बाल गोपालांना आवडतील अशा कविता -डॉ.अशोक घोळवे
विठ्ठल जाधव
बालगोपालांना आवडतील अशा कविता
‘उंदरीन सुंदरीन‘ हा विठ्ठल जाधव यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. तो दत्ता डांगे यांनी इसाप प्रकाशन, नांदेड करिता १४ नोव्हेंबर २०१९ रोजी बालदिनी प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ व रेखाटने दिवंगत प्रमोद दिवेकर यांची आहेत. ज्यांच्या आयुष्यात अजूनही शिक्षणसूर्य उगवला नाही त्यांना हा संग्रह अर्पण केला आहे. कवितासंग्रहात एकूण ३८ कविता आहेत. दासू वैद्य यांनी या कवितासंग्रहावर त्यांचे मत मांडले आहे.
कवी विठ्ठल जाधव हे पेशाने प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी बालमनाच्या कुतूहलतेवर लिहिलेली ‘पांढरा कावळा’ ही कादंबरी, बीड जिल्ह्यातील स्त्री-भ्रूण हत्येवरील ‘ गर्भकळा ‘ हा कवितासंग्रह चांगला चर्चिला गेला आहे. ‘बटाटीची धार’ आणि ‘तिवढा’ हे दोन कथासंग्रह अनुक्रमे बालमन आणि ग्रामीण पार्श्वभूमीच्या वाटेवर जाणारे आहेत. तसाच पण एक वेगळा पारंपरिक बाज आणि लोक परंपरेतील बडबड गीतांचे वलय असणारा कवितासंग्रह म्हणून ‘उंदरीन सुंदरीन’ या कवितासंग्रहाकडे पाहिले जाते. मुलांचे भावविश्व थोरामोठ्यांनी चिमटीत पकडणे ही अवघड आणि जिकरीची गोष्ट. त्यांना खेळवत ठेवून वृक्ष, वेली, निसर्ग, समाजप्रेम, मातृप्रेम, स्वच्छता यांचे संस्कार बालमनावर करत करत संगणक, शाळा, देशप्रेम यांची तोंडओळख करून त्यांच्यात नव्या बदलांची जाणीव करून देण्याची किमया कवीला अवगत झाली आहे. दुष्काळात पाणी वाचविणे आणि बापाचे रगत ओकणे ही भयान ओढवलेली परिस्थिती बालमनाला न पेलवणारी बाब पण ती कवी विठ्ठल जाधवांनी आपल्या कौशल्याने सिद्ध केलेली आहे.
बाप रगत ओकतो
भेगा भूईच्या सांधतो
खरबड्या हातातली
माया गाली फिरवितो (पृ.११)
किंवा
दुष्काळी राज्यात
आहे एक घर
घरासाठी पाणी
येते ते टँकर (पृ.८)
या ओळीतून बालकांना जगण्याचे डोळस भान आणि समंजस जाण बालमनावर बिंबवलेली दिसते.
बालसाहित्य लेखन करणारे कवी हे शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत. एक शिक्षक, गुरू आणि माणूस म्हणून ते सतत मुलांच्या संपर्कात, सानिध्यात आणि सहवासात असतात. याचा लाभ बालसाहित्यिकांना होत असतो. बाल साहित्यिकांच्या लेखनाचे विषय तेच ते ठराविक आणि ओळखीचे विषय असतात. पण एक बाब अशी असते की सर्वांच्या नजरेला ज्या बाबी दिसून येतात त्याकडे पाहण्याची प्रत्येकाची वेगवेगळी दृष्टी असते. त्यातून लेखकाचे लेखन पुढे सरकत असते.
कवी विठ्ठल जाधव यांची कविता बालविश्वाची बोली बोलते. ग्रामीण जीवनात बापाच्या अवस्थेतून जाते ती आईच्या कोमल वात्सल्यातून उलगडत नव्या बदलाचा वेध घेते.
