बये!तू सूर्यमुखी!!
- डॉ. जगदीश कदम, नांदेड
(माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा कवयित्री आणि वक्ता सूर्यकांता पाटील)
बये,
कुठून सुरूवात करू
तुझ्या चरिताची!
कुठून मारू
शिरोरेष
को-या कागदावर!
किती सोडू समास
आणि
किती ठेवू पानं राखून
तुझं खणखणीत जगणं
मांडून घेण्यासाठी!
आजवर
बख्खळ लोकांना
गाठलं आम्ही
शब्दांना
धरून हाताशी!
नाहीच पडला पेच!
पंधरा आगस्टला
यावं चापडूनचोपडून
शाळेत
टापटीपीनं,
तसं
छान
भांग काढून
येत गेले
शब्द!
आज मात्र दहादा
विचार करून,
मायबापाची
इजाजत घेऊन
शब्दांनी केला
किंचित
किलकिला दरवाजा!
बये,
तू
आमच्या
टापूतली
म्हणून
असेल
कदाचित
ही
हक्काची
अंतर्ओढ!
बये,
तुझं बालपण
लाडाकोडातलं!
लोकांची लगातार
ऊठबस असलेल्या
घरातला
जन्म तुझा!
आझादपणाचं
पोटभर वारं
अवतीभवती
घोंगावणारं.
आई
नि
चुलता
सत्तेच्या सारीपाटावर!
आमदारकी नव्हती
त्या काळी
आजच्या सारखी
कळकट झालेली!
आमदार आला म्हणलं
की अख्खं गाव
जायचं उजेडून!
सत्ताही नव्हती
इतकी
वखवखलेली!
नव्हता तिला
जडलेला
आजार
मोहाचा!
आवतन देऊन
उपाशी ठेवायचे
डावपेच ही
नव्हती ती
शिकलेली!
रहाता येईल
जितकं नेक
तितकी
आणि तेवढीच
तिची धावपळ!
राजकारण रमायचं
परकोटात
वा
पारावर.
नव्हतं येऊन
बसलं घरातल्या
चुलठाण्यावर!
बये,
तू
बालवयातच
घेतलेले
मोकळ्या श्वासांचे
दोर हाती!
घरातलं
वातावरणही
मुक्त,
मोकळं.
आई
राजकारणात
आणि
बाप
जनआंदोलनात!
कसलं हे
आंदोलन!
ही तर
मुक्तीची लढाई!
गुलामीच्या खिलाफ!
हैदराबाद
मुक्तीसंगरात
बापाचं
शहीद होणं
ही गोष्ट
पेरून गेली
तुझ्यात
क्रांतीची
ठिणगी!
चार अश्रू ढाळून
ढासळणं नव्हतंच
तुझ्या रक्तात!
कुठल्या कुठल्या
निर्धारांनी
बांधत गेलीस
स्वत:ला!
बाई म्हणून
धाकट्या खुंट्याला
बांधून घेणं
नव्हतं तुझ्या
स्वप्नातही शक्य!
तुझी म्हणून
स्वतंत्र
प्रतिभा
आणि
प्रज्ञा
नाहीच
झाकता आली
तुला!
त्या क्षणापासून
या घडी पर्यंत!
बये,
तू मागत होतीस
हक्काचा प्रकाश
आणि
व्यवस्था होती
दिमाख लावून डावलत!
व्यवस्थाच ती.
कडेकोट
बंदोबस्तात
बघत होती तुला;
आणि
पाहात होती ठेऊ
मानेवर जरबी जू!
कसलीच जरब
नव्हती तुला मान्य.
तुझी तू
स्वयंभू,स्वतंत्र!
खानदानी वगैरे
जगण्याची
खानेसुमारी
तू उधळून आलीस
गारगोट्या समजून!
अशीही
झाली
तुझ्याविषयी
ओरड;
पण
ओरड करणारा
आवाज
कधीच नाही
वाटला
कळवळून
आलेला!
स्वातंत्र्य
हिरावून घेण्याची
हेकाटीच
होती
जणू!
बाई आणि गाय
या हिशेबाने
मजबूत केलेले
खुंटे
मागत असतात
नेहमीच
जगण्याचं स्वातंत्र्य!
हे कळण्याइतपत
होतं शहाणपण
तुझ्या गाठीला
नक्कीच!
तू निवडलास
तुझा
प्राधान्यक्रम!
जुने जाऊ द्या
मरणालागुनी
ही केशवसुती
शिकवण
घेतलीस तू
आतून सिरीयस!
निर्भयपणे
रोवलीस
मनाच्या मांडवात!
केली पाहिजेत
जातीची हाडं
खिळखिळी
असा
मंत्र जपणारे
असतात
जरूर
जागोजाग!
जात व्हावी म्हातारी
आणि
उचलावं तिनं
बि-हाड
अशी भरमसाठ
भाकीतं
भरविणारे बुवाही
दिसतात
गल्लोगल्ली!
ही सगळी
सोंगं
मारतात
छान गप्पा
परिवर्तनाच्या!
त्यांच्या
केवळ
गप्पाच
आणि
तू घेतलेली
भरारी कोणत्याच
आभाळात न
मावणारी!
बये,
तू
खानदानी
पाटलीन
घराण्यातली!
झुगारलेस
सारे बंध!
जातीअंताची
लढाई
नाही
येत
जिंकता
कृतीचा
इसार
दिल्याबिगर!
तू
तो दिलास
जाहीरपणे!
बये,
तशी तू
अतोनात सर्जक!
तू कवयित्री,
तू संपादक,
तू वक्ता,
तू चर्चक!
