अधांतरीचे प्रश्न – अभिप्राय
अर्चना डावखर यांनी ९६ पृष्ठांच्या या संग्रहात एकल स्त्रीच्या जगण्याचे नानाविध स्तर धीटपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. एकटया राहणाऱ्या , त्यातही सधवा नसणाऱ्या स्त्रीचा भोगवटा मराठी कवितेत अभावानेच व्यक्त झालेला आहे. अर्चना डावखर यांनी हा प्रयत्न नेमकेपणाने केलेला आहे.काही ठिकाणी ठेवलेल्या बाईच्या मानसिकतेची अंदोलने दिसतात. आपल्या वाट्याला आलेले दुय्यमपण ‘निकाह ‘ सारख्या चित्रपटांतून दिसलेच. ठेवलेपण आणि नाकारले जाणे यामुळे स्त्रीचे जळणे चांगल्या रितीने डावखर व्यक्त करतात. ‘ गळालेले अवयव ‘ ही कविता त्या दृष्टीने लक्षणीय म्हणता येईल.
बाईने थोडे समाजाचा संकेतांना धक्का दिला किंवा पुरुषाशिवाय स्वतःच प्रगती करण्याचा प्रयत्न केला की तिला कॅरेक्टरलेस ठरवले जाते. समाजाच्या या विखारी वागण्याचा समाचारही डावखर घेताना दिसतात.
संग्रहाच्या सुरुवातीला अष्टाक्षरी, अभंग अशा रूढ वाटेने जाणारे प्रकार कवयित्री हाताळते. मात्र उत्तरार्धातील कविता यांनी संग्रहाची उंची वाढवलेली आहे. या कविता अनुभूती आणि त्यांची सेंद्रियता जाणवून देणाऱ्या आहेत. ‘रोपाचं पुनर्वसन ‘ सारख्या कविता तर अंगावर येण्याइतपत सशक्त झाल्या आहेत.
एकंदरीत कादंबरीपेक्षा डावखर ‘ कविता ‘ हा प्रकार ताकदीने हाताळतात असे निश्चितपणे म्हणता येते. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा..
– डॉ. संजय बोरुडे, अहमदनगर.
[3/24/2020]