकत्र क्वारंटाईन करतात. म्हणजे सरकार देखील कसे दुर्लक्षित करते या सर्व परिस्थितीकडे, हे दाखविले आहे. मदत मागायला जाणारा एक अंध त्याला आर्मी मारून टाकते कारण ते त्याला घाबरलेले असतात. त्यांच्या या कृतीवर परत चौकशी होत नाही. याचाच अर्थ असा की सरकार हुकूमशाहीकडे झुकत चालले आहे. एकूणच एकेकाळी समाजकारणकडे झुकत जाणारे सरकार, देश आता जागतिकीकरणानंतर आणि भांडवलशाहीनंतर हुकूमशाहीकडे वळत चालले आहे. हे आपणाला दिसत जरी असले तरी आपण शांत आहोत. सरकार देखील वेळी शांत बसत आहे. जे घडत आहे ते फक्त पाहत बसले आहे. म्हणजे सरकार देखील अंध झालेलं आहे. जसे आधी लोक प्रत्येक हक्कसाठी सरकार विरुद्ध लढत होते, युवक त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत होते पण आता युवकांमध्ये लढण्याची उमेद नाहीशी होत चालली आहे. लढणारे कोणीच राहीलेले नाहीत. म्हणून विज्ञानाने एवढी प्रगती केली, माणसाचा विकास झाला तरी माणूस म्हणून आपण चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवत नाही आहोत. हेच या कादंबरीत अदभूत कथेद्वारे उभे केलेले आहे.

      पण यासर्व घाबरणाऱ्या वस्तुस्थितीमुळे न मिटणारा माणूस आणि चिवटपणे त्याला तोंड देणारा माणूस देखील लेखकाने दाखवलेला आहे. अशा परिस्थितीत टिकाव धरून राहण्याच्या मानवी क्षमतेचा देखील आढावा या कादंबरीने घेतलेला आहे. या कादंबरीची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, नेहमीच्या वस्तुमय जीवनातून उसळी मारून दैनंदिन जीवनात आंधळेपणात दडलेल्या लोकांना समोर आणते. ” अत्यंत विचित्र तर्हेच्या अन्याय्य परिस्थितीतही चिवटपणे टिकाव धरून राहण्याच्या मानवी चैतन्याच्या अंगभूत क्षमतेचा थांग सारमागूची ही अस्तित्ववादी रुपकथा घेते. या चिरपरिचित संघर्षाचा पुनरशोध लेखकाने त्याच्या सिद्धहस्त शैलीदार वेगलेपणासह घेतला आहे,” हे कादंबरीबद्दलचे मत ‘दि न्यूयॉर्ककर’ने मांडलेले आहे. म्हणून ही कादंबरी 90च्या दशकातील एक महत्त्वाची कादंबरी म्हणून ओळखली जाते आणि तितकेच महत्त्व तिला आताही मिळत आहे.

लोकशाही राजकारणाचे विशिष्ट संदर्भ, आर्थिक पद्धती आणि सरकारी संस्था, ही कादंबरी अधिक स्पष्टपणे मांडत जाते आणि वरवर पाहता सक्तीचा रीतीने. या जगाचा एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून ही कादंबरी आपणासमोर आणलेली आहे. आजच्या काळातील एक महत्त्वाची आणि तेवढीच बोलकी कादंबरी आहे. वाचताना वाचकाला सोबत घेऊन जाणारी ही कादंबरी सर्वांनी वाचली पाहिजे.

– प्रतीक महेंद्र कदम , टेंभुर्णी, जि. सोलापूर

Recommended Posts

2024 Hindi kavita ऑगस्ट

उत्तम कोलगावकर : चंद कवितायें

परिचय : उत्तम कोलगावकर मराठी के एक सशक्त कवि है । उनकी कविता प्राय : भाष्यकविता की रूप में सामने आती है । आकाशवाणी में एक अफसर के रूप मे सेवापूर्ति कर वे आजकल नासिक में निवृत्त जीवन जी रहे है । ‘ जंगलझडी ‘ ,”तळपाणी ‘ , ‘ कालांतर ‘ आदि कविता संग्रह उनके […]

सा हि त्या क्ष र 
2024 जुलै प्रेरणा

‘भवरा ‘च्या निर्मितीची कथा : विजय जाधव,अंबड

बहुचर्चित ‘पांढरकवड्या ‘ कादंबरीचे लेखक विजय जाधव यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा चार वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने जग हादरून गेले होते. मानव जातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या एकाकी काळात मी बरीच पुस्तके वाचली, पण यामध्ये प्रसिद्ध लेखक बाबुराव बागुल यांचे ‘सूड’ हे पुस्तक वाचण्यात आले आणि मला हे पुस्तक खूप आवडले. काही लेखकांची […]

सा हि त्या क्ष र 
2024 Hindi kavita सप्टेंबर

अशोक कोतवाल की कवितायें

परिचय : अशोक कोतवाल मराठी के एक सुप्रतिष्ठित कवि है । मराठी साहित्य जगत के कई सम्मानों ने उन्हें नवाजा गया है । फिलहाल वे महाराष्ट्र के जलगांव में स्थित है । समकाल पर विपरित एवं गंभीर टिपण्णी करना, ये उनकी विशेषता है । प्रस्तुत है उनकी चंद कविताओं का संजय बोरुडे द्वारा हिंदी अनुवाद […]

सा हि त्या क्ष र 
2024 History ऑगस्ट

युआन श्वांग : भाग ५ वा -सतीश सोनवणे

( प्रसिद्ध लेखक जगन्मोहन वर्मा यांच्या सुयेन च्वांग या पुस्तकाचा क्रमश: अनुवाद . ) प्रकरण पाचवे-भारतयात्रेला सुरुवात: युआन श्वाग चिनचाऊ चा भिक्षू हियावत्ता’ बरोबर चांगआन सोडून चिनचाऊला आला. तो एक रात्र तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी त्याला लान चाऊ येथील एक साथीदार भेटला जो चिन चाऊला काही कामासाठी आला होता आणि त्याच्या घरी जात होता. तो […]

सा हि त्या क्ष र 

Leave A Comment