कावळ्याचे नवे फेसबुक
भलतेच आले बघा रंगात
रोज-रोज न जाता शाळेत
शिका म्हणे नेटच्या घरात (पृ.४७)
कोल्होबाचे व्हाट्स अॅप, सिंहाचे युट्यूब चॅनेल या बाबी नव्या बदलांची चाहूल देतात. आज मात्र अस्सल खरे मातीतले हरवत आहे.
जंगलातील सारी शांतता
मोबाईल रिंगटोनने भंगली
कोल्हेकुई, डरकाळी
नेटवर्क व्यस्तने थांबली !
हे निसर्गनिर्मित जंगलावर मानवी सिमेंट काँक्रीटचे जंगल यातून नष्ट होत चाललेला जंगलातील निसर्ग आणि प्राण्यांवरील अतिक्रमण यातून कोल्ह्याची कोल्हेकुई अर्थात निसर्गाचे निसर्गपण हरवत चालले. हिरावून घेतले गेले याची जाणीवही बालकविता करून देते.
बालमन त्यांचे कोमल भावविश्व त्यात घडत जाणारे, संस्कारित होणारे बालजीवन याची जाण कवी विठ्ठल जाधवांना चांगलीच जमलेली आहे असे दिसते. त्यांच्यात नव्या बदलांबरोबरच वृक्षमहिमा, निसर्ग, पत्रलेखन, संस्कार करत करत ही कविता प्रांजळ अनुभूती मांडते.
मुलं-मुली हुश्शार, एक वानर भर दुपारी, शाळा माझी, सायकल या कविता शिक्षणातून संस्कार आणि संस्कारापलीकडे अमर्याद भावविश्व, कुतूहलापोटी आलेली जाणीव, नव्या बदलातून घडत जाणारी बालकांची पिढी, जुन्यांना नव्यांसाठी रस्ता निर्माण करण्याची गरज तसेच त्यातून नव्या बदलांची जाणीव व्यतीत होते.
भारतीय शिक्षण व्यवस्था नव्या बदलांना पाहिजे तशी स्वीकारत नाही. संगणक, इंटरनेट, सोशल मीडिया इत्यादी बदल बाह्य व्यवस्थेत होत आहेत. रोजगाराभिमुख शिक्षणाकडे या व्यवस्थेचा ओढा आहे. पण मूल्यात्मक भान निर्माण करणारे, मूल्य रुजविणारे शिक्षण इंग्रजाळलेल्या शाळांमधून हद्दपार होत आहे. मात्र कवी या बदलाचे स्वागत करताना लिहितो.
संगणक माझा दोस्त
मज ज्ञान देतो मस्त
माऊस खेळतो खेळ
क्लीकने लावतो मेळ (पृष्ठ: २४)
किंवा
चॅनलच्या गराड्यात
मोबाईलच्या मस्तीत
फास्टफूडचे खाणे
येते का कधी ओठी
जात्यावरचे पहाट गाणे (पृष्ठ; १३)
लोकपरंपरेत कथागीत आणि लोकगीत असे दोन प्रकार असतात. कथागीतात कथा आणि गीत एकत्रित असते. मात्र लोकगीतातील एक प्रकार म्हणजे बडबडगीत हा प्रकार ग्राम संस्कृतीत, लोकपरंपरेत खूप प्रसिद्ध आहे. (आज शिक्षण, संगणक आणि मोबाईल यामुळे हा प्रकार काही अंशी का होईना लुप्त झाल्याचा भास जाणवतो. ) या बडबडगीत वळणाच्या पण त्यात आधुनिक शब्दांची पेरणी करूनही काही कविता या संग्रहात दिसतात.
अमुण्या- कामुण्या डोंगराला
कारं बोरं टोकाडाला
गीठमूळ्या औताला
हामणं सारी खायला (पृ:१२)
किंवा
झोपडी झाडी बाकदार
नदी माय वळणदार
शाळा- शाळा सुंदर
मुलं- मुली हुश्शार (पृ:१२)
किंवा
सखू गं सखू, कुठे चाललीस
बाजाराला जाते, बाजारहाट करते
भाजीपाला आणते, फळंबिळं आणते
आंगडे टोपडे बघते,बाळा खाऊ घेते (पृ:१९)
अशाच वळणाच्या उंदरीन सुंदरीन, जन्माचा इतिहास, बाळाचे बोल, पाऊस माझा, या अशा कविता लोकपरंपरेत आजही तितक्याच ताकतीने गायल्या जातात. आजही खेडोपाडी ह्या कविता बालकांच्या खेळात ऐकायला मिळतात मात्र कवी विठ्ठल जाधव यांनी नव्याने लोप पावत चाललेल्या बडबड गीतांना एक प्रकारे ‘अक्षरत्व’ बहाल केले आहे. कवी विठ्ठल जाधव यांच्या काव्यसंग्रहाच्या केंद्रस्थानी ‘बालक’ आहे. तो सर्व समाजस्तरातील आहे. एकीकडे समृद्ध कुटुंबात जन्मलेला संगणकाशी खेळतो तर दुसरीकडे ज्यांच्या आयुष्यात अजूनही शिक्षण सूर्य उगवला नाही अशा प्रत्येक बालकांना केंद्रस्थानी ठेवून कवी आपल्या जाणिवा प्रकट करतो. मानवी जगण्याच्या, बालकांच्या बालविश्वाच्या आणि बापाच्या रक्त ओकण्याच्या दुः खद जाणिवा कवी अभिव्यक्त करतो. मात्र त्याचबरोबर आपण शिक्षण घेतल्याशिवाय, नव्या बदलाला सामोरे गेल्याशिवाय आपल्या परंपरागत दुःखद जगण्यातून सुटका होणार नाही हा बालमनावर संस्कारही करून जातो. त्यांच्या शाळा माझी, मातृभाषा, जन्माचा इतिहास, बाळाचे बोल, मातृऋण, आई माझी, पत्र मायना, ये दादा या कवितांमधून कवी मुलांना संस्कार देत देत समाजभान निर्माण करतो. तसा तो निसर्ग आणि निसर्गाशी साधर्म्य असलेल्या बाबींवर प्रेम करायला शिकवणारी विठ्ठल जाधव यांची लेखनी कधी माझा दोस्त, जंगलचे नेटवर्क या कवितेमधून आधुनिकतेची गोडी निर्माण व्हावी आणि मुलांचे मन जगात घडणाऱ्या बदलाला सामोरे जावे यासाठी तंत्र युगाची पायाभरणी करते आहे.
कवी आपल्या लेखणीचा शोध ‘परंपरेत नवता’ या जाणिवेतून घेत आहे. बडबड गीतांपासून सुरू होणारी कविता जंगलाच्या नेटवर्क पर्यंत येऊन थांबते. विठ्ठल जाधव यांच्या कवितेतील भाषा अत्यंत साधी सोपी आहे. तिच्यावर कोणताही अलंकार चढवलेला नाही. खरे तर ती बोलीभाषाच आहे. ‘संवेदनशीलता’ हा उंदरीन सुंदरीन या काव्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. कवी शब्द प्रतिमांमधून वाचकांच्या डोळ्यासमोर ‘चलचित्र’ उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. त्याबरोबर हे चित्र रंगवताना त्यांच्यामध्ये आपल्या भावभावना कवी ओततो. नाजूक, हळव्या शब्दांमधून कवी आपली संवेदनशीलता अभिव्यक्त करतो.
—
उंदरीन सुंदरीन (कवितासंग्रह)
कवी: विठ्ठल जाधव
प्रकाशक: दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड.
पृष्ठे : ४८, मुल्य : ८० रू.
—
— डॉ.अशोक घोळवे,
मराठी विभागप्रमुख,
कालिकादेवी महाविद्यालय,
शिरूरकासार, जि. बीड सं.९४०३४३३२११
डॉ.अशोक घोळवे
‘साहित्याक्षर’ च्या वतीने प्रकाशित समीक्षा ग्रंथ