जेजुरी नंतरची कविता महाद्वार :देवा झिंजाड
डॉक्टर बाळासाहेब लबडे लिखित “महाद्वार” हा कविता संग्रह विजय प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे.महाव्दार ही भारतीय अध्यात्मातील व्यापक कल्पना आहे.महाद्वार हे मुक्तीचे द्वार आहे.जन्ममरणाच्या फेर्यात अडकलेल्या माणसांना वैकुंठाचा रस्ता जेथून सापडतो.अशा प्रवेशाचे द्वार अशी पारंपरिक मानसिकता या मागे आहेे.या सगळ्या पार्श्वभुमीवर अध्यात्मातील सध्यकालीन वास्तव या कवितासंग्रहाने मांडले आहे.
माणसास सतत परात्म शक्तीची भिती वाटत आलेली त्यातून त्याची श्रद्धास्थाने अस्थिस्वात आली.या संग्रहात कुठेही परमेश्वरावर टिका नाही.परंतु स्वयंघोषित शोषित व्यवस्था निर्माण करूणारांची ही समीक्षा आहे.
यातील कविता तीन भागात सोयीसाठी विभागलेल्या आहेत कवितासंग्रहाचे वाचन केल्यावर मनात अनेक भावना
निर्माण झाल्या.
महाद्वार मधील कविता ही वैविध्यपूर्ण कविता आहे.बर्मूडा ट्रँगल, हिरवे अध्यात्म खुले महाव्दार या पैकी पहिल्या विभागात वैश्विक जाणीवेची रूपे येतात.दुसर्या विभागात झाड या प्रतिमेच्या माध्यमातून स्ञीपुरूष संबधांचे आकलन येते.स्ञी जीवनाचे अनेक पदर रेखाटत या कविता जातात.शोषणाचे संदर्भ ही कविता मांडत जाते.
“रात्रीच्या अंधारात गुपचूप
येणारे पुरुष
दिवसा प्रतिष्ठित होऊन रोज
मिरवत राहतात बिनधास्त…...
कवितासंग्रहातील, अश्या अनेक ओळी, कविता ह्या आजच्या युगातल्या समाजातील भीषण अन नागडे वास्तव प्रकाशात आणताना कधी प्रखरपणे तर कधी हळूवारपणे काळजाला हात घालतात.साहित्यसृजनात्म अाविष्कार घडवतात.
ह्यातली प्रत्येक कविता ही आजच्या काळाचे प्रतिनिधित्व करते. तुमच्या आमच्या मनातल्या भावना मांडताना कधी कधी कवी फार कसरत करत नाही ह्यांच्या कुठल्याच कवितेत अशी ओढाताण जाणवत नाही. ह्यांची कविता अगदी सहज व्यक्त होते. आपल्या पुढ्यात येते. जगण्याचे भान देते. अतिशय नेमकेपणाने आपल्याला दिसणार्या पण आपण मांडू न शकलेल्या गोष्टी सहज मांडते.
महाद्वार ह्या शीर्षकाने एक अध्यात्मिक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही. तीर्थक्षेत्रातल्या पवित्रतेची जपणूक करताना कमी पडत चाललेला समाज, हळूहळू त्यात व्यावसायिकता आल्याने तीर्थक्षेत्रांना आलेला एक अव्यवस्थितपणा, बाजारूपणा, पोटभरू वृत्ती, राजकारणाचे ओंगळवाणे प्रकार, दळणवळणाच्या साधनांमुळे होणारी गर्दी त्यातून निर्माण झालेल्या समस्या, प्रदूषण, विश्वात्मकतेची हाक जिथन दिली जाते तेथून दाहक, भेदक वास्तव आणि भाव-भक्ती सुद्धा विकायला काढू पाहणारे पैशाचे साधक यांचे आकलन म्हणजे महाद्वार. आजच्या युगातले जाण म्हणजे महाद्वार म्हटले तर वावगे ठरणार नाही.अवतार ही कविता मनाला चटका लावून जाते.
तळहातावरच्या रेषा सांगणार्या हातांना….
/सूर्य पाहिलेली माणसे /सगळा अंधार पिऊन तर्र होतात / रिकाम्या पोटीही उजेडाच गाणं गातात……
अश्या रचना समस्यांची उकल करताना त्याची दुसरी बाजूही समर्थपणे आणि सजगपणे कवी इथे मांडतो.
१९९० नंतरच्या कवींमध्ये एक समान धागा सापडतो अन तो म्हणजे जागतिकीकरण..अन त्यातून निर्माण झालेल्या समस्या अनेक कवींच्या कवितांमध्ये डोकावतात पण ह्यातून तीर्थक्षेत्रे सुद्धा सुटली नाहीत…पण दुर्दैवाने ह्या प्रश्नाला वाचा फोडणार्या लेखण्या अत्यल्प आहेत. त्यात हा कवी अगदी कसलीही भीडभाड न ठेवता लिहिता झाला आहे हे महत्वाचे आहे. त्यासाठी पुढील ओळी आपल्याला नक्की पटतील.
