बेळगावची कमल बस्ती (बसडी)
बेळगावात अनेक जैन मंदिरे आहेत. त्या सर्वांपैकी कमल बस्ती अर्थात (बसडी ) येथील मंदिरे जबरदस्त आहेत. भूमिज शैलीतील या मंदिरांवरील नक्षीकाम, झुंबरं, वातायने प्रेक्षणीय आहेत.
कर्नाटक च्या प्रमुख शहरांमध्ये मोजल्या जाणाऱ्या, बेळगाव शहराला एक हेवा वाटणारा वारसा आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामधील सांस्कृतिक मिलाफ या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो.
कित्येक वर्षांपासून बेळगाव येथील ऐतिहासिक महत्त्व असणारी स्मारके पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करत आहेत. बेळगाव किल्ला शहराच्या मध्यभागी आहे, आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोन तीर्थे आहेत, एक गणपतीला समर्पित केलेली आहे, आणि दुसरे दुर्गा देवीचे.
कमल बस्ती (बसडी): गडाच्या तटबंदी मध्ये कमल बस्ती हे ऐतिहासिक, चालुक्य शैलीचे जैन मंदिर आहे. या मंदिरात सापडलेली काळ्या दगडाची एक नेमिनाथाची मनमोहक, आकर्षक मूर्ती आहे, इतिहासामधील महान मूर्तीकलेची एक उत्तम नमुना आहे.
या मंदिराचा उत्कृष्ट भाग म्हणजे “मुखमंडप” असून त्याच्या सर्वोच्च मध्यभागी कमळ आहे. त्या वरूनच याचे नाव कमळ बस्ती असे पडले आहे. मुखमंडप बघितल्यावर खिद्रपुरच्या कोपेश्वर मंदिरची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
मंदिरातील घुमट (गुंबज) मध्ये असलेल्या या कमला मध्ये 72 पाकळ्या कमळाच्या रुपात बनविलेले आहे. प्रत्येक कालखंडातील म्हणजेच भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातील 24 तीर्थंकर या कमळाच्या फुलांच्या 72 पाकळ्यांवर दर्शविले आहेत.
श्री नेमिनाथ तीर्थंकर कमळ बस्ती ची निर्मिती इ. स. 1204 साली शुभचंद्रा भट्टारक देव यांच्या प्रो्साहनामधून रट्ट राजा चौथा कर्तविर्य यांचे मंत्री बिछीराजा यांनी केले. सध्या लंडन स्थित ब्रिटिश संग्रहालयात असलेल्या बालचंद्रदेव (कवी कांदर्पा) यांनी रचलेल्या दोन शिलालेखा द्वारे या मंदिराबद्दल अधिक माहिती मिळते. या समूहातील दक्षिणमुखी दुसरे जैन मंदिर देखील रट्ट कालीन असल्याचे मानले जाते.
बर्याच काळापासून बेळगाव हे जैनांचे एक प्रसिद्ध केंद्र आहे आणि बर्याच प्राचीन जैन मंदिरांचे हे घर आहे. या प्रदेशात जैन मंदिराच्या बांधकामाचा प्रारंभ दहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत दख्खनमध्ये प्रमुख सत्ताशक्ती असलेल्या चालुक्यांच्या काळात झाला. अभिनव आणि कलात्मक बांधकामाचा प्रभाव इतर राजवंशांसारखा होयसला, गंगा, कदंब यांनाही प्रेरणा देत राहिला, परिणामी बेळगाव व आसपासच्या परीसरामध्ये अनेक जैन मंदिरे तयार झाली.
भगवान नेमिनाथ यांचे दगडामध्ये कोरलेले सिंहसन अतिशय कलात्मक आहे. मूर्तीला कोरीव कल्पवृक्षाची सुंदर प्रभावळ आहे. मंदिराचे खांब (लेथ कार्विंग) कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहेत आणि चमकदार आहेत. स्थापत्य कलेचा हा सुंदर आविष्कार मनावर ठसा उमटवणारा आहे. लेथ स्टोन कार्विंग चे तंत्र हजार वर्षांपूर्वी अवगत असणाऱ्या त्या काळा मधील स्थापत्य कलेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कोणतेही आधुनिक यंत्र नसताना, विजेचा शोध लागणयापूर्वी ७०० वर्षे फक्त मनुष्यबळ आणि पशुबल वापरून अशी कलाकृती साकारण्यासाठी किती कुशल आणि प्रवीण कलाकार लागले असतील याचा प्रचंड कोड पडत. प्रत्येक खांबावर केलेले नक्षीकाम कमालीचे एक सारखे आहे. कठीण काळ्या दगडावर कोणीतरी जादूच केली असावी असा भास नक्कीच झाल्या शिवाय राहत नाही. या मंदिराच्या मूर्तींचा आणि इतर पुतळ्यांचा इतिहास इ.स. अकराव्या शतका पासून सापडतो.
कायोत्सर्गाच्या आसनातील भगवान सुमतीनाथां ची आकर्षक मूर्ती, सातफणी असलेल्या नागराजांच्या सावलीखाली भगवान पार्श्वनाथांची मूर्ती, पद्मासन मुद्रामध्ये भगवान आदिनाथची मूर्ती आणि नवग्रह मूर्तीही या मंदिरात दिसू शकतात.
कमल बस्ती(बसडी) ची आज जवळजवळ १०० वर्षे काळजी घेत असलेल्या बेळगाव येथील प्रख्यात दोड्डानावर कुटुंबातील सदस्य राजू दोड्डानावर म्हणतात, शतकानुशतके पूर्वी बांधल्या गेलेल्या या मंदिरातील प्रार्थना कधीच थांबल्या नव्हत्या. १९४०च्या दशकात ब्रिटीशांनी मंदिरात पूजा थांबवली असली तरी माझे मोठे आजोबा बासप्पा दोड्डानावर आणि माझे आजोबा रामचंद्र दोड्डानावर, प्रार्थना करण्यासाठी लपून एका कोपऱ्यातून वाट काढून पूजाअर्चा करत असत. ”
ते म्हणाले की मंदिराची देखभाल करणारी त्यांची चौथी पिढी आहे. पुरातत्व विभागाने 1996 मध्ये या मंदिराचे संपूर्ण नूतनीकरण केले आणि मूळ योजना आणि आकार विस्कळीत न करता ते केले गेले. प्रख्यात जैन मुनिंच्या भेटीमुळे अलिकडच्या वर्षांत या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रख्यात जैन संत तरुण सागर महाराज यांनी अनेकदा किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन प्रवचने दिली होती. मंदिर व्यवस्थापनाने जैन स्वामींना कमल बसडीच्या आवारात मुनि निवास बांधली आहेत.
ऐतिहासिक मंदिरांचे जतन करणे आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना हा वारसा सोपवणे खूप गरजेचे आहे. वैभवशाली गौरवशाली इतिहास असलेल्या जैन धर्माची ही मंदिरे वारसा आहेत. तसेच प्रचंड कलात्मक आणि स्थापत्य कलेचा उत्तम ठेवा म्हणून पण अश्या मंदिरांकडे पाहिले गेले पाहिजे. नवनवीन काँक्रिटची मंदिरे उभरण्यापेक्षा अश्या मंदिरांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे मंदिराच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न नक्कीच दिसतात.
* * * *
( छायाचित्र सौजन्य : प्रा. अशोक आलगोंडी, बेळगाव )
* * * *