डोयातून आला…पाऊस आला !
सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी विजय सोसे यांची ‘पाऊस’ नावाची एक अतिशय गाजलेली कविता आहे.या कवितेमधून त्यांनी शेतक-यांंच्या जीवनाचे पेरणीपासून तर त्याच्या हातात पीक येईपर्यंतच्या क्षणाचे अतिशय भावपूर्ण शब्दात हुबेहूब चित्र उभे केले आहे.पहिल्या पावसाची अधीरपणे वाट पाहणारा शेतकरी,पाऊस पडल्यानंतर अतिशय आनंदाने आपल्या कुटुंबियांना सोबत घेवून पेरणी करणारा शेतकरी,पीक बहरायला,डोलायला लागल्यानंतर समाधानी होणारा शेतकरी आणि शेवटी कापणी,मळणी करुन पीक घरी नेण्याच्या तयारीत असलेला आनंदी शेतकरी, परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडून एका क्षणात कसा उध्वस्त होतो याचे अतिशय ज्वलंत,जीवंत आणि वास्तव चित्रण कवी विजय सोसे यांनी पाऊस कवितेत केले आहे.आपल्या कवितेचा शेवट अतिशय वेदनादायी भावनेने करतांना कवी म्हणतात,
बेरजेचं गणित मांडलं ,झाली वजाबाकी !
किस्मत फिरलं ,सपन इरलं !
सारा जगच वैरी झाला !
पाऊस आला ,डोयातून आला !!
अश्रूंच्या रुपात शेतकऱ्यांच्या डोळ्यातून येणारा पाऊस त्याच्या दुःखाची आणि वेदनेची दाहकता दर्शवितो.
सध्याही शेतकऱ्यांची अवस्था अशीच विदारक आणि विषन्न झाली आहे.परतीच्या भयानक पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.लाखो शेतक-यांंचे कोट्यावधी रुपयांचे पीक आपल्या डोळ्यादेखत पावसामुळे उध्वस्त होत असतांनाचे भीषण दृश्य पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या ह्दयाचे ठोके वाढून तो अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही.सरकार नावाची यंत्रणा फार काही करु शकेल अशी अपेक्षा नाही.मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार ! लोकांच्या भावनांशी खेळण्याची ज्यांना सवय जडली आहे,ते लोक आश्वासने देण्याशिवाय किंवा तुटपुंज्या मदतीची जाहिरातबाजी करण्याशिवाय फार काही करू शकत नाही हे सर्वांनाच माहित आहे.उद्योगपतींंना एका मिनिटात लाखो कोटींची कर्जमाफी देणारे सरकार शेतक-यांंचा प्रश्न आला की मात्र शेकडो कारणे सांगून आपली जबाबदारी झटकतात ही वस्तुस्थिती आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या कठीण परिस्थितीत सापडला आहे.पावसाच्या कहराने तो पूर्णपणे खचून गेला आहे.कोणतेच पीक पूर्णपणे चांगल्या अवस्थेत त्याच्या घरापर्यंत पोहचू शकले नाही.शेतीचे साहित्य सुध्दा पुरात वाहून गेले आहे.जनावरे दगावली आहेत.संसाराचा गाडाच पुराच्या गाळात आरपार फसून गेला आहे.अनेक शेतांमधे तर शेतकरी कमरेएवढ्या पाण्यात बुडालेले पीक पाहून वेदनेने अश्रूंना वाट मोकळी करुन देतांनाचे,जीवाचा थरकाप उडविणारे विदारक दृश्य पाहायला मिळाले आहे.पण शेतकऱ्यांच्या भरवशावर नेता बनलेल्या एखाद्या राजकारण्याच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा एखादा थेंब कुठे पाहायला मिळाला नाही.सत्ताधारी व विरोधकांची निव्वळ एकमेकांवर चिखलफेक सुरु झाली आहे.पण राजकीय विरोध विसरुन शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करण्याची सुबुध्दी मात्र कोणालाही सुचत नाही.अस्मानी आणि सुलतानी संकट हा वाकप्रचार आपण नेहमीच वापरत असतो.अस्मानी संकट हे नैसर्गिक तसेच भयानकही असते.ते सुचना न देताच अचानकपणे येते.परंतु सुलतानी संकट मात्र त्याच्यापेक्षाही महाभयंकर असते.कारण सध्याचे विविध पक्षांचे सुलतान हे शेतकरी व सर्वसामान्य लोकांचे शोषण करणारे आहेत.या सुलतानांना सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात अघोरी आनंद मिळतो.मते सामान्यांना मागायची आणि कामे मात्र सामान्यांचे शोषण करणाऱ्यांची करायची ही सध्याच्या सर्वपक्षीय सुलतानांची रीत आहे.त्यामुळे कोणीही सत्ताधारी असले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवतील अशी अपेक्षा करणे मुर्खपणा आहे.फक्त खोटी आश्वासने,वचननामे,घोषणापत्रे जाहीर करुन लोकांना फसविणे हीच सध्याच्या काळातील लबाड सुलतानशाही आहे.यापेक्षा तेव्हाचे सुलतान कितीतरी बरे होते असे म्हणण्याची आता वेळ आली आहे.
शेतकऱ्यांचे तारणहार म्हणवणारे नेते निवडून येताच करोडपती-अब्जोपती होतात.आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे,आमदार-खासदार होताच लगेच सत्ताधा-यांच्या सुरात सूर मिसळतात व आपले पूर्वीचे दिवस विसरतात.त्यामुळे लोकांचा कोणत्याच शेतकरी नेत्यांवर आता विश्वास राहिलेला नाही व जे काही थोडेसे लोक इमानदारीने शेतकऱ्यांसाठी लढतात त्यांना प्रसिध्दी नसल्यामुळे लोक त्यांच्यामागे जात नाही.अशा बिकट परिस्थितीत कोणत्याही सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची सुतराम शक्यता नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते होण्यापेक्षा फक्त शेतकरी जमात म्हणूनच आपल्या हक्कासाठी संघटीतपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढायला पाहिजे व सत्ताधाऱ्यांना एकजूटीने जाब विचारायला पाहिजे.तरच काहीतरी आशादायी चित्र पाहायला मिळू शकते.अन्यथा येणाऱ्या काळात शोषित विरुध्द शोषक हा संघर्ष उग्र रुप धारण केल्याशिवाय राहणार नाही.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
प्रेमकुमार बोके
अंंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६
२४ आॕक्टोबर २०२०