या सगळ्यांना
रेटत मागं
तू निवडलास
राजकारणाचा
अस्थिर आवाका.
शब्द
जाऊ शकतात
सहजी फिरवले
असल्या नादान
दिवसांचं हे
राजकारण!
आम्हाला
नाही कळत
त्यातलं फारसं!
कळतं
हे
तुझं वाचन दांडगं!
तुकाराम आणि
त्याचं
विद्रोही वर्तन
पेरून गेलं
तुझ्यात क्रांतीचं
बीज!
तुकाराम बीज करून
कळत नसतो तुकोबा!
त्यासाठी
भटकावा लागतो
भंडारा माळ,
खोदून काढावा लागतो
मनाचा कोपरा न् कोपरा!
आणि
तू तेच खोदत
राहिलीस बये!
कोण होतं
तुला समजून
घेणारं
त्यासमयी!
पदर पडला तरी
पाय घसरला म्हणून
पत जोखणारी
दणकट
दलदल
आजूबाजूला!
हजार डोळे पाठीवर घेऊन
चालावं लागायचं लेकीबाळींना!
तोंडावर वल आणि
हातात चपला घेऊन
चालायचे गावातले रस्ते
बायामाणसांच्या पायांनी!
अशा काळात उमटवला
तू टापांचा आवाज!
आईवडिलांची पुण्याई
वगैरे म्हणतात ती
असेलही जरूर
तुझ्या पाठीशी!
परंतु
कसं पुसता येईल तुझं
स्वयंभू तेज तळव्यानं!
आज धावतात
असंख्य वाहानं
पोरींच्या हातात
बाईकचं
ब्रेक देऊन!
त्या काळी
गावातच नव्हे
संपूर्ण टापूत
तुझ्या
एकमेव
बाईकची चर्चा!
कारण तू
लाखात एक!
सूर्यकांता
हे नाव नक्कीच
निर्मिलं गेलं
तुझ्या
एकटी साठीच!
सूर्यासारख्या कांतीमान
जगण्याचेच
पुरवत आलीस
तू
मनसोक्त लाड!
तुझं इतकं
ठळक जगणं
दिसत नसेल का
करपट
काथ्याकूटीला!
बये,
तू होत गेलीस
प्रकाशमान गडगंज!
जिंकत गेलीस
गडामागून गड!
असते राजे हयात आज;
तर दिला असता तुला
तुझ्या मनासारखा गड.!
आणि
म्हणाले असते
‘दाखव पोरी
तुझं शौर्य
शंभर पट!’
बये,
आहेत कुठे पाहायला डोळे
आणि
करायला कौतुकाचे शब्द
तुझ्या कुणबिकी
करणा-या
गणगोताकडं!
गावशिव
आणि
गप्पागोष्टीतच
गार झालेला
हा
गावपट्टा
गातही राहिला
गुणगान तुझं!
तुझ्या वाणीची
धडाडणारी तोफही
बांधून ठेवली
त्यानं
बेजोड म्हणून!
तू
केलंस
तुझ्यापरीनं
शक्य ते
सगळं!
उजंग
पडावा
गावशिवाराला
म्हणून
कारखान्याची
चाकंही
पाहिली
फिरवून.
लागला
नाही
तालमेळ.
बये,
तुझं बोलणं
असो
चारचौघात।
वा
हजारोलाखोत!
तू
बरसतेस
धबधबा होऊन.
कुठून कुठून येतात
शब्दांचे झरे
कळत नाही.
पाहता पाहता
बांधत जावी सुंदर इमारत
वा
विणता विणता विणलं जावं
वाणाचं वस्त्रं
इतकं हे बेमालूम!
बये,
सोडून दिलं असतंस
राजकारणासारखं
ओबडधोबड अंगण
आणि
उतरली असतीस
वाणीच्या वावरात
तर
भल्याभल्यांची
दुकानदारी
पाडली असती
पालथी!
तुझ्यातलं
सामर्थ्य
नाही कळलं
टापूला!
पार
बारामतीला जाऊन
पोचला तुझा आवाज
तेव्हा कुठं
लाल दिवा येऊन थांबला
दारात!
खरं तर
मंत्री वगैरे
गोष्टींचं
कधीच नव्हतं
तुला अप्रुप!
नाही
उतरता आलं तुला
सवंग होऊन
सत्तेच्या साठेमारीत.
जी काही असतील ती
आपली
चिमुटभर
तत्त्व घेऊन
तू राहिलीस
निर्भयपणे
चालत!
बये,
तू आज जिथं
आणि जशी आहेस
ते योग्य की अयोग्य
हे कोणी तुला सांगावं
इतकी दुधखुळी
तू
नक्कीच नाहीस!
तू
सत्तरीत असशील
आलेली
तरीही
उत्तम आरोग्याची
गुरूकिल्ली
आहेच
तुझ्याकडं!
त्याचं शास्त्रही
तुला
कंठगत!
जमलंच
तर
एखादं पान भिर्कावून दे
आमच्याकडेही!
बये,
बघ ना
हा
कसला योगायोग!
स्वातंत्र्याचा
चौघडा
वाजला
त्याच
दिवशी
तू जन्माला आलीस!
तू सूर्यकांता!
तू सूर्यमुखी!!
- जगदीश कदम
+++
(माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा कवयित्री आणि वक्ता सूर्यकांता पाटील यांचा पंधरा ऑगस्ट हा जन्म दिवस आहे,त्यानिमित्ताने..)
++++
हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, अहमदनगर आणि निशिराज पब्लि. पुणे यांची संयुक्त पेश कश. लौकरच प्रसिद्ध होत आहे.