महाप्रसादाचा लाडू अतिथी भोजन / रजिस्टर लग्न लग्नासाठी भांडी / धर्मशाळा अशा जाहिरातींचे / फलक लागले आहेत नगरीभर / येणाऱ्या भाविकांचे स्वागत / करीत पुढारी मिरवीत आहेत आपल्या पक्षाचा / अजेंडा आणि झेंडा.
मानवाच्या जगण्यातल्या अडचणी त्यातून वाट काढीत जगणारी माणसे, उठता बसता सरकारला शिव्या देणारे अन देवाच्या हवाल्यावर जीवन सोपवणारी माणसे सुद्धा बाळासाहेबांच्या कवितेत मला दिसतात.
महाराष्ट्राच्या काळजात मोठ्या भक्तिभावाने विराजमान असलेले आळंदी हे तीर्थक्षेत्र आणि त्याचे सांस्कृतिक महत्व जरासुद्धा कमी न करता तिथल्या लोकजीवनाची एक प्रगल्भ चिकित्सा “महाद्वार”ने करता करता तिथल्या काही मनाला न पटू शकणार्या गोष्टींवर त्यांनी शब्दप्रहार केला आहे. अतिशय सहज सोप्या भाषेत त्यांनी तुमच्या आमच्या मनातल्या भावना मांडल्या आहेत. कारण साध्या भावना ह्या जटील शब्दात मांडल्या कि त्यांचा अर्थ लागत नाही व मग अशी कविता कितीही दर्जेदार असली तरी ती लोकाभिमुख होत नाही. ह्या कविता वाचताना आपण त्या भावनेशी कुठेतरी आतुन जोडले गेलो आहोत असे वाटत राहते आणि म्हणून प्रत्येक कविता अधिक वाचनिय होत जाते.
“भाविकांच्या खिशाकडे लक्ष देत
चिमुरड्यांची पाउले भोवरा बनून
लांबवर लागलेल्या
दर्शन बारीतून फिरतात……….
भाव भक्तीच्या मळ्यात द्यानेशाच्या दर्शनासाठी जमलेली मंडळी अन त्यांच्यात पोटासाठी दुसर्याचे खिसे चाचपणारे “ आधुनिक बाल द्यानेश” हे मला चोर वाटत नाही तर ते आगतिक वाटतात. पण ह्या ६२ नंबरच्या कवितेत बाळसाहेब त्या मुलांना अजिबात दोष देत नाहीत हे फार महत्वाचे आहे. आळंदी मध्ये असणारे छोटे छोटे आश्रम, मंगल कार्यालये…अन त्यातून काम करणारे, लग्न लावणारे, जेवण बनवणारे, भांडी घासणार्या महिला…..ह्या सगळ्यांच्या आयुष्यातील आळंदीचे महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित करणारी कविता आपल्याला महाद्वारात नेऊन उभे करते. पण काही काही गोष्टीमुळे वाद होतील कि काय असे वाटत राहते. पण वास्तवाला प्रखरतेची किनार असल्याशिवाय ती गोष्ट पटत नाही हे त्यांनी पुढील ओळींमधून दाखवून दिले आहे. प्रस्थापितांना न जुमानता लिहिलेली कविता त्यामुळे सरस,उजवी अन धाडसी ठरते ह्यात दुमत नाही.
ताई,आई,काका,मामा / म्हणून घालत असतात साद / चप्पल ठेवून हार फुले
घेवून जाण्यासाठी…..
कविता हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाहीय तर तो वास्तवतेला स्पर्श करून मानवी भावभावनांचा कल्लोळ आपल्या काळजापर्यंत पोहोचवण्याचे एक सकस माध्यम आहे असे मला वाटते अन त्यात महाद्वार यशस्वी झाले आहे असे मला वाटते.
आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम फक्त आपल्यावर होत नसतो तर तो साहित्यावर सुद्धा होतो. ह्याचाच प्रत्यय ह्या पुस्तकातले अभंग वाचताना येतो.
काय बोलावे / काय ते चालावे / वाचेला मुकावे /गुलामांनी
पुढे एक वागे /मागे एक वागे /बहुतची सोंगे /मिरविशी
अभंगाचा मूळ स्थायीभाव जपून अश्या रचना आपल्या मनावर त्यांच्या मनातील भावना बिंबवण्यात यशस्वी होत राहतात. त्यांच्या रचना आंतरात्याम्याशी भांडतात, बोलतात वास्तवतेशी अतिशय प्रामाणिक राहण्याचा प्रयत्नही करतात. ह्या जागतिकीकरणाच्या उरफोडी स्पर्धेत.
चिल्लीम तोंडाला / अन होतो तल्लीन /समाधी लागल्यासारखा /भाकरीसाठी……
मानवी संवेदना मांडताना लेखणी अधिक खोल होत जाते, आपला आवाज निभिडपणे मांडताना शोषितांचे दु:ख ठळकपणे उमटवते. कारण आज फक्त ग्रामीण कवितेत अडकलेला कविवर्ग खरतर ग्रामीण भागातून स्थलांतरीत झालेल्या अन त्यातून निर्माण झालेया समस्यांची उकल करताना फारसा आढळत नाही त्यामुळे कवितांमध्ये तोचतोचपणा फार आलेला आहे. म्हणून महाद्वारचे वेगळेपण शब्दाशब्दातून जाणवत राहतात.
कळतही नाही मेणबत्तीचे पाय का विरघळतात? / किनार्यावरी कुठेही / कोणी उपाशी नसावा / सुख वाटण्यास येथे बोटे हजार असावी /
भरल्या कांकनाची / गोंदण होतात झाडे /भरल्या संसारातून / उध्वस्त होतात झाडे
अश्या अनेक ओळी मनाला डागण्या द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. ग्रामवास्तव बदलाचे पडघम त्यांच्या प्रत्येक रचनेत अभिव्यक्त होताना दिसतात.
जाणिवांचे गाठोडे सोडताना कवी महाद्वारातून कधी बाहेर पडतात अन महाद्वारबाहेरच्या जगातल्या वास्तवतेलाही तितक्याच समर्थपणे स्पर्श करतो. मुळ धागा न तोडता कसे आपल्या कवितेशी एकनिष्ठ राहतात ह्याची प्रचिती पुस्तकाची पाने पलटताना जाणवत राहते. वास्तविक पाहिले तर एखाद्या प्रचलित चांगल्या गोष्टीची एखादी वाईट बाजू असू शकते पण ते मांडताना आपले प्रतिबिंब त्यात पाहिल्याशिवाय कवीला व्यक्त होता येत नाही. त्यामुळे निखळ सत्य मांडणारे अनेक कवी आहेत. सगळ्यांच्या कविता मला कमी-अधिक प्रमाणात आवडतात त्यात बाळसाहेब लबडे सुद्धा अगदी सहज भावतात.
थीमबेस कविता अनेकानी आजवर लिहिल्या त्यात प्रामुख्याने काही नावे आवर्जून घ्यावी लागतील अन तू म्हणजे, जेजुरी – अरुण कोल्हटकर , व त्यानंतरच्या थीम बेस कवितेत भक्तीक्षेञातली महाद्वार सुद्धा आता तितक्याच ताकदीने बेमालूपणे मिसळून जाईल ह्यात शंका नाहीच.जेजुरी नंतर मराठी कवितेचा नवा टप्पा म्हणून महाद्वार म्हणता येईल.
साहित्य हा समाजाचा आरसा आहे, त्याची प्रचिती महाद्वार वाचताना नक्कीच येते. प्रत्येक कवितेला अनुरूप चित्र हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आपले अनुभवविश्व समृद्ध करणार्या कविता वाचताना आपल्या समाजाचा दु:खभोग जसा अधोरेखित होत जातो तसाच भक्तीच्या नावाखाली चाललेला बाजार पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभा ठाकतोच.
शोषितांकडे डोळसपणे पाहिले तर त्याला संपन्नतेची, सुबत्तेची एक सुरक्षित किनार लाभलेली असते अन त्यातून शोषणाची निर्मितीही होत असते. शोषण मांडताना महाद्वारमध्ये अभिव्यक्ती हि कुठे कमी पडली असे वाटत नाही.
“ज्या झाडांखाली पुरलेली असतात / माणसे खत म्हणून / त्यांना चिणून मारण्याच्या आरोळ्या/ पोहचत नाहीत माळ्यापर्यंत / हि बधिरता आणि हा सांस्कृतिक / मुखवट्याचा अविनाशी उत्सव / माणसांच्या पानगळीच्या दिवसात / हे शोषणाचे ऋतू कसे वहात असतात / हे श्रमाचे थेंब कष्टकर्यांचे / उभे करताहेत / त्रिलोकात जिवंत अभंग“
ह्यातील सगळ्या प्रतिमा, प्रतीके, विचार, भावना, आकांत, आक्रोश, उर्मी, नवी दिशा, वास्तव पटवून देण्याचा आग्रह ह्याचा प्रत्यय प्रत्येक रचना वाचताना येत राहतो.
त्यामुळे ही कविता आगळीवेगळी आणि समकालीन प्रश्नांना वाचा फोडणारी चालती बोलती “वारी डॉट कॉम” ठरते. ह्या “सुवर्णपिंपळाला” रसिकांच्या “आधाराच्या पारंब्या” लाभून “विश्वरूप” दर्शन घडो हीच सदिच्छा.
विजय प्रकाशनाचे प्रकाशक सचिन उपाध्याय ह्यांचे अतिशय कौतुक की त्यांनी अतिशय दर्जेदार निर्मितीला न्याय दिला. पुस्तकाची उतम बांधणी, समर्पक रेखाटने ह्या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत. सध्याच्या काळात कवितेला चांगला प्रकाशक मिळत नाही अशी ओरड असताना आपल्या प्रकाशनाच्या वतीने महाद्वारची निर्मिती एक सुखावणारा अनुभव आहे.
. देवा झिंजाड ९८८१२३५